देवा जाग्यावर...३ (अंतिम)

Submitted by हरिहर. on 3 December, 2019 - 02:55

देवा जाग्यावर - २
मी आणि नाना खांद्यावर सॅक अडकवून घाईत जीना उतरलो. आज कॉलेजला जरा उशीरच झाला होता. नानाने पार्किंगमधून बाईक बाहेर काढली तेवढ्यात समोरच्या दुकानातल्या भाभींनी आवाज देवून सांगीलतले “अप्पा, भाभींचा फोन होता काल. त्या आज साडेदहा वाजता शिवाजीनगरला येणार आहेत. तुला घ्यायला बोलावलं आहे” या दुकानवाल्या भाभी फार प्रेमळ होत्या पण तितक्याच विसरभोळ्या. कालचा निरोप त्या आज देत होत्या. मी नानाचे घड्याळ पाहीले. दहा वाजले होते. सगळाच घोटाळा झाला होता. माझी होणारी बायको अर्ध्या तासात शिवाजीनगरला येणार होती आणि मला पोहचायला तासभर तरी लागणार होता. मी नान्याला घाई केली आणि त्याला मागे बसायला सांगून गाडीला किक मारली. कॉलेजला दांडीच बसणार आज हे ओळखून नान्याने आमच्या सॅक्स भाभींच्या दुकानात ठेवल्या व तो गाडीवर बसत म्हणाला “अप्पा, मला दत्तमंदिरासमोर सोड आणि तू तसाच पुढे जा गाडी घेवून. मी रिक्षाने येईन घरी” ही कल्पना चांगली होती. मी ट्रॅफीकबरोबर खो खो खेळत गाडी सुसाट सोडली. अर्ध्या तासात मी दत्तमंदिरासमोर गाडी उभी केली. नान्याची उतरायची वाट पहात मी गाडी रेझ करत राहीलो.
नान्या खाली उतरत म्हणाला “च्यायला, वहिनीच्या नुसत्या नावाने काट्यावर आल्यासारखा काय करतो अप्पा. गाडी बंद कर जरा. आवाज ऐक काय गोड आहे”
“नान्या मरुदे तो गोड आवाज. तू काय लग्नाअगोदर माझा काडीमोड करतो की काय” म्हणत मी घाई केली. पण नान्याने हात पुढे करुन गाडीची चावी काढली. नान्यापुढे कधी कुणाचे चालले आहे? मी निमूट गाडी स्टँडवर लावली व कोण गातय ते शोधायला लागलो. रस्त्याच्या पलिकडे एका दुकानासमोर साधारण माझ्याच वयाची एक मुलगी फुटपाथवर बसुन कव्वाली गात होती. तिच्या शेजारी ढोलकवर बसुन एक पन्नाशीचा माणूस तिला साथ देत होता. समोरच स्टिलचे एक ताट होते. त्यात काही चिल्लर दिसत होती. येणारे जाणारे त्या दोघांना ओलांडून जात होते. कुणी एखादा त्या ताटात नाणे टाकत होता. चार पाच बिनकामाची माणसे बाजूला उभी राहून तिची कव्वाली ऐकत होती. साडे दहा-अकराची वेळ असल्याने रस्त्यावर भरपुर वर्दळ होती. नान्याने माझे मनगट पकडले व रस्ता ओलांडला. आम्ही अगदी त्या दोघांच्या समोरच जावून उभे राहीलो. त्या पोरीचा आवाज जरा पुरूषी होता पण त्यामुळे कव्वालीला चांगलाच उठाव मिळत होता. मुळ कव्वाली मी खुपदा ऐकली होती पण ही पोरगी त्या कव्वालीत नसलेल्याही जागा, हरकती अगदी सहजतेने घेत होती. मधेच तिने त्या कव्वालीत नसलेला एक भलताच शेर अगदी बेमालूमपणे त्यात मिसळला. सुरांची आणि शायरीची उत्तम जाण असल्याशिवाय हे शक्य नव्हते. पण तिला साथ देणारा माणूस मात्र होळीचे ढुमके वाजवावे तशी साथ करत होता. त्या पोरीने विणलेल्या रेशमी कव्वालीला त्या माणसाने बारदानाचे ठिगळ लावले होते. सुरेल आवाजातली ती कव्वाली ढोलकमुळे कानांना त्रास देत होती. तरीही नान्या मजेत उभा राहून कव्वालीचा आनंद घेत होता.
मी नान्याच्या हातातली गाडीची चावी घ्यायचा प्रयत्न करत म्हणालो “नान्या, काय ऐकतो हे. त्या माणसाने सगळी डाळ नासवलीय ढोलकामुळे. तू बस ऐकत. मला जावूदे बाबा. जोडे खायला लागतील नाहीतर बायकोचे”
तोवर त्या मुलीने कव्वाली आवरती घेतली होती. अपेक्षेप्रमाणे थाळीत पैसे जमा झाले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
नान्या तिला म्हणाला “क्या रुबी, ये गधा कहासे पकडके लायी तू? लगता है आज तू खाली पेट रहेगी दिनभर”
थाळीतील चार पाच नाणी गोळा करत ती मुलगी म्हणाली “बाप है मेरा. उसकू कायकू फिकर रहेंगी रोटी की, ठर्रे का पैसा जमा होतैच कल्टी मारेगा ये. तू आज कैसे आया इधर भैय्या?”
नान्याने खिशातून पन्नासची नोट काढून तिच्या हातात दिली व म्हणाला “तेरे भाई को क्यू साथ नै लायी तू? और ये पचास की नोट युही नही थमायी, ओ गफलत की नींद में सोनेवाले सुना कडक आवाज मे. तेरे बाप को उठा पहले वहासे”
मी नान्याला म्हणालो “तू ओळखतोस हीला? तू या गल्लीत कुठे कुठे ओळखी वाढवल्या आहेत काय माहीत. मला निघूदे, तू बस कव्वाली ऐकत”
नान्याने माझी शर्टची बाही धरुन ओढले व म्हणाला “तू कुठे जातोस? वहिनी येईल बसने बरोबर. नाना असताना काळजी कसली करतोस? चल ढोलकवर बस. कडक हात चालला पाहीजे एकदम”
मला क्षणभर नान्याला वेड लागले आहे की काय असे वाटले. की माझ्या ऐकण्यात चुक झाली होती? पण मी जे ऐकले होते तेच नान्या म्हणाला होता. त्या पोरीचा बाप उठून उभा राहीला होता. उभ्या जागी तो गारुड्याचा नाग झुलावा तसा झुलत होता. त्याने सकाळीच झोकली असावी. तो नान्याकडे आणि माझ्याकडे अतिशय लाचार नजरेने पहात होता. ती पोरगीही नान्याकडे आश्चर्याने पहात होती.
नान्या तिला म्हणाला “हा माझा मित्र आहे. खतरी तबला वाजवतो. तू गा. हा बसेल ढोलकवर”
रुबी आता माझ्याकडे पहायला लागली. तिला नान्याच्या विक्षिप्तपणा माहित असावा पण तो इतका वेडेपणा करेल असे तिलाही वाटले नसावे. कारण तिच्या डोळ्यात आश्चर्य व माझ्यासाठी सहानभुती दिसत होती.
ती नान्याला म्हणाली “छोड ना भैय्या, उसकू कायकू परेशान करतै तुम?”
माझी रदबदली त्या रस्त्यावर कव्वाली गाणाऱ्या पोरीने करावी याचा मला राग आला. मी नान्याला चिडून म्हणालो “नान्या, हे काही गावकीचे भजन नाहीए रामनवमीचे. आणि तू दिगूभटाच्या भैरवीला साथ कर म्हटल्यासारखा आग्रह काय करतोय? चल, चावी दे. मला निघायला हवे”
नान्याने शांतपणे माझ्याकडे पाहीले आणि म्हणाला “त्या मंडपात खडीसाखर लवंगा चखळत, हाताला पावडर लावून तबला बडवतोस तू तेंव्हा राम प्रसन्न होतो काय रे तुझा आणि या रुबीबरोबर बसलास जरा वेळ तर तो राम काही कोदंड घालणार आहे का तुझ्या टाळक्यात? तिचा बाट लागेल असे नखरे करतोय उगाच. भटा बामणांच्या वरतान करायला लागला तू तर. चल बस. मी पहातो कशी तुझी अब्रू जाते या धुळीत ते. बस येथे”
माझ्या विरोधाला न जुमानता नान्याने माझे खांदे दाबत मला त्या ढोलकसमोर बळेच बसवले आणि पहारेकऱ्यासारखा माझ्या पुढेच उभा राहीला. रस्त्यावरुन जाणारी सारी रहदारी फक्त आणि फक्त माझ्याकडेच उपहासाने हसत पहात आहे असे मला वाटायला लागले. या पोरांचे काय चालले आहे हे पहायला काही बिनकामाची माणसेही तेथे गोळा झाली होती. मी जवळ जवळ त्या पोरीच्या मांडीला मांडी लावूनच बसलो होतो. नान्याने पुन्हा इशारा करताच मी त्याच्याकडे आणि मग त्या पोरीकडे अतिशय हतबल होऊन पाहीले. तिला इतक्या जवळून पहाताना मला तशा अवस्थेतही वाटून गेले की या पोरीला लख्ख धुवून, निटनेटकी केली तर लाखात नाही पण हजारात नक्कीच उठून दिसेल. सुरमा घातलेले टप्पोरे व करारी डोळे, करारी डोळे असुनही चेहऱ्यावर अत्यंत सालस भाव, सावळा रंग. सावळा कसला, काळाच म्हणावा लागेल. डोक्यावर तेल न लावलेले व टोकाला चमकदार पिवळट झालेले केस, कानात लांबलचक झुबे, अंगावर मळकट हिरव्या रंगाचा स्वच्छ पंजाबी ड्रेस, त्यावर वापरुन वापरुन घडयांनी सुरनळी झालेली पिवळी ओढणी, हातात ऍल्यूमिनिअमची बांगडी व पायात काळा दोरा. रंग काळा असल्यामुळे जास्तच गुलाबी दिसणारा तिच्या हाताचा तळवा पाहून मला कृष्णाच्या चित्राची आठवण झाली. मी ढोलक कधी जवळ घेतोय याची रुबी वाट पहात होती व मी तथाकथीत सज्जन समाजात अत्यंत बदनाम असलेल्या त्या गल्लीत तिच्याशेजारी फुटपाथवर धुळीत मांडी घालून असहाय होवून बसलो होतो.
नान्याने नुसत्या हुंकाराने तिला इशारा केला आणि तिने कव्वालीचा पहिला शेर गायला सुरवात केली. डाव्या हातातली घुंगरांची पट्टी मांडीवर हलकेच आपटत तिने ताल धरला होता. काहीही असो पण पोरीच्या आवाजात खरच जादू होती. कुणी जाणकाराने तिच्या आवाजाला चांगले घासुन पुसून तेज केले असते तर पिंपळपानावर विश्व तरावे तसे त्या आवाजावर रुबीचे अख्खे कुटूंब नक्कीच तरले असते. शेर संपवून तिने पहिले कडवे गायला सुरवात केली तरी मी मख्खसारखा नुसता बसुन होतो. गायीच्या पाठीवरुन हात फिरवावा तसे त्या ढोलकाच्या एका कातडी बाजूवर मी उजवा हात फिरवत होतो. रुबीचे पहिले कडवे संपून ती पुन्हा धृपदावर आली तरी माझा ढोलक सुरु होईना. हे पाहून नानाने पुढे होवून माझा खांदा हलवला. काहीही केले तरी आता आपली सुटका होत नाही हे लक्षात येताच मीही मग निर्ढावल्यासारखा निट आरामशिर बसलो. समोरचा ढोलक पुढे ओढून तो व्यवस्थित उजव्या मांडीखाली घेतला. एवढ्या गोंगाटातही हलकेच चाट वाजवून ढोलक कोणत्या पट्टीत लागलाय याचा अंदाज घेतला आणि “होवूनच जाऊदे आता” अशा नजरेने मी रुबीकडे पाहीले. तिलाही अंदाज आल्याने तिने धृपद न घेता तेच कडवे पुन्हा घेतले. मी छातीवर हनुवटी दाबून, डोळे बंद करुन डोके शांत केले. कडवे पुर्ण करुन रुबी समेवर आली आणि मी एकदम कडक पंजाबी उठान वाजवून चक्क केरवातली लग्गी सुरु केली. कव्वालीला केरवा लग्गीची साथ पाहून नान्या एकदम खुष झाला. माझ्या कानावर त्याची दाद आली. या फुटपाथवर तसेही कुणी मला ओळखत नव्हतेच आणि राममंदिरातील मंडपात असणारी जाणकारांची जरब तर अजिबातच नव्हती. रुबीलाही तालाची उत्तम जाण दिसत होती. त्यामुळे मी तिच्या कव्वालीच्या साथीला वाट्टेल ते प्रयोग सुरु केले. दहा मिनिटे झाली होती. मी छातीवर दाबलेली हनुवटी अजुन वर उचलली नव्हती ना घट्ट बंद केलेले डोळे उघडले होते. माझे कान रुबीच्या आवाजाचा मागोवा घेत होते आणि बोटे त्याबरहुकूम ताल उमटवीत होती. आजूबाजूला असणारा कोलाहल हळूहळू मला ऐकू येईनासा झाला. काही वेळाने रुबीचा आवाज आणि त्याला साथ करणारा माझा ढोलक यांची भुमीका नकळत बदलली. आता माझा अंदाज घेवून रुबी गात होती. जणू काही तिचा आवाज आता माझ्यासाठी लेहऱ्याचे काम करत होता आणि मी ढोलकवर तबल्याचे बोल थोडा फार फरक करुन तिच्या कव्वालीच्या चालीच्या साथीत वापरत होतो. येथे काहीही बंधने नव्हती की कुणी नावे ठेवणारे नव्हते. कुठे बसलोय, कुणाला साथ करतोय हे मी आता विसरलो होतो. तबल्यापेक्षा ढोलकमधे काही गोष्टी सहजसोप्या वाटत होत्या. बोल जरा वेगळ्या प्रकारे उमटत होते. ही ढोलकची मजा जरा आगळीच होती हे माझ्या लक्षात यायला लागले होते. त्याचा पुरेपूर फायदा आणि मजा मी घेत होतो. मी जवळ जवळ पंधरा मिनिटे ढोलक वाजवत होतो. या दरम्यान रुबीने कव्वालीची दोन आवर्तने पुरी केली असावीत. तिने शेवटची सुरावट घेतली आणि मी चक्क धुमाळीचे दोन बोल वाजवून हात वर केले. आजूबाजूने टाळ्यांचा आवाज येताच मी कुठे बसलोय याचे मला भान आले. नविन जागी नुकतेच झोपेतून उठल्यावर जो भांबावलेपणा येतो तसे मला झाले. नान्याने माझ्यासमोर चवड्यावर बसुन लहान मुलाला च्यावम्याव करावे तसे माझे दोन्ही कान धरुन माझे डोके पुढे मागे हलवले. कान न सोडताच नान्या म्हणाला “बहार, बहार उडवलीस अप्पा. भयंकर भारी हाणला ढोलक तू आज”
मी आजूबाजूला पाहीले. बरीच गर्दी गोळा झाली होती. बहुतेकांच्या नजरेत कौतूक दिसत होते. माझे कपडे वगैरे पाहून त्यांचा समज झाला असावा की एका भिक मागणाऱ्या मुलीला हा पोरगा मदत करतोय. काही जणांना खरेच माझ्या वाजवण्याचे कौतूक वाटलेले दिसले. अनेकांनी खिशातून दहा-विसच्या नोटा काढून रुबीच्या हातात दिल्या. काहींनी ताटामधे चिल्लर फेकली. काही लोकांनी माझ्या अंगावरही काही नाणी टाकली. एक दोन जणांनी माझ्या समोरच्या ढोलकवर पैसे ठेवले. हळू हळू गर्दी पांगली आणि माझी नजर त्या उरलेल्या बघ्यांमधे उभ्या असलेल्या माझ्या होणाऱ्या बायकोकडे गेली आणि मी चपापलो. मला अशा ठिकाणी, अशा अवस्थेत बसलेले पाहून खरे तर तिने माझी ओळखही नाकारली असती तरी मला गैर वाटले नसते, पण तिच्या डोळ्यात माझ्याविषयी आदर दिसत होता. आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याविषयी असे आदराचे भाव पहाणे हे खरच छान असते. नान्या माझ्या कानात कुजबूजला “मी सांगितलय वहिनीला सगळे. काळजी नको करुस”
एवढ्यात कुणी तरी माझ्या अंगावर एक रुपयाची तिनचार नाणी फेकली. फेकणाऱ्याचा हेतू वाईट असेल असे नाही पण बायकोसमोर झालेला प्रकार पाहून मला शरमल्यासारखे झाले. मी नान्याला बाजूला करुन खाली पडलेली नाणी गोळा केली. ढोलकवर असलेल्या एकदोन नोटाही उचलल्या. हातातल्या त्या पैशांकडे पाहून मला जाणवले की गावाकडे असलेले माझे घरचे लोक, त्यांची समाजातली पत, मळ्यात असलेली थोडीफार शेती या गोष्टी काही अहंकार बाळगण्याएवढ्या मोठ्या नाहीत. अंगावर पडलेले ते पैसे पाहून मला लहानपणी आजोबांनी वारंवार सांगीतलेले विचार आठवले. आजोबा म्हणायचे “दारावर आलेल्या कुणाला मोकळ्या हाताने जावू देवू नये अप्पा. दहा विस पैसे द्यावेतच. आणि पैसे हातावर निट ठेवून त्यांना मनोमन नमस्कार करावा. म्हणजे ‘मी देतो’ हा अहंकार आपल्यात येत नाही आणि समोरच्यालाही लाचार असल्यासारखे वाटत नाही. त्यांच्यामुळेच आपल्याला दानाचे पुण्य मिळाले की नाही! म्हणून नमस्कार करायचा” आजोबा काय म्हणायचे त्याचा अर्थ आज इतक्या वर्षांनंतर मला समजला. अंगावर पडलेल्या त्या नाण्यांनी मला माझी पायरी दाखवली होती. मी रुबीकडे पाहीले. ती खुष दिसत होती. आता मला ती रस्त्यावर कव्वाली गाणारी पोरगी एकदम जवळची, आपली वाटायला लागली. त्या गल्लीत बसल्याचा उरला सुरला संकोच कुठल्या कुठे गेला. नान्याने पुढे केलेला हात धरुन मी जमिनीवरुन उठलो. बुड झटकले. ढोलक उचलला व रुबीकडे दिला. हातातले पैसेही तिच्यासमोर धरले. माझ्यातला हा बदल पाहून नान्या सुखावला.
“चल अप्पा, तुला आणि वहिनीला चहा पाजतो झकास” म्हणत नान्याने रुबीलाही सोबत चलण्याची खुण केली. मला वाटले होते की नान्या आम्हाला घेवून कुठेती चांगल्या हॉटेलमधे घेवून जाईल पण तो गल्लीच्या आतील भागाकडे वळला. आता मला त्या गल्लीविषयी फारसे काही वाटत नव्हते. गळ्यात ढोलक अडकवलेल्या रुबीबरोबर नान्या अगदी जवळची मैत्रीण असावे तसे चालत होता. त्यांच्या मागे मी आणि माझी बायको होती. जरा अंतरावर नान्या एका फडतूस हॉटेल समोर थांबला आणि पायरीवर आरामात टेकला. शेजारी रुबी. आम्ही दोघेही तेथे बसलो. जरा वेळाने एका पोऱ्याने काचेच्या ग्लासात चहा आणून दिला. तेथे पायरीवर बसूनच आम्ही चहा प्यायलो. रुबी तिच्या वेगळ्या टोनमधल्या हिंदीत मला खुपदा ‘शुक्रीया भैय्या’ म्हणत होती आणि मी रेड लाईट एरीयातल्या फडतूस हॉटेलच्या पायरीवर बसून चहा पिणाऱ्या बायकोकडे पहात होतो. मला आजही हेच वाटते की त्यादिवशी नान्याने जो प्रकार केला तो मुद्दाम केला असावा. त्याने पंधरा मिनिटात त्या फुटपाथवरच्या धुळीत बसवून माझ्या चष्म्याच्या काचांवर साचलेली धुळ झटकली होती. तेथील बायकांविषयी, त्यांच्या मुलांविषयी माझ्या मनात असलेली घृणा, गैरसमज दुर झाले होते. नान्याच्या या एका कृतीने मला खऱ्या माणसात आणले होते.

फाऊंडेशनचे ते वर्ष पुर्ण करुन परिक्षा द्यायच्या भानगडीत न पडता आम्ही गावी परतलो. या एका वर्षात नान्याने मला हज्जारदा अडचणीच्या प्रसंगात टाकले, कठीण वेळी सावरले. माझे संकट त्याला त्याचे वाटायचे व माझा आनंद तो साजरा करायचा. माझी बहकलेली अक्कल नान्याने खुपदा ताळ्यावर आणली. धमालही खुप केली आम्ही. एकदा रात्री जेवायला म्हणून बाहेर पडलो आणि एका गार्डनमधे सुरु असलेल्या लग्नाच्या रिसेप्शनला नान्याने मला ओढले. जेवायला काय आहे याची चौकशी करुन आम्ही जेवायचा विचारच करत होतो एवढ्यात लॉनच्या मध्ये किशोरची गाणी गाणारा गायक व त्याचा ऑर्केस्ट्रा दिसला. सगळ्या पाहूण्यांनी पुर्ण दुर्लक्षीत केलेला तो गायक घेतल्या पैशाला जागून गात होता. सगळ्यांचे लक्ष स्वागत करण्यासाठी उभ्या असलेल्या वधू-वरांकडे होते. नान्या व मी दोन खुर्च्या टाकून गायकासमोर बसलो. नान्याची काळजातून जाणारी दाद पाहून गायक खुलला. नान्याही त्याला वेगवेगळ्या फर्माईशी करत होता. सगळ्या समारंभात आमचा हा वेगळाच समारंभ सुरु होता. जेवायचे भान विसरुन मी गाणी ऐकत होतो. मध्येच नान्याने फर्माईश केली “साब आपके आवाज मे जो दर्द है उसका क्या कहना! ‘तू औरो की क्यु हो गयी’ सुनाईए थोडा साहब” नान्याची फर्माईश ऐकून गायकानेही सुरेख सुर लावून आर्तपणे गाणे छेडले. तोही आता चांगलाच रंगात आला होता. पहिले कडवे होता होता समारंभातील काही माणसे ऑर्केस्ट्राकडे रागाने धावली तेंव्हा कुठे आम्हाला आमची चुक समजली आणि सुग्रास अन्नावर पाणी सोडून आम्ही कसाबसा तेथून पोबारा केला. बिचारा गायक. त्याची बिदागी मात्र नक्कीच बुडाली असणार. अशा अनंत प्रसंगात नान्याने मला गुंतवले व बाहेरही काढले. तर हे असो. इंजिनिअरींगची डिग्री घेतल्यानंतर ‘मी वर्षभर मला वाटेल ते करणार’ हा माझा निर्णय मी खरा केला होता. आता बाबा जे म्हणतील त्याला नकार द्यायला माझ्याकडे काही कारण नव्हते. बाबांनी त्यांच्या मित्राला सांगून मला एका नावाजलेल्या कंपनीत चिकटवले आणि मी माझ्या आयुष्यातील पहिल्यावहील्या नोकरीच्या निमित्ताने दुर गुजरातमध्ये असलेल्या साईटवर निघून गेलो. जायच्या अगोदर नान्याच्या मळ्यातील खळ्यामध्ये बसुन मनसोक्त बिअर प्यायलो. हसलो, गप्पा मारल्या. नंतर गळ्यात पडून रडूनही झाले. मी गेल्यावर नान्याने डेअरीच्या कामात लक्ष घालून बापूंना जरा मोकळे केले. साईटवर असताना मला होणाऱ्या बायकोची व बाबांची आठवण यायच्या ऐवजी गावी असलेल्या मित्रांची, नानाचीच जास्त आठवण यायची. आजूबाजूला असणाऱ्या गुजराती बोलणाऱ्यांमुळे जास्तच एकाकी वाटायचे. फोन कॉल महाग असुनही नान्या आणि मी शुक्रवारी तास तासभर फोनवर बोलायचो. बापूंनी नानासाठी मुली पहायला सुरवात केली होती, त्यावर पांचट विनोद करायचो. आयुष्य संथ वाहणाऱ्या नदीसारखे निर्धोक वाहत होते. कुठेही खळखळ नव्हती. मला या साईटवर वर्ष होत आले होते. लवकरच काम संपेल असे वाटत होते. या वर्षभरात माझ्या गावाकडे काही चकराही झाल्या होत्या. आमच्या कंपनीची पुण्याजवळच एक साईट सुरु होणार असल्याने मी आनंदी होतो.

गुरवार होता. मी साईटवर निघणारच होतो इतक्यात ऑफीसवरुन एक माणूस “अप्पासाहेब, तुमचा फोन आहे” हे सांगत पळत आला. कुणाचाही फोन आला तरी तो शुक्रवारीच यायचा. असा मधेच कसाकाय फोन आला? कुणाचा असावा? याचा विचार करत मी ऑफीसमध्ये येवून फोन घेतला. आवाज ओळखीचा वाटला.
“अप्पा, मी बजाबा बोलतोय. बापूंचा गडी. तुमी निघता का लवकर? नानाला जरा जास्त हाय”
मी हडबडलो “नान्याला काय झाले? आणि तोच का नाही आला फोनवर? तु कुणाच्या फोनवरुन बोलतोय बजाबा?”
बजाबाचा आवाज जड वाटला “मी तुमच्या घरीच आलो व्हतो निरोप सांगायला पन तुमचे वडील म्हनले की येथून फोनच कर. नानाचं जास्त हाय त्यामुळे तो न्हाय आला”
माझा जीव घाबरा झाला. मी नान्याची चौकशी करत होतो आणि बजाबा उत्तरे देत होता पण चुकूनही त्याने “काळजी करण्यासारखे काही नाही” असे माझ्या समाधानासाठीही म्हटले नव्हते. मी त्याला बाबांकडे फोन द्यायला सांगीतले. बाबांना नक्कीच माहिती असणार होती. बाबा म्हणाले “तू निघ अप्पा. घाई करु नकोस. काळजी करण्यासारखे काही नाहीए. पण भेटून जा नानाला. बापूंनाही बरे वाटले”
बाबाही मोघमच बोलले होते. काळजी करु नको म्हणत होते, बापूंना बरे वाटेल असही सांगत होते. सगळाच गोंधळ होता. मी साईटवर जाणे रहीत केले आणि रुमवर येवून बॅग भरायला सुरवात केली. आता या नान्याने नक्की काय उद्योग करुन ठेवलाय हे समजायला मार्ग नव्हता. बाबांनीही काही सांगीतले नव्हते. उगाच जीवाला घोर लागला होता. फोन आल्या आल्या जरी मी निघालो असलो तरी जाण्यायेण्याची साधने पहाता मला किमान विस तास तरी लागणार होते. तोवर हा छातीवरचा दगड असाच पेलायला हवा होता. इतक्या दुरुन बाबाही यायला लावणार नाही याचीपण खात्री होती. अशा वेळी कुविचारच का येतात मनात कुणास ठाऊक. मी अठरा-विस तासांचा प्रवास करुन पहाटे गावी पोहचलो. मला चैन पडत नव्हती. मी अंघोळ करुन दोन तिन तास झोप काढणे अपेक्षीत होते पण मी बाबांनाही झोपू दिले नाही. बॅगा घरात टाकल्या व बाबांच्या गाडीची चावी घेत मी विचारले “कोणत्या हॉस्पिटलला ठेवलय नानाला? पुण्याला का नाही हलवले त्याला?”
माझ्या हातातली चावी घेत बाबा म्हणाले “अप्पा, जरा बस. मी काय सांगतोय ते ऐक शांतपणे”
आता माझ्याबरोबर कदाचित बाबांनाही ताण झेपत नसावा. पटकन सांगून या ताणातून मोकळे व्हावे या हेतूने बाबा म्हणाले “अप्पा, नाना परवा रात्री गेला. काल संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले. बापू म्हणत होते अप्पाची वाट पाहू पण सगळे आले होेते त्यामुळे मीच ‘अप्पासाठी थांबू नका’ म्हणून सांगीतले. उशीर झाला असता. जात्या जीवाचे कशाला हाल करायचे?”
माझं डोकं सुन्न झालं. डोळे कोरडे पडले. घशालाही कोरड पडली. छाती दडपल्यासारखी झाली. मला बाबा सांगत होते त्यावर विश्वासच बसेना. नाना असा कसा जाईल मध्येच उठून? काय खेळ आहे हा विचित्र? माझ्या पोटात ढवळून यायला लागले. रडूही फुटेना. बाबांनी पोटाशी धरुनही माझी पोरके झाल्याची भावना काही जाईना. मला बळेच अंघोळ करायला लावून बाबा म्हणाले “तू झोप दिड-दोन तास. बरे वाटेल. सकाळी नवू वाजता काळांब्यावर जावे लागेल सावडायला”
‘नानाची राख सावडायची’ या कल्पनेनेच मला रडू फुटले. कोरड्या डोळ्यांचा बांध फुटला.

बाबांकडून कळाले की गावच्या केटी बंधाऱ्यात वाडीतली कुणी बाई आणि तिची मुलगी पाय घसरुन पडली. बैल पाण्यावर घेवून गेलेल्या नान्याने काहीही विचार न करता पाण्यात उडी मारुन माय-लेकींना वाचवले. वाडीत नान्याचे खुप कौतूकही झाले. दुपारी नाना व्यवस्थित जेवला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याला सणसणून ताप भरला. हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत नाना बेशूद्धीत गेला. डॉक्टरांना निदान होत नव्हते. रात्रभर वाट पाहून सकाळी पुण्याला हलवायचे ठरवले होते. आजार गंभीर आहे हे समजलं असलं तरी काही वेडेवाकडे होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. रात्री बापू आणि आई दिड वाजेपर्यंत नान्याशेजारी बसले होते. त्यांना नर्सने बाहेर बसायला सांगितले. पहाटे केंव्हा तरी नाना गेला. आई बापू बाहेर बसलेले होते, त्यांनाही सुगावा लागू न देता नाना गेला. न बोलता गेला. आम्ही जेंव्हा जेंव्हा वारसी बंधूंची कव्वाली ऐकायचो तेंव्हा “शब को मेरा जनाजा जाएगा यु निकलकर, रह जाएगे सहर तक दुश्मन भी हात मलकर” हा शेर ऐकला की नान्या म्हणायचा “अप्पा, माणसाने असं निघून जायला पाहीजे. कुणाला खबर नाही की त्रास नाही. गुपचूप नाहीसे व्हावे. नंतरही काही विधी वगैरे नाही. नुसती राख, फक्त राख”
नानाने आपले शब्द खरे केले. दुश्मन तर बाजूलाच, आई-बापाला चकवून अंतराळी झाला नान्या.

नाना म्हणायचा ती ‘नुसती राख, फक्त राख’ सावडायला मी बाबांना सोबत घेवून काळांब्यावर गेलो. त्या सगळ्या विधीत ना मला रस होता ना गेलेल्या नानाला कधी होता. मी बजाबाला नानाची रक्षा आणून द्यायला सांगीतली होती. ती त्याने निघताना आणून दिली. तो तांब्यांचा लहानसा गडू माझ्या हातात देताना भरल्या डोळ्याने बजाबा म्हणाला “बापूसायबानी त्यांच्या सवतासाठी गंगा आनली व्हती काशीहून. पर नानासाठी गडू फोडावा लागला. कशी इपरीत तऱ्हा हाय दैवाची बघा. बापाच्या खांद्यावर पोरानी कौतूकानी बसायचं का असं जायचं? या साठी अस्तोय व्हय बापाचा खांदा! पार खचलं बापू या वझ्यानं”

सगळ्या मित्रांनी खुप विनवूनही मी घरी न थांबता तिसऱ्याच दिवशी गाव सोडले. नानाला सोबत घेवून सज्जन गड गाठला. येथे नानाच्या आणि माझ्या खुप आठवणी होत्या. एकदा येथेच समर्थांच्या समोर बसून नानाने व मी जयवंत कुलकर्णींबरोबर रात्रभर भजन गायली होती. झपाटनारा वळीव झेलला होता. श्रावणात खिर ओरपली होती. धाब्याच्या मारुतीजवळ दोन दोन दिवस तंबू ठोकून भन्नाट वारा अंगावर घेतला होता. नानाची ही अत्यंत आवडती जागा होती. मी समर्थांचे दर्शन घेवून नानाची राख गडावरच्या हवेत उधळली. ही काही नानाची इच्छा नव्हती पण मला वाटले येथेच नानाच्या जीवाला सुख वाटेल. उन्हे कलताना मी गड उतरलो व गाडी साधूच्या गावाकडे वळवली. साडे आठ नवाला मी साधूच्या घरासमोर होतो. त्याचे म्हातारे वडील अंगणात अंथरुन टाकत होते. सर्वत्र सामसूम होती. साधूचे नुकतेच लग्न झाले होते. माझ्या गाडीचा आवाज ऐकून त्या नव्या नवरीने बाहेर येवून पाहीले व साधूला बोलवायला ती आत गेली. जरा वेळाने साधू बाहेर आला. मला पाहून त्याला इतका आनंद झाला होता की काय करु आणि काय नको हे त्याला समजत नव्हते. शेवटी तो धावत येवून मला लहान मुलासारखा बिलगला. तोवर त्याच्या बायकोने पाण्याची बादली बाहेर आणून ठेवली होती. मी पाय धुत असताना साधूने विचारले “आज कशी काय आठवण काढली अप्पा? आणि इतका उशीर करुन कसा काय आलास?”
मी रडका चेहरा करत नुसताच हसलो.
साधू आश्चर्याने म्हणाला “काय झालय अप्पा? आणि एकटा कसा काय आलास? नाना कुठाय?”
मी मठ्ठ सारखा तसाच बसुन राहीलो. सगळ्यांची जेवणे कधीच उरकलेली होती त्यामुळे साधूने बायकोला माझे एकटयाचे ताट वाढायला सांगीतले. त्याला थांबवत मी म्हणालो “साधू जेवायचे राहूदे तू. मी दुपारी गडावर प्रसाद घेतला आणि इकडेच आलोय. आपण झोपू. खुप दमल्यासारखे झालेय”
माझे काही तरी बिनसलेय याचा साधूला अंदाज आला. बायकोला दुध पाठवायला सांगून साधू मला घेवून माडीवरच्या खोलीत आला. मागोमाग वहिनीने दुधाचा ग्लास आणून ठेवला. साधूने अंथरुने घालत मला विचारले “अप्पा बोलल्याशिवाय कसे कळणार? तु केंव्हा आला भावनगरहून? आणि सज्जनगडावर नानाला न घेताच गेला म्हणजे काही तरी गडबड आहे खासच. नानाने पुन्हा पोरगी नाकारली का?”
मी मांडीवर उशी घेवून भिंतीला टेकलो. साधू आता वैतागून माझ्या चेहऱ्याकडे पहात होता. शेवटी चेहरा अगदी निर्विकार ठेवत मी शांत आवाजात साधूला सांगीतले “आपला नाना गेला साधू. पार कुठच्या कुठे गेला. त्याचीच राख गडावर उधळून आलोय मी तुझ्याकडे हे काळे तोंड घेवून. नाना गेला”
ही बातमी ऐकून माझी जी अवस्था झाली होती तिच साधूची झाली. मला सावरायला बाबा तरी होते. येथे मीच अजुन सावरलो नव्हतो तर साधूला काय आधार देणार होतो. उलट साधूला ही बातमी सांगताना नानाचे दुःख मी पुन्हा नव्याने भोगत होतो. नानाने या साधूसाठी खुप केले होते. वर्षभर त्याच्या मेसचे पैसे भरले होते. त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याला खास कारागीराकडून बनवून घेतलेला संबळ दिला होता. संबळ वाजवण्यावरुन साधूच्या आई वडीलांची समजूतही नानानेच काढली होती. त्याच्या लग्नात मुलगी पहाण्यापासून नानाचा मोठा सहभाग होता. सगळ्यात मोठा आहेरही नानाचाच होता. जरा वेळाने साधू कढ आवरत उठला व खाली गेला. खोलीच्या खिडक्यांचे काळेभोर चौकोन अंगावर येत होते. बाहेर रातकिडे किरकीरत होते. दिड दोन तास झाले तरी साधू वर आला नव्हता. मला आता त्याची काळजी वाटायला लागली. एवढ्यात त्याची बायको घाबरी घुबरी होवून वर आली “भावजी, हे संबळ घेवून इतक्या रातीचे रानाकडं गेलेत” असं तिने सांगताच मी खाली धावलो. मला वेड्या साधूची काळजी वाटायला लागली. मागच्या अंगणात लावलेल्या दिव्याचा क्षिण उजेड सोडला तर शेतात बऱ्यापैकी अंधार होता. मी ढेकळे तुडवत साधूला शोधायला धावलो. मधेच धडपडलोही. इतक्यात समोर अंधूक दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाकडून संबळ वाजवल्याचा आवाज आला. मी ठेचा खातच आंब्याजवळ पोहचलो. साधूचा चेहरा दिसत नसला तरी तो दुःखाने अगदी पिळवटला असणार याची मला खात्री होती. कारण तो तांडव केल्यासारखा बेभान संबळ वाजवत होता. मला काय करावे तेच समजत नव्हते. माझ्या मागोमाग साधूची बायकोही अनवानी पळत आली होती. अंधारात ताड ताड संबळ वाजवणाऱ्या नवऱ्याची तिला भिती वाटली असावी. “पोर का पळाली” म्हणत साधूचे वडीलही तेथे येवून पोहचले. “काही झाले नाही. मी येतो साधूला घेवून. तुम्ही जा वहिनीला घरी घेवून” असे म्हणत मी त्या दोघांनाही कसेबसे घरी पाठवले. दहा मिनिटे पिसाटल्यासारखा संबळ वाजवून साधू गलितगात्र होवून गुडघ्यावर बसला. मी त्याच्या गळ्यातला संबळ काठताच तो माझ्या कंबरेला बिलगून हमसून हमसून म्हणाला “अप्पा, आता तू कितीही मोठ्याने ‘देवा जाग्यावर, देवा माघारी फिर’ म्हणून ओरडला तरी आपला नाना काय माघारी फिरायचा नाही रे आता”
मी साधूच्या डोक्यावर हात फिरवत नुसता उभा राहीलो. त्याला मनसोक्त रडण्याची गरज होती. हुंदके देत देत साधू जरा शांत होतोय असे वाटत असतानाच तो काळीज चिरणाऱ्या आवाजात ओरडला “देवा जाग्यावर हां, पार जाग्यावर…”

(पुर्ण सत्य)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनिता.झक्कास, स्मिता श्रीपाद, रश्मी खुप धन्यवाद!
निलूदा, सुर्यगंगा प्रतिसादासाठी आभार!
आदू तो दुषीत पाण्यातील विषाणूंमुळे आजारी पडला. विषाणूचे नाव लक्षात रहात नाही. विचारुन सांगेन. औषधांचीही रिॲक्शन असावी अशीही मला शंका आहे. थॅंक्यू!

विचारुन सांगेन>>>नाही अप्पा मी सहज विचारलं,सकाळी ok असलेला माणूस अचानक रात्री जातो म्हणून,
बाकी लेखा बद्दल काय आणि कोणत्या शब्दात बोलू कळतच नाहीये म्हणून फक्त छान लिहिलंय इतकंच म्हणलंय Sad

वा! हरिहर., याआधीही मी कुठेतरी म्हटलंय, की तुमच्या लिखाणात जिवंतपणा आहे. तेच इथेही म्हणावंसं वाटतंय. नितांतसुंदर लेखमालिकेबद्दल धन्यवाद!

रडवलत तुम्ही...असे कलंदर जिवाभावाचे मित्र तुम्हाला मिळाले म्हणून कौतुक वाटते तुमचे... +11111

विलक्षण मैत्राचे विलोभनीय दर्शन...
नानाला मिही विसरु शकत नाही जरी माझी त्याची भेट तुमच्या लेखातून झाली. अशी माणसं देवालाही खूप प्रिय असावीत .
मिही खुप भावूक झालो लेख वाचताना....

काय म्हणावे? फार वाईट वाटतेय.. ताकदीचं लिखाण.

वाचताना डोळ्यात पाणी कधी आले, कळलेच नाही.नाना मनाला चटका लावून गेला..>>>> +१.
तुम्ही खूप भाग्यवान आहात असे मित्र लाभले.तुमचाही मोठेपणा आहेच, त्यात शंका नाही."प्रेम लाभे प्रेमळाला".

अप्पा, मी निशब्द.
तुमची लेखनशैली अफाट आहे.
जणू काही तुमची सावली बनून तिन्ही भाग अनुभवले.
_/\_ _/\_ _/\_ त्रिवार दंडवत तुमच्या लेखनाला

तीनही भाग आवडले.

कथा रंगवण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. वाचक अगदी गुंगून जातो वाचताना.

वाचताना डोळ्यात पाणी कधी आले, कळलेच नाही.नाना मनाला चटका लावून गेला..>>>> +१११
नाना माणूस म्हणून खूप भावलाही.
तिनही भाग वाचले, खुपच सुंदर झाले आहेत.

Pages