एकएकटी नांदत होती

Submitted by निशिकांत on 12 November, 2019 - 23:14

या कवितेची पार्श्वभूमी जरा गंमतशीर आहे म्हणून सांगतो. मी पुण्यात एका जॉगिंग ट्रॅकवर रोज सकाळी फिरायला जात असे ट्रॅकच्या शेजारी कांही फ्लॅट्स होते. मला एकादिवशी दिसले की एका फ्लॅटमधून एक स्त्री गॅलरीत येवून आपले धुतलेले कपडे झटकून दोरीवर वाळू घालत होती. ती आत गेली की लगेच एक गृहस्थ आपले कपडे झटकून वाळू घालत असत. हे दृष्य मी रोजच छंद म्हणून बघायला लागलो दोघेही नवरा बायको असावेत बहुधा. माझ्या मनात विचार घोळायला सुरू झाले. त्यांचे आपापसात जमेल नसेल कदाचित. पण मजबूरीने एकत्र रहात असावेत. अर्थात ही माझीच कल्पना. हे खरे असेल तर त्यांचे जीवन कसे असू शकते? यावर विचार सुरू झाले आणि त्यातून निर्माण झालेली ही कविता.

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळसांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बघितलेल्या घरातील दोघे एकएकटे नसावे.हि सदिच्छा!
कारण नोकरदार नवरा-बायकोची आजची परिस्थिती दुर्दैवाने याहुन वेगळी नाही.