नाते मजला, विणावयाचे आहे

Submitted by निशिकांत on 1 December, 2019 - 23:41

आकाशाशी नाते मजला, विणावयाचे आहे
पंख लावुनी मला जरासे उडावयाचे आहे

 प्रेम कसे हे ! परवान्याला जळावयाचे आहे
शमा म्हणे, तो जळण्याआधी, विझावयाचे आहे

वास करावा क्षितिजावरती, मनी जागली आशा
नभास धरती कुठे भटते, बघावयाचे आहे

नैवेद्याच्या ताटामधले देव कधी का खातो?
तेच जेवुनी पोट भुकेले, भरावयाचे आहे

लज्जित आहे, दुसर्‍यांसाठी कांही केले नाही
मलाच माझ्यापासुन थोडे दडावयाचे आहे

पानगळीचा मोसम येता, उदास मी का व्हावे?
नवी पालवी फुटण्यासाठी, गळावयाचे आहे

खूप जमवले सभोवताली, जीवन जगता जगता
जरी वाटते सर्व कळाले, वळावयाचे आहे

भोग कधी का कुणास टळले, होम हवन करण्याने?
विठ्ठलासही जणीबरोबर दळावयाचे आहे

शायरास का वाटत असते, ग़ज़लांना तो लिहितो?
"ग़ज़ला लिहिती शायरास" हे, कळावयाचे आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम गझल झाली

तुमच्या गझल फारच छान व सुंदर असतात
जसे मनातले बोल तुम्ही तुमच्या गझल मध्ये लिहिता

असेच लिहित रहा

आम्ही नक्कीच आनंद लुटत राहू

शुभेच्छा

खूप छान !!
भोग कधी का कुणास टळले, होम हवन करण्याने?>>अगदीचं पटले.