अमर-शक्ती

Submitted by पायस on 2 October, 2019 - 07:49

बिझिनेस जार्गनमध्ये "लो हँगिंग फ्रुट" ही संज्ञा अनेकदा वापरली जाते. थोडक्यात सांगायचे तर असे काहीतरी जे सहज साध्य आहे. जेव्हा काही उत्तुंग आकांक्षा मनी असेल तेव्हा कायम हाच सल्ला दिला जातो की आधी लो हँगिंग फ्रुट्स ओळखा, ती साध्य करा आणि मग टप्प्या-टप्प्याने अंतिम ध्येयाकडे वाटचाल करा. याच न्यायाने धरम-वीर पाहिल्यापासून त्याचे सखोल रसग्रहण करण्याचा पराक्रम करण्याची इच्छा होणे साहजिक आहे. पण एकदम अशा खडतर आव्हानांना सामोरे जाण्यात फारसा अर्थ नाही. सुदैवाने हर्मेश मल्होत्राने आपल्यासाठी एक लो हँगिंग फ्रुट धरम-वीर नंतर केवळ एकाच वर्षानंतर बनवले. त्याचे नाव आहे अमर शक्ती!

हर्मेश मल्होत्रा नक्कीच एक बर्‍यापैकी दिग्दर्शक आहे. त्याच्या या धरम-वीर कोर्सच्या कॅपस्टोन प्रोजेक्टमधून त्याला बरेच काही शिकावयास मिळाले आणि त्याने आपल्याला कैक खतरनाक सिनेमे दिले. नगीना-निगाहें मधून नागपटांची लाट आणणारा हाच मनुष्य! दुल्हे राजा सारखा धमाल चित्रपटही याचाच आहे (दुल्हे राजा डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला असा गैरसमज आहे). अमर शक्ती, खरेतर अमर-शक्ती, मध्ये त्याने आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली आहे. कुठल्याशा मध्ययुगीन युरोपीय राज्यात, जिथे हिंदी बोलली जाते, घडणारे कथानक. दोन राजपुत्र. जीवनमुळे त्यांची लहानपणीच झालेली ताटातूट. प्रदीप कुमार. इंद्राणी मुखर्जी. रणजीत. अशी अनेक साम्ये या दोन्ही चित्रपटांत असली तरी क्षुल्लक कथा वेगळी असल्यामुळे याला फक्त थिमॅटिक इन्स्पिरेशन म्हणावे लागते. यामुळे याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

१) चित्रपटासाठी स्वामीभक्तांइतकाच राजद्रोही महत्त्वाचा असतो

१.१) दोनच पहारेकरी ठेवणार्‍या युवराजांचे दिवस फार लवकर भरतात

सिनेमाची सुरुवात दहा घोडेस्वार दाखवून होते. हे घोडेस्वार कोणत्यातरी जंगलात संध्याकाळी घोडे फेकत निघाले आहेत. यांचे प्रमुख आहेत प्रदीप कुमार आणि जीवन. प्रकुला जीवन अदबीने कोणते तरी घर दाखवतो. त्या अदबीवरून या सिनेमात जीवनवर दुय्यम व्हिलन, तोही प्रकुचा, बनण्याची दुर्दशा ओढवल्याचे स्पष्ट होते. हे घर आणि प्रकु-जीवन जोडीमध्ये कोणतातरी विशेष रेखांश असल्याने टाईम झोन बदलून तिथे रात्र झालेली असते. घराबाहेर पहारा आणि सूर्य असलेला पांढरा झेंडा बघता हे कोणत्यातरी राजघराण्यातील व्यक्तीचे निवासस्थान असल्याचे कळते. प्रकु आणि जीवन यांनी राजस्थानी पद्धतीचा पोशाख केला आहे. दोघे लगेच डोईच्या फेट्याने आपली मुखकमले झाकून घेतात. उपस्थित दोन पहारेकर्‍यांनी मात्र ब्रिटिशकालीन हवालदारांचा वेश घेतला आहे. प्रकु-जीवनची माणसे शिताफीने या दोन पहारेकर्‍यांना ठार करतात.

प्रकु खिडकीतून आत डोकावतो. ते घर म्हणजे एक लाकडी केबिन आहे. थोडक्यात केबिन इन द वुड्स आपल्या लोकांनी आधी बांधले म्हणायला हरकत नसावी. केबिनमध्ये आधी राजन हक्सर (ऐलान-ए-जंग मधील लोळणारा सेठ म्हणून सुप्रसिद्ध) दिसतो. आणखी एका खिडकीतून बघतो तर अलका (कालिचरणमधील शत्रुघ्न सिन्हाची बहीण) दिसते. बाहेर सगळे लोक उकाड्याचे कपडे घातलेले असूनही राजन उगाच शेकोटीसमोर दारू पीत बसलेला असतो. तर अलका अतिशय गॉडी डिझाईनचे निळे पातळ घालून बसली आहे. तिचे कपडे बघता फार फार तर ती एखाद्या सावकाराची बायको शोभेल. पण हिला काही मिनिटे राजघराण्यातली सहन करणे भाग आहे. राजन-अलका जोडप्याला दोन मुले आहेत. एक किशोरवयीन तर दुसरा चार-पाच वर्षांचा असेल. या दिमतीला इंद्राणी मुखर्जी लीला या नावाने दासी दाखवली आहे. धरम-वीर मध्ये रानीमाँ बनून भरपूर माती खाल्ल्याने हिचे डिमोशन झाले असावे. अलकाला खिडकीतून डोकावणारा डाकूच्या वेशातला प्रकु दिसतो. ती किंकाळी फोडते. आता लपण्यात फारसा पॉईंट नसल्याने दरवाजा फोडून प्रकु आणि गँग आत शिरते.

बरीच तलवारबाजी होते. राजन एकच जोराचा तलवारीचा आघात करतो. याने खरेतर प्रकुचा चेहरा चिरला गेला पाहिजे. पण तसे न होता केवळ त्याचा बुरखा गळून पडतो. प्रकुचे नाव शमशेर सिंग असल्याचे स्पष्ट होते. याला गोल्डन कलरची फ्रेंच कट दाढी दिली आहे. नाव शमशेर असले तरी हातात रोमन पद्धतीची शॉर्ट स्वोर्ड आहे. शमशेर राजघराण्याचा नोकर असल्याचेही स्पष्ट होते. तोही लगेच गद्दारी का कलंक लावण्याऐवजी खून का तिलक लावायला आला असल्याचे घोषित करतो. मग ते दोघे आता हातात तलवारी दिल्याच आहेत तर पैसे वसूल करण्यासाठी थोडी खणाखणी करूया म्हणतात. राजन अलकाला पळून जायला सांगतो. ती पळते पण त्याआधी ती आणि मोठा मुलगा राजनचा प्रकु-जीवनच्या हातून तलवारी भोसकून झालेला मृत्यु बघतात. हा इंटरेस्टिंग डिझाईन चॉईस आहे. यामुळे धरम-वीरचा जो अर्ध्या तासाचा लांबलचक सेटअप आहे तो जवळ जवळ वीस मिनिटे कमी होतो. पण त्यामुळे काही सेट पीसेस वाया जातात. जसे की धरम-वीर मध्ये जीवनला आपला आयुष्यभराचा गैरसमज कळून चुकतो तेव्हा त्याच्या व्हिलनला सुद्धा अनेक पदर दाखवता येतात. पण दिग्दर्शक शिकाऊ असल्याने त्याला हे अजून कळलेले नाही. म्हणा प्रदीप कुमार व्हिलन हीच चॉईस डिबेटेबल आहे.

१.२) जब तक राजकुमार ना चाहे, राजकुमार को कोई मार नही सकता

अलकाबाईंना किमान डोके असल्यामुळे ती दोन्ही राजकुमार एकत्र घेऊन पळत नाही. छोटा राजकुमार अमर सिंग ती इंद्राणीच्या हवाली करते तर स्वतः मोठा राजकुमार शक्ती सिंग घेऊन पळ काढते. अशी ही अमर-शक्तीची जोडी सहीसलामत वाचणार यात कोणालाही तिळमात्र शंका यायचे कारण नाही. प्रश्न इतकाच आहे की ते कसे वाचणार. शेरू द वंडर बाजच्या डेट्स न मिळाल्याने दुर्दैवाने हे काम मनुष्यप्राण्यांकडून करवून घ्यावे लागले आहे. तर प्रकु-जीवन अलकाच्या मागे लागतात. पण दूरदृष्टी आणि सर्वंकष विचारांचा अभाव असल्याने त्यांना खोलीतून पळून जाणारी अलका दिसते पण त्याच खोलीच्या कोपर्‍यात लपलेली इंद्राणी दिसत नाही. ते सर्व केबिन बाहेर पडल्यानंतर इंद्राणी अमरला घेऊन सुमडीत पळ काढते.
आता पाठलाग जंगलात शिफ्ट होतो. केवळ बरीचशी झाडे आहेत म्हणून याला जंगल म्हणायचे. अन्यथा इथे बरेच मोकळे पट्टे असल्यामुळे माणसांना सहज शोधता येते. अशाच एका मोकळ्या जागेत अलका आणि शक्ती दिसतात. जीवनचा नेम भलताच चांगला असतो. तो अज्ञात अंतरावरून अदृश्य चाकू फेकून मारतो. हा अदृश्य चाकू अलकाच्या विव्हळण्यावरून तिच्या डाव्या खांद्यापाशी लागला आहे असे दिसते (आमचा आपला एक अंदाज). एवढ्याशा जखमांमुळे सामान्य माणसे मरत नसली तरी ऐषारामी वृत्ती हाडामासा खिळलेली ती ललना लगेच प्राण (म्हणजे जीव, प्राण धरम-वीरमध्ये, अमर-शक्तीत नाही) सोडते. एव्हाना सकाळ झालेली असते. आता ते दोन राजकुमार ठार करणे बाकी असते. त्यांना पळणारा शक्ती सिंग दिसतो. मॅन व्हर्सेस वाईल्ड पाहिलेले नसल्याने उंचावरून नदीत उडी घेताना तिच्या पात्राच्या खोलीचा अंदाज घ्यायचा असतो हे शक्तीला ठाऊक नसते. त्यामुळे तो बेधडक नदीत उडी मारतो. नदीत उडी मारणारा माणूस हिंदी चित्रपटात कधीही मरत नाही या महान सत्याचा उलगडा प्रकु-जीवनला झालेला नसल्यामुळे ते शक्ती सिंग मेला असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. आता राहिला छोटा राजकुमार ज्याला घेऊन पळाली लीला.

इकडे इंद्राणी पळते ती तडक घर गाठते. रात्रीचा तिचा नवरा शांतपणे झोपलेला असतो. ती येऊन दणादणा दार वाजवते. नंतर कळते की तिचा राजकुमाराच्याच वयाचा मुलगा घरात आहे. पण एवढी आदळआपट केल्यानंतरही त्या बाळावर काही ढिम्म परिणाम होत नाही, तो निवांत झोपून राहतो. तो नवराही रात्रीची झोपमोड झाल्याचे कोणतेही लक्षण दाखवत नाही. उलट अतिशय प्रसन्न चेहर्‍याने तो पत्नीला घरात घेतो. इंद्राणी म्हणते की शमशेर सिंग-नाहर सिंग जोडीने युवराज-युवराणीला मारून टाकले आहे. (नाहर सिंग म्हणजे जीवन) तो नवराही महाचतुर आणि स्वामीभक्त असल्याने त्याला लगेच कळते की आत्ता नमकहराम कॅटेगरीचे पारडे जड असून छोटा राजकुमार मोठा होईपर्यंत वाट बघावी लागेल. तसेच सिनेमाची पटकथा आपले बलिदान मागत असल्याचेही त्या चाणाक्ष पुरुषास कळून चुकते. एवढ्यात एक घोडा खिंकाळतो. इंद्राणी लगेच म्हणते की प्रकु-जीवनचे लोक इथपर्यंत आले आहेत. तसे बघावे तर इंद्राणीसुद्धा घोड्यावरूनच इथे आली आहे. हा खिंकाळणारा घोडा तिचा नाही हे कशावरून? ती घोडा ओळखण्यात चतुर असावी. असो तर आता राजकुमाराला कसे वाचवावे? मग लीलाकांत एक अफलातून कल्पना काढतो. तो म्हणतो आपला मुलगा आणि राजकुमार समवयस्क का आहेत? याच दिवसासाठी तर केला होता तो टायमिंगचा अट्टाहास! या बलिदानाच्या चढाओढीत आईचे हृदय तिळतिळ तुटते पण त्यावर स्वामीभक्ती मात करते. ती राजकुमाराला लपवते आणि जीवन घरात प्रवेश करतो. तो म्हणतो कुमार कुठे आहे? लीलाकांत म्हणतो इथे कोणी कुमार नाही, आगे जाओ. आई-बापाप्रमाणेच उत्कृष्ट टायमिंग असल्याने तो रिप्लेसमेंट मुलगा रडायला सुरुवात करतो. वय भलेही चार-पाच वर्षे असले तरी तान्ह्या बाळाच्या आवाजात रडण्यात तो पटाईत असतो. जीवनच्या मते नगास नग मुलगा मिळाला म्हणजे झाले. त्यामुळे तो कोण मुलगा आहे याची शहानिशा करता सरळ जाऊन त्याला मारून टाकतो. लीलाकांतही मरतो. इंद्राणी मध्ये तडमडते तर तिचेही डोके फोडले जाते. मग त्या घराला आग लावून देतात. ते सिमेंटचे पक्के घरही लाक्षागृह असल्यासारखे धू धू करून जळते. पण सिनेमा अजून सुरुही झालेला नसल्याने इंद्राणी मेलेली नसते. ती जीवन गेल्याची खात्री होताच खर्‍या राजकुमाराला घेऊन पळ काढते.

१.३) परफेक्ट प्लॅनिंग

छोटा तर इंद्राणीकडे आहे. पण मोठ्या मुलाचे काय झाले? तो नदीत वाहत जाऊन एका किनार्‍याला लागतो. तिथे एक बंजार्‍यांचा कबिला आलेला असतो. या कबिल्याचा सरदार असतो ओम शिवपुरी. ओम म्हणतो की हा चांगल्या घरातला दिसतो आहे, याला घेऊन चला आणि काय मलमपट्टी करता येईल ती करा. इकडे राजमहालात काय चालले आहे ते बघू. आधी सांगितल्याप्रमाणे राजन हक्सर युवराज होता. म्हणजे अजून तो राजा झालेला नाही. राजा असतो मुराद (हिंदी चित्रपटांतला अनंत काळचा न्यायाधीश, जवळपास ४३ वेळा न्यायाधीशाची भूमिका बजावण्याचे महान कार्य केलेला कलाकार). हा तसाही आज आहे उद्या नाही कंडिशनमध्ये असतोच. त्यामुळे याला सगळे समाचार याच्या बेडरूममध्ये जाऊन द्यावे लागतात. तर जीवन धावत धावत बेडरूममध्ये घुसतो. तिथे राजस्थानी नोकर, पठाणी सैनिक, फ्रेंच कट दाढीधारी प्रदीप कुमार अशी अनेकता में एकता दाखवणारी मंडळी असतात. जीवन त्याला सांगतो की युवराज-युवराज्ञी-राजकुमार (१ आणि २) डाकूंकडून मारले गेले. हे ऐकून मुराद दोन सेकंद आपल्याला कोणता आजार आहे हे आठवायचा प्रयत्न करतो. काहीच न सुचल्याने तो हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून बेशुद्ध पडतो. तिथे म्हैसुरी फेटा बांधलेला एक हकीमही (शराबीमधला रुस्तम बंदूकवाला) असतो. प्रकुच्या इशार्‍यावरून तो औषध देण्याच्या नावाखाली मुरादच्या तोंडात विषाची कुपी रिती करतो. मुराद मरतो आणि त्याचा मृत्यु सदमा नावाखाली खपवतात. अजूनही पुरेशी अनेकता में एकता दिसलेली नसल्यामुळे पठाणी, राजस्थानी, बुंदेली असे सगळे फेटे आणि मॉडर्न इन्स्पेक्टर स्टाईलच्या टोप्या घातलेले पहारेकरी दुखवटा व्यक्त करायला मान झुकवण्याचा शॉटही आपल्याला दिला जातो.

ही बातमी ओम शिवपुरीला कळते. शमशेर सिंग आता महाराज बनणार हे ऐकून तो राज्य सोडतो. सोबत शक्ती असतोच पण तो आपले रहस्य उघड करत नाही. इकडे प्रकु कच्च्या गुरुचा चेला नसतो. आपला प्लॅन परफेक्ट असावा म्हणून तो प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्ह्व्ह्ड सर्व पार्ट्यांना बोलावून घेतो. इथे त्याला ब्रिटिश अधिकारी स्टाईल पांढरा शर्ट पांढरी पँट दिली आहे. प्रकु-जीवनला ब्लॅकमेलरची कन्सेप्ट माहित असल्याने ते या लोकांना मारायचे नक्की करूनच आलेले असतात. पण तरी आपले मनोरंजन व्हावे म्हणून ते या लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देतात. इथे शानमधल्या सीनचा प्रिकर्सर बघायला मिळतो. त्यांना बोलाचाली मध्ये विशिष्ट जागी उभे केल्यानंतर प्रकु छानपैकी खुर्चीत बसून टेबलाच्या खणातले एक बटण दाबतो आणि या लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. खाली एक पिंजरा असतो, पिंजर्‍यात एक वाघ असतो. वाघ ऑफस्क्रीन जेवण उरकतो आणि प्रकु-जीवन जोडीचा मार्ग निष्कंटक होतो. प्रकु राजा तर जीवन त्याचा दिवाण बनतो.

२) हिरो-हिरोईन की एंट्री

२.१) हिरो लोक फेअरप्लेमध्ये विश्वास ठेवत असल्याने विन-विन ऑफर्स घेत नाहीत

इकडे इंद्राणी कुठल्यातरी स्वामीभक्त नोकराकडे आसरा घेते. तोही फार आढेवेढे न घेता हिला आणि राजकुमाराला घरात घेतो. हा तलवारबाज असतो. तो राजकुमार अमर सिंगला या राज्याचा सर्वोत्कृष्ट तलवारबाज बनवण्याचा विडा उचलतो. जसे जागरुक पालक आपल्या पाल्याला आयआयटीतील यशासाठी सध्या पहिली-दुसरी पासून तयारी करतात तसे हा अमरला पाचव्या वर्षापासूनच तलवारबाजीचे धडे द्यायला सुरु करतो. मग हे दोघे काही काळ फेन्सिंग करतात. दोघांच्या हातात रेपिअर्स दिल्या आहेत. पण दोघांनाही रेपिअर चालवायची अक्कल नसल्याने ते दांडपट्ट्याप्रमाणे काहीतरी खणाखणी करतात. यानंतर लहान पोरांना मोठे करा ट्रान्झिशनमधली एक उत्तम केस स्टडी आहे. स्वामीभक्त तलवारबाज त्या पाच वर्षांच्या पोराच्या हातून सहजतेने तलवार पाडतो आणि त्याला वर "तलवार उठाओ अमर" करून हिणवतो. मग श्रेयनामावली होते आणि नामावली संपताच अमर मोठा झालेला असतो. अमर आहे शशी कपूर. तोच सीन रिपीट होतो आणि आता शशी "तलवार उठाओ चाचा" म्हणून आपण निष्णात तलवारबाज झाल्याची ग्वाही देतो. एवढे पुरेसे नसल्यामुळे लगेच त्याला अन्यायनिवारणाचीही संधी मिळते.

गावात कोतवाल शेरसिंग (मोहन शेरी, त्रिशूलमधला गंगू) लगान वसूल करण्याच्या नावाखाली अत्याचार करत असतो. इथे हा कोतवाल नॉटिंगहॅमच्या शेरिफप्रमाणे दाखवला आहे. शशी कपूर एकटाच येऊन त्याच्या लोकांना बदडायला लागतो. हिरोंना समवयस्क व्हिलन द्यायची गरज असल्याने शशीला प्रतिस्पर्धी म्हणून रुपेश कुमारला इंट्रोड्युस केले जाते. रुपेश असतो कुंवर रणजीत नारायण सिंग. हा वेगळ्या कुठल्यातरी राज्याचा युवराज असतो. कोतवाल त्याला थोडक्यात परिस्थिती विशद करतो. हे ऐकून तो म्हणतो की आमच्या राज्यात अशा फायटिंग करणार्‍या लोकांचे हात तोडले जातात. नही वो तो बराबर हैं पण शशी तुझ्या राज्यात येऊन हाणामारी नाही करत आहे. पटकन काहीतरी उपाय सांगायचा सोडून फालतूची शायनिंग मारत असल्याने हा दुय्यम व्हिलन असल्याचे स्पष्ट होते. तो कोतवालाला सुचवतो की गावातले पाच तरुण पकडून घेऊन जा. त्या पाच तरुणांना सोडवण्याची किंमत म्हणजे या वेळचा लगान - पाचशे मोहरा. जर त्यांनी सात दिवसांत लगान नाही भरला तर त्या पाच लोकांना फासावर द्या. सगळे हा उपाय मान्य करतात. समजा गावकर्‍यांनी गावातले उपद्रवी तरुण याच्या हवाली केले आणि लगान भरला नाही तर या उपायानुसार ते उपद्रवी तरुण फासावर लटकतील. म्हणजे आयतीच कटकट गेली. आणि यांना लगानही भरावा लागणार नाही कारण रुपेशच्या काँट्रॅक्टनुसार लगानची रिप्लेसमेंट ते तरुण आहेत. वरुण ग्रोव्हरच्या शब्दांत सांगायचे तर "ऐसी विन-विन ऑफर मैने छह महिने में नही सुनी". पण हिंदी चित्रपटातील सामान्य जनता प्रॅग्मॅटिक विचार करत नसल्याने असा विचार करत नसल्याने तसे होत नाही.

२.२) फ्रान्सचा राजपूत

कट टू दरबार. रुपेश कुमार किशनगढचा युवराज असल्याचे कळते. प्रकुचा पैसा वर आल्यामुळे तो दरवर्षी ऑलिंपिक छाप स्पर्धा भरवत असतो. रुपेशचे कॅरेक्टर यांच्या ऑलिंपिकचा मायकेल फेल्प्स असतो. म्हणजे दर वर्षी तोच जिंकत असतो. आपल्या तोडीचा कोणी प्रतिस्पर्धी नसल्याची त्याची लाडिक तक्रार प्रकु-जीवन ऐकून घेतात. इथे सर्वांचे कपडे मोठे रंजक आहेत. जीवनचा ड्रेस काहीसा तंग असल्यामुळे त्याची ढेरी दिसते. रुपेशला केशरी रंगाचा नेपोलिअनच्या काळातला युनिफॉर्म दिला आहे आणि खाली एम्ब्रॉयडरी केलेली पांढरी पँट. तर प्रकु त्याचा पांढरा ड्रेस घालून बसला आहे. प्रकुच्या खांद्यावरची झूल सिंहासनावरून खाली सोडली आहे आणि ती सिंहासनाच्या तीन-चार पायर्‍यांपर्यंत लोळेल इतकी मोठी आहे. इथे बहुधा ती झूल म्हणजे मुघलकालीन काबा दाखवायचा असावा. पण एवढे पांढरे कपडे बघता या राज्यात धोब्याचा धंदा जोरात असावा.

रुपेशच्या बढाया प्रकु ऐकून घेतो. रुपेशला दरबारातच एकाच वेळी तीन-तीन लोकांशी फाईट करायची असते. त्याच्याकडे बघता त्याला एकाशीही धड फाईट जमणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे प्रकु त्याला कव्हरअप करू बघतो. म्हणतो की उगाच कशाला दरबारात रक्तपात? पण रुपेश स्वतःला राजपूत समजत असल्यामुळे त्याला जखमा-रक्त वगैरे वीरतेचे लक्षण वाटत असते. तसेच तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कायम मारत असतो, पण यावेळी तो प्रकुच्या लोकांना जिवंत सोडण्याचे वचन देतो. मग तीन सरदारांना समोर आणून फाईटिंग होते. प्रकु सुद्धा हौसेने याला हरवण्याचे बक्षीस म्हणून आपली अंगठी देऊ करतो. दुर्दैवाने प्रकुचे सरदार फारच बंडल निघतात. रुपेश त्यांना सहज हरवतो. प्रकु खुश होऊन त्याला काय बक्षीस पाहिजे विचारतो. रुपेशला या राज्यातला आबदार मोती हवा असतो. राज्यात मोत्यांचे प्रॉडक्शन होत नसल्याने प्रकु गोंधळतो. पण जीवन काय समजायचे ते समजतो. हिरोईनच्या एंट्रीची वेळ झालेली आहे.

२.३) व्हिलनची मुलगी नेहमी हिरोईन असते

हा आबदार मोती असतो राजकुमारी सुनीता. सुनीता दाखवली आहे सुलक्षणा पंडित. सुलक्षणा संपूर्ण सिनेमात गरिबांची गुटगुटीत नीतू सिंग दिसते. तिच्या सख्या खिदळत येतात आणि तिला दरबारात काय झाले ते सांगतात. एम्पॉवर्ड हिरोईन असल्याने ती आपला चॉईस आपणच ठरवणार असल्याची घोषणा करते. सीन कट होऊन कॅमेरा शशी कपूरवर आल्याने सुलक्षणा शशीची हिरोईन असल्याचे कळते. शशीलाही फेन्सिंग ऑलिंपिकविषयी कळते. सिनेमाचा हिरो असल्याने तो ऑलिंपिकमध्ये भाग घेऊन त्याचे बक्षीस - पाचशे मोहोरा - जिंकण्याचा निश्चय करतो. इंद्राणीला रुपेशच्या अजिंक्यपणाच्या दंतकथा ऐकून चिंता वाटते. पण शशी तिला आश्वस्त करतो आणि ऑलिंपिकसाठी राजधानीकडे रवाना होतो.

एका राजकुमाराची हिरोईन दाखवल्यानंतर दुसर्‍याची हिरोईन दाखवणे भाग आहे. कट टू बंजार्‍यांचा कबिला. या कबिल्याच्या कपड्यांमध्ये शून्य कन्सिस्टन्सी आहे. ओम शिवपुरी हंटिंग जॅकेट आणि हंटिंग बूट्स घालून हिंडतो आहे. अजून काही जणांच्या अंगावर मंगोल पद्धतीचे कपडे आहेत. काही जण जिप्सी दाखवले आहेत. पुन्हा अनेकता मे एकता! ऑलिंपिक स्पर्धांसोबत राजधानीत मेलाही होणार असतो. हा दिलों का मेला नसल्यामुळे इथे ट्विंकल खन्ना नाही, चिंता नसावी. तर मेल्यामध्ये तमाशा दाखवून पैसे कमवण्यासाठी बंजार्‍यांनी जाणे गरजेचे असते. त्यानुसार हे लोक तयारी करत असतात. इथे आपल्याला कळते की शक्ती मोठा झाला असून तो कबिल्यातील उच्चपदस्थ आहे. त्याला हिरोईन आहे ओम शिवपुरीच्या राईट हँड मॅन जब्बालची मुलगी चमकी. चमकीची भूमिका केली आहे मंजुला नावाच्या नटीने. ही हिंदी चित्रपटांत साऊथमधून आयात केलेल्या पहिल्या नट्यांच्या ताफ्यात मोडते. हिचा पहिलाच शॉट क्लिवेज शॉट काढून घेऊन दिग्दर्शकाने हिच्या भूमिकेविषयीचे आपले विचार स्पष्ट केले आहेत.

आता जसे शशीला रुपेश आहे तसे शक्तीला सुद्धा कोणीतरी व्हिलन पाहिजे. त्यानुसार चमकीमध्ये इंटरेस्टेड दाखवला आहे रणजीत. रणजीत ओमशिवपुरीचा मुलगा दाखवला आहे. वुल्व्हरिनने आपले साईडबर्न्स वाढवण्याची प्रेरणा रणजीतला या सिनेमात बघून घेतली असावी. बाकी रणजीत दिसतो कमाल! थोडे केस कमी केले आणि अ‍ॅस्थमाची ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यात नावं ठेवायला जागा नाही. पण नशीबी व्हिलनगिरी लिहिल्यामुळे त्याला मंजुलाकडून बोलणी ऐकून घ्यावी लागतात. त्याला मंजुला आपल्याला भाव देत नसून शक्तीला भाव देते याचे दु:ख झालेले दिसते. तसेही तो सरदारचा मुलगा असतानाही लोक शक्तीला भाव देत आहेत हे बघता त्याला दु:ख होणे साहजिक आहे. असा ग्राऊंडेड व्हिलन इतर सिनेमाच्या तुलनेत फारच आश्चर्यजनक आहे. असो, रणजित मग दोन मिनिटे रणजीतची कामे करतो आणि आपण आता हा शक्ती सिंग मोठा होऊन कोण झाला आहे ते बघतो.

शक्ती सिंग आहे शत्रुघ्न सिन्हा. ही चॉईस जरा ऑड आहे. शॉटगन शशीपेक्षा तरुण दिसतो आणि प्रत्यक्षातही तो आठ वर्षांनी लहान आहे. तरीही तो सिनेमात मोठा भाऊ आहे. याचा पराक्रम ठसवण्यासाठी एंट्री शॉटमध्येच तो एका बिबळ्याला गळ्यात पट्टा घालून कुत्र्याला फिरवावे तसे फिरवत असतो. हा बिबळ्या गुंडामधील सडा हुआ टाईगरचा पूर्वज असावा असा आमचा दाट संशय आहे. यानेही कलाबूत केलेले जाकीट, मॅचिंग पँट आणि पांढरा शर्ट घातला आहे. आपला डाव बघताच तो बिनधास्त त्या बिबळ्याला सोडून देतो आणि तिच्याकडे जातो. बिबळ्या सज्जन असल्यामुळे तो गुपचूप आपल्या वाटेने निघून जातो, उगाच वस्तीत गोंधळ माजवत नाही. शशीला काही लक्षात नसले तरी याला लहानपणचे सर्वकाही आठवत असते. त्यामुळे हा राजधानीला जायचे टाळत असतो. यावेळेस मात्र ओम शिवपुरी त्याला आग्रह करून राजधानीला घेऊन जातो.

३) ऑलिंपिक्स

३.१) मनोरंजनाच्या व्याख्या व्यक्तीसापेक्ष असतात

राजधानीला गणपतीला उसळावी तशी गर्दी असते. गर्दी तिथे पाकिटमार या न्यायाने रणजीत लोकांचे खिसे कापत असतो. ओम शिवपुरी सुद्धा जवळच असतो. प्रेक्षकांना थोडे टीज करावे या हेतुने शशी आणि शत्रुघ्न एकमेकांना धडकतात. पण दोघे एकमेकांना ओळखत नसल्याने यातून निष्पन्न काहीच होत नाही. गंमतीची गोष्ट अशी की या दोघा हिरोंनी आपापाली छाताडे केस दिसावेत इतपत उघडी ठेवली आहेत. पण व्हिलन रणजीतची बॉडी मात्र वॅक्सिंग केलेली आहे. असो, आत्ता वेळ मिलनाची नाही तर खेळांची आहे. खेळ सुरु करायला प्रकु, जीवन, रुपेश मैदानापाशी बांधलेल्या सज्जात येऊन बसतात. प्रकु तिथेही आपला तो इम्प्रॅक्टिकल काबा घालून आला आहे. पण सणासुदीचे म्हणून शर्ट-पँट नवीन आहेत. जीवनलाही सणासुदीचा नवीन शर्टपीस दिला आहे. शत्रुघ्नला लांबून हे लोक दिसतात. टेलिस्कोपिक व्हिजन असल्यामुळे इतक्या लांबूनही त्याला प्रकु ओळखू येतो. हिरो लोक भावनेच्या भरात वाहून जात असल्यामुळे तो प्रकुला सुरा फेकून मारायचा विचार करतो. इतक्या लांबून प्रकुला कदाचित एखादा स्नायपरही मारू शकणार नाही तर याचा सुरा कसला पोहोचायला? पण असं डोकं हिरो लोक लावत नसतात. सुदैवाने त्याला कोणीतरी येऊन ओम शिवपुरीने बोलावल्याचे सांगतो आणि हा वेडेपणा बघायची वेळ प्रेक्षकावर येत नाही.

आता राजकुमारीही गच्चीत येऊन बसलेली आहे. शशी तिला बघतो आणि त्याला पहली नजर का प्यारचा साक्षात्कार होतो. सोबत त्याचा मित्र गोपाल (बीरबल) असतो. तो त्याला भानावर आणतो. गंमत म्हणजे प्रकुच्या डोक्यावर छत आहे तर सुलक्षणाला तसेच उन्हात बसवले आहे. मग काही मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सुरुवातीला स्कॉटलंडमधला जथा असावा कारण लोक बॅगपाईपर वाजवत येतात आणि जातात. मग काही रथ येतात आणि जातात. मग काही गदाधारी लोक येतात आणि जातात. मग काही लोक कार्टव्हिल मारत येतात आणि जातात. मला वाटले आता स्कूटर वरून गिरीश कुलकर्णीही येईल आणि जाईल, पण तसे होत नाही. या लोकांच्या मनोरंजनाच्या अपेक्षा अत्यंत माफक असल्याने यानेही ते खुश होतात. मग मुख्य आकर्षणाची वेळ झालेली असते. जीवन येऊन म्हणतो की गेल्या पाच वर्षांपासून तलवारबाजीची स्पर्धा रुपेश जिंकत आला आहे. गेली दोन वर्षे तर त्याला वॉक-ओव्हर मिळाला आहे. तर या वर्षी सुद्धा वॉक-ओव्हर की कोणी चॅलेंजर आला आहे? जीवनच्याच शब्दांत सांगायचे तर "क्या इस साल कोई तलवार जवान हुई हैं?" याचे उत्तर सांगण्याची गरज नसावी.

३.२) पहिली चकमक नेहमी हिरोने जिंकावी

तत्पूर्वी या स्पर्धेविषयी थोडेसे. एकतर हिला स्पर्धा का म्हणत आहेत हे कळत नाही. या स्पर्धेला काही क्वालिफाईंग पूल नाही. रजिस्ट्रेशन प्रोसेस नाही. तसाही दरवर्षी रुपेश कुमारच जिंकतो जो आहे दुसर्‍या राज्याचा. या रुपेशच्या तोडीचा तलवारबाज समजा या राज्यात नाही पण रुपेशप्रमाणे इतर राज्यांतून स्पर्धक का येत नाहीत? आणि प्रकुला सुद्धा दरवर्षी गर्विष्ठ रुपेशकडून आपल्या राज्याचा अपमान करून घ्यायची काय हौस आहे काही समजत नाही. बरं असेही नाही की प्रकुचे राज्य रुपेशच्या राज्यापेक्षा कमजोर आहे, किमान तसे वाटत तरी नाही. मग हा टाईमपास दरवर्षी करण्यात काय हशील असावे? संशोधकांनी हा आव्हानात्मक प्रश्न सोडवायला घ्यायला हवा असे नमूद करून पुढे जाऊयात.

रुपेश चॅलेंज म्हणून त्याची तलवार मैदानात फेकतो. चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड म्हणून शशीही आपली तलवार मैदानात फेकतो. रुपेशला त्याची ओळख पटते. तो "तुम्हारी मौत मेरे हातों से लिखी हैं" अशा गोंडस शब्दांत शशीचे स्वागत करतो. शशी असल्या पोकळ धमक्यांनी घाबरणारी पार्टी नसते. या दोघांभोवती शिपाई एक रिंगण करतात. शशी पळून जाऊ नये म्हणून ही खबरदारी असल्याचे रुपेश सांगतो. शशी त्याला विचारतो की समजा तुला पळून जायचे असले तर? याने खवळून रुपेश फाईटिंग सुरु करतो. हे लोक फेन्सिंग करत असले तरी नमस्कार-बोईंग वगैरे सोपस्कार या राज्यात अस्तित्वात नाहीत. ही फाईट अ‍ॅक्चुअली चांगली आहे. दोघेही अ‍ॅग्रेसिव्ह स्लॅशिंग करून आपापल्या रेपिअर्स पुढे थ्रस्ट करत आहेत जे फेन्सिंगचे बेसिक आहे. अर्थात ही फाईट फिक्स दिसते कारण शशी शिपायांच्या जवळ जाताच एक शिपाई भाला भोसकण्याचा प्रयत्न करतो आणि क्रॉस-थ्रस्टिंगमध्ये रुपेशच्या हातून मारला जातो. याने रुपेश इतकी वर्षे कसा जिंकत आला हे स्पष्ट होते. थोड्यावेळाने शशी रुपेश जमिनीवर लोळण घेण्यास भाग पाडतो. रुपेश हरतो आहे हे दिसताच ते शिपाई पुढे होऊन शशीवर भाले रोखतात.

लोकांना शशी आवडला असल्याने ते बूईंग करायला सुरु करतात. सुलक्षणालाही शशी आवडला असल्याने ती या फिक्सिंगने भलतीच व्यथित होते. ती प्रकुकडे याची तक्रार करते. प्रॉब्लेम इतकाच असतो की प्रॉस्पेक्टिव्ह जावयाचा अपमान करणे प्रकुला परवडण्यासारखे नसते. पण रुपेशने स्वतःच माती खाल्ली असल्याने प्रकुचाही नाईलाज होतो. शशीला सोडले जाते आणि सुलक्षणा शशी जिंकल्याचे जाहीर करते. ती पाचशे मोहोरांची थैली शशीकडे भिरकावते, शशीही ती झेलून तिला अदबीने कुर्निसात करतो. रुपेश अपमानाने लालेलाल होऊन निघून जातो. हे असे सगळे होणार हे आधीच ठाऊक असल्याने कोतवाल मैदानाच्या कडेला वाट बघत उभा असतो. शशी त्याला मोहोरा देऊन आपल्या गावकर्‍यांची सुटका करतो. त्याचा नावाचा एकच जयजयकार होतो.

अशा रीतिने हिरो लोकांनी छोटासाच का होईना पहिला विजय प्राप्त केला आहे. समोर ताज्या दमाचे व्हिलन (रणजीत, रुपेश) आहेत. तर बदला घेण्यासाठी धूर्त व्हिलनही (प्रकु-जीवन) आहेत. हिरो लोक-व्हिलन लोक अजून काय काय टाईमपास करतात याविषयी सविस्तर चर्चा अल्पविरामानंतर प्रतिसादांत. पण एवढ्या अभ्यासानंतरही तुमचे कुतुहल चाळवले नसेल तर मायनर स्पॉईलर - या सिनेमात ट्रोजन एलिफंट आहे!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बऱ्याच दिवसांनी पायस चा लेख. येऊ द्या!

वा, वा, वा, वा, वा, वा, वाह!!!!!! बर्याच दिवसांनी पायस ची चित्रपट चिरफाड!! क्या बात है!! दिन बन गया!!!!

मस्त सुरूवात. कपड्यांची वर्णने ऐकून धरम-वीरचे रेकॉर्ड मोडले आहे या चित्रपटाने हे नक्की

जंगलाची व्याख्या, ४-५ वर्षाचा मुलगा तान्ह्या मुलासारखा रडणे वगैरे जबरी लोल. गिकु Lol

येउ दे अजून.

मला वाटले आता स्कूटर वरून गिरीश कुलकर्णीही येईल आणि जाईल >> अशक्य हसू दाबलंय मी हपिसात Lol Rofl

गिरीश कुलकर्णीचा रेफ कळला नाही...!!! काय आहे तो?

पण खूपच धमाल लेख!
Happy
वय भलेही चार-पाच वर्षे असले तरी तान्ह्या बाळाच्या आवाजात रडण्यात तो पटाईत असतो. जीवनच्या मते नगास नग मुलगा मिळाला म्हणजे झाले. त्यामुळे तो कोण मुलगा आहे याची शहानिशा करता सरळ जाऊन त्याला मारून टाकतो. ....वगैरे भारी पंचेस!
ही इंद्राणी मुखर्जी म्हणजे तीच ना....... शीना बोरा वाली?
Biggrin

मस्त! मस्त! मस्त!
अनेकता मे एकता भारी आहे.

<<<<<<<मला वाटले आता स्कूटर वरून गिरीश कुलकर्णीही येईल आणि जाईल>>>>>> हा उच्च आहे

मला वाटले आता स्कूटर वरून गिरीश कुलकर्णीही येईल आणि जाईल, पण तसे होत नाही >> इथे फिस्स करून हसू आले रे.

धन्यवाद Happy

गिरीश कुलकर्णीचा रेफ कळला नाही >> तुम्ही एकदा पुणे ५२ नक्की बघा आणि एक काऊंटर ठेवा. गिकु इकडून तिकडे गेला की काऊंटर एकने वाढवायचा आणि तिकडून इकडे आला की काऊंटर एकने परत वाढवायचा. शेषनागचा जय त्रिकालदेव आणि हातिमताईचा अल्लाह का नेक बंदा/फरिश्ता काऊंटर या गिकु काऊंटर पुढे काहीच नाही.

ही इंद्राणी मुखर्जी म्हणजे तीच ना....... शीना बोरा वाली? >> नाही. ही इंद्राणी मुखर्जी जुनी अभिनेत्री आहे. धरम-वीर, परवरीश अशा सिनेमांमधली आई. शीना बोरावाली इंद्राणी मुखर्जी आणि ही इंद्राणी मुखर्जी यांचा दुरान्वयेही संबंध नाही.

४) अर्धा तास झाल्यानंतर प्रेक्षकही चुळबूळ करायला लागतो - गाणी कधी चालू होणार?

४.१) समोर पळणार्‍या चोराचा पाठलाग करण्यापेक्षा त्याच्या एकाजागी उभ्या असलेल्या संभावित साथीदाराला पकडावे

कोतवाल पाचशे मोहोरा घेऊन गर्दीतून वाट काढत रमत गमत चाललेला आहे. हा महत्त्वाचा माणूस असल्याने याला गरुडाचे चित्र असलेला केप दिला आहे. रणजीतची लक्ष वेधण्यास तेवढे पुरेसे असते. तो कोतवालाच्या कंबरेला लटकणारी थैली चोरायचे ठरवते. इथे पुरातन कालीन "ते बघा काय आहे तिकडे" ट्रिक वापरली जाते आणि कोतवालही बावळटासारखा भलतीकडे बघतो आणि रणजीत निवांत थैली काढून घेऊन पळ काढतो. खरेतर एवढी मोठी रक्कम पब्लिक प्लेसमध्ये नजरेत भरेल अशी वागवणार्‍या माणसाला कोतवालीतून बडतर्फ केले पाहिजे. पण नाईलाजाने असा माणूस कोतवाल म्हणून सहन करावा लागतो. बरं रणजीतही काही सराईत खिसेकापू दाखवलेला नाही. एवढ्या गर्दीत तो हा हा म्हणता दिसेनासा व्हायला हवा. त्याऐवजी कोतवाल आणि त्याची माणसे अगदी सहज त्याचा माग काढताना दाखवली आहेत. आपण पकडले जाऊ असे लक्षात येताच रणजीत ओम शिवपुरीला एवढ्या गर्दीतही स्पॉट करतो आणि मोहोरांची थैली त्याच्या दिशेने भिरकावतो. ओम शिवपुरीही आपल्या मुलाचे प्रताप ठाऊक असूनही ती थैली हातात घेतो. हे सर्व शिपायांनी पाहिले असल्यामुळे ते ओम शिवपुरीला चोराचा साथीदार समजून अटक करतात. सोबत चमकीला सुद्धा पकडून नेतात. इथे खटला वगैरे प्रकरण बहुधा नसावे. त्यांना डायरेक्ट पकडून किल्ल्यात कैदेत टाकतात. हे येऊन इतर बंजारे शॉटगनला सांगतात. शॉटगन गरम डोक्याचा असल्याने तो लगेच किल्ल्याकडे जायला निघतो. पण सोबती त्याला जरा सबुरीने घ्यायला सांगतात. त्यामुळे ते रात्री हल्ला करायचे ठरवतात. शत्रुघ्नचे कपडे - लेमन यलो रंगाचे शर्ट, काळ्या रंगाचे लेदरचे हंटिंग जॅकेट, काळी पँट, हंटिंग बूट, सिंहमुखी बेल्ट!

रात्र होते. असे कळते की चमकी आणि ओम शिवपुरीला तहखान्यात ठेवले आहे. शॉटगनने दिवसभराचे घामेजलेले कपडे अजूनही घातलेले असले तरी तो फ्रेश दिसण्याचा मिनी चमत्कार घडतो. कट टू तहखाना. ओम शिवपुरीला एकप्रकारच्या टॉर्चर डिव्हाईसला बांधलेले असते. याला एक चाक जोडलेले आहे. हे चाक फिरवून त्याच्या हाता पायांवर ताण वाढवता येतो. प्रमाणाबाहेर ताण वाढला की त्याचे हात पाय तुटणार. दिवसभर त्याला पाणीही दिलेले दिसत नाही. अंगावर चाबकाचे फटकारे ओढल्याच्या खुणा आहेत. कोतवालाला त्याच्या साथीदारांविषयी माहिती हवी असते. ती न मिळाल्याने तो सरदारला टॉर्चर करत असतो. सरदाराची ही अवस्था चमकीला बघवत नाही. हिचा ड्रेस भलताच रंगीबेरंगी आणि गोंडेदार आहे. चमकीवर अत्याचार होऊ नयेत म्हणून ओम शिवपुरी सर्व सांगायला तयार असतो. पण चमकी नाव आहे तर ती पार्टीत चमकेलच असा विचार करून कोतवाल तिला महालात घेऊन जातो.

४.२) गाणे कसेही असो, नाच वाह्यात असायलाच हवा

महालात एंजॉय करायला आणखीही लोक आलेले असतात. ते म्हणतात की नाच. ती म्हणते नाही नाचणार. ते म्हणतात गा. ती म्हणते नाही गाणार. समजा या पॉईंटला ते म्हणाले की पळ तर ही बया नाही पळणार म्हणेल का? बरं ही बंजारन आहे तर तिला नाचगाणे येत असेलच हा त्यांचा आत्मविश्वास कहर आहे. कोतवाल म्हणतो की मी ठरवलं तर दगडाची मूर्ती सुद्धा गाते. तसं बघावं तर ही देखील दगड आहेच. त्याच वेळी शत्रुघ्न बाहेरून कोणातरी पक्ष्याची शीळ घालून हिला आपण आलेलो असल्याचे कळवतो. ती सुद्धा लगेच आपला अ‍ॅटिट्यूड बदलते आणि नाचायला लागते. हिचा असा अचानक पावित्रा इतर कोणालाही संशयास्पद वाटेल पण या लोकांना वाटत नाही.

जी हां भाईयों और बहनों गाने के बोल हैं ठहरो ठहरो ठहरो (इथे नेहमीपेक्षा मोठा पॉज घ्या) ठहरो जी ठहरो. आवाज आहे आशा भोसल्यांचा आणि संगीत दिले आहे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी. तुनळी आवृत्तीत गाणी म्यूट आहेत त्यामुळे गाण्यावर मी फारशी टिप्पणी करू शकत नाही. पण गाण्याचे बोल ऑनलाईन मिळतात आणि सर्वात महत्त्वाचे मंजुलाचा वाह्यात नाच ऑनलाईन बघायला मिळतो. कोतवालाच्या सगळ्या माणसांना केप दिला आहे. त्यामुळे हे लोक ड्रॅक्युला सारखे दिसतात. हातात रेड वाईन देऊन डिरेक्टरने पोएटिक जस्टिस साधला आहे. प्रत्येक जण दारू पिऊन झिंगल्याचा अभिनय करतो आणि सगळे तिच्या भोवती रिंगण करून तिला अ‍ॅप्रोच करण्याचा प्रयत्न करतात. मल्होत्रा-भाऊ हिच्या क्लिव्हेज आणि नेव्हल शॉट्सच्या फारच प्रेमात असल्यामुळे त्यांनी हिच्या बहुतांशी फ्रेम्स विशिष्ट अँगल्समधून लावल्या आहेत. ते समजा बाजूला ठेऊ (आणि हा फारच मोठा समजा असल्याची मला कल्पना आहे). पण कथेतली चमकी एवढी खुश होऊन, छातीतले दिल छातीसकट मचलवत, कंबर हलवत बेली डॅन्स का करते आहे? आय मीन, शक्ती तिच्या सुटकेसाठी आला आहे आणि वेळ काढायचा आहे हे मान्य. पण म्हणून प्रेमभाई इतनी खुशी?

हिचा वाह्यातपणा कमी म्हणून की काय, ते सगळे ड्रॅक्युला मख्ख चेहर्‍याने हिच्यासोबत फ्लर्टिंग करत आहेत. यांचे फ्लर्टिंग बघून आपल्याला चमकीची दया येते. जर तिची दया येण्याकरिता हा इंटेन्शल डिरेक्शन चॉईस असेल तर मल्होत्रा-भाऊंना माझा (कपाळाला हात लावून) सलाम! मध्ये मध्ये दिजिए थोडी शराब, पीके मैं नाचू जनाब अशी यमके जुळवलेली कडवी आहेत. प्रत्येक कडव्यात तिचा एकच संदेश आहे - मी आत्ता सोबर आहे. मी इतर कोणाशी तरी कसमांनी बांधील आहे. तर जरा संयम बाळगा. मी टुन्न होईपर्यंत थांबा. मग काय तुम्ही रंगीन, शौकीन आहातच. असे महान संदेश जुन्या श्रवणीय गाण्यांमध्ये दडलेले आहेत आणि बहुधा त्या काळातला बापडा प्रेक्षक शेजारच्याचा "हॅ शब्दांत काय ठेवलंय, मेलडी ऐकायची असते. पण सायेब लव शीन काय लावला आहे, ट्राली बघा कशी गारगार फिरवली आहे" अभिप्राय ऐकून खुर्चीखाली पिचकारी मारून (शेजारच्यानेच दिलेल्या पानाची, त्याच्याच सांगण्यावरून) गप्प बसले असावेत.

४.३) जर राज्यात ऑलिंपिक संस्कृती असेल तर प्रत्येकाला ऑलिंपिकचा एक खेळ खेळता यायलाच हवा

इकडे हा किल्ला राजधानीत नेमका कुठे आहे कळायला काही मार्ग नाही. राजधानीचा भूगोल पूर्ण सपाट असल्याने किल्ला भुईकोट असावा. खणलेल्या खंदकाने आपल्या संशयास बळकटी मिळते. हा खंदक फारच उथळ आहे आणि त्यात मगरी सोडण्याची बेसिक खबरदारी या लोकांनी घेतलेली नाही. केवळ या फालतूगिरीची शिक्षा म्हणून या लोकांना धोपटणे योग्य ठरते. तसेही युरोपीय किल्ले सहसा उंच भिंती असलेल्या भुईकोट गढ्याच असतात. पण अशी उंच भिंत ओलांडायची कशी? शशी कपूरला फेन्सिंग जमत असल्याने शत्रुघ्नलाही एखादा ऑलिंपिक खेळ जमायला हवा. त्यानुसार शत्रुघ्नला सर्जी बुबकाला लाजवेल असे पोल-व्हॉल्टिंग जमत असते. तरी तो पोल-व्हॉल्ट करून कोटाच्या भिंतीवर दाखल होतो. मग वरून तो दोर सोडतो आणि त्या दोरांना धरून त्याचे साथीदार भिंत चढून येतात. इकडे चमकीच्या नाचावर ड्रॅक्युला लोक टाळ्या पिटत असतात. हिलाही ऑलिंपिक जमायला हवे अशी मागणी होते. मग हिच्या डान्स स्टेप्स जिमनॅस्टिक्समध्ये बदलतात. हे सर्व कोतवाल आणि मंडळी कौतुकाने बघत राहतात (पोरगी ८०ला मॉस्कोहून सुवर्णपदक आणणार बघा!) अखेर ती थकून जमिनीवर बसते आणि ड्रॅक्युला लोक तिच्यावर सामूहिक पडी घ्यायची तयारी करतात.

याच वेळेस शॉटगन वर लटकलेल्या झुंबरावर उडी घेतो. आजूबाजूला मेणबत्त्या लावलेले बरीच झुंबरे असतात. तो आपल्या तलवारीने ती सर्व झुंबरे कापून टाकतो. मेणबत्त्या विझल्याने अंधार होतो. कोतवाल आपली तलवार फेकून मारतो आणि शत्रुघ्न उभा असलेले झुंबरही तुटते. तिकडे त्याचे साथीदार तहखान्यात जाऊन आपल्या सरदाराची (आणि पर्यायाने इतर बर्‍याच कैद्यांची) मुक्तता करतात. शॉटगन अगदी शशी इतका नसला तरी बर्‍यापैकी तलवारबाज असतो. तो खटाखट बर्‍याच ड्रॅक्युला लोकांचा खात्मा करतो. मंजुलाही बरीच हिंसक दाखवली असल्याने ती सुरेफेक करून काहींना यमसदनी धाडते, तर अनेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवते. शॉटगनला तसेही तलवारीची फारशी गरज नसते तो नुसता इकडून तिकडे उड्या मारूनही यांना हरवतो. पण तरी थोडी खणाखणी व्हायला हवी म्हणून त्याचे कोतवालासोबत द्वंद्व होते. कोतवाल मारला जात नाही पण आत्ता ते लक्ष्य नसल्याने शत्रुघ्नही फारसे प्रयत्न करत नाही. तसेही कोणीतरी धाड पडल्याची घंटा वाजवतो. त्यामुळे यांना आणखी मदत येण्याच्या आत पळ काढणे भाग पडते.

मग हे लोक उड्या मारत खंदक गाठतात. मगरी नसलेला खंदक पोहून पार करतात. इतर बंजारे तर बघता बघता दिसेनासे होतात. पण शत्रुघ्न-मंजुलाला टांग्यातून पळ काढावा लागतो. बहुधा तरी या टांग्यात ओम शिवपुरी असावा. अशा टॉर्चरनंतर त्याला पळ काढता येत नसावा. कोतवालाचे घोडेस्वार या टांग्याचा पाठलाग करतात पण मध्येच एक गवताची गंजी ठेवलेली हातगाडी आड आणली जाते. या हातगाडीत बरेच लक्ष्मी बॉंब असतात. मशाल फेकून ते फोडले जातात. आवाजांनी घोडे बुजतात, पाठलाग विफल जातो आणि शत्रुघ्न सरदार-चमकी जोडीला सोडवण्यात यशस्वी होतो.

भारी आहे परीxaण. हहपुवा
>>>>> सुलक्षणा पंडित. सुलक्षणा संपूर्ण सिनेमात गरिबांची गुटगुटीत नीतू सिंग दिसते. >>>> लोलच लोल
खूपच मस्त आहे.
>>>>>>> मनोरंजनाच्या व्याख्या व्यक्तीसापेक्ष असतात. राजधानीला गणपतीला उसळावी तशी गर्दी असते. >>>>>>>>>> हाहाहा

काल जेवताना तोंडी लावणं म्हणून हा लेख वाचत होतो. अर्धाच वाचून झाला.

काय अभ्यास! काय अभ्यास! _/\_

"इस वक्त, इस घरमे एकही उमर के दो बच्चे है"! काय जबाबदार्‍या असत लोकांपुढे तेव्हा! विशेषत: विश्वासू नोकर कॅटेगरीतील माणसांकडे! synchronized activity! "महाराज अंतःपुरात गेलेले आहेत होssss" अशी दवंडी पिटली जात असावी बहुधा.

इथे राजवाडा व घरे ग्राउण्ड लेव्हलला असल्याने मुले तटावरून खाली फेकून बाझ पक्ष्यांना कॅच प्रॅक्टिस देणे वगैरे जीवनने केलेले नाही. बहुधा धरम-वीर प्रकरणानंतर राजघराण्यात जीवन असेल तर राजवाडे भुईकोटच बांधत असावेत.

सुरूवातीच्या फाइट सीन मधे प्रकु ने जितकी हालचाल केली आहे ती त्याच्या कारकीर्दीतील आधीच्या सगळ्या रोल्स मधे मिळूनही केलेली नसावी. जो वाद किया वो निभाना पडेगा मधे त्याचे तोंड मुश्किलीने हलते. व रोके जमाना चाहे रोके खुदाई म्हणताना एकदा तो वर बघतो इतकेच.

घोड्यांच्या खि़ंकाळण्याचे आवाज हे त्यांच्या टापांच्या आवाजापेक्षा २-३ मिनीटे आधी येतात ही नवीन माहिती इथे आपल्याला मिळते.

अमुक व्यक्ती सत्तास्थानी आली तर मी राज्य सोडून जाइन म्हणणारे लोक तेव्हा खरोखरच जात हे ही एक कळाले. शब्दशः कुटुंब कबिला घेउन ओम शिवपुरी जातो इथे.

जीवन व इतर मारेकरी लहान मुलाला घेउन जाणार्‍या राजकन्येच्या मागे धावत आहेत. त्यांना ती मुलाला घेउन पळताना दिसते. मग ते तिच्यामागे धावतात. ती धावता धावता थांबते. मुलाशी बोलते. त्याला पळून जायला सांगते. मधे आणखी काही सेकंद जातात. त्यानंतर ते धावणारे तेथे पोहोचतात. सशाच्या मागे कासव लागल्यासारखा पाठलाग आहे हा.

त्यात हे लोक भलतेच तरबेज असावेत पाठलाग करण्यात. मधेच एका ठिकाणी थांबून इकडेतिकडे बघत बसतात तो मुलगा कोठे पळाला ते. मग दिसते की मोकळ्या मैदानात चांगल्या उजेडात या सर्वांच्या बरोब्बर समोर अगदी स्क्रीनच्या मध्यावर तो मुलगा पळून जात आहे.

इं.मु. च्या नवर्‍याची हेअर स्टाइल हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

विविध लोकांचे फेटे व त्या कबिल्यातील मुलीचा एकूण वेष व डोक्यावर जे काय घातले आहे ते पाहता अंग झाकण्यापेक्षा डोके झाकण्याला जास्त महत्त्व असावे त्या काळी. डोके कव्हर न केलेल्या सर्व व्यक्ती ओपनिंग सीन्स मधे मारल्या गेल्या आहेत.

तेव्हाचे राजवैद्या खिशात विषाच्या कुप्या घेउन फिरत असत ही नवीनच माहिती मिळाली.

मारल्या गेलेल्या राजा व राजपुत्रामधे २-४ वर्षांचेच अंतर असावे असे वाटले.

एकूणच गरिबांचा धरम-वीर वाटतो हा Happy हा चित्रपट बघायल उद्युक्त केल्याबद्दल अनेक आभार पायस Happy

1979 मध्ये शशी शत्रूघन जोडीचा एक गौतम गोविंदा सिनेमा आलेला दिसतोय Happy

युट्युबवर प्रताधिकाराबद्दल जागृत कोण आहे ज्याने यातली गाणी म्यूट केली?

Pages