डिटॉक्स.

Submitted by अश्विनीमामी on 20 January, 2010 - 06:33

मामीच्या मेंट्ल स्पा मध्ये आपले हार्दिक स्वागत. हे काही मेन्टल हॉस्पिटल नव्हे तर आपल्या मनासाठी एक
आरामाची, रीचार्ज होण्याची जागा आहे. आजकाल आपल्यापैकी बरेच जण जिमला जातात मग मेहनत करून झाल्यावर कधी कधी ट्रेनर सांगतो आता या वीकांताला तू फुल बॉडी मसाज घे, एक बॉडी रॅप घेऊन बघ स्किन अगदी नव्यासारखी होइल. आवडत असेल ते फेशिअल घे. दोन तीन दिवस डिटॉक्स डायेट कर. ­बघ अगदी नवीन वाटेल तुला. ताजे तवाने वाटेल. मी काल विचार करत होते. हे असेच काहीतरी आपल्या मनासाठी का नको?

जसे आपल्याला भान येते व आपण लहानाचे मोठे होतो. अनेक नाते संबंधांचा भाग होतो. कधी आपण त्यातून काहीतरी मिळवितो तर कधी काही तरी देतो. कधीतरी हिशेब चुकतात व मनाला त्रासच होतो. जसे आपले शरीर कायम आपल्या बरोबरच असते तसेच हे मन देखील आपल्याबरोबरीने सारे सुखदु:ख उपभोगत असते, आघात सोसत असते.

पण एक आहे. रोज स्नान करून शरीर सुन्दरपैकी स्वच्छ, सुवासिक होते. पण मन मात्र कितीतरी जुन्या नात्यांचे संबंधांचे हरवलेल्या मैत्र्यांचे घाव आठवणीस्वरूपात बरोबरच घेउन हिंडते. त्यामुळे ते भारावलेले, जडावलेले असते. अश्या कितीतरी आठवणी असतात ज्यांनी आपल्याला त्रास होतो, कधी रडू ही येते, का मला कोणी समजावून घेतले नाही, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, आनंदात सहभागी करून घेतले नाही. असा आकांत मनात उसळतो. काही लोक, काही प्रसंग आपल्याला आपसुक रागाने मुठी आवळायला लावतात. कधी तिरस्काराने मन भरून जाते. तर कधी पश्चात्तापाने! या नकारात्मक भावना आपले मानसिक जीवन व्यापून टाकतात व त्यात नवे अनुभव चाखून बघायला, नवे आनंद घ्यायला जागाच शिल्लक ठेवत नाहीत.

कसे कराल आपले मन डिटॉक्स? एखादी दोन तीन दिवसांची सुट्टी बघून ठेवा व हे डिटॉक्स प्लॅन करा.
ही एक पूर्ण वैयक्तिक बाब तसेच मोठ्या माणसाने करण्याची गोष्ट असल्याने मुलांची काळजी आपल्या
पार्टनर वर सोपवा. आपल्या घरीच हे करू शकता पण शक्य असेल तर आपल्या आवडीच्या, जिथे आपल्या पॉझिटिव असोसिएशन्स असतील त्या जागी जा. जसे कोकणातील गाव/ आवड्ता बीच/ ट्रेक/ अगदी मॉल मधील गॅलरी पण चालेल. पण शक्यतो बाहेरचा उपद्रव फार होणार नाही असे ठिकाण निवडावे. थोडी शांतता अपेक्षित आहे.

ज्या वेळी आपल्याला कामाचे फोन वगैरे येणार नाहीत साधारण पणे त्या वेळी एक खोल उडी आपल्याच मनात घ्यायची आहे. लहानपणीचे अपमान, जसे हिसकावून घेतलेला बॉल, खेळातील खोटे पणे, पालकांचे वागणे, शिक्षकांचे ओरडणे, वगैरे पासून सुरुवात करून मग वयात येताना झालेले दु:खी प्रसंग, विरह,
पहिला प्रेमभंग, कदाचित काही वेडेपणे नकळत घड्ले असतील ( दिल चाहता है मधील आकाश आठ्वा)
ते सर्व आठ्वणीत आणा, आता ते काही रेलेवंट आहे का त्याचा विचार शांतपणे, तट्स्थ पणे न इन्व्हॉल्व होता करा. नाहीतर त्या आठ्वणी डिलीट करा. झाली मेमरीत जागा. हीच प्रोसेस पुढे नेत नेत मग नोकरीतील अनुभव, वैयक्तिक नातेसंबंधातील अवघड प्रसंग, तुटी त्रास, अपमान आठ्वत व प्रोसेस करत करत चालु ठेवायची आहे. एखादा कप चहा किन्वा कडक कॉफी घ्या मध्ये. मॅगी टॉमॅटो सूप पण चालेल की. हलके जेवा. व ही अंतर्मनाची सहल चालूच ठेवा. यात जसे आपण जुने चान्गले पण आता न फिट होणारे कपडे, विट्लेल्या साड्या, कॉलर वर गेलेले शर्ट टाकायला बाहेर काढतो तसे तेव्हा ज्या ने आपण खूप दुखविले गेलो होतो त्या घटना, ते शब्द, मनात आणायचे. ती व्यक्ती आता या घडीला, आपल्या भविष्यात किती आवश्यक आहे, की ती नसलीच तरी काहीच फरक पडणार नाही हे मनात पक्के करायचे.
कारण आपला प्रवास पुढे जाण्याचा आहे. ज्यांनी आपल्याला घडविण्यात मोलाची मदत केले पण जे आता जवळ नाहीत किंवा जगातच नाहीत त्यांच्या आनंदी आठ्वणी आपण एका रत्नजडित पेटीत सुरक्षित ठेवणार आहोत व ती सोबत घेऊन पुढे जायचे आहे.

इथेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कधी कधी आपण आसुसून प्रेम केलेले असते, कामात एखाद्या
विषयावर जिवापाड मेहनत केलेली असते ती वाया जाते. आपण दु:खी होतो. पण ती प्रेमाची भावना,
ते ज्ञान आपल्या जवळ असतेच की. त्या व्यक्तीपासून ती निखळ चान्गली भावना ते ज्ञान अलग करून
हलकेच आपल्या त्या पेटीत नीट ठेवायचे आहे. व उरलेली नकारात्म्क भावना मग का ओझे बाळगत फिरायचे? द्या सोडून. झाली बघा मेमरी मोकळी. आता तिथे नवे अनुभव, आनंद नवे ज्ञान येइलच. ते वाट्च बघत आहे. मन हलके झाले ना!

आता या रिकाम्या जागी एक सुन्दर दिवा लावायचा ज्यात सुगंधी तेल आहे व कधी न विझणारी वात आहे. त्याने आपले अंतर्मन उजळून निघेल. सुवासिक होइल. मग एक मोठा श्वास घ्या व आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींना( those who really love you for what you are and accept you for your strengths and with your weaknesses) फोन करा, त्यांना तुमच्या नव्या लाइट मनोव्रुत्तीचा लाभ घेउ द्या. कदाचित मुलांना तुम्हाला एखादे चित्र दाखवायचे असेल. पार्टनरला नवे गाणे ऐकून तुम्हाला सांगायचे असेल. नवी सुखे, नवे आनंद तुमच्या मनात येऊ पहात आहेत..... येउ द्या ना त्यांना.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer: I am not a trained therapist and this may not cure entrenched psychological diseases. You need to see a therapist for that.

गुलमोहर: 

आवडले मामी. जमलय जमलय ते करायला.. जशी मॅचुरिटी वाढत जातीये तसे जास्त पटकन जमतय Happy ... खुप बरं वाटतं.

मामी,
निशुल्क सेवा असल्यामुळे कि काय पण, तुमच्या डिटॉक्स स्पा वर खुप गर्दि झालिय.
आता किमान प्रवेश फी चालु करा बरं का Happy

मामी, खूप मस्त आणि खरं लिहिले आहेत.
नुकतेच खूप दिवसांनी मला स्वतःसाठी निवांत असा वेळ मिळाला. तेव्हा मीही हा प्रयोग केला होता. माझ्याकडून झालेल्या काही चुका, काही प्रसंगी इतरांकडून झालेले अपमान, जवळच्या लोकांचे आलेले कटू अनुभव यांचा मी विचार केला. आत्तापर्यंत केवळ याचा विचार करून मी स्वतःला त्रासच करून घेत होते, 'जशास तसे' असेच वागत होते.पण यावेळी असा त्रास नाही झाला. मन शांत-निवांत असल्याने असेल कदाचित, या सगळया गोष्टींकडे नव्या दॄष्टीने बघितले आणि मी च बदलून गेले. एकदम हलके हलके वाटले, मनावरचा ताण कमी झाला,माझे वागणे बदलले. सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघू लागले. आणि खरं सांगते, यावेळची सुट्टी मी सगळ्यात जास्त एंजॉय केली.

मनाचा डिटॉक्स.... भन्नाट विचार आहे, आणि मामी, लिहिलयही सुंदर. छान एकसंध, सुरेख उतरलेत विचार.

धन्यवाद मनापासून. मेंट्ल स्पा फुल स्पीड्मध्ये दुसर्‍या आर्टीकल वर काम करत आहे. Happy मायबोली नसती तर हे सारे विचार माझ्या मनात फुलून सुकून गेले असते केव्हाच.

मामी,
तुमच्या या स्पानी शतक ठोकलाय.
हा घ्या शतकी ग्राहक.
मला मात्र सवलतीच्या दरात बरं का मामी! (दोन चार अधिकच्या टिप्स मला कानात सांगा)
मी शंभरवा ना! म्हणून.

सुरेख.
त्या व्यक्तीपासून ती निखळ चान्गली भावना ते ज्ञान अलग करून हलकेच आपल्या त्या पेटीत नीट ठेवायचे आहे. व उरलेली नकारात्म्क भावना मग का ओझे बाळगत फिरायचे? <<<<<< व्वा ! लोक ज्यावर कोर्स/डिस्कोर्स करतात, ते तुम्ही एका वाक्यात सांगितले.

अश्विनीमामी तुम्ही लिहीलय त्यात तथ्य आहे.

मन, पूर्व-अनुभुतांवर विचार करण्यात व्यस्त राहिल्यास वर्तमानातील वास्तवांचा सामना नीटपणे करू शकत नाही.

इथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. मी पहिल्यांदा योगसाधना करू लागलो तेव्हा मला ती सांगितली गेली होती.

दोन शिष्य नदीपलीकडे कामाखातर गेलेले असतात. परततांना धुवाधार पाऊस पडतो. नदीला पूर येतो. पाणी गळ्यापर्यंत चढते. मग उपायच न राहिल्याने ते त्या तेवढ्या पाण्यातूनच आश्रमात परतण्याचा विचार करतात. तेवढ्यात त्यांना एक स्त्री दिसते. ती गर्भार असते. असहाय्य असते. त्यांना विनंती करते की "मला खांद्यावर बसवून पलीकडे न्याल का?" शिष्य आपसांत विचारविनिमय करतात. एक शिष्य तिला नेण्यास तयार होतो. ते नदी पार करून जातात. बाई खाली उतरते आणि आपल्या वाटेने निघून जाते.

शिष्य आश्रमाकडे जाऊ लागतात. सारी वाटभर अगदी नि:शब्द. आश्रमाच्या दाराशी पोहोचतांना ज्याने स्त्रीला उचलून खांद्यावरून वाहून आणले होते, त्याला दुसरा शिष्य म्हणाला की:

"आपण ब्रह्मचारी आहोत. तू स्त्रीला असे उचलून आणलेस हे काही चांगले केले नाहीस. तुझे ब्रह्मचर्य बुडाले. मी आता गुरूजींना सांगणार!"

त्यावर वाहून आणणारा शिष्य म्हणाला:

"म्हणजे काय? तू आतापर्यंत तिलाच मनात धरून आलास की काय? मी तर तिला नदीवरच उतरवून परतलो आहे. मग दीर्घकाळ तिचाच विचार करत राहिल्याखातर तुझेच ब्रह्मचर्य बुडाले असणार. म्हणून मीच तुझे नाव गुरूजींना सांगतो!"

मामी, उत्तम लिहीलय. अगदी सगळ्यानी करण्यसारख डीटॉक्स आहे हे. इन्फॅक्ट करायलाच पाहिजे असं डिटॉक्स... जगातले निम्म्याहुन अधिक प्रॉब्लेम्स कमी होतिल.... Happy

मनात गाळ साठायच्या आधीच मधुन मधुन असा डीटॉक्स आवश्यक आहे.

मागे मी SSY चा कोर्स केला होता. त्याचा खुप फायदा झाला.

कित्येक वेळेला आपल्याला थोडी मदत लागते असं डिटॉक्स व्हायला. आणि मला SSY ची खुप मदत झाली.

कुठेतरी वाचलं होत - 'मन गाळण्यासारखं (स्ट्रेनर) असाव.... जे चांगल ते ठेवाव राखुन... जे नको ते टाकुन द्याव'.... (अर्थात गाळणं दुहेरी काम करत Happy हा भाग विरळा )

हे करता करता चान्गल्या फाइलपण डिलीट झाल्या. एखाद रीसायकल बीन आहे का?>> आहे ना खरा इतिहास नावाच्या बीबी वर ठेवली आहे खास तुमच्यासाठी. तिकडेच जा.

आज हे फॉरवर्ड आले, आणि मामींचा लेख आठवला
जरा मन आवरायला घेऊ

***
या दिवाळीत सारं घर
झाडूनपुसून लख्खं केलं.
माळे काढले.
नकोशा वस्तू काढून टाकल्या.
काहीत रुतल्या होत्या आठवणी.
त्या हातात धरून पाहिल्या.
पण नको आता ही अडगळ,
काय उपयोग म्हणून सरळ
भंगारमधे दिल्या.
जुने कपडे,
मोडकी भांडी,
तुटक्या खुर्च्या,
विरले पडदे,
फाटके अभ्रे.
नकोत आता असं बजावलंत
ना स्वत:ला.
आणि ते बाहेर काढून
जरा मोकळी केली जागा.
आणि
नवीन काही घेऊ तेव्हा घेऊ पण
आता जुन्याची अडगळ नको.
पसारा नको.
आणि हा हावरटपणाही नको.
नाही नाही ते जमवण्याचा.
त्यानंतर कसं सारं स्वच्छ,
मोकळं. आणि सुटं झालं.
***
हे असं सारं या दिवाळीत आपल्या
मनाचंही केलं तर?
मनातली अशी अडगळ.
कधीचे सायडिंगला पडलेले माळे.
त्या माळ्यावर टाकून दिलेल्या आठवणी,
त्यातले काच.
संताप.
चिडचिड.
आणि काही मनभर पसरलेला पसारा.
त्यावर बसलेली धूळ
अस्ताव्यस्त भावनांचे तुकडे,
नकोशा आठवणी,
द्वेष.
असूया.
जिव्हारी लागलेले अपमान.
बदल्याची भावना.
सूडाची आग.
हे सारं आपण काढून टाकू शकू
मनातून या दिवाळीला?
मोकळी करू जरा जागा
नव्या आनंदासाठी?
***
जुनाच पसारा तसाच ठेवला तर
नव्या गोष्टींना जागा कशी व्हायची?
नव्या माणसांना प्रवेश कसा मिळायचा?
आणि आपल्याला तरी हलकं,
फ्रेश, ताजतवानं कसं वाटायचं?
***
म्हणून वाटतंय की,
या दिवाळीत एवढं करूच.
जरा मन आवरायला घेऊ.
अडगळ काढून टाकू.
रडून घेऊ वाटलं तर!
म्हणजे त्या पाण्यात स्वच्छ होतील
काही आठवणी.
बोलू मनापासून
आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर
उधानउसनवारीच्या स्मायली नको.
प्रत्यक्ष बोलू,.
खांद्यावर डोकं ठेवून.
काय ते सांगून मोकळे होऊ.
राग-संताप असेल तर तो सांगू.
प्रेम असेल तर तेही सांगू.
पण जरा बोलूच.
***
कशाला उगीच जिवाला जाळायचं?
कशाला काजळी धरून द्यायची मनावर?
कशाला हवी उदास मेणचट वारूळं?
आणि कशाला उगीच धरून बसायच्या
छोट्याछोट्या गोष्टी?
या दिवाळीत विचारू ना हे प्रश्न स्वत:ला?
आणि लख्खं उजळवून टाकू मन.
आपलंच.
आपल्यासाठी!
आपणच!
***
जमेल का?
का नाही?
एक दिवा जर सारा अंधार उजळवतो
तर तसाच एक सुंदर प्रकाशाचा किरण
आपल्या मनाला का उजळवणार नाही?
-उजळेलच की!
त्या ‘उजाळ्याचीच’ खरी गरज आहे!!
दिवाळी च्या खूsssप खूsssप शुभेच्छा....
>>>>>>

हॅपी दिवाळी

अतिशय सकारात्मक लेख. अगदी अशाच प्रकारचे विचार परवा १० ऑक्टोबर - वर्ल्ड मेंटल हेल्थ डे ला येउन गेले. इतक्या समर्पक रीतीने उतरविणे माझ्याकरता अशक्य होते.
>>>>>>>>>> द्या सोडून. झाली बघा मेमरी मोकळी. आता तिथे नवे अनुभव, आनंद नवे ज्ञान येइलच. ते वाट्च बघत आहे. मन हलके झाले ना!

आता या रिकाम्या जागी एक सुन्दर दिवा लावायचा ज्यात सुगंधी तेल आहे व कधी न विझणारी वात आहे. त्याने आपले अंतर्मन उजळून निघेल. सुवासिक होइल. मग एक मोठा श्वास घ्या व आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तींना( those who really love you for what you are and accept you for your strengths and with your weaknesses) फोन करा, त्यांना तुमच्या नव्या लाइट मनोव्रुत्तीचा लाभ घेउ द्या. >>>>>>>>>
फार सुंदर लिहीलयस अमा!
माझ्याकरता स्तोत्रे वाचणे हे शांती मिळवण्याचे फार मोठे साधन आहे. लोकं व्यासंग वाढवतात, छंद जोपासतात, तशी मी स्तोत्रे वाचते.

मामी आणि अमा एकच आहेत का. धागा काढणाऱ्याच्या जागी अमा दिसतंय आणि खाली लिहिलंय मामी यांच्या स्पामध्ये स्वागत. हे असं फक्त मलाच दिसतंय का.

दोघी भिन्न आहेत असा माझा ९९.९९% कयास आहे. ताईंचा सल्ला जसे 'क्लिशे' शीर्षक असते. तसे अमा यांनी 'वेलकम टु मामीज स्पा' असे लिहीले आहे असे वाटते. पण एक मिनीट - इतरजणही मामी म्हणुन संबोधत आहेत खरे!!!

अमा आयडी आणि मामी आयडी दोन वेगळ्या व्यक्ती आहेत.
अमांना काही जण मामी (बहुतेक नात्याने) संबोधायचे असे जुन्या धाग्यातून दिसते.

छान लिहले आहे अमा. मनाचा डीटॉक्स करणे खुप गरजचे आहे.
अमांचा बहुतेक अश्विनी मामी हा जुना id होता असा मला वाटते.
किन्वा म जुने मोबोकर अमां ना मामी म्हणतात आदराने.

अमांचा बहुतेक अश्विनी मामी हा जुना id होता असा मला वाटते_ त्या चाच शाॉर्टफॉर्म अमा आहे. म्हणूनच त्या दोन अश्विनीमध्ये येण्याचा उल्लेख करतायत.

अमांचा बहुतेक अश्विनी मामी हा जुना id होता असा मला वाटते_ त्या चाच शाॉर्टफॉर्म अमा आहे.
ओह असे आहे तर. मला वाटायचे अमा म्हणजे आई असा अर्थ आहे .
कारण अमां च्या प्रतिसादात बर्याचदा हैद्राबाद चा उल्लेख येतो. त्या बहुतेक तिथे राहिल्या आहेत सो अमा असे नाव ठेवले id चे. Happy असे मला वाटयचे.

Pages