आदर्श संगोपन

Submitted by सतीश कुमार on 12 October, 2019 - 02:09

लहान मुलांचे संगोपन हा विषय फार गहन आहे. या विषयावर अनेक मंडळींनी अनेक पुस्तके लिहिली आहेत परंतु त्याचा उपयोग होईलच असे नाही. काही गृहितके धरून ती लिहिली जातात आणि तशी स्थिती प्रत्यक्षात नसतेच. प्रत्येक मूल हे असाधारण असते आणि प्रत्येक घरातील वातावरण वेगवेगळे असते . अमुक एका पद्धतीने संगोपन होऊ शकत नाही किंवा त्या साठी एखादी स्टँडर्ड आँपरेटींग प्रोसिजरही अस्तित्वात नाही. साधारण अडीच तीन वर्षाची आणि त्या नंतरची मुले, कळती होईपर्यंत सांभाळणे याला फार सहनशक्ती लागते आणि आताच्या पालकांकडे ती कमी प्रमाणात असते.

आईवडील दोघेही नोकरी करीत असतात आणि घरात आजी आजोबा नसतात अशा मुलांची अवस्था फार केवीलवाणी होते. पाळणाघर हा उपाय असला तरीही पाळणाघरातल्या आया मावश्या कशा असतात आणि कसे संगोपन करतात हा संशोधनाचा विषय आहे. आता अशी मुले जेव्हा संध्याकाळी आईबरोबर घरी येतात त्या नंतर मुले आईबाबांना चिकटून बसलेली दिसतात.त्या नंतर थोड्या वेळांनी दोघांपैकी कोणाचातरी मोबाईल वाजतो. दोघांच्या प्रेमाचे भरते ओसरते आणि मूल परत खेळण्यांकडे वळते.

बहुतेक सदनिका प्रकल्पात आता लहान मुलांसाठी खेळायला जागा असते जिथे घसरगुंडी, झोका वगैरे तत्सम प्रकार असतात .अशा ठिकाणी आई त्या मुलाला घेऊन जाते आणि मुलाला घसरगुंडीच्या हवाली केले जाते. आई परत मोबाईलमधे डोके खुपसते .मुलांपेक्षा मोबाईल जास्त हाताळला जातो. आईमुलाच्या नात्यावरचे व्हाँट्सअँप मँसेजेस फिरत राहतात आणि मूल बिचारे "मी मोबाईल असतो तर आईबाबांच्या हातात जास्त वेळ राहिलो असतो " असा विचार करत खेळत राहते. या आधुनिक आया एवढया कठोर कशा असा प्रश्न पडावा अशी यांची वागणूक असते.

मागच्या महिन्यात मुंबईहून पुण्याला येत असताना समोरच्या सीटवर अशीच आधुनिक ललना बसली होती. गाडी सुटली तशी तिने बँगेची चेन ओढली, आतून खेळण्यातली कार काढली आणि आपल्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या हातात सोपवून मोबाईल उघडला. चांदणी चौक येईपर्यंत तिने मोबाईल मधून डोके वर केले नाही. मुलगा बिचारा कार शी तासभर खेळत राहिला आणि मग पेंगुळलेल्या डोळ्यांनी कलंडला.

थोड्या फार फरकाने सगळीकडे हेच चित्र आहे.
आईबाबा आणि मुलांमधला हा दुरावा मिटविण्यासाठी काही पथ्ये पाळणं आवश्यक आहे. सर्वप्रथम प्राथमिकता कशाला द्यावी, मोबाईलला कि मुलांना हे ठरवायला हवे.आँफिसमधून घरी आल्यावर मोबाईल शक्यतो बंद ठेवावा.फक्त महत्त्वाचेच बोलणे करावे आणि तेही लवकर आटपावे. संपूर्ण वेळ केवळ मुलांबरोबर घालवावा.
मोबाईलचा विषय निघाला असल्याने ब-याच पालकांना हा प्रश्न पडतो कि मुलांना मोबाईल/टँबलेट बघू द्यावा कि नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि आपण जे जे करतो ते मुलं करणार. मोबाईल द्यायला हरकत नाही.मोबाईल मधून घातक किरण बाहेर पडतात ही समजूत आहे. चांगल्या कंपनीच्या मोबाईल फोनला स्पेसिफिक अँब्साँर्प्शन रेटींग या चाचण्यातून जावे लागते याचे निकष पूर्ण केलेल्या फोनलाच मान्यता दिली जाते. शिवाय मोबाईल मुळे काही विशिष्ट आजार झाल्याची नोंद कुठे झाली नाही .मोबाईल देण्यापूर्वी डेटा कनेक्शन आणि वायफाय बंद करावे. ब्राईटनेस कमी करावा, गेम्स असल्यास काढून टाकावे आणि द्यावे. पंधरा वीस मिनीटात मुले कंटाळतील. मोबाईल ठेवून देतील आणि दुसऱ्या कशात तरी गुंततील.
मुलांनी टीव्ही पहावा कि नाही या बद्दल ही बरंच लिहिले आहे पण हीही न टाळता येणारी गोष्ट आहे. मोजकी दोन तीन चँनेल्स ठेवावी आणि संध्याकाळी सात नंतर लाँक करावी.जेवण करताना टीव्ही पहावा कि नाही या बद्दल दुमत आहे.परंतु टीव्ही पाहात निदान जेवत तरी असतील तर टीव्ही पाहण्यात गैर काय? उपाशी राहण्यापेक्षा हे निश्चितच बरे.
मारून रागावून घास भरविण्याचे दुष्परिणामच होतात. जेवताना मन आनंदी आणि समाधानी असायला हवे. टीव्ही मुळे हे साधत असेल तर त्याचा उपयोग करून घ्यावा.

आता ज्यांच्याकडे आजीआजोबा असतात आणि मुलगा /सूनबाई नोकरीला जातात तिथे काय परिस्थिती असते ते पाहू.
मुलांची शाळा- पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग अनेक संस्थाचालक सकाळीच का ठेवतात हे न उलगडणारे कोडे आहे.पूर्वी कंदील असायचे तेव्हा मुले लवकर झोपी जात परंतु आता ढळढळीत लाईटच्या उजेडात रात्रीचे झोपायला साडेदहा अकरा म्हणजे लवकर म्हणायला हवे.सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करणे म्हणजे रोज एक दिव्यातून पार पडावे लागते . मुले उठतात ती रडतच. मग शी,शू आणि दूध हा कार्यक्रम उरकताना कस लागतो .गणवेशाची तयारी ,त्यांचा डबा, पाण्याची बाटली, दफ्तर , पायमोजे, बूट इत्यादी गोष्टींची पूर्तता करतांना दमछाक होते.मुलगा आणि सून सकाळी नोकरीला गेल्यावर नातवांच्या सेवेत असणा-या आजी-आजोबांची स्थिती फार केवीलवाणी होते. दुधावरची साय ह्या नात्याने नातवांवर हात ही उगारता येत नाही.शाळेत सोडणे आणणे आणि आणल्या नंतर कपडे बदलणे, मग घास भरविणे ह्या कामात दुपार संपून जाते.मूल जेवल्याशिवाय आजी आजोबांच्या घशातून घास उतरत नाही.त्या नंतर होमवर्क करवून घेण्याची जबाबदारी असते कारण संध्याकाळी मुलांची खेळायची वेळ असते आणि त्याच वेळी मुलगा आणि सून थकून येतात. मग त्यांच्या कडून मुलांचा गृहपाठ करवून घेणे अशक्यच. ज्युनी/सिनी.केजीला पण तीन तीन विषयांचा गृहपाठ देतात.ती पेन्सिलीने पूर्ण करायची. सकाळी शाळेत वर्गपाठ आणि दुपारी घरात गृहपाठ. लहान मुलांची नाजूक बोटे दुखून जातात आणि इथूनच अभ्यासाचा तिटकारा वाटू लागतो. गृहपाठ करायचा राहिला कि " होमवर्क इनकम्प्लीट" असा शेरा येतो आणि ते पाहिल्यावर सून आणि मुलाचे डोळे विस्फारतात. शाळेतल्या शिक्षिकेला दया माया नसते आणि अश्रू ओघळतात ते मात्र आजी आजोबांच्या डोळ्यांतून.
आता रात्र होते आणि अकरा वाजतात. मूल झोपावे म्हणून साम दाम वगैरे प्रकार होतात आणि कधीतरी मूल झोपी जाते. आणि त्या नंतरच आजी आजोबांची, उद्याच्या युद्धासाठी सज्ज व्हायला पाठ टेकते.
अशा परिस्थितीत आदर्श संगोपन कसे करावे या वर कुणी प्रकाश टाकेल काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती एकांगी लेख आहे,
सून आणि मुलगा त्रास देत आहेत, आजी आजोबा बिचारे कसेबसे नातवंडांना सांभाळत आहेत, असं वाटत आहे.
सगळं चूक आहे असे नाही रोख चुकीचाच आहे . आई मोबाईल बघत असते, बाळाकडे लक्ष देत नाही वै वै. आता फक्त आईने नोकरी आणि मोबाईल सोडला पाहिजे एवढेच लिहायचे बाकी आहे.

@ पियू,सुहृद, तुमचा प्रतिसाद वाचून अगं बाई सासूबाई मधली आगाऊ प्रज्ञा आठवली. लग्न झालं नसेल तर करा आणि लवकर आजीबाई व्हा हाच आशीर्वाद.

आईबाबा आणि मुलांमधला हा दुरावा मिटविण्यासाठी काही पथ्ये पाळणं आवश्यक आहे. सर्वप्रथम प्राथमिकता कशाला द्यावी, मोबाईलला कि मुलांना हे ठरवायला हवे.आँफिसमधून घरी आल्यावर मोबाईल शक्यतो बंद ठेवावा.फक्त महत्त्वाचेच बोलणे करावे आणि तेही लवकर आटपावे. संपूर्ण वेळ केवळ मुलांबरोबर घालवावा.>> मुलांचे वेगवेगळे क्लासेस, शाळेतून मिळालेला ग्रुहपाठ ह्याबद्दलचे अनेक मेसेजेस आणि अपडेटस हल्ली पालकांच्या मोबाईलवर येत असतात. ते नीट लक्षपूर्वक वाचले नाहीत आणि त्यानुसार मुलांना योग्य त्या सूचना/ माहिती दिली नाही तर आपलंच मूल, शाळेत, छंदवर्गात मागे पडू शकतं. त्यामुळे अनेकदा ऑफिमधून घरी आल्यावरही पालकांना मोबाईल हातात धरावाच लागतो.

सतीश कुमार, लग्न करायचे का तशीच मुले जन्माला घालायची ते मी बघेन. या आशीर्वादाची गरज नाही, साभार परत करत आहे.

मला तर आयांपेक्षा, वडील माणसे मोबाइल मध्ये जास्त वेळ बिझी असतात असे वाटते. आणि त्या वेळेत मुलं जवळ आलेली पण त्यांना चालत नाहीत. याउलट/ आई / आजी हि लोक मुलांना जास्त नीट संभाळू शकतात असे दिसते. पुरुष मंडळी लवकर कंटाळून मुलांच्या हाती मोबाइल बहाल करतात

माझ्याकडे अज्जिबात सासू सासरे माझ्या मुलीचा अभ्यास घेत नाहीत. उलट आम्ही इतक्या वेळ बघितलंय आता तुमचं तुम्ही निस्तरा हा attitude असतो. मोबाइल बघायला आईला वेळ मिळतो का ? काहींच्या काही लिहून फक्त आई ला दोषी ठरवले आहे.

लेख आवडला. आधुनिक सोयीसुविधांनी जग जवल आलय तशी नेट्सर्फिंग आदि व्यसनेही वाढलेली आहेत. श्रेयस आणि प्रेयस यांच्या कात्रीत प्रत्येक जण सतत सापडला जातोय - हे तर सत्य आहे.
मुलांना वळण लावायला हवे हेही सत्य आहे पण पोरं ऐकतात का? किती सेल्फ-विल असते या कार्ट्यांना. जरा मोठी झाली की शिंग फुटतात. एक ५-६ वर्षांपर्यंत भारी गोंडस असतात. आपल्या कह्यात असतात, लाड करुन घेतात, आवळून चिवळून घेतात नंतर मग मात्र झोपेतच लाड करावे लागतात. इतर वेळी सुळ्ळकन हातातून निसटून जातात. Happy

@ सुहृद, आवडलं तुमचं मनोगत. छान रागावता तुम्ही. मर्यादा चित्रपटांतलं " गुस्सा इतना हसीन है तो.." गाणं आठवलं. समजा तुम्हाला "जसं हवं तसं" मूल झालं तर शाळेत घालताना काय नाव घालाल? वडिलांचे नाव काय टाकाल? आईचे नाव टाकायचे असेल तर अगोदर तुमचं नाव लीला असायला हवं. त्यानंतर मुलाचे बारसे करतात त्या वेळेला मुलाचं नाव संजय ठेवायला हवं आणि आता जे आडनाव आहे ते बदलून भन्साळी करायला हवं. हे सगळं तुम्हाला जमणार आहे का? बर, तसं तुम्ही अगदी धडाडीने केलत( तुम्ही आहातच धडाडीच्या) तरी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुमच्या निष्पाप मुलाला स्पष्टीकरण देत बसावं लागेल की आईचं नाव का लावलं? बघा, शांतपणे विचार करा. आणि हो, राग तब्येतीला मारक असतो बरं का.. ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही लिहिलेले प्रतिसाद वाचून एका इंग्रजी लेखकाची वाक्यं आठवली. तो म्हणतो, " intelligence is like underwear, you must have it but not show it, stupidity is like bra, even with attempt to hide it, it shows up and ego is like a bum, you can't see yours but other's can, and you keep noticing only other people's.....

खरंय. आजच्या आईबापांना काय आजीआजोबांना सुद्धा पोरे सांभाळता येत नाहीत. आपल्यावेळेसारखे आजीआजोबही आता राहिले नाहीत.
म्हणूनच मी विचार करतोय जॉब सोडावा आणि एक पाळणाघर प्लस वृद्धाश्रम एकत्र चालू करावे. जिथे जुन्या जमान्यातील आजीआजोबांना मुलांच्या सेवेसाठी ठेवता येईल. व्यवसायही उत्तम होईल आणि मुलांना आदर्श संगोपनही पुरवता येईल.

लेखात पाळणाघरातल्या बायका कशा असतात हा "अभ्यासाचा" विषय म्हणून सोडून दिलेले आहे.
तर लेखकाने अशा काही डे केअर्सचा जरूर जरूर अभ्यास करावा. त्यांचे डोळे नक्कीच उघडतील. आणि घरी आजी-आजोबांबरोबर झी मराठी/प्रवाह वगैरे बघत बसण्यापेक्षा डे केअर किती छान असतं ते लक्षात येईल.
आजकाल मुलं उशिरा होतात. तोपर्यंत आजी आजोबासुद्धा थकलेले असतात. त्यामुळे अनेक सुजाण पालक घरी आजी आजोबा असले तरी हल्ली आपल्या मुलांना डे केअरमध्ये सोडतात. पुण्यात आजोळ सारखी अतिशय उत्तम डे केअर आहेत. आणि आजी आजोबाच सकाळी त्यांना सोडायला येतात. मुलं तिकडे असली की आजी-आजोबांना स्पेस मिळते. त्यांना त्यांच्या आवडीचे काही करता येते, मित्रमैत्रिणींना भेटता येते.

आणि डे केअरमध्ये मुलांना अतिशय छान उपक्रम देण्यात येतात. ८-१० महिन्यांच्या बाळांची सुद्धा वयाप्रमाणे तिथे ऍक्टिव्हिटी असते.आणि सगळ्या मुलांना त्या ऍक्टिव्हिटी प्रचंड आवडतात. फाईन मोटर स्किल्स, आपापल्या हाताने जेवणे, भरपूर गाणी, आर्ट आणि क्राफ्ट, कधी कधी कूकिंगसुद्धा करतात सगळे मिळून. काय खावं काय खाऊ नये (गुड फूड बॅड फूड) हे तर इतकं छान शिकवतात की आमचा मुलगा आम्हाला सुद्धा कधी पिझ्झा खाऊ देत नाही! जेवढा वेळ मुलं डे केअरमध्ये असतात तेवढा वेळ त्यांना कुठलाही स्क्रीन हातात मिळत नाही. मुलांना काही व्हिडियो दाखवायचे असतील तर तिथे प्रोजेक्टर असतो आणि आठवड्यातून एकदाच असे कार्यक्रम दाखवले जातात. प्रत्येक सणाचे महत्व, त्यासाठी लागणारी क्राफ्ट केली जातात. एवढे सगळे संस्कार घरातली ४ जणांची टीमसुद्धा करू शकत नाही.

माझ्या मुलाच्या आनंदी असण्यात आणि नवीन नवीन गोष्टींबद्दल त्याला कुतूहल असण्यात आजोळचा मोठा वाटा आहे. आणि मला माझ्या आई-वडिलांवर किंवा सासरच्या लोकांवर अवलंबवून राहावे लागत नाही याबद्दल मी आजोळची अत्यंत आभारी आहे. माझ्या मुलाच्या संगोपनाचा भार कुठल्याही आजी आजोबांवर आला नाही हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे आता जेव्हा तो आजी आजोबांकडे जातो तेव्हा तो फक्त मज्जा करायला आणि त्यांच्याबरोबर राहायला जातो. त्यात दोन्ही बाजूंचा आनंद असतो.

आजी आजोबांना झेपत नसेल तर त्यांनी सांगावं आपल्या मुलांना की बघा आपलं आपण. सुनेचा पैसा, तिचं शिक्षण, कौटुंबिक उन्नतीसाठी हवं तर तर थोडा बहुत त्रास होणारच. आज काल सासु सासरे, आई बाबा ह्यांना त्रास नको म्हणून पूर्णवेळची कामवाली असते. आजी आजोबांना तरिही थोडं कठीण जातं ह्याची कल्पना आहे/असते त्यामुळे त्यांच्यासाठी मुलं/मुली प्रयत्नशील असतात. आज काल आजी आजोबा देखील जागरुक असतात त्यांच्या त्यांच्या स्पेसबद्दल. संगोपन, कष्ट आणि अपेक्षा ह्याबद्दल सुसंवाद हवा. उपदेश नको.

आईच्या मोबाईल वापराबद्दल लिहितना बाबाच्याही जबाबदारीबद्दल लिहा. आजही कित्येक कुटुंबात आई ७ दिवस काम करत असते आणि आजीदेखिल.

बाकी तुमचे सुहृद ह्यांना असलेले पोस्ट्स बिलो बेल्ट प्रकारतले कै च्या कै आहेत. काही तरी असंबद्ध बोलताय का?

त्यांनी लिहिलेले प्रतिसाद जहाल सदरात मोडतात , जेव्हा की सुहृद यांचा पहिला आणि नंतरचेही सर्व प्रतिसाद सभ्यतेच्या मर्यादेतच होते , हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही . पूर्वीचा लेख आहे क्षमाशीलता , ज्यात कसे समजूतदार पणे आणि सौम्य भाषेत प्रतिसाद द्यावेत हे इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे . तो लेख ऍक्चुली मला आवडला होता , किती समजूतदार विचार आहेत , हे ह्यांना समजलं तसं सगळ्यांना समजलं असतं तर इतके वाद का झाले असते असंही म्हटलं मनाशी ...

पण इथे येऊन पाहते तर काय - दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान ; आपण कोरडे पाषाण Sad

.मोबाईल देण्यापूर्वी डेटा कनेक्शन आणि वायफाय बंद करावे. ब्राईटनेस कमी करावा, गेम्स असल्यास काढून टाकावे आणि द्यावे. पंधरा वीस मिनीटात मुले कंटाळतील. मोबाईल ठेवून देतील आणि दुसऱ्या कशात तरी गुंततील.>>>
मग फोन कशासाठी द्यायचा ? कॉल करण्यासाठि का ? कुणाला कॉल करण्यासाठी?

>>मोजकी दोन तीन चँनेल्स ठेवावी आणि संध्याकाळी सात नंतर लाँक करावी.जेवण करताना टीव्ही पहावा कि नाही या बद्दल दुमत आहे.परंतु टीव्ही पाहात निदान जेवत तरी असतील तर टीव्ही पाहण्यात गैर काय? उपाशी राहण्यापेक्षा हे निश्चितच बरे.>>>>> हे कसे साध्य करता येईल ? मुल फक्त ब्लँक स्क्रीन किती वेळ बघणार?

@ जाईजुई, तुमचा प्रतिसाद आवडला. मी माझ्या लेखात अगदी शेवटी " यावर कुणी प्रकाश टाकेल काय " असं विचारलं त्याचा नेमका अर्थ तुम्हाला उमगला आणि टीका करण्या ऐवजी तुम्ही सुचवलं हे छान झालं. जाईजुई चा वास किती छान असतो तसं अगदी प्रसन्न वाटलं. मनापासून धन्यवाद.

@सीमा, १) हवं तर तुम्ही ब्राईटनेस फुल्ल करून आणि वाय फाय टाकून मुलांना देऊ शकता. मी लेखात फक्त सुचवलं होतं तसं पण कंपलशन नाही.
२) तुमच्याकडे मुलांना संध्याकाळी सात नंतरच जेवायला देता असं दिसतं . म्हणजे दुपारी शाळेतून आल्यावर उपाशी ठेवता. का? असं करणं योग्य नाही.
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आदर्श संगोपन असे काही खरेच असते का?
प्रत्येक कुटुंबाची परीस्थिती वेगळी. अगदी मध्यमवर्ग धरला तरी त्यात कनिष्ठ, मध्यम, आणि उच्च असे स्तर आले. लेखात तुम्ही पाळणाघराबद्द्ल लिहिले आहे आणि सईने तिचा अनुभव लिहीला आहे. अतिशय बेकार ते अतिशय उत्तम सेवा अशा श्रेणीत ही पाळणाघरे येतात. तुम्ही कुठे रहाता, तुम्हाला काय दर परवडणार आहेत, तिथे जागा उपलब्ध आहे की नाही, वगैरे अनेक गोष्टी यात येणार. सईचा अनुभव चांगला आहे म्हणून सगळ्याच मुलांना अशी उच्च दर्जाची पाळणाघरे उपलब्ध आहेत असे होत नाही. यावर उपाय काय? पालकांनी संघटित होवून प्रयत्न करणे शक्य आहे का?
ज्या घरात आजीआजोबा आहेत तिथे आजीआजोबांना झेपत नसताना नाईलाज म्हणून नातवंडे सांभाळायला लागणे, कारण वरकड मदत परवडणारी नाही ते घरात परवडते आहे म्हणून मदतीला दोन बायका आणि आजीआजोबांची देखरेख अशी श्रेणी आहे. त्याशिवाय आजीआजोब देखील त्यांच्या व्यवसायात व्यस्त असल्याने कुटुंब एकत्र असले तरी आजीआजोबांवर नातवंडांची जबाबदारी नाही असेही चित्र आहेच. जे काही प्रश्न आहेत ते मोकळेपणाने बोलूनच त्यावर उपाय शोधायचा. काहीवेळ त्यातल्या त्यात कमी वाईट पर्याय निवडायला लागणेही करावे लागते. नाईलाज असतो.

आत्ताच्या पालकांत सहनशक्ती कमी असे सरसकटीकरण का करावे? व्यक्ती तितक्या प्रकृती. पूर्वीच्या काळी पालक खरेच सहनशील होते का? की हे आपले आधीच्या पिढीने पुढील पिढीला नावे ठेवायच्या रिवाजाला अनुसुरुन उगाचच? परवा स्काईप-गप्पांच्या ओघात माझी आई म्हणाली भारतातले आताच्या पिढीचे आयुष्य फार धकाधकीचे झालेय, प्रवासात केवढा वेळ जातो, कामाचे प्रेशरही फार आहे. त्यातूनच वेळ काढून मुलांना चांगलं देण्यासाठी धडपडतात बापडे.
लेखात तुम्ही कठोर आधुनिक आयांचा उल्लेख केला आहे तर असेच वर्तन करणारे बाबा तुम्हाला आढळलेच नाहीत का? मुलांना रमवणे, त्यांच्या पातळीला येवून त्यांच्याशी खेळणे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यामुळे लगेच आई कठोर होते का? कदाचित दिवसभराच्या व्यापाने ती थकलेली असेल , विरंगुळा शोधत असेल. काही वेळा नकळत ते व्यसन झालेले असते. बरेचदा मोबाईलवर ऑफिसचेच काम नाईलाजाने सुरु ठेवावे लागते. प्रवासात आईने मुलाला विरंगुळा म्हणून आठवणीने कार सोबत ठेवली होती. कारशी थोडावेळ खेळून मुलगा झोपला. यात खटकण्यासारखे काय? मुलाने इतर सहप्रवाश्यांना त्रास देवु नये म्हणून तिने हा उपाय योजला असेल. ती स्त्री खिडकीबाहेर निरुद्देश बघत बसली असती तर लगेच चांगली आई ठरली असती का? त्या प्रवासाच्या वेळात तिने बरेच दिवस वाचायचे ठरवलेले एखादे पुस्तक वाचले असेल, दूर रहाणार्‍या जिवलग मैत्रीणीशी निवांत गप्पा मारल्या असतील. तिला प्रवासाच्या निमित्ताने मिळालेला मोकळा वेळ त्याबद्दल आपण का जजमेंटल व्हावे?

मोबाईलचा वापर, स्क्रीन टाईम हे कमी असावे असे वाटणे योग्यच पण बरेचदा दुसरा काही पर्याय न सुचल्याने, तसे होत असावे. मुद्दाम मुलाकडे दुर्लक्ष करणे असा हेतू त्यात नसतो. काही घरांतून जेष्ठांनाच त्यांच्या स्क्रिन टाईममधे खंड पडलेला चालत नाही. आमच्या नात्यात/ओळखीत काही ठिकाणे जिथे नवरा-बायको दोघेच रहातात त्यांच्याकडे टिवी/केबल नाही आणि एकत्र कुटुंब आहे तिथे टिवी/केबल हवाच अशी परीस्थिती आहे.
देशात मुलांना अभ्यास बराच असतो पण मग त्यातल्या त्यात कमी दडपण असेल अशी शाळा शोधावी. आमच्याकडे काही मंडळींनी मुलाला चक्क एक वर्ष वर्ग रिपीट करु दिले. काहींनी शाळेत विनंती केली की मुलाच्या कलेने घ्यावे, दडपण नको. पालक, शिक्षक भेटून चर्चा करुन मध्यम मार्ग काढला.

>>>>>लेखात तुम्ही कठोर आधुनिक आयांचा उल्लेख केला आहे तर असेच वर्तन करणारे बाबा तुम्हाला आढळलेच नाहीत का? मुलांना रमवणे, त्यांच्या पातळीला येवून त्यांच्याशी खेळणे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यामुळे लगेच आई कठोर होते का? कदाचित दिवसभराच्या व्यापाने ती थकलेली असेल , विरंगुळा शोधत असेल.

याला अगदीच अनुमोदन. हो आणि मला असे पाळणाघर परवडते म्हणून मी ते चूज करू शकते. जिथे आईचा पगार बाबापेक्षा खूपच कमी असतो तेव्हा सरळ (आईचा पगार - पाळणाघराचा खर्च) =? अशी आकडेमोड होते. आणि येणारा आकडा त्या बाईची नोकरीं चालू राहणार की नाही ते ठरवतो.
या अप्रोचला कितीही "प्रॅक्टिकल" ठरवले तरी असे केल्याने तुम्ही त्या मुली साठी तिच्या शिक्षणाने उघडून दिलेला एक दरवाजा कायमचा बंद करत आहात हे आलेच. अशावेळी घरची मंडळी बऱ्याचदा बाईने नोकरी सोडावी यासाठीच प्रयत्न करत असतात.
मुलांचे अटीतटीचे संगोपन फार तर फार पहिली 3 वर्षं करावे लागते. एकदा मूल पूर्ण वेळ शाळेत जाऊ लागले की ती चार वर्षं समजून घेऊन त्या आईला नोकरी देणारे कमी असतात. आणि मुलं ही आईच्याच स्पेसिफिक प्रेमाला आसुसलेली असतात वगैरे सगळ्या बायकांवर दबाव आणायच्या गोष्टी आहेत. प्रेम करणाऱ्या आणि प्रेमाने वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मूल चिकटते. आणि बाईबरोबर तिचे मूल वाढवणारी अशी एक टीम असली की तिचेही आयुष्य आनंदी होते. त्यात आजी आजोबांच्या आधी बाबा असला पाहिजे.
"पूर्वीच्या काळी" एकत्र कुटुंब पद्धतीत अशाच टीम्स मुलांना वाढवायच्या. आता फक्त त्या नवीन Hipster अंदाजाने deconstruct झाल्यात असे आपण म्हणू शकतो. नव्या काळाने नवीन पद्धत शोधून काढली आहे. पण मुलं आनंदी असली आणि प्रगती होत असली तर त्यात काहीच वाईट नाही!

>>>> मुलं ही आईच्याच स्पेसिफिक प्रेमाला आसुसलेली असतात वगैरे सगळ्या बायकांवर दबाव आणायच्या गोष्टी आहेत. प्रेम करणाऱ्या आणि प्रेमाने वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मूल चिकटते. >>>>> याच्याशी मात्र असहमत आहे. Sad आई ती आईच. शाळेतून येउन , घराला कुलुप पहावं लागणं आणि शाळेतून आल्या आल्या आई घरी असणं - यातील फरक नीट आठवतो. बाकी पाळणाघरात शिकायला मिळते, चौफेर बौद्धिक वाढ होते आदि बाबींशी सहमतच आहे.

>>> शाळेतून येउन , घराला कुलुप पहावं लागणं आणि शाळेतून आल्या आल्या आई घरी असणं - यातील फरक
पण इथे चर्चा कुलूप आणि आई याबद्दल सुरू नाही, इतर कोणीही वडीलधारी प्रेमळ जबाबदार व्यक्ती आणि आई याबद्दल सुरू आहे.

आता एकच मूल असल्या मुळे आणि घर
नातेवाईक ,शेजारी, ह्यांच्या साठी बंद झाल्या मुळे वेगळे वातावरण आहे .
मुलांची मानसिक वाढ समवयस्क मुल खेळायला असतील तर चांगली होते.
पण असे समवयस्क मुल बरोबर नसणे,खेळायला जागा नसणे किंवा खेळायला कोण्ही नसणे ह्या मुळे ती एककल कोंडी होत आहेत
मोबाईल चा अतिवापर मुळे मैदानी खेळ जवळ जवळ मुलांच्या आयुष्य तून बादाच झाले आहेत.
मोबाईल मधील भासमय विश्व आणि रिअल जग ह्यांचा कोठेच संबंध लागत नसल्या मुळे मुल मानसिक दृष्ट्या कमजोर होत आहेत
संकटाना तोंड देणे त्यांना जमत नाही.
म्हणूनच लहान सहान कारण वरून आत्महत्या करण्याचे प्रमाण तरुण न मध्ये वाढले आहे.
१५ दिवसा मधून एकदा तरी मुलांना मित्र मंडळी बरोबर राहण्यास मिळालं पाहिजे .
त्यांच्या मित्र ना घरी बोलावणे .
अशा खूप गोष्टी गरजेच्या आहेत.

कुलूप म्हंटलं तरी त्यातही मला काहीही वावगं वाटत नाही. मी latch key kid होते. मी एकुलती एकही होते. कितीतरी वेळा घराचे कुलूप उघडणारी मी असायचे. अगदी लहानपणापासून आईच्या तोंडावरच "बिचारी! एवढ्या लहान वयात घरी एकटी असते" वगैरे सगळे कमेंट्स मी ऐकले आहेत. त्यावेळी तुम्ही म्हणता तसं आई घरी असण्याची मज्जा काय आहे हेदेखील आठवतंय. आईबद्दल प्रेम, राग, चीड, आकस या सगळ्या भावना पुरेपूर अनुभवल्या आहेत.स्वतःच्या आईला अनेकवेळा जज केले आहे. पण पण पण..
आज मी ज्या स्थितीत आहे, जे काम करते, जशी राहते, माझ्या मुलाला जसे वाढवू शकते त्या सगळ्यासाठी माझ्या आईने नोकरी आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला याबद्दल मी तिची ऋणी आहे. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते सगळे मी तिच्याकडूनच घेतले आहेत. आणि माझी सल्लागार, मैत्रीण वगैरे म्हणाल तर माझी आईच आहे.
आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींचे वेगवेगळे रूप अनुभवतो. आपल्या मुलांशी आपले नाते निर्मळ असेल तर त्यांनाही कधी ना कधी आपण जे निर्णय घेतले त्यामागे काय कारण होते याचे भान येते. Life comes a full circle and you learn to appreciate the positives.
आणि स्वतःच्या करियरचा त्याग करून घरी राहून मुलांना बघणाऱ्यां आया मुलांकडून कधीच जज होत नाहीत असेही नाही. आपल्या पालकांबद्दल विविध मानवी भावनांचे full spectrum अनुभवल्याशिवाय कोण हे जग सोडून गेला आहे?

सई, स्वाती२ छान प्रतिसाद. सहमत.
आई ही आई असं काही नसतं. जो/ जी मुलांना जास्त वेळ देतो/ देते त्याला/तिला मुलं जास्त चिकटतात. कुठला खेळ खेळायला कोण चटकन 'हो' म्हणेल हे पोरांना बरोबर समजतं आणि ते त्याला/ तिला विचारतात. शाळेतुन घ्यायला जायला एखाद दिवस उशिर झाला तर पोरगा बाईंना सांगतो, "आज माझा बाबा येणार असणार". आणखी काय सांगतो हे ऐकण्याआधी मी पुढच्या मिटिंगला उशिर होण्याच्या भयाने पळतो. Happy
आजी/ आजोबांवर जबाबदारी न टाकता मुलं वाढवता आली याबद्दल मला ही सई सारखंच वाटतं. तिकडे गेल्यावर दोन्ही साईड फक्त मजा करतात.

बाकी डे-केअर मला आवडतं आणि मुलांनाही आवडतं. तिकडे एखाद दिवस जायला मिळालं नाही की पोरं रडारड करतात (याचं देसी मानसिकतेने आम्ही बिलकुल वाईट वाटून घेत नाही). तिकडे/ शाळेत कायकाय भारी गोष्टी असतात/ जसं शिकवतात ते बघुन मला माझ्या बालपणाची आणि शाळेची दया येते.

>>घसरगुंडी, झोका वगैरे तत्सम प्रकार असतात .अशा ठिकाणी आई त्या मुलाला घेऊन जाते आणि मुलाला घसरगुंडीच्या हवाली केले जाते.>> इथे आईने मोबाईल मध्ये डोकं न खुपसता मुलाच्या मागे मागे फिरत राहिली असती, त्याला/ तिला काय होतंय का? तो/ती पडत तर नाहीये ना? कोणाशी/ काय बोलत्येय? इ. करत राहिली असती तरी तुम्ही "आमच्या काळी आम्ही कसे मोकाट खेळायचो... आणि त्यातुनच कसे शिकलो आणि हल्लीच्या आया कसे स्पून फीडिंग करतात आणि मुलांची वाढ खुंटवतात ... ब्ला ब्ला लिहिलं असतंत.
मी प्ले एरियात स्ट्रिक्टली पोरांना सोडून दूर जाऊन (अधिमधी मोबाईल बघत) बसतो. त्यांना हे कर/ करू नको सांगायला जात नाही. पडली (फार लागणार नाही असं वाटत असताना) तरी धावत नाही. मग ती झाँबीने काय केलं याच्या गप्पा ठोकत एकमेकांवर मॅजिक स्पेल टाकत बसतात. बसूदे!
कार हातात देऊन त्या मुलाला त्याच्यात मन रमवायला शिकवणारी ललना बेस्ट की! काय करायला हवं होतं तिने? मुलांशी बोलून बोलून डोकं कलकलतं हो कधीकधी!. 'आय स्पाय' आणि 'गेस द पर्सन गेम'... आणि 'आय हॅव क्वेश्चन' हू!!!!. अहो कार मध्ये बसल्यावर हे गेम तासंतास पालक खेळतात. त्या पोराने ओन्ली टू मिनिट्स मोबाईल मागितला नाही ऐकून मला कसला हेवा वाटलाय सांगू!
तुमचं वय झालंय असं वाटतंय. आपल्या पूर्वीच्या प्रथेप्रमाणे वानप्रस्थाला का जात नाहीयात? सगळे पाश सोडून मज्जा करा, आणि नव्या पिढीला त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या.

>>>>> त्या सगळ्यासाठी माझ्या आईने नोकरी आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला याबद्दल मी तिची ऋणी आहे. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते सगळे मी तिच्याकडूनच घेतले आहेत. आणि माझी सल्लागार, मैत्रीण वगैरे म्हणाल तर माझी आईच आहे.>>>> सुंदर, परिपक्व, प्रगल्भ विचार सई.
>>>>>>>त्यामागे काय कारण होते याचे भान येते.>>>>>> +१००
>>>>>>> Life comes a full circle and you learn to appreciate the positives.
आणि स्वतःच्या करियरचा त्याग करून घरी राहून मुलांना बघणाऱ्यां आया मुलांकडून कधीच जज होत नाहीत असेही नाही. आपल्या पालकांबद्दल विविध मानवी भावनांचे full spectrum अनुभवल्याशिवाय कोण हे जग सोडून गेला आहे?>>>>> पूर्ण प्रतिसादच टिपून ठेवावा असा दिलेला आहेस.

Pages