Happy birthday महानायक....!

Submitted by Narsikar Vedant on 10 October, 2019 - 14:40

१९४२ साल हे 'चले जाव' या ऐतिहासिक आंदोलनासाठी इतिहासात नोंदवलं गेलं, पण ह्यावर्षी अजून एक ऐतिहासिक घटना घडली आणि ती घटना होती महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म!

त्यानं काय केलं नाही पडद्यावर? ऍक्शन केली, रोमान्स केला, गाणं म्हटलं, डान्स केला, हसवलं, रडवलंही आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दिली. आपल्याला जे आवडतं ते सगळं त्याने केलं आणि एक काळ असा आला की तो जे काही करतोय तेच आवडतंय.

त्याचा कुठलाही सिनेमा बघताना कळतं की, काय काय बारकावे टिपलेत त्याने. चालण्याची पद्धत, चेहरा हलवायची-बघण्याची स्टाईल, पॉझ कुठे, कसा व किती घ्यावा ? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवाज! आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या या माणसाचा चेहरा सुद्धा प्रचंड बोलका आहे.

त्याचे कोणत्याही सिनेमातील एक्सप्रेशन्स बघा, चेहऱ्यावरील रेषांची होणारी हालचाल त्याच्याशिवाय कोणीच करू शकत नाही.

'दीवार' मध्ये त्याला मिळालेल्या खुर्चीकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा.

'आज खुश तो बहोत होगे तुम' च्या सीन मध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किती सरसर बदलतात हे बघणं फारच रंजक वाटतं.

त्यानंतर परवीन बाबीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सामंतकडे जातो, तिथे फालतूची फायटींग नाही, सामंतला एकाच फटक्यात ग्राऊंड फ्लोअरला डीलीव्हर करतो.

'शोले' मध्ये म्हशीवरून उतरतानाचा त्याचा अभिनय न बोलताही बरंच काही बोलून जातो.

मरणप्राय अवस्थेत ज्यावेळी तो विरूला म्हणतो की ,"अपने दोस्ती की कहानी तू उन्हें बतायेगा ना, भूलेगा तो नहीं....?" म्हणतानाचा त्याचा चेहरा सगळं काही बोलून जातो.

'त्रिशूल' मध्ये 'शांति कन्स्ट्रक्शन' च्या बोर्डकडे बघतानाचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव उत्कृष्ट अभिनय आणि टायमिंगचं उदाहरण म्हणावं लागेल. उगीच कुणी महानायक होत नाही. त्यासाठी अभ्यास लागतो, निरीक्षण पाहिजे.

दारू पिण्याची अॅक्टींग करावी तर त्यानेच!
'नसीब' मधील 'चल मेरे भाई' गाण्यातील त्याचा अभिनय खऱ्या दारुड्याची आठवण करून देतो.
'शराबी', 'सत्ते पे सत्ता', 'सुहाग', 'मुकद्दर का सिकंदर', 'अमर अकबर अँथनी' ह्या सर्वच सिनेमांमध्ये त्याने जे काही केलंय त्याला शब्दच नाहित.

'सरकार' मध्ये त्याने जो आवाज वापरलाय ना तो खरंच लाजवाब !

'बागबान' मध्ये त्याची सून त्याच्या हातातून पेपर हिसकावून घेते त्यानंतर 'त्या'च्या चेहऱ्यावरचे भाव बघा.

'देश प्रेमी', 'आखरी रास्ता', 'सुर्यवंशम्' या डबल रोल असलेल्या सिनेमांमध्ये त्याचा तरुण भुमिकेसाठीचा आवाज आणि वृद्ध भुमिकेसाठीचा आवाज ह्यामध्ये कमालीचा बदल जाणवतो.

७०-८० च्या दशकात सिनेसृष्टीला व्यापून टाकणाऱ्या ह्या अवलियाला 'कुली' च्या सेटवर मोठी दुखापत झाली. त्यावेळी संपूर्ण देशाने त्याच्यासाठी प्रार्थना केली, काहीजणांनी नवस बोलले तर काहींनी देव पाण्यात ठेवले. हे सगळं काही त्यानं पडद्यावरून जे काही दिलं त्याची परतफेड होती.

यश चिरकाल टिकत नाही. अमिताभच्या आयुष्यातही अपयशाचा काळ आला , कर्जबाजारी झाला. परंतू त्याने हार मानली नाही. ज्याकाळी छोट्या पडद्यावर येणं हे सिनेमापेक्षा कमीपणाचं लक्षण होतं त्याकाळात या पठ्ठयानं 'कौन बनेगा करोडपती' केलं. आणि तोच कार्यक्रम आज सर्वाधिक टिआरपी खेचतोय ह्यात जास्त योगदान अमिताभचंच! त्याने छोट्या पडद्यावर केलेली एंट्री बघूनच इतर कलाकारांनीही आपला मोर्चा टिव्हीकडे वळवला.

अमिताभच्या यशात त्याच्या भारदस्त आवाजाचाही वाटा आहे. आवाजाचा योग्य वापर, नाजूकपणा, चढ-उतार यांचं अचूक मिश्रण त्यानं साधलं. 'जंजीर', 'डॉन', 'दीवार', 'त्रिशूल', 'शक्ती', 'आखरी रास्ता', 'शहेनशाह' या सिनेमांमधले संवाद गाजले ते त्याच्या आवाजामुळेच!

तो संवाद म्हणताना कुठलाही टारगटपणा करत नाही (उदा. राजकुमार 'जानी' वापरायचा). आवश्यक त्या शब्दांवर जोर देणे, स्पष्ट उच्चार हि त्यांची खासियत. म्हणूनच तर कभीकभी, सिलसिला मधील कविता श्रवणीय वाटतात. त्याला बघत-ऐकत काही पिढ्या मोठ्या झाल्या. अनेकजण स्वतःला वृद्ध समजतात पण हा माणूस अजूनही नवतरुणांना लाजवेल अशी एनर्जी घेऊन काम करतोय. त्याने असंच काम करत राहावं अन् ईश्वरानेही या महानायकाला निरोगी दिर्घायुष्य द्यावं हिच प्रार्थना!

Happy birthday महानायक !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा आवडता नायक... शोले, जंजीर, दिवार... मुकद्दर का सिकंदर मला आवडलेत. काला पत्थर, शोले विशेष आवडले. पारायणे केलीत.