राहिल्या त्या काही आठवणी (कोकण ) - २

Submitted by 'सिद्धि' on 7 October, 2019 - 01:29

(https://www.maayboli.com/node/71503 या मागील भागात आपण वाचले की, मजल-दरमजल करत आपण घरापर्यंत पोहोचलोय. गावच्या वेशीपासुन ते घराच्या दारापर्यंतचा प्रवास आपण वाचला. आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. हाच प्रवास पुढे नेण्यापुर्वी मी या भागात माझ्या कोकणातील टुमदार जुन्या घराच्या काही निवडक आठवणी मांडत आहे. या भागामध्ये आपण या सगळ्या आठवणींना असाच उजाळा देत सैर करुया कोकणातील माझ्या घराची. खरतर कोकणातील घराची वर्णन खुप ठिकाणी वाचायला मिळतात. पण तरीही माझ्या लेखमालीकेचा एक भाग म्हणून, मी इथे थोडक्यात घराचे वर्णन करत आहे. कारण पुढील भागातील पुष्कळशा आठवणी या घराच्याच आवती-भोवती फिरणार्‍या आहेत.)

*****
कोकणातील घर म्हणजे एक टुमदार आयताकृती कलाकुसरीचा देखावाच. संपूर्ण घराच्या भिंती या मातीच्या किवा विटांच्या मापानी बनवलेल्या. त्यांना मस्त शेणामातीने सारवून गुळगुळीत केलेले असते. वरती कौलारु छत . वलई करुन पायाखालची जमीन देखील मस्त शेणामातीने सारवली जाते. सारवणे ही सुद्धा एक कलाच आहे . आता लादी-प्लास्टरच्या युगात सारवणे म्हणजे काय ? हे देखील खुप जाणना माहीत नसावे. मस्त रबरबीत शेणामध्ये थोडे पाणी घालुन दहीकाला प्रमाणे काला केला जातो. यातील थोडे-थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन हातानेच जमीनीवर फिरवले जाते. खोलीच्या एका कोपर्यापासुन दुसर्या कोपऱ्यापर्यंत हेच शेणाचे मिश्रण हाताने फिरवत खाली-खाली आणले जाते. जमीनीमध्ये एखादा खाच-खड्डा पडला असेल, एखादी चिर पडली असेल, तर यावर मिश्रणाचा हात मायेने गोंजारला जातो, तिची मरम्मत केली जाते . मग जमीन अगदी नव्यासारखी गुळगुळीत होते. आणि बैठक मारुन खाली बसणार्यालाही याचा आनंद मिळतो.
कधी झरझरत्या हातानी यावर राखुंडीची नक्षी , तर कधी नुसत्याचा थोड्या सागरलाट ओढुन ही जमीन सुशोभीत केली जाई. उंबर्यावर याच रांगोळीने फुलवेलीची नक्षी काढली जाते . देवासमोर स्वस्तिक काढले जाते . या सगळ्यावर हळद-कुंकू वाहिल्या शिवाय या सजावटीस पुर्णत्व प्राप्त होत नाही. दार-खिडकीवर पान-फुलांच्या माळा गुंफल्या की मग ते घर कोणत्याही सणा-समारंभासाठी सज्ज असे..... अगदी दिमाखात . तो शेणामातीचा दरवळ घरामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रसन्नता पसरवत असे.
25289591_1928042834125758_6795564733431315684_n.jpg
.
कोकणात सर्वसाधारण घर आणि आजुबाजुचा परिसर याची रचना सारखीच असते. सुरुवातीलाच एक बेडा लागतो. त्यानंतर दगड ,चिरे , विटा , यांच्या पासुन बनवलेल्या २-४ पायर्‍या . पायर्‍या चढुन वरती आल्यावर खळ लागत, तेही मस्त वलई करुन तयार केलेल. वलई करणे म्हणजे जमीन करणे. हे देखिल एक कौशल्ल्याचे काम. खळ्यातील, परसातील आणि अगदी घरातील जमीनीची वलई केली जाते. या मध्ये त्या भागातील जमीन कुदळाने किवा खनतीने खणुन घेतली जाते. खनलेली मोठीमोठी ढेकळे फोडुन सारखी करुन बारीक माती तयार होते. यासाठी या ढेकळावर चोपण्याने जोराचा चोप दिला जातो. ही बारीक झालेली माती काहीही चढउतार न ठेवता सरळ एकसमान अशी पसरवुन यावर पाण्याचा फवारा केला जातो. माती अगदी आतपर्यंत ओली होऊन मऊशार होई पर्यंत पाणी मारले जाते. अगदी यावर पाय ठेवला तर पायही आतमध्ये रुतेल एवढ्या प्रमानात पाणी मारुन या जमीनीवर हलकेच दाब दिला जातो. ६-७ तासांमध्ये ही जमीन वाळली की मग परत २-३ वेळा यावर चोपन्याने दाब दिला जातो. यावेळी मात्र ही जमीन कुठेही उंचसखल राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. समांतर अशी जमीन तयार झाल्यावर यावर शेणामातीचे सारवण करुन दुसर्‍या दिवशी ही वलई केलेली जमीन वावरास योग्य अशी तयार होते. खळ्यातील वलई केलेल्या जमीनीवर भात वगैरे झोडले जाले, अश्या वेळी या थोड्याशा ओलसर जमीनीत एखादा भातदाणा रुजुन वरती येई. आपली ईवलीशी पाने फडफडवत ताठ मानेने तो खळ्यामध्ये झोकात उभा ठाके. जणू येणाया जाणाऱ्यांच्या स्वागतासाठीच त्याला नेमले असावे.
' डोंगर का पाणी' खेळण्यासाठी खळ प्रसिद्ध असे . खळ्याच्या कडेला अर्धगोलाकारपणे लावलेल्या दगडाला डोंगर आणि खळ्यामधील जमीनीला पाणी समजुन खळ्यामध्ये मस्त खेळ रंगायचा . आता कोणी असे खेळ खेळताना पाहील्याच अजीबात आठवत नाही.
तुलसी वृंदावन -
61118016_1713813588721656_4744258881327202304_n.jpg
.
दितील रंगीत गारगोटे ,फरश्यांचे वेगवेगळ्या रंगानचे तुकचे इत्यादी पासुन बनवलेली तुळस घराच्या समोर पुर्वेकडील दिशेस उभी असे. तिच्या समोर एखादे स्वस्तिक त्यावर थोडे हळदी-कुंकू, समोर एक दोन तगरीची फूले असत. बाजुला एक तेवते निरांजन ही असे. तुळशीमध्ये एक-दोन अगरबत्ती रोवलेल्या असत. पुजेच्या वेळेस तुळशीला वाहीलेल्या दुर्वा , झेंडूची फुले तेथेच रुजुन तुळशी लगतच वृंदावनामध्ये दाटीवाटीने वरती पसरत. घरासमोर खळ्याच्या दोन्ही बाजुला मस्त जासवंदि वाढत ... कर्दळीची बेटेच्या बेटे फुलून येत... अबोलीचे ताटवे बहरत.... सोनचाफा, निशिगंध , रातराणी ही फुलझाडे मात्र थोडी दुर कुंपणालगत लावलेली असत. त्याच्या वासाला जनावरे येत , म्हणुन अशी झाडे घरापासुन योग्य अंतर राखुनच लावली जात.
पडवी-
70553454_1336408809845326_3223719104242253824_n.jpg
.
ग पुढे लागे, ते घरचे मुख्य प्रवेशद्वार । घराचे दरवाजे... 'हो दरवाजा नाही.... दोन दरवाजे. ' , कारण तोही एकटा नसे. एकमेकांच्या हातात-हात आणि गळ्यात-गळे घालुन मधोमध दोन दरवाजे अगदी दत्त म्हणून उभे असत. कुंडी बाजुला सारली की हे दोन्ही दरवाजे कुरबुर करत एकमेकांन पासुन विलग होत. आजकाल एकटा-दुकटाच दरवाजा पहायला मिळतो....अगदी निराश आणि एकलकोंडा....त्यावर ही छोटस टाळ, जणु त्याची कुरबुर कुलूपबंद करण्यासाठी. पुर्वी मात्र ते दोघे सताड उघडे असत... एकमेकांच्या साथीने.
दारातुन प्रवेश झाला की आपण पडवी मध्ये पोहोचतो. लाकडी गजाच्या मोठाल्या उभ्या-आडव्या बार्या असणारी पडवी. एका बाजुला दणकट लाकडाचा झुलता झोपाळा आणि दुसर्या बाजुला एक जुनाट लाकडाची पण पॉलिश केलेली आरामखुर्ची... बुजुर्गांच्या आठवणीची निशाणी म्हणुन... त्यावर नायलॉनच्या ताठ धाग्यानी विनलेली झालर असे . उजव्या बाजुला अगदी कोपर्‍या सरशी एक भलामोठा लाकडी पेटारा दिमाखात बसवलेला असे. घरातील जुन्यापुराण्या अवजड वस्तु , शेतीची हत्यारे-अवजारे अश्या सगळ्या प्रकारच्या अडगळीचा भार अत्यंत प्रेमाने यात सामावलेला असे. या सगळ्या लावाजम्यावरुन तुम्ही मनसुबे बांधू शकता की, या समोरच्या पडवीचा आकार किती मोठा असावा .
पुढे तीन बाजुनी भिंती आणि समोरची बाजु उघडीच अशी ओटी पडवी ओटी लागे. छोटीशी हवेशीर रुम म्हणजे ओटी. आमचा देवाराही ओटीवर असायचा. सोनं-नाणं सांभाळून ठेवण्याची जागाही माजघरातच असे. ' कोकणात घरोघरी गणपती येतात. तसेच शिमगोत्सावाच्या वेळी, देवाची पालखी किवा डोलारा घरी येतो. अश्या वेळी देवाला बसवण्यासाठी या ओटीची रचना केली, असे माझे अजोबा सांगायचे.' हल्लीच्या नविन घरामध्ये ओटी असल्याचे जास्त पाहावयास मिळत नाही .
ओटी-
70128836_1336714699814737_3245682111000084480_n.jpg
.
पुढे पडवी , त्या मागे ओटी आणि स्वयंपाकघराच्या मधोमध तयार होणार्‍या कोपर्‍यात माजघर असे. यालाच काही ठिकाणी मजघर असेही म्हणतात. ही अगदी ठेवणुकीची रुम. पुजेपासुन ते छोट्यामोठ्या सण-सोहळ्यासाठी माजघर वापरले जाई. आजीच्या चंची पासुन ते काकुच्या बटव्या पर्यंत चे सगळे सामान इथे असे. इथे मुख्यता: स्त्रियांचे राज्य. पुरुष मंडळीचा ओटी-पडवीमध्येच जास्त वावर . इथे एखादी लाकडी अलमारी...त्यामध्ये एखादा कृष्णधवल फोटो , बंद पडलेला एखादा जुनाट रेडीओ असे. याची गम्मत अशी की, आजोबा '' हात्तीच्या मारी बन्द कसा पडला ररर हा ? " असे म्हणत त्यावर दोन फटके मारत , हे धपाटे पडल्यावरती तो आपोआप चालु होत असे .
जेवनाचा-खाण्याचा कार्यक्रमही माजघरातच होत असे. यावरुन वेगवेगळ्या प्रसंगावरुन वेगवेगळी अशी माजघरातील गाणीही प्रसिद्ध होती.
* जेवनावरुन रचलेल गाण.
सांगा प्रभुला सैंयपाक झाला । विठुजी जेवायला चला ॥०॥
रांगोया काढुनया लावील्या समया । लावया उदबया सुगंधीया ।
चांदीचा हा मांडूनी पाट । कनकाचशोभतबघा ताट ।
पेला घेतिला पांचुचा कांठ ।
सर्व थाट घडवुनीं सुन्दर केला । विठुजी जेवायला चला ॥१॥
शोभेपान केळी ची लिंबलवणी । डाळीची नारळाची वाटल चटणी ।
कोशंबीर पेरु केळीची फणी । रायतीं रुचिर झाली साजणी ।
भरत वांडा दोडकयाचे भोपळ्याचे।
आवडीने देवा केलेमी तुजला । वठुजी जेवायला चला ॥२॥

* कोणाला मुलगा बघायला आला, म्हणजे स्थळ आल तर त्यावरुन रचलेल गाण.
आलं गंगाला मागनं पावना घ्यावा पारकून
बसायला टाका पिंढनपाट . पुसायाचे जातगोत
याची जात धनगराची आमची गंगा बामनाची ॥०॥
याची आमची सोयरक हाई ! आमची गंगा याची हाई
जागा पाहूंजागाईत मळा पाहूं बागाईत
नवरां पाहूं रुपशाई तथं देऊं गंगाबाई ॥१॥

* भाऊ बिजेला ओवाळनीच्या वेळेस रचलेल गाण.
भाऊबीज माझे सदनीं मनीं हर्ष झाला
दिन बंधु करुणा सिन्धू ओवाळीन त्याला ॥०॥
नवलपरचीं नव पक्वाने करीन स्वये आजी
श्रवणाचे शंकरपाळे, किर्तन करंजी
हरी स्मरण केल कैसी जिलेबी ताजी
चरण सेवनाचे लाडू वळूनी वाढूंया याला ॥१॥

* नवा कोरा कपडा-लत्ता, सनासुदीला घालायचे दाग-दागीनेही याच माजघरात ठेवलेले असत त्यावरुन रचलेल गाण.
धन संपतीला काय उणं , सख्या वो आपल्या वो घरी जाऊनी या
पिवळी शेलारी यावी घेऊनी अवघ्या नगीं लव भरजरची
घडी रुमालांत घालनी आणावी चौकशी करोनी
एवढं वरचेवरी ऐकुनी पिवळी शलारी यावी घेऊनी ॥०॥
श्रावण शुद्ध आला महना नागर पंचीम आली साजणा
मन पुजा करीन गौरीची आवड मला पिवळ्या शेलारीची
राधा नेसनी रुपसुनदर लोळे पतीच्या ग चरणावर ॥१॥

कडे स्वयंपाकघराची तर्‍हा मात्र न्यारीच... अन्नपूर्णेचा भरभरुन मिळालेला वरदहस्त आणि घर मालकीनीचे ओतपोत भरलेले प्रेम याने स्वयंपाकघर नेहमीच समृद्ध असे . आग्नेयेला तांब्या-पितळेची भांडी, एखादे मातीचे माठ , गरम पाण्याचा बंब असे सर्व ठेवलेले असे . तर पुर्वेला चुल्हा मांडलेला असे . त्या शेजारी वैल ही असे . चुल आणि वैल याच्या वरती मोकळी जागा राहते तिथे लोखंडाचा चिमटा , चावी माचिसचा बॉक्स , घासलेटची चिमणी हे साहित्य नेहमीच पहायला मिळे . चुलीच्या बाजुला फाटयाचा छोटासा ढिगही सदैव रचुन ठेवला जाई . एखादे काळे पडलेले तपेले ही पाणी भरुन बाराही महिने चुलीवरतीच ठेवलेले पहायला मिळे. दिवसभर केव्हाही पाणी लागले तर यातील पाणी काढुन, यामध्ये पुन्हा भर घातली जाई. भांडी ठेवण्यासाठी लाकडी मांडणी , स्वयंपाकास लागणारे साहीत्य ठेवण्यासाठी लाकडी आयताकृती पेटी अशी या खोलीमध्ये दाटीवाटी एकंदरीत असे. पुर्वी मिक्सर नसायचे तेव्हा पाटा-वरवंटा याचे राज्य ही याच खोलीत .... पाट्यावरील वाटपाच्या जेवनास कशाचीही तोड नाही. लसुन खोबर्याची चटणी , दाण्याचे कुट , शेंगदाण्याची चटणी , धाण्याची भरड ईत्यादीसाठी व्हायन, उखळ-मुसळ तसेच खलबत्ता वापरला जाई तोही याच खोलीत असे.
IMG-20191101-WA0036.jpgचुल -
IMG_20161013_193740.jpg
.
(अधीक माहीतीसाठी पहा - https://www.maayboli.com/node/69734) या सगळ्या वस्तु स्वयंपाकघरात पहावयास मिळत . याच स्वयंपाकाच्या खोलीत साठवणुकीच्या धाण्याच्या कणग्या, हारा, टोपल्या वरती कढीलिंबाचा पाला लावून किडमुंगी लागु नये म्हणुन बंद करुन ठेवलेल्या असत.
गावचे स्वयंपाकघर-
12378198313_643337a52c_b.jpg
.
न्हाणीघर आणि शौचालय मात्र शेवटी एका बाजूला कोपर्‍यात असते .
पण लहान मुलाना न्हाऊ घालण्यासाठी बाहेर परसात पोफळी किवा वेळूचे बांबू आणि नारळाच्या झावळ्या या पासून छोटेखानी न्हाणीघर बनवलेले पहावयाला मिळे. पातेलीमध्ये गरम-गरम पाणी घेऊन तांब्याने लहानग्यांना कडेवर घेऊन प्रेमाने न्हाऊ घातले जाई . याची एक गम्मत अशी की , माझ्या लहानपणी आजी आम्हा सक्ख्या-चुलत भावंडांना एकत्र न्हाऊ घालत असे. तेव्हा आम्ही एकत्र रांगेत अंघोळीला बसायचो, गरम पाण्यात थोडा कढीलिंबाचा पाला टाकुन एक-एक तांब्या प्रत्येकाच्या डोक्यावर ओतुन, लालेलाल लाईफबॉय साबणाची प्रसन्न अंघोळ असे . अगदी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीप्रमाने वर भिजलेल्या चणाडाळ आणि सहानेवर उगाळलेल्या चंदनाचे एकत्रीत असे तयार केलेके मिश्रण अंगाला लावले जाई .... त्याचा मस्त सुहास पसरायचा. " आजी तु ताईला थोडे अधीक चंदन लावले, मला कमी , मला छान वास येत नाही " असे म्हणत आम्ही थोडे जास्त डाळ-चंदनाचे मिश्रण अंगाला लावुन घेण्यासाठी भांडायचो.... रुसूनही बसायचो. Mysore Sandal Gold Soap चा टॉप ब्रॅन्ड वापरला तरीही त्या आजीच्या हातच्या अभ्यंगस्नानाची सर यायची नाही.
24909641_1924784981118210_3036934329180530955_n.jpg
.
काही ग्रामीण प्रादेशिक शब्द -
बेडा - अंगणाचे प्रवेशद्वार
माप - मातीच्या घरगुती विटा
पडवी- ओसरी
राखुंडी - राख
जनावर - साप
चोपने - धुणी बडवायच्याला धोका
फाटी - चुलीत जाळण्यासाठी घालायची लाकडं
हारा-बांबूची मोठी टोपली
वलई करणे - उठण्या-बसण्या योग्य नविन जमीन तयार करणे
कुदळा/खनती - जमीन खनतन्याचे साधन
बार्या - खिडक्या
डोलारा - मोठ्या आकाराची पालखी
अलमारी - मोठे लकडी कपाट
वैल - चुलीच्या बाजूला असणारा गोलाकार वईल चार खुर असलेला त्यावर स्वयंपाकासाठी पातेले वगैरे ठेवले जाते.
घासलेट - रॉकेल

(कृपया याची नोंद घावी. - डकवलेले काही फोटो फक्त रेफरन्ससाठी घेतलेले आहेत. पण ज्यानी काढले आहेत त्या माझ्या कोकणवेड्या ग्रुपची पुर्ण परवानगी घेतली आहे. तसेच काही प्रादेशिक शब्द जसेच्या तसे वापरले आहेत. ते प्रदेशानुसार बदलतात ही.)
'सिद्धि चव्हाण'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांडू कुठे गेला? मागल्या अंगणा त बाव असते तिथे माग लपलाय काय. मधल्याखोलीतून जिना, मग वर खास लोकांच्या खास खोल्या हवेशीर मस्त. उगीच नाय शेवंता भाळ त. माजघरात कपाटात दागिने चीज वस्तु.

छान आहे हा ही भाग !!! बरेच विस्मृतीत गेलेले शब्द आठवले. चोपण्याने जमीन केली आहे. आता खळ्यातील जमीनच फक्त मातीची आहे त्यामुळे तेच फक्त शेणाने सारवले जाते. नांगर सुद्धा पडवीत असा अडकवून ठेवलेला असायचा.

सुंदर लेख आहेच पण सुंदर संस्कृती जतन होते अशा लिखाणातून. गाणी पुन्हा पुन्हा वाचेल. जात्यावरच्या ओव्या, भात लावताना म्हणायची गाणी असतील तर टाका. वाचायला आवडेल.

सिद्धि
खूपच सुंदर लिहिलंय. चित्रदर्शी वर्णन. मस्तच. आवडला

प्राचीन, अमा, अज्ञातवासी, शालीदा, भाऊकाका, गोल्डफिश, दत्तादादा, ऋतुराज -प्रतिसादाद्दल सर्वांचे मनापासून आभार.

- दत्तादादा जात्यावरच्या थोड्या ओव्या https://www.maayboli.com/node/69734 या धाग्यावर आहेत. बघते कलेक्शन करायला जमल तर त्यावर एक अखंड नविन धागा बनु शकतो.
- भात लावताना म्हणायची गाणी याच सिरिजच्या पुढच्या काही भागात येणार आहेत.

सिद्धी माझ्या लहानपणी पुस्तकांमध्ये, मासिकांमध्ये, सापडलेल्या काही ओव्या, एका वहीत लिहून ठेवल्या होत्या. इथे देउ का? - सांगितलंस तर काढून टाकेन. पण हा धागा मस्त कोंदण आहे त्या ओव्यांकरता -

(१) राजबन्सी गं पाखरु|चोचीमंदी दुखावलं
मोत्या नी पवळ्याचा| चारा खानं इसरलं|
उन्हाळ्याचं ऊन्|झाडाला नाही पान|
जंगल पाखराचं| उदास झालं मन|
हासून खेळून्|नार चालली वनाला|
अंतरीचं दु:ख| काय कळे गवाराला|
देहाला भिरुडं|सांगून काय सार|
जगाला दिसतं| झा गं हिरवं गार|
सुख मझं दु:ख| दोघं मांडले दुकानी|
सुखालामिळे धनी|दु:खाला नाही कोणी|

(२) थोराच्या आम्ही लेकी|आम्ही फार शिरजोर|
सर्पचे केले दोर्|वाघ नेले पाण्यावर|
बोलशील बोल्|बोलू देते एक दोन|
तिसर्‍या बोलाला|उतरीन भारी पण|

(३) माळ्याच्या मळ्यामंदी|हुबी माळीण एकली|
जाईच्या फुलांचेए गं|हिनं काचोळी गुंफीली|
माळ्याच्या मळ्यामंदी|हाये माळीण मइना|
जाईच्या कळ्यामंदी |हिनं गुंफला आईना|

(४) जोडीला मायबहीण्|जात साळूची वायली|
एका ताटात जेवायाची|हौस मनात र्‍हायली|
तुझा माझा भाऊपणा| जसा डोंगराचा झरा|
वरी जमू द्या कचरा|अंतरात लोभ खरा|

(५) रांधोन घालते घरादाराला, पाहुण्याला,
निवद मनोमन माज्या ईठ्ठल देवाला|

(६)माझ्या गं अंगणात्|सांडीला दूधभात|
जेवीला रंगनाथ्|तान्हा बाळ|
माझ्या गं अंगणात्|सांडीली दूधपोळी|
जेविली चाफेकळी|लेकीबाई|

(७) पिकलेलं लिंबू|लिंबू झाडाला तोलेना|
गर्व झालेली बोलेना|वैनीबाय|
शेजी गं पुसते|तुला भाऊ कोणकोण|
चंद्रसूर्य दोघेजण्|भाईराज|

(८) अरण्या रानात|कोण रडतय आइका|
सीतेला धीर देती|बोरी बभळी बायका|
रामाच्या महालात्|जळे सोन्याची समई|
लाकूड पेटवून| सीता बाळाचं तोंड पाही|

(९)मिरगाच्या महीन्यात्|काय आभाळ उठीयेलं|
कुना गं कुणब्याचं|बाळ पेराया नटयेलं|

(१०) बापानं दिल्या लेकी|नाही पाहीलं वतन|
कसाबाच्या घरी|गाई बांधल्या रतन|
बाप म्हणे लेकी | तू गं नशीबाची हीन|
डोंगर धुंडल्यानं|पळसाला पानं तीन|
बाप म्हणे लेकी| मर मर वं पापीणी|
तुज्या संसाराची| माज्या जीवाला घोकणी|

(११) भरताला नारी|नको बोलू अजंदुजं|
अपुल्या जल्माचं|त्यान उचललं वझं|
फाटला पालव|घे गं नीरीला झाकून|
आब कंथाचा राखून|

(१२) दुबळ्या भ्रताराची|नको करुस हेळणा|
वर्साला हालवीतो|कोडकौतुकं पाळणा|
वळणाचा पाऊस | कुठं पडतो कुठं न्हाई|
भरताराचं सुख| दैवालागून हाये बाई|
लेकीचा जल्म कसा|जसा बाभळीचा पाला|
वार्‍या वावट्ळानं गेला|धनी कुनाचा कोन झाला|
भरताराचं झालं|सरगामधी सोनं|
मागं राहील बाईल्|तुळशीचं वाळवण|
दुबळा भरतार असू दे दुबळा बाई
सम्रत (समर्थ्)मायबाप, तिथं काडीची सत्ता नाही|

(१३) धाकला माजा दीर्|गोरा छल्लाटा नाकयेला|
किती धाक मी लावू त्येला|
थोरलं माजं घर| त्येला चौकट मोराची|
करनी थोरल्या दीराची|
न्नंद पाहुनी|कोन पुसे शेजारीन|
माझ्या चुड्याची कैवारीन|

(१४)पीर्तीचा कंथ बोले|राणी गं खाली बैस|
जातीस माह्येरा|मला कठीण जाती दिस|

(१५)माहा दुबळपण्|उद्या निघून जाईल|
बालकाला माह्या|मोल हीर्‍याला येईल|

(१६) झाले बारा वर्षं|लेक झाला कामिनीचा|
पाऊस पडतो रंग्|पाहून जमिनीहा|

(१७) लेका गं परीस्|लेक कशानं ती उणी|
राजस बाई माझी|हीरा नव्हे ती हिरकणी|
सगळ्या झाल्या लेकी|शेजी म्हणते झाल्या झाल्या |
माऊली झुरे मनी|दाही दिशा चिमण्या गेल्या

(१८) डोंगरी वणवा|आग लागली तणाला|
जळती कीडा-मुंगी|शान्या उमज मनाला|
आपल्या मनाजोगं|मन गेले मी पहाया|
सोन्याच्या नादानं|खरं रेशीम गेलं वाया|
संसाराचा वेढा|वेढा बाई वंगाळ|
पान्यतली नाव्|खुशीखुशीनं सांभाळ|

(१९) कडू विंद्रावण्|मला वाटे खावं खावं|
त्याचे हे असे ग्|मला वेडीला काय ठावं|
गरतीची लेक| का गं कावरी बावरी|
तीळ घेतील झाडुनी|झाड पडेल वावरी|
हासू नको नारी|हशाचा भ्रम मोठा|
आपुला अस्तुरीचा|नारी गं जल्म खोटा|

(२०)अहेवाचं लेनं हात भरुन काकनं|
हळदीवरी कुंकू कपाळावरी दिस छान|
धनसंपदेचं नको देवास घालू कोडं|
हळदकुंकाचं राज असावं तेवढ|

(२१) तान्ह्या गं राजापायी जीव होतो थोडाथोड|
लाडका बाळ माझा , माझ्या काळजाचा घडा|

(२२) शेजी लेती लेनं पाच पुतळ्या कवामवा|
कपाळीचं नित दागीना माझ नवा|
एका करंड्याचं कुंकू रोज लेत्यात सासूसुना|
सये गं शेजीबाई असं भाग्य नाही कुना|

(२३)सुर्व्या उगवला उगवाला झाडावेरी|
किरन टाकीतो तोच माझ्या चुड्यावरी|

(२४)अहेव मरणाची मला हाये वो आवड|
म्होरं पतीपुत्र मगे कुंकवाही कावड|
अहेव मरणाची सयांनो मोठी मौज|
म्होरं चाले कंथ, माग गोतांची चाले फौज|
अहेव मरण येई असलपाअत|
ध्याईला जागा तुळशीवनात|

सिद्धी दोन्ही भाग सलग वाचले. घरबसल्या मन कोकण फिरुन आलं.. आता प्रत्यक्षात यायलाच हवं असं वाटतंय.. Happy
पुभाप्र! Happy

@ सिद्धिताई खूप धन्यवाद ... वाचली लिंक...
@ सामो तुमचेही खूप आभार या नितांतसुंदर ओव्यासाठी..‌‌‌
या ओव्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतात कारण ते स्रीचं समरसून जगण असत. किती सहज, सुंदर शैलीत त्या नात्याचे, भक्तीचे, प्रेमाचे, संसाराचे , आयुष्यातल्या सुखदु:खाचे, समाजातल्या चालीरीतीचे, पदर उलगडतात. किती प्रगल्भ विचारसरणी. ज्या कोणी या रचल्या त्या लौकिकार्थाने अशिक्षित असल्या तरी सरस्वतीच्या लेकीच.

ज्या कोणी या रचल्या त्या लौकिकार्थाने अशिक्षित असल्या तरी सरस्वतीच्या लेकीच. + १११

श्वेता, दिप्ती, दत्तादादा,सप्रस प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

- सप्रस व्हिडिओ ची लिंक दिलीत तर बरं होईल.... पहाता तरी येईल.

>>>>> ज्या कोणी या रचल्या त्या लौकिकार्थाने अशिक्षित असल्या तरी सरस्वतीच्या लेकीच.>>>>> +१००००
मला ओव्यांचा एक फार मोठा खजिना माहीत आहे. लिंक सापडल्यास देतेच.

https://ccrss.org/database/songs.php?location_id=239

या लिंकवरती शोधाल तर खूप खूप जात्यावरच्या ओव्या सापडतील.

छान लिहीलंय.

ओटी आणि पडवीमधे काय फरक असतो?