ब्रॉडचर्च - इंग्रजी मालिका

Submitted by राधानिशा on 11 October, 2019 - 11:48

मी फारशा क्राईम- डिटेक्टिव्ह / पोलीस मालिका पाहिलेल्या नाहीत ... इंग्रजीतील ह्या प्रकारातली पहिलीच पाहिलेली ही मालिका , ती आवडली .. हिच्यापेक्षाही खूप चांगल्या- अधिक प्रसिद्ध इंग्रजी क्राईम मालिकां इथे अनेकांनी आधीच पाहिलेल्या असतील , त्यामुळे कदाचित यात फारसा रस वाटणारही नाही याची मला कल्पना आहे .. तरीही कुणालातरी पाहावीशी वाटेल आणि आवडेल म्हणून इथे शेअर करत आहे .

ब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ...

आधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच . पण हिचं दुसरं अनोखं वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध बऱ्यापैकी उलगडून दाखवले आहेत ... त्यातून त्या त्या माणसांचे स्वभाव , त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन , अपेक्षा , स्वप्नं , अणि प्रत्यक्षात वाट्याला येणारं आयुष्य , त्यातल्या अनपेक्षित समस्या हे सगळं पाहायला मिळालं .. तरुण वयात ठराविक पॉइंटवर आयुष्यात सगळं सुरळीत गोड होणार आहे असं वाटत असतं पण जसा जसा काळ जातो तशा विचारही केला नव्हता अशा समस्या पुढे येतात ... सगळ्याच घटकांवर माणसाचा ताबा राहत नाही ... कदाचित या समस्यांना आपापल्या कुवतीनुसार तोंड देणं , त्यांनी बदलवलेल्या आयुष्याशी ऍडजस्ट करत करत त्यातही आनंद शोधण्यासाठी धडपडणं म्हणजेच आयुष्य असंही मालिका बघताना एकदा पुसटसं वाटून जातं ...

आधुनिक युरोपियन समाजातील नवरा बायको , आई वडील - मुलं , शेजारी / वर्षानुवर्षे मैत्रीचे संबंध असलेली माणसं यांच्यातील परस्परसंबध ज्या पद्धतीने दाखवले आहेत तसे याआधी कुठल्या मालिकेत पाहिले नव्हते ... पहिल्या सिजन मध्ये सीआयडी डिटेक्टिव्ह एली मिलर हिच्या 11 वर्षे वयाच्या निरागस मुलाचं पात्रं भेटतं ... 2 सिजन मध्ये पात्र प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी ओळखीचं होतं , आवडू लागतं .. तिसऱ्या सिजन मध्ये 15 वर्षे वय दाखवलं आहे .. त्याच्या आईला शाळेत येऊन भेटण्याची सूचना येते , हा मुलगा आणि मित्र इतर मुलांना मोबाईल मध्ये पॉर्नचे व्हिडीओ देत असल्यामुळे एक आठवड्यासाठी सस्पेंड केलं आहे म्हणून सांगतात , आई फोन जप्त करून घेते पण मुलगा तिने लपवलेला फोन पुन्हा घेऊन तसलेच व्हिडीओ पुन्हा त्यात घेतो .... हे समजल्यावर एली हातोड्याने त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप ठोकून ते उपयोगशून्य करून टाकते आणि यापुढे शाळेच्या अभ्यासासाठी कॉम्प्युटरची गरज असेल तर शाळेतला कॉम्प्युटर वापरायचा आणि स्मार्टफोन नाही असं ठणकावते ... मुलाला घाबरून आईपुढे मान खाली घालून निमूट ऐकून घेताना पाहून मनोरंजन झालं . एरवी मुलाशी हसूनखेळून असलेली आई याबाबतीत कठोर होते आणि मुलगाही उलट उत्तरं न देता आईच्या धाकाखाली ऐकून घेतो हे पाहणं सुखद होतं .

दुसरं पात्र डिटेक्टिव्ह अलेक हार्डी याचा घटस्फोट झाला आहे .. त्याची 17 - 18 वर्षांची मुलगी आईशी पटत नाही म्हणून तिसऱ्या सिजनमध्ये त्याच्याबरोबर राहायला येते आई दुसऱ्या शहरात पोलीस खात्यातच असते .. आपल्या मुलीवर त्याचा फार जीव आहे .... नवीन कॉलेज, नवीन वातावरणाशी जुळवून घेत असतानाच तिचा मोबाईल फोन कुणीतरी परस्पर घेऊन त्यातला एक खाजगी असा सेल्फी वर्गातल्या सगळ्यांना फॉरवर्ड करतं .. परिणामी सगळे मुलगे तिला कॉलेजात आणि येताजाता वाटेवर त्रास देऊ लागले आहेत ... घटना घडल्यावर 2 आठवड्यांनी वडिलांना सांगते आणि आता हे झाल्यानंतर या कॉलेजमध्ये जुळवून घेणं कठीण आहे आपण परत आईकडे जातो म्हणून सांगते . इतक्या उशिरा का सांगत आहेस विचारल्यावर तुमच्या केसपुढे तुमच्याकडे वेळ कुठे आहे काही सांगायला असा प्रश्न करते .... तिने जाऊ नये म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो .. समाजात राहताना असे प्रश्न कधीतरी येणारच , कधीतरी त्याला तोंड द्यायला शिकायचंच आहे , किती दिवस तू अशी तुझ्या आईकडून माझ्याकडे , माझ्याकडून तिच्याकडे अशी कसरत करणार ? मी आहे तुझ्याबरोबर , दोघे मिळून ह्या प्रश्नाला तोंड देऊ असा आधार देण्याचा प्रयत्न करतो ...

हा प्रसंग पाहत असताना भारतातल्या अगदी सुशिक्षित कुटुंबातही याच परिस्थितीत भारतीय वडिलांची प्रतिक्रिया कशी झाली असती हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही , 90 % सुशिक्षित बापांनीसुद्धा आधी मुलीवर आगपाखड केली असती की मुळात असला नसता फोटो काढलासच का म्हणून ? मोबाईल काढून घेणे पासून तो फोडून टाकणे इतपत टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या ... तेव्हा अलेक हार्डीचं मुलीला धीर देणं , मृदूपणे समजावणं मनाला स्पर्श करून गेलं .... मुलगी दुसऱ्या दिवशी जायचं तिकीट काढते तेव्हा तिची मनधरणी करताना , आपलं पेसमेकर बसवण्याचं ऑपरेशन यशस्वी झालं , जीवनाची दुसरी संधी देवाने / नियतीने दिली तिचा अर्थ मी इथे असायला हवं आहे , तुझी काळजी घेणं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला ही दुसरी संधी दिली गेली आहे असं मला वाटतं असं सांगून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ... त्याची सहकारी एली मिलर मी तुझ्या जागी असते तर तिकीट फाडून टाकलं असतं , प्रत्येक गोष्ट काय मुलांची ऐकायची म्हणून सांगते तेव्हा " काहीतरीच काय ? मी अशी तिला मनाविरुद्ध जबरदस्तीने नाही थांबवू शकत" म्हणतो .

शेवटी तिला स्टेशन वर सोडताना तिच्या वर्गातले मुलगे रस्त्यावर दिसतात , त्यांना बघून ती नर्वस होते ते बघून गाडी थांबवून त्यांना सज्जड दम भरतो आणि आपल्या मुलीला जराही त्रास झाल्याचं कानावर आलं तर परिणाम भोगण्याची तयारी ठेवा असं बजावतो . गाडीत परत येऊन मुलीचं तिकीट फाडून टाकून तू कुठेही जाणार नाहीयेस असं सांगतो आणि तिची मनमानी थांबवतो ...

तसे मालिकेत अनेक सुंदर सिन आहेत पण हे 2 - 4 मला विशेष भावले ....

तिसऱ्या सिजनमध्ये रेपच्या केसचं इन्वेस्टीगेशन दाखवलं आहे... रेपच्या विक्टीम ठरलेल्या स्त्रियांसाठी जी सपोर्ट यंत्रणा दाखवली आहे - कुठलाही आर्थिक मोबदला न घेता , संपूर्ण निरपेक्ष भावनेतून कार्य करणारी , त्या स्त्रीला सतत भेट देऊन , तिला मानसिक आधाराची गरज असेपर्यंत तिच्या संपर्कात राहणारी , पावला पावलावर तिला धक्क्यातून - ट्रॉमामधून सावरण्यासाठी तिची पोलिसात तक्रार करण्याची इच्छा नसेल तर त्या इच्छेचा मान राखून संपूर्ण गुप्तता राखणारी , फक्त तिला आधार देऊन परत उभी करण्यावर संपूर्ण फोकस ठेवणारी संस्था ती बघून अपार कौतुक आणि आदर वाटला .... भारतात अशा काही संस्था कार्यरत आहेत का याबद्दल काही माहिती नाही ... परदेशातल्या स्त्रियांबाबत ही एक बाब तरी नक्कीच हेवा करण्यासारखी वाटली ..

पहिल्या सिजन मध्ये ब्रॉडचर्च या लहानशा युरोपियन गावात एका 11 वर्षे वयाच्या मुलाचा खून झाला आहे आणि त्या गुन्हेगाराचा शोध घेणं हे मुख्य कथानक आहे ... या गावात सगळे लोक पिढ्यानपिढ्या एकमेकांना परिचित जवळचे आहेत , खेळीमेळीने प्रेमाने राहतात .... असा गुन्हा इथे कधीही झालेला नाही ... एकूणच गुन्हेगारीचं प्रमाण अगदी नगण्य आहे.. अशा या गावात ही घटना फार खळबळ उडवणारी आहे.. संशयाची सुई मुद्दामून अनेक पात्रांवर नेण्याचं तंत्र वापरलं आहे... पहिल्या सिजनच्या शेवटच्या म्हणजे आठव्या एपिसोड मध्ये खुनी कोण ते समजतं ... अनपेक्षित धक्कातंत्राचा यशस्वी वापर केला आहे . तिसऱ्या सिजन मध्येही रेपच्या गुन्हेगाराचा शोध घेताना हेच तंत्र वापरलं आहे ... शेवटच्या एपिसोडमध्ये गुन्हेगार कळतो तेव्हा मिनिटभरासाठी डोकं बधीर होतं ..

डिटेक्टिव्ह अलेक हार्डी आणि डिटेक्टिव्ह एली मिलर यांच्यात वाढत जाणारी मैत्री ही खूप रिफ्रेशिंग वाटली पाहायला .... कुठलाही रोमँटिक रंग देण्याचा प्रयत्न न करता मेल आणि फिमेल कॅरॅक्टर मधली ऑनस्क्रिन निखळ मैत्री आधी पाहिलेल्या मालिकांमध्ये फारशी कुठे आढळली नव्हती .... त्यामुळे एक वेगळा अनुभव वाटला ..

एली मिलरचं काम केलेल्या अभिनेत्रीला दुसऱ्या कुठल्यातरी रोल साठी ऑस्कर मिळालेलं आहे .. तिचा अभिनय अतिशय जिवंत , नैसर्गिक आहे ... अलेक हार्डीचं काम डेव्हिड टेनॅन्ट या माझ्या आवडत्या अभिनेत्याने केलं आहे ... खरं म्हणजे जेसीका जोन्स ह्या मालिकेचा पहिला सिजन ब्रॉडचर्च पूर्वी पाहिला .. त्यातलं डेव्हिड टेनॅन्टचं काम प्रचंड आवडलं ... दुसऱ्या आणि तिसऱ्या सिजनमध्ये तो नाही म्हटल्यावर पुढे पाहण्याचा इंटरेस्टच गेला ... मग त्यानेच काम केलेलं दुसरं काहीतरी शोधताना ब्रॉडचर्च सापडली .. पण एकूण मालिका म्हणूनच खूप पसंतीस उतरली ...

ब्रॉडचर्च पाहून झाल्यावर टेनॅन्टचीच दि एस्केप आर्टीस्ट ही तीन एपिसोडची मालिका पाहिली, तिने मात्र साफ निराशा केली , कोर्टाचे नियम अजिबात समजले नाहीत आणि चिडचिड झाली , जो शेवट केला तो ओढूनताणून जमवल्यासारखा वाटला ... उलट ब्रॉडचर्चच्या दुसऱ्या सिजनमध्ये तब्बल 8 एपिसोड कोर्टाची केस दाखवली आहे आणि त्यात पुराव्यांचा शोध , कोर्टाचे नियम , साक्षीदार , साक्षी , उलटतपासणी या सगळ्यात न समजण्यासारखं काहीच नव्हतं आणि ते बघायला भयंकर इंटरेस्ट वाटत होता , दोन्ही वकिलांची पात्रं अप्रतिम होती , एकीचा आक्रमक सूर तर दुसरीचं शांतपणे पुराव्यांची एक एक वीट रचून लॉंग टर्म खेळी खेळणं ... सर्वच बाबतीत ब्रॉडचर्च अपेक्षांना खरी उतरली . एकूण 24 च एपिसोड आहेत .. आणखी सिजन्स हवे होते असं वाटलं मालिका संपल्यावर ... हा मालिकेच्या यशाचा पुरावा म्हणता येईल .

मिपावर पूर्वप्रकाशित ..

Group content visibility: 
Use group defaults

मी पहिला सीजन बघितला होता, युकेवाला. यूएसमध्ये त्याचा रिमेक आला होता. रिमेक कशाला केला होता काय माहित.
पहिल्या सीजनचा ट्विस्ट भारी होता, तो खुनी आधी ओळखता आला नव्हता.

रिमेकचा ट्रेलर मी पाहिला त्यात डेव्हिड टेनॅन्ट सोडून बाकीचे कलाकार बदलले आहेत , एली मिलरचं काम ब्रेकींग बॅड मध्ये स्कायलरचं काम केलेल्या अभिनेत्रीने केलं आहे ... खरोखरच रिमेक का केला समजलं नाही .. तिकडचे कलाकार पाहायला तिथल्या प्रेक्षकांना अधिक आवडेल असा काही विचार होता का देव जाणे .. पण हा अंदाज अर्थहीन वाटतो .

उरलेले 2 सिजनही चांगले आहेत .

मी तर फक्त ज्योडी व्हिटेकरसाठी (अ पर्फेक्ट ईंग्लिश रोझ) पहात असे. Proud
ऑफकोर्स नो कंपॅरिझन टू रोझामंड पाईक (अ मोअर पर्फेक्ट ईंग्लिश रोझ) Lol

टेनॅन्टचीच दि एस्केप आर्टीस्ट ही तीन एपिसोडची मालिका पाहिली, तिने मात्र साफ निराशा केली , कोर्टाचे नियम अजिबात समजले नाहीत आणि चिडचिड झाली , >> टेनॅन्ट, कोर्ट वरून 'गॉबलेट ऑफ फायर' आठवला की नाही पुन्हा Proud

नाही , नाही आठवला खरा ... तो ज्या रोल मध्ये असेल ते कॅरॅक्टर होऊन जातो पूर्ण .. त्यामुळे त्याची खरी ओळख , आधीची कामं या सगळ्याचा विसर पडतो तात्पुरता ... जेसीका जोन्स मध्येही त्याने व्हिलनचं काम अमेझिंग केलं आहे ... त्यातही डॉक्टर हू पाहिली असेल आधी तर डॉक्टर म्हणून तो इतका मनात बसतो की इतर अगदी व्हिलन्सच्या रोल मध्येही त्याचा राग येत नाही ... किंवा पर्सनॅलिटीच तशी असल्यामुळे असेल ... हे हे Lol I'm fangirling bad

ब्रॉडचर्च जाम आवडलेली.
ऑलिव्हिआ कोलमन आणि डेव्हिड टेनंट दोघांनी अशक्य भारी कामं केल्येत. ही मालिहा बघुन ब्रिटिशच काय स्कॉटिश अ‍ॅक्सेंटही समजू लागलाय असं मला काही काळ वाटू लागलेलं. Wink मिलं Proud
ऑलिव्हिआ कोलमनचं ऑस्कर स्पीच ऐकलं आणि तिच्या आणखी प्रेमात पडलो.
टेनंट साठी क्रिमिनल चा पहिला भाग बघितलेला. Happy

हो चांगला अ‍ॅक्टर आहे तो.. पण मी त्याला कुठेही कोणत्याही रोलमध्ये बघितले (त्याने रंगवलेली बहुतेक पात्रे विक्षिप्त असतात) तरी तो आता कधीही जीभ बाहेर काढून 'आय विल शो यू माईन' म्हणेल असे वाटत रहाते. Proud

वेगवेगळ्या कथा नाहीत.. 8-10 एपिसोड्सचा एक असे तीन सीझन्स आहेत. एका सीझन मध्ये एकच कथा आहे.
Kinnaman आणि Enos ची अमेरीकन सिरीज The Killing पहिली असल्यास ही similar types आहे,फक्त स्कॉटिश सेटअप आहे.

कुठल्याही mystery किंवा thriller चे स्कॉटिश किंवा एकंदर ब्रिटिश असणे हाच एक आपोआप उंचावलेला बेंचमार्क आहे. No one tells mystery better than British.
Broadchurch एक Netflix वर आली म्हणुन फेमस झाली. Acorn.tv वर अशा अनेक नव्या जुन्या भारी ब्रिटिश मालिका सापडतील.

कथा वेगळ्या असल्यातरी एकमेकांत गुंफलेल्या वाटतात. एकाच गावातील असल्याने सगळे ओळखिचे लोक असल्याने असेल. मला सगळ्यात आवडलेला पार्ट म्हणजे अमेरिकन क्राईम ड्रामा सारखं 'एफबीआयला अचाट पॉवर्स असतात, आणि बजेट वगैरे सारखे मर्त्य जगातले प्रश्न कधीच भेडसावत नाहीत' असलं काही न्हवतं, आणि लीड रोल्सनी रोमांस केला नाही. Biggrin नाही म्हणायला डीआय हार्डीचं ब्रोकन रिलेशन दाखवलेलं मला वाटतं. पण स्पाऊसला लेस्बिअन दाखवुन टिकमार्क फीचर केलं न्हवतं ते एक नशिब. Proud
मिडसॉमर पण म्हणुनच आवडलेली. एकदम स्मॉल वर्ल्ड फीलिंग येतं.

स्कॉटिश किंवा एकंदर ब्रिटिश असणे हाच एक आपोआप उंचावलेला बेंचमार्क आहे >> +१. तो अँक्सेंट से** वाटतो , ड्राय आणि विटी जोक्स पण भारी वाटतात , आणि बॅकग्राउंड म्युझिक... एकदम मिनिमन वाद्यात अशक्य वातावरण निर्मिती होऊन जाते. अपार्ट फ्रॉम क्राईम कंटेंट. Happy

Lol खरं आहे.
एकदा का ह्या प्रकाराच्या मालिकांची ब्रिटिश हाताळणी अनुभवली की अमेरिकन मालिका एकदम धसमुसळ्या आणि superficial वाटत राहतात.
दशकांपेक्षा जास्त काळ सलग प्रसारीत झालेल्या Poirot, Marple, midsomer, Sherlock वगैरे मालिका बर्‍याच आघाडीच्या आणि नावाजलेल्या ब्रिटिश कलाकारांचे launching pad ठरल्या आहेत. ह्यातले बरेचसे methodical actors आहेत. उगीच नाही Coleman वगैरे ऑस्कर घेऊन जात.

एका सीझन मध्ये एकच कथा आहे. >> हो हो, तसंच हवं होतं. नाहीतर २०० व्या भागात पण गोगलगाय असणार्‍या पहाणे बंद केले आहे. छोटी मालिका असेल तर नक्की लिहा. आणि कुठे पाहिली ते पण. १ ते ३ सिझन्स वाली पाहणार.. ब्रिटीश उच्चार एकदम रॉयल, खानदानी वाटतात. बायांचे जास्त आवडते ऐकायला.

पॉयरो युट्युबवर भयंकर महाग आहे. एकदा प्राईम दोनेक महिने भाड्याने घेऊन संपवायचा विचार आहे.

सर्वांना धन्यवाद ... माबो कर प्रेक्षकांचा टॉरेंटला नैतिक विरोध वगैरे आहे काय ? जुने मालिका - चित्रपट संबधित धाग्यांवरचे प्रतिसाद वाचलेले नाहीत त्यामुळे माहीत नाही .. तेव्हा सरळच विचारावंसं वाटलं ...

> माबो कर प्रेक्षकांचा टॉरेंटला नैतिक विरोध वगैरे आहे काय ? > माझा नाहीय. म्हणजे मी पूर्ण हृदयातून त्याचं समर्थन करते, मिरवते असं नाही. पण मी ते वापरते.
बादवे आजकाल माझ्या आयडिया फोनवरून index of नीट चालत नाहीय. तुला काही प्रोब्लेम आला का इतक्यात?

नाही काही प्रॉब्लेम नाही ☺️ पण नेटफ्लिक्स , अमॅझॉन प्राईम किंवा इतर वेबसाईट / ऍप्सचेच उल्लेख खूप दिसतात , टॉरेन्ट कुणी सुचवताना दिसत नाही .. अब्रह्मण्यम असल्यासारखे बोलायचं टाळत आहेत की काय अशी शंका आली त्यामुळे .. म्हणजे टॉरेन्ट एकमताने निषिद्ध वगैरे मानलं आहे की त्याचा उल्लेखही कोणी करत नाही अशी परिस्थिती असेल आणि आपण सुचवलं तर बरेच लोक तुटून पडतील अशी भीती वाटत होती .

माझा अंदाज -
• सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की त्यांना हे कन्टेन्ट विकत घेणं परवडतं
• दुसरा पण पहिल्यापेक्षा थोडासाच कमी महत्वाचा मुद्दा ते ज्या देशात राहतात तिथे टोरंट बेकायदेशीर आहे, त्या कायद्याची अमंलबजावणी कडकपणे केली जाते म्हणजे टोरंट वापरलं की अर्ध्या तासात पोलीस घरात असं काहीतरी असेल.

माझं म्हणाल तर 'भारतात राहणारे १. चॅनल विकत घेऊन माझ्या नवऱ्याची बायको पाहणारे नैतिक २. टोरंट वापरून चांगल्या मालिका बघणारे अनैतिक' या दोघांत निवड करायची असेल तर मी २ च निवडणार.