आनंदिले मन, शिकविता जर्मन… (माझे जर्मन शिकविण्याचे प्रयोग)

Submitted by केदार जाधव on 15 November, 2019 - 00:47

जर्मन शिकण्याची आवड मला कधीपासून वाटू लागली, तेच मला आठवत नाही. अगदी आठवी किंवा नववीत असताना कुठूनतरी “जर्मन शिका मराठीतून” टाईपची पुस्तके मिळवून “आईन्स, त्स्वाय “ शिकलेले आठवते. पण इचलकरंजीसारख्या ठिकाणी शिकण्याची साधने (त्या काळात तरी) बरीच मर्यादीत असल्याने ते राहूनच गेले. त्यानंतर नोकरीमध्ये थोडा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न केला खरा, पण २००८ सालची आर्थिक मंदी आली, अन्‌ नोकरी वाचवण्यासाठी बेंगलोरला पळावे लागले. पण मे २०१५ मध्ये मात्र योग जुळून आला आणि मला ‘गोएथे इन्स्टीट्यूट’, मॅक्स मुलर भवन, कोरेगाव पार्क इथे सकाळी सात ते साडेआठ या वेळेतील बॅचला प्रवेश मिळाला.

ते दिवस इतके धावपळीचे अन कठीण होते, की आज मी विचार करतो, जर एवढी आतून उर्मी नसती तर आपण हे करू शकलो असतो का ? रोज सकाळी साडेपाचला उठून, आवरून, साडेसहाला पिंपळे सौदागरहून निघायचे, सात ते साडेआठ या वेळेत क्लास, मग तेथून खराडीला ऑफिस करून संध्याकाळी घरी परतायचे. अभ्यास शनिवारी आणि रविवारी होईल तितकाच. तशातही ए-वन (पहिली लेव्हल) यामध्ये ९६% मिळाले अन्‌ पहिला आलो. मग मात्र उत्साह वाढला आणि पुढच्या दोन वर्षांत ए-टू, बी-वन, बी-टू असे टप्पे पार पाडत, सी-वन सर्टीफिकेशनही पूर्ण झाले.

त्याच वेळी पुण्यात जर्मन शिकणाऱ्यांची संख्यादेखील एक्स्पोनेन्शिअली वाढू लागली. २०१५ साली ज्या ‘गोएथे ए-वन’मध्ये ताबडतोब प्रवेश मिळायचा, तिथेच २०१७ साली सहा-सहा महिने वेटिंग करणे भाग पडू लागले. अर्थात रोज सकाळी उठून, क्लाससाठी कोरेगाव पार्क गाठून, परत हिंजवडीला जाणेही बऱ्याच जणांना शक्य नव्हते. जर्मन शिकण्यासाठी एखाद्या सोयीस्कर पर्यायाची गरज निर्माण झाली, आणि यातूनच जन्म झाला “केदार्स जर्मन क्लासेस” चा.

सुरूवातीला अगदी जवळच्या दहा मित्र-मैत्रिणींना ‘विद्यार्थी’ म्हणून प्रवेश देऊन हे क्लासेस सुरू झाले. माझे स्वतःचे बी-टू सुरू असल्याने दिवस आणखीनच धावपळीचा अन अवघड झाला. पण ‘जर्मन’ आणि ‘शिकवणे’ या दोन्हीही गोष्टींबद्दल मुळातच आवड असल्याने, जर्मन शिकवण्याचा वेळ हा दिवसातील माझा सर्वात आवडता वेळ झाला ! सुदैवाने मला पहिली बॅचही चांगली मिळाली, अन्‌ सगळे ए-वन चांगल्या गुणांनी पासही झाले. यामुळं माझा आत्मविश्वास दुणावला.

पहिली बॅच सुरू करतानाच ठरवले होते की, या ‘कामा’साठी एक रूपयाही घ्यायचा नाही. मी क्लासेस घेतो कारण जर्मन भाषा ही माझी पॅशन आहे, आणि ती मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. जर्मन शिकण्यासाठी पैसे भरावे लागतात म्हणून एखाद्याने जरी हे क्लास नाही केले, तर तो माझ्या विचारांचा पराभव वाटत होता. त्यामुळे यातील कितीतरी जवळच्या मित्रांनी कितीही आग्रहाने पैसे देऊ केले, तरी मी ते घेतले नाहीत. मग जवळच्याच मित्र-मैत्रिणींची दुसरी एक बॅच झाली अन्‍ मग तिसरी… मग कुणी आपल्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव सुचवले अन्‌ अशा प्रकारे बॅचेस वाढत गेल्या.

माझे बी-टू सुरू असताना, मला गोएथेमधे जर्मनी ‘जॉब सीकर व्हिजा’बद्दल कळले. जर्मन जर पक्के करायचे असेल, तर जर्मनीमधे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. हा विचार करून मी ती प्रोसेस सुरू केली आणि साधारण एका वर्षभरात मी जर्मनीमध्ये म्युनिक येथे ‘सिनॉप्सिस’ला रूजू झालो.

त्यावेळी मी ए-टू चेही क्लासेस घ्यायला सुरूवात केली होती, अन्‌ त्या बॅचला अर्धवट सोडणे शक्यही नव्हते. मग त्यावर पर्याय निघाला, तो म्हणजे - ‘स्काईप’वर ऑनलाईन क्लासेस घेणे. आधी हे जमेल का याबद्दल धाकधूक वाटत होती, कारण मला स्वतःला प्रचंड इंटरऐक्टीव्ह रहायला, प्रत्यक्ष संवाद साधायला आवडते. पण प्रयत्न केल्यावर समजले की, ऑनलाईन स्वरुपातही आपण वेगवेगळ्या प्रकारे इंटरऐक्टीव्ह राहू शकतो. आणि या पहिल्याच प्रयत्नात चांगले यशही मिळाले.

मग मात्र मला या ‘ऑनलाईन क्लासेस’चे फायदे लक्षात यायला लागले. एक म्हणजे, आता जगाच्या कानाकोपऱ्यातून कुणीही क्लास जॉईन करू शकत होते. माझ्या पहिल्याच क्लासमधे जगातील पाच देशांमधील नऊ शहरांमध्ये राहणारे विद्यार्थी होते. दुसरे म्हणजे, या ‘ऑनलाईन क्लासेस’साठी कुणालाही कुठेही जाण्याची गरजच नव्हती, त्यामुळे जागेचा आणि प्रवासाचा प्रश्नही सुटत होता. पूर्वी क्लास न करू शकणारे काहीजण - उदाहरणार्थ, अगदी लहान बाळ असलेल्या मैत्रिणीही या सोयीमुळे आता क्लास करू लागल्या. आणि मग एका मागोमाग एक बॅचेस सुरू झाल्या. आजवर माझ्या तेवीस बॅचेसमधून मी तीनशेहून अधिक लोकांना जर्मन शिकवले आहे. गेल्या काही बॅचेससाठी तर जागा भरल्यामुळे पुढील बॅचेससाठी वेटींगही करावे लागले. या गोष्टीचे मला वाईट वाटले, पण नाईलाज होता. कारण एकदा एखाद्या व्यक्तीला शिकविण्यासाठी होकार दिला, तर मग ते नीट शिकतात की नाही याची जबाबदारी माझी आहे, असे मला वाटत राहते. म्हणून एका मर्यादेबाहेर विद्यार्थी संख्या वाढली, तर प्रत्येकाकडे असे लक्ष देणे शक्य होत नाही.

अर्थात, वाढत्या बॅचेसबरोबर काही अडचणीही वाढल्या. मला या कामातून पैशांची अपेक्षा नव्हती, पण त्यामुळे फक्त ‘फुकट आहे’ म्हणून शिकायला येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. आणि जे फुकट मिळते त्याची किंमत नसते ही दुर्दैवाने अनेकांची मानसिकता असल्याने, विद्यार्थ्यांची गुणवत्ताही घसरू लागली. त्यातून आता हे ‘विद्यार्थी’ माझे अगदी जवळचे मित्र नसल्याने, त्यांना काही बोलणेही अवघड झाले होते. उदाहरणच द्यायचे तर, याच पुरुषांच्या बॅचमधील तीसपैकी चौदा जणांनी पहिल्या पंधराच दिवसांत क्लास सोडला. त्यांनी एका शब्दानेही “मला आता जमत नाही, म्हणून मी क्लास सोडत आहे” असे सांगितले नाही. अर्थात, त्यांनी मला न सांगता क्लास सोडल्याबद्दल मला फारसे वाईट वाटले नाही, पण त्या चौदा जागांवर ‘वेटींग लिस्ट’मधल्या ज्या इतर सिन्सिअर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला असता त्यांचे नुकसान झाल्याबद्दल मात्र नक्कीच वाईट वाटले.

आता हे जर्मन क्लासेस ही माझी पॅशन झाले आहेत. कितीही मोठे कारण असले तरी मी कधी क्लास चुकवले नाहीत. कारण आपल्यामुळे इतक्या लोकांचा वेळ वाया जाऊ नये, हीच भावना मनात होती. माझी आजी वारल्याचे जेव्हा मला जर्मनीमध्ये समजले, त्याही दिवशी मी क्लास घेतला. अगदी माझे सासरे वारले, त्याच्या चौथ्या दिवशीही मी त्यांच्या घरून क्लास घेतला. तिथे बरेच नातेवाईक आले होते, त्यांच्यातील काहीजणांना माझे असे वागणे चुकीचेही वाटले असेल. पण माझ्यासाठी हे खूपच महत्वाचे होते.

या क्लासेसचे काही वेगळेपण असेल, तर ते म्हणजे - जर्मन भाषा रोजच्या व्यवहारात वापरता येण्यावरचा भर. तुम्ही चांगले जर्मन वाचू, लिहू, बोलू शकलात, तर तुम्ही आपोआपच कुठलीही परीक्षा पास व्हाल. फक्त परीक्षेसाठी अभ्यास करण्यात अर्थ नाही, हे माझे कायमचे सूत्र राहिले आहे. साधारण तीन महिन्यांच्या क्लासमध्ये मी फक्त शेवटचे पंधरा दिवस परीक्षेची तयारी करून घेतो. आणि तरीही माझ्या विद्यार्थ्यांच उत्तीर्ण होण्याच प्रमाण ९४% आहे , माझ्या कितीतरी विद्यार्थ्याना ९०% च्यावर (एकीला तर १००%) गुण मिळाले आहेत !

दुसरे म्हणजे, मी मुख्यतः मराठीतून, आणि अगदीच गरज असेल तर हिंदीतून शिकवतो. मराठी आणि जर्मन या भाषांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. उदाहरणार्थ, तो, ती, ते / der die das तसेच आदरार्थी बहुवचन, वगैरे. यामुळे बऱ्याच संकल्पना लवकर समजायला मदत होते. मी फक्त जर्मन भाषाच नाही, तर जर्मन संस्कृती, जर्मनीमधील लोक यांच्याबद्दलही माहिती देतो. मी दिवसभर ऑफिसमध्ये जर्मन भाषेत बोलत असल्याने, मला काही पुस्तकी संकल्पनांच्या ऐवजी रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे शब्दही माहिती झाले आहेत. तेदेखील मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो.

मला बरेच जण विचारतात की, मला यातून काय मिळते ? मला सगळयात महत्त्वाचे काही मिळत असेल, तर ते म्हणजे - ‘आपण कुणाला तरी उपयोगी पडू शकतो याचे समाधान’ ! देण्यातला आनंद एकदा कळला की मग त्यासारखे सुख नाही, कारण घेणारे तर अनेक आहेतच. माझी मुलगी ओवी हीदेखील हे सर्व प्रत्यक्ष पाहून शिकत आहे, याचेही समाधान आहेच. संस्कार-संस्कार म्हणजे आणखी काय असते ?

अर्थात्‌ मी अजून ‘संत’ बनू शकलो नाही, हेदेखील खरे आहे. ‘कर्म करो, फल की इच्छा मत करो’ हे आचरणात आणणे प्रचंड अवघड आहे. जेव्हा तुम्ही कामावरुन धावत-पळत येऊन क्लास सुरू करता, आणि तीस विद्यार्थ्यांपैकी फक्त आठजण हजर असतात… आणि मग नंतर, मी एका पार्टीला गेलो होतो, आज कंटाळाच आला होता, अशी कारणे देतात. (हो, लोक खरोखर अशी कारणे देतात, अशा मेसेजचे स्क्रीनशॉट मी जपून ठेवले आहेत.) अशा वेळी मात्र राग, उद्वेग, खेद या सगळ्या भावना उफाळून येतात.

पण यातूनच मी प्रगल्भ - मॅच्युअर होत गेलो, असेही मला वाटते. मी या विषयात जेवढा पॅशनेट आहे, तेवढेच इतरांनीही असावे, ही माझी अपेक्षाच चुकीची आहे, हे मला हळू-हळू समजत गेले. खरे सांगायचे तर, आजवर माझ्याकडून जर्मन शिकलेल्या ३०० "विद्यार्थ्यां’पैकी अगदी दहाजणांनीही नंतर कधी स्वत:हून संपर्क करायचा प्रयत्नही केला नाही (यापैकी काहीजण माझे पूर्वीचे मित्रही आहेत). आधी या गोष्टीचे फार वाईट वाटायचे, पण या अनुभवातूनच माणसांचा स्वभाव समजत गेला.

पण सगळेच असे वागतात असेही नाही. जेव्हा कधी राग-राग होतो अन्‌ क्लास बंद करायचा विचार मनात येतो, तेव्हा आजारी लहान बाळाला मांडीवर घेऊन क्लास करणारी सुश्मिता डोळ्यांसमोर येते. प्रत्येक तीस विद्यार्थ्यांमागे असे फक्त चारजण जरी मिळाले, तरी या सर्व प्रयत्नांचे सार्थक झाले, असे मला वाटते. यंदाच्या वर्षी, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, मी माझ्या सध्याच्या बॅचला ‘ऐच्छिक गुरूदक्षिणा’ मागितली अन्‌ बघता-बघता ४८ जणांनी मिळून एक लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम गोळा केली, तेव्हाची भावना शब्दात व्यक्त करणे खरेच कठीण आहे. तुम्ही इतरांसाठी चांगले काम केले, तर ते चांगले काम पुढे चालत राहते, यावरील माझा विश्वास आणखी दृढ झाला.

सध्या आणखी एक प्रयोगही सुरू आहे, तो म्हणजे - रोज फक्त पाच मिनिटांचे वैयक्तिक क्लासेस. मला आणि शिकणाऱ्या व्यक्तीला, दोघांनाही जेव्हा कधी वेळ असेल त्या वेळेत. माझ्या मते, अशा प्रकारे बराच फावला वेळ सत्कारणी लागू शकेल. सध्या फक्त दोघा जणांवर हा प्रयोग सुरू आहे. जर तो यशस्वी झाला, तर संख्या वाढवताही येऊ शकेल.

कधी कधी वाटते की, रोज संध्याकाळच्या वेळेत आपण स्वतःला बांधून घेतो आहोत. हाच वेळ मी माझ्या मुलीसाठी - ओवीसाठी - देऊ शकलो असतो, संध्याकाळी फिरायला जाऊ शकलो असतो…पण मग मनात विचार येतो की, मला माझ्या लहानपणी जी संधी मिळाली नाही, ती इतरांना उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला लाभले आहे. नव्हे, हे तर माझे कर्तव्यच आहे.

त्यामुळे हे क्लासेस तर नक्कीच सुरू राहतील. तुम्हालाही जर्मन शिकायची मनापासून इच्छा असेल, तर तुमचेही स्वागतच आहे - मग ते क्लाससाठी असो, की फक्त जर्मन भाषेबद्दल दिलखुलास गप्पा मारण्यासाठी असो. अट फक्त एकच, जर्मन भाषेवर तुमचे प्रेम असायला हवे !!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पालवी, महाराष्ट्र मंडळ म्युनिक दिवाळी ई अंकात पूर्व प्रकाशित

संपर्कासाठी व्हॉट्सअ‍ॅप : +४९ १७६७३९१५१९५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान विचार केदार Happy

मुलाला लेख पाठवला आहे. संपर्क करेल तो!
मला पण नवनवीन भाषा शिकायला आवडते.

केदार, तुमचे काम जबरदस्त आहे. लेख अतिशय आवडला.

मीदेखिल जर्मन गेले ४ महिने शिकत आहे. सध्या ए२ चा क्लास सुरू आहे. येत्या डिसेंबरला ए२ परिक्षा देणार आहे. जर्मन भाषा मला अतिशय आवडते आहे. मला अपेक्षित प्रगती साधली जातेय असे वाटते. तुमच्याशी बोलायला, मार्गदर्शन घ्यायला खुप आवडेल.

टोटल रीस्पेक्ट सर!
शुभेच्छा!!
फ्रेंच बद्दल काहि मार्गदर्शन करु शकता का? माझी मुलगी शिकतेय. सध्या शाळेत. मग पुढे जाऊन लेव्हलस करायच्या आहेत.

खूप छान विचार केदार
मुलाला लेख पाठवला आहे. संपर्क करेल तो!
मला पण नवनवीन भाषा शिकायला आवडते.
>> विनिता नक्की

केदार, तुमचे काम जबरदस्त आहे. लेख अतिशय आवडला.
मीदेखिल जर्मन गेले ४ महिने शिकत आहे. सध्या ए२ चा क्लास सुरू आहे. येत्या डिसेंबरला ए२ परिक्षा देणार आहे. जर्मन भाषा मला अतिशय आवडते आहे. मला अपेक्षित प्रगती साधली जातेय असे वाटते. तुमच्याशी बोलायला, मार्गदर्शन घ्यायला खुप आवडेल. >> कधीही . वर माझा व्हॉटसअ‍ॅप नंबर देऊन ठेवतो Happy

टोटल रीस्पेक्ट सर!
शुभेच्छा!!
फ्रेंच बद्दल काहि मार्गदर्शन करु शकता का? माझी मुलगी शिकतेय. सध्या शाळेत. मग पुढे जाऊन लेव्हलस करायच्या आहेत.

>> सस्मित, मीच फ्रेंच शिकतोय , पण लेव्हल्स कन्सेप्ट सगळ्या युरोपियन भाषांची सेम आहे Happy

वा! मस्तच उपक्रम. लोकांच्या वागण्याच्या एकेक तर्हा वाचून आश्चर्य वाटलं नाही. ही असलीच मानसिकता पाहिली आहे. एव्हढ्ं होऊनही तुम्ही तुमचं काम चालू ठेवलंय म्हणजे तुम्ही खरंच महान आहात.

मला स्वत:लाही भाषा शिकायला आवडतात. Spanish चाले तैसा बोले category मधली असल्याने सध्या Duolingo वर शिकत आहे. एक विचारु का? German भाषेच्या शब्दांची spellings पाहिली तर उच्चाराशी match होत नाहीत. बरीच अक्षरं silent असं असतं ना? मग हे सगळं शिकणं अवघड नाहीये का? कसं जमतं विद्यार्थ्याना?

मला स्वत:लाही भाषा शिकायला आवडतात. Spanish चाले तैसा बोले category मधली असल्याने सध्या Duolingo वर शिकत आहे. एक विचारु का? German भाषेच्या शब्दांची spellings पाहिली तर उच्चाराशी match होत नाहीत. बरीच अक्षरं silent असं असतं ना? मग हे सगळं शिकणं अवघड नाही का?

>> स्वप्ना राज , धन्यवाद .

पण खर तर उलट आहे , जर्मन फोनेटिकली बरीच करेक्ट भाषा आहे , म्हणजे Bus बुसच म्हणायचे , अर्थात थोडे अपवाद आहेत पण इंग्रजीपेक्षा नक्कीच कमी आहेत.

विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्....
जे दिल्याने वाढते अशा ह्या धनाची महत्ता काय वर्णावी?
हे धन आपण निरपेक्षतेने मुक्तहस्ते वाटत आहात.
मोठे उमदे आणि उदात्त कार्य करीत आहात.
सादर नमस्कार.

विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्....
जे दिल्याने वाढते अशा ह्या धनाची महत्ता काय वर्णावी?
हे धन आपण निरपेक्षतेने मुक्तहस्ते वाटत आहात.
मोठे उमदे आणि उदात्त कार्य करीत आहात.
सादर नमस्कार.

>> धन्यवाद हीरा !!

भारी लेख केदार. मला मी फ्रेन्च शिकत होतो ते दिवस आठवले. सकाळी लोकलने शिवाजीनगर तिथून बसने पत्रकार् नगरला Alliance Francaise De Poona मध्ये.. २ तास क्लास. तिथून बी एम सी सी आणि मग कॉलेज झाले की एका सी एस कडे पार्टटाईम आर्टिकलशीप. परकीय भाषा शिकताना खूप मजा येते मात्र. त्या लोकांची संस्कृती, खान पान, आचार विचार, गाणी, चित्रपट, राजकारण असे काय काय समजायचे. Alliance Francaise ला नशिबाने मला नंदिता वागळे होती शिकवायला ८-१० महिने. ती मराठी टू फ्रेन्च असे शिकवायचा प्रयत्न करायची खुपच काही अडले तर. म्हणजे इंग्रजी टू फ्रेन्च ऐवजी. जसे की volte-face हा फ्रेन्च शब्द ईंग्रजी दैनिके सर्रास वापरतात. तर हे volte-face म्हण्जजे मराठीतले 'घूमजाव' आणि असा अर्थ समजला की डोळे एकदम चमकायचे. फ्रेन्चचे उच्चार शास्त्र बर्यापैकी अवघड आहे. ते सुद्धा एकदम कसे असायला हवे ते साग्रसंगीत सांगणार. म्हणजे de आणि deux ह्याचा 'द' हा उच्चार असला तरी de म्हणताना तो साधारण the सारखा कराय्चा आणि deux मात्र ईंग्रजी the ओठाचा चंबू करून जोर देउन करायचा. आणि अभ्यास केला नाहीतर अर्धा तास बाहेर उभे करणार Happy
बरेचदा माधुरी पुरंदरे पण तास घेत. त्या तर एकाच शब्दाचे ईतके प्रतिश्ब्द सांगत की मज्जा येई. आणि वैचारिक डिबेट तर अफलातून.. असो,
तुला खुप शुभेच्छा.
@सस्मित , मी शिकलोय फ्रेन्च. आमच्या वेळी (२०००- २००२) AFP ला डिप्लोमा पर्यंत ५ लेवल होत्या डिप्लोमा दोन भागात म्हणजे तशा ४ च. आता माहित नाही. मी AFP च रेकमेंड करेन पुण्यात असाल तर.

ओह असं आहे का.....ते जेएफके ची आय एम डोनट वाली फजिती ऐकून माझा गैरसमज झाला म्हणायचा भाषेच्या बाबतीत.

Pages