माझा La carte मेन्यू

Submitted by अस्लम बेग on 8 October, 2019 - 11:03

जीवनात कायम दुःखी असेल अशी व्यक्ति सहसा असुच शकत नाही कारण येणारे सुख काय किंवा दुःख काय, दोन्हीही असतात क्षणभंगुर ! कारण दोन्हीचे अस्तित्व अवलंबून असते ते फक्त क्षणागणिक बदलत राहणाऱ्या चार गोष्टींवर ― आहार, विहार, आचार, विचार. माणसाच्या चंचल मनामुळे जेव्हा कधी सुख मिळते तेव्हा त्या क्षणांचे सातत्य राखणे आणि ज्याचे परिणाम म्हणून सुख अनुभवले त्या कृतीचे अवलोकन करणे बहुतांश वेळा अवघड होऊन बसते. आणि अश्या दोलायमान स्थितीमुळे आणि नेमके विपरीत कृतीचे आचरण घडल्याने मनाला पुन्हा एकवार दुःख भोगावे लागते. मग ह्यावर उपाय काय ?

खरं पाहता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बहुतांश वेळी त्या प्रश्नातच दडलेले असते, फक्त गरज असते ते डोळसपणे सत्य स्विकारण्याची आणि जे मला उचित आहे त्याचीच बाजू निपक्षपणे घेण्याची ! जगातील सर्व गोष्टी एकाच छत्राखाली मिळणारे कितीही आधुनिक मॉल्स असो किंवा जगभरातील रुचकर पदार्थ एकाच टेबलवर उपलब्ध करून देणारे पंचतारांकित हॉटेल असो... आपण आपली विविक्षित भावनांची ऑर्डर इकडे नोंदवू शकणार नाही. कोणी अर्धा किलो आनंद द्या किंवा एक प्लेट सुख द्या म्हटले तर ते कोणी देऊ शकणार का ? तर नाही ! पण ह्याचा अर्थ ते मिळणार नाही असा मात्र अजिबात होऊ शकत नाही. कारण ही गोष्ट इतरांनी आपल्याला द्यावयाची नसून आपली आपणच ती मिळवायची असते. स्वतःच ती आपल्या ताटात वाढून घ्यायची असते. ह्याचा सरळ अर्थ म्हणजे ती गोष्ट आपल्या अवतीभोवती, समोर अस्तित्वात आहेच फक्त ती व्यक्तिसापेक्ष असल्याने इतरांना त्याचे दृश्य परिमाण समजू न शकल्याने ह्याकामी त्यांचा उपयोग शून्य होणार आणि आपले आपणच तो आनंद वेचुन घेऊ शकणार असतो. ह्याबाबत मी माझ्या आयुष्यात नक्की काय काय करू शकतो हां इतकाच आपमतलबी विचार करण्याशिवाय इथे बाकी काही गत्यंतर नाही. त्यामुळे मी आणि माझं हे एवढंच सध्या विविध बाजुनी समजून घेऊया.

आहार, विहार, आचार, विचार ह्यापैकी आपण आता कुठल्या पायरीवर आहोत आणि अजुन किती पल्ला गाठणे बाकी आहे ह्याचा स्वत:च्या मनाशी प्रामाणिक राहून आपला आपणच परामर्श घ्यायचा प्रयास सुरु करूया. सर्वप्रथम आहाराविषयी बघू. मुखावाटे निव्वळ उदरभरण कार्यासाठी घेतला जातो तोच फक्त आहार नसून जे जे आपली ज्ञानेंद्रिय ग्रहण करतात आणि बुद्धीच्या साहाय्याने आकलन करत असतात तो सर्वच आपला दैनंदिन आहार असतो. मी प्रत्यक्ष काय खातो त्याचा भौतिक / शारीरिक परिणाम तर आहार शास्त्रानुसार मला अनुभवायला मिळणार असतोच पण तो आहार सात्विक आहे का राजस की तामसी ह्यावरुन माझ्या भावशारिरी गुणांमध्ये चांगला / वाईट असा आपोआप बदल घडत असतो. सध्या सर्वत्र दिसणाऱ्या रस्त्यावरील गाड्यांवर आवडीने आणि चवीने खाल्ल्या जाणाऱ्या चायनीज पदार्थामधील अजिनोमोटो ह्याचे उदाहरण येथे प्रतिनिधीक म्हणून नक्कीच विचार करायला लावेल. विहार म्हणजे भौतिक पातळीवर चालणारे चलनवलन निव्वळ गृहीत न धरता आपल्या मनाचे वारु कुठल्या कुठल्या दिशेने उघळत आहेत ह्याचा मागोवा घेणे आवश्यक असते. नाहीतर असे व्हायचे की बसलो आहे मंदिरामध्ये कीर्तन ऐकत आणि मनामध्ये बिपाशाचे नर्तन सुरु आहे. आपण सामान्य माणसे आहोत, कोणी साधू संत नाही की आपापले मन आपल्या पूर्ण नियंत्रणात ठेवू शकु. त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे भरकटणे तर होणारच आहे पण ते मूळ विषय सोडून अतिरेक नको इतपत संयम तर नक्कीच बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेत जास्तीतजास्त लक्ष अभ्यासावर केंद्रित करत आपली प्रगती साधायची की इतरत्र भरकटत परीक्षेचा निकाल दुखमय करायचा हेही आपल्याच हातात आहे.

आता ह्याच २ मुद्द्यांचा थोड़ा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा म्हटले तर एक गोष्ट लक्षात येईल की कुठलीही सोशल नेटवर्किंग साइट, मग ते फेसबुक असो की मायबोली असो... तिकडच्या वावराने मला आनंद मिळणार की दुःख हे माझ्या तिकडच्या आहार विहारावरच अवलंबून आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड असते तसे आपल्याकड़े वाचनासाठी (बुद्धिच्या खाद्यासाठी) इथेही अनेक पर्याय समोर ठेवलेले असतात. मला माझी भूक किती ह्याची यथोचित जाणीव असली की मग मी मला हवं असलेलं मनाला भावणारं फक्त लिखाण वाचणार. ज्यातून मला निखळ आनंद मिळेल असे निवडक वेचुन घ्यायचे की अजीर्ण होइस्तोवर आपले पोट बिघडवून घ्यायचे ह्याचा चॉइस माझ्याचकडे असतो. निव्वळ टाइमपास करायला म्हणून काहीही वाचल्याने आणि उलटसुलट माहिती आणि मतप्रवाह ह्यांच्या गर्तेत मनस्वास्थ्य हरवून डोळ्यांना आणि बुद्धिला चुकीचा आहार मिळाल्याने बरेचदा फक्त दुःख पदरात पडते. आणि ह्याचे पडसाद बहुतांश वेळा मनातील संमिश्र भावनांच्या स्फोटक प्रतिसादातून उमटत राहून त्यात इतरांनाही दुःख देणारी भाषा वापरली जाते. हे कधी सहेतुक घडेल तर कधी अजाणतेपणी, पण दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आणि समोरच्यासाठीही वाईटच ठरतात. मायबोलीचा प्रामुख्याने विचार करायचा झाला तर आपल्या आवडी निवडी जपण्याचे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. मग समजा मी नाशिकला राहत असतानाही पुण्याच्या गप्पांमध्ये पुणेकर बनून सामील व्ह्यायचे की उगिचच अमेरिकेतील आयुष्य (टिपापा वगैरे) डोकावायला जायचे हे विहार स्वातंत्र्य मलाच ठरवायचे असते. मला फोटोग्राफी आवडते की कुकिंग करायला आवडते त्यानुसार इथे माझे विहाराचे राजमार्ग (लेखनाचे गृप) सुस्थापित असताना नको त्या मार्गावरती भटकुन / भरकटुन मी माझ्यासाठी निखळ आनंद कसा वेचणार ?

येथे काही महीने वावरल्यानंतर एक लक्षात आले ते म्हणजे येथील आयडी आणि त्या आयडीमागील व्यक्तिचे प्रतिसाद आपल्याला त्यांची एक विशिष्ट आचारविचार प्रणाली दर्शवत असतात. कोणी कितीही विविध आयडी घेऊन शेळीच्या कातड्याखाली वावरले तरी लांडगा असल्याचे बिंग फूटतेच ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे मी नाहीच आहे त्याचा आभास निर्माण करत इथे जगणे हे कधीच नैसर्गिक असू शकत नाही आणि त्यामुळे ही कृत्रिमतेचे किनार लाभलेले आयुष्य माझ्या आणि इतरांच्या पदरात कधीच आनंद घालू शकत नाही. मला काय हवे हे मनाशी ठामपणे ठरवले की त्यासाठी अनेक मार्ग आणि पर्याय आपोआप निर्माण होत राहतात. बदल होत राहणे हा सृष्टीचा नियमच आहे. जेथे ह्या विधात्यानेच पृथ्वीवर काहीही पर्मनेंट ठेवलेले नाही तेथे सोशल साइटवरील आभासी जगात आपल्या मनातील खरोखरचे रुसवेफुगवे उगीच किती काळ जपत राहायचे ? त्यानाही change is the only constant thing in this world हा नियम लागू करत मुव्ह ऑन व्हायला जमले तर बरे नाही का !

Group content visibility: 
Public - accessible to all site users