मोग

Submitted by प्रकाश कर्णिक on 1 August, 2012 - 07:34

फिलोमिनाला यायला अजून बराच वेळ होता. फ्रान्सिस पहाटेपासून जागा होता. आताशी त्याला झोप पण नीट लागत नसे. रात्री दिलेल्या सलाईन बरोबर झोपेचे औषध अथवा पेन किलर देत त्यामुळे थोडी तरी गुंगी येई पण सलग झोप आता लागेनाशी झाली होती. आणि पहाट होताच खिडकीच्या तावदानातून दिसणाऱ्या प्रकाशामुळे फ्रान्सिसला एका नवीन दिवसाची जाणीव व्हायची आणि मग तो डोळे उघडे ठेऊन फिलोमिनाची वाट पाहत पडून राहायचा. फिलोमिना सुद्धा पहाटे घरी जाताना त्याला उठवत नसे. आजकल फ्रान्सिसला हॉस्पिटलच जेवण जेवता येत नव्हतं तेंव्हा फिलोमिना घरी जाऊन तांदळाची पेज आणि मिठाच्या पाण्यात साठवलेली कैरी नाष्ट्या साठी घेऊन येई. तिला फ्रान्सिसचं दुपारचं जेवण पण करायचं असे. फ्रान्सिस आता थोडं घरचं शीत आणि सोल कढी ती पण मिरची शिवाय या पलीकडे काही खाण्याच्या परिस्थितीत नव्हता. कधी एखादा माश्याचा तुकडा फिलोमिना घेऊन आलीच तर तो खूप अपेक्षेने त्या तुकड्याकडे बघायचा पण खाण्याची इच्छा आणि चव दोन्ही आता गेले होते. आज इतवार म्हणजे चर्च मध्ये मास. फिलोमिना अगदी दररोज चर्च मध्ये जात होती पण ते संध्याकाळी. फक्त रविवारी ती सकाळच्या मास ला जात असे. संद्याकाळी तिला फादर लोबो भेटत. त्यांचाच एक आधार तिला होता. त्यांच्या ओळखी मुळे अल्डोनातल्या असिलो हॉस्पिटल मध्ये फ्रान्सिसचा उपचार इतके दिवस शक्य होत होता.
फ्रान्सिसला असिलो हॉस्पिटल मध्ये अॅखडमिट होऊन दोन महिने झाले होते. या दोन महिन्यांच्या काळात फ्रान्सिसच्या धड दाकट शरीराचा सापळा झाला होता. फ्रान्सिसला स्वत आपल्या मांड्यां कडे आणि हातांकडे पाहून रडायला येई. आता तो आरशात पाहायला नकार देई. फिलोमिनाच दर दोन दिवसांनी त्याची दाढी करत असे. फिलोमिना दाढी करत असताना अगदी जवळ येई. तिच्या अंगाची उब, तिचा सुगंध आणि तिच्या स्पर्शाची मृदुता त्याच्या साऱ्या आठवणी ताज्या करत.
कधी कधी रात्री जेव्हा त्याला झोप लागत नसे तेंव्हा खाली सतरंजीवर लवंडलेली फिलोमिना पलंगावर त्याच्या कृश शरीराला चिकटून झोपे. तेंव्हा त्याला तिच्या बिन आवाज्याच्या हुंदक्यांची जाणीव होई. लग्ना अगोदरची फिलोमिना आणि आताची काळवंडलेली, रोडावलेली फिलोमिना यांच्यात किती फरक होता हे त्याला ती जेवण घेऊन दारातून वार्ड मध्ये शिरे तेंव्हा प्रकर्षाने जाणावे. तिचे केस सुद्धा आता पूर्वी सारखे व्यवस्थित विंचरलेले नसत. तिच्या चेहेऱ्यावर आता हताशपणाची, पराभवाची सावली दिसू लागली होती.
फ्रान्सिसला प्रथम तिची कधि भेट झाली हेच आठवत नव्हते. तसे आठवणे शक्यच नव्हते कारण फ्रान्सिस चर्चच्या अनाथालयात वाढलेला आणि दर रविवारी त्याची चर्च मध्ये नेमणूक असे. त्या दिवशी असंख्य मुली फॅमिली बरोबर येत. दर एक तासाला मास असे. त्याला सगळ्या मुली सारख्याच दिसायला लागल्या होत्या.
पण फ्रान्सिसला फेलोमिनाचे अस्तित्व प्रथम त्याच्या क्लबच्या फुटबॉल मॅचच्या वेळी कळले. ते सुद्धा त्याने केलेल्या गोल नंतर बराच वेळ टाळ्या वाजवणारी मैदानाच्या कठड्यावर बसलेली शाळकरी मुलगी म्हणून. त्याला तेंव्हा फिलोमिना खूपच बालिश वाटली होती. त्यानंतर त्याला जाणवले कि त्याच्या प्रत्येक मॅचला ती हजर असते. का तिला गेम एवढा आवडत होता ? त्याला कळायला सुद्धा खूप दिवस लागले. फिलोमिनाची शाळा बारावी नंतर सुटली आणि तिने टायपिंगचा क्लास घेतला तेंव्हापासून तिचा शाळेचा ड्रेस जाऊन साधा फ्रॉक आला. अचानक फिलोमिना त्याला मोठ्ठी दिसू लागली. तिच्या मैदानावरच्या वागण्यात सुद्धा मोठ्ठा फरक आला.
इतर मुलांनी आता तिच्या मॅचला हजर असण्याची दखल घ्यायला सुरुवात केली होती , अगदी अॅरलेक्सने सुद्धा. अॅयलेक्स त्याचा चांगला मित्र होता. अॅमलेक्स बऱ्या घरचा मुलगा होता. सधन नसला तरी घरदार होते , वडील सरकारी हुद्यावर होते आणि थोडी नारळाची बाग होती. पण फ्रान्सिसला वाटले आता आपल्या पसंतीची आणि हक्काची जाणीव सर्वाना करून देण्याची वेळ आली.
अॅललेक्सशी त्या दिवशी त्याचे भांडण उगाचच झाले नाही. अॅहलेक्सला माहित होते कि फिलोमिना फ्रान्सिसच्या प्रत्येक गेमला असते आणि हे सर्वांनीच ओळखले पण होते. तरीही त्या दिवशी गेमच्या अगोदर अॅयलेक्सने त्याला चिथावणी दिली कि त्याचे पप्पा फिलोमिनाच्या मम्मीशी त्या दोघांच्या लग्ना बद्दल बोलणार आहेत .
त्यांची बाचाबाची हातघाईवर येणार एवढ्यात फिलोमिना तेथे आली आणि नंतर गेम पण सुरु झाला. फ्रान्सिस त्या दिवशी जबरदस्त खेळला आणि अॅवलेक्सच्या टीमचा तीन विरुद्ध शून्यनि पराभव केला. तिन्ही गोल फ्रान्सिसनं केले.
गेम नंतर तो अॅबलेक्सशी नं बोलता चर्च कडे निघून गेला. फ्रान्सिस चर्चच्या पायऱ्यांवर बराच वेळ एकटा बसून होता. त्याला वाटले काय त्याचा हक्क आहे अॅेलेक्सशी भांडण्याचा . तो तर अनाथ, नं आगा नं पिछा. त्याला कोण मुलगी देणार? त्याच मन उदास होता होता फिलोमिना तेथे आली. शांतपणे ती त्याच्या शेजारी बसली होती. त्याने आपले मन तिच्यापुढे रिक्त केले. अगदी सर्व भावना त्याने व्यक्त केल्या, त्याची परिस्थिती, त्याचं या जगात एकटे असण सुद्धा. फिलोमिनाच्या डोळ्यातून अश्रू येत होते . तिने “आय लव यु “ म्हणून त्याच्या गालावर किस केलं आणि ती पळून गेली होती.
गालावरचे चुंबन जपत आणि ही होकारार्थी पावती आहे असे समजून फ्रान्सिस फिलोमिनाच्या आईला भेटला. तिनेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत. आई म्हणाली " माझ्या पुता , मला नातेवाईक खूप आहेत पण जवळचं असं कोणी नाही हे फिलोमिनाचा डॅडी गेल्यावर लगेच मला उमजलं. मी फिलोमिनाला कठीण परिस्थितीत वाढवली . आता आम्हाला आधार पाहिजे. तुम्ही दोघे सुखी रहाल."
फ्रान्सिसने पण फिलोमिनाच्या आईला धीर दिला " मदर, फादर लोबो यांनि माझ्या खेळाच्या जोरावर शिपयार्डात नोकरी दिली आहे. मी फिलोमिनाची काळजी घेईन ."
लग्न अगदी साधे पणाने झाले. फिलोमिनाच्या आईला खूप उत्साह होता पण फादर लोबोनी नाही खर्च करायचा म्हणून सांगितलं. फिलोमिनाने आपल्या आईचा वेडिंग गाउन घातला होता. फ्रांसिसला वाटले तिच्या सारखी सुंदर मुलगी या जगात कोणि नाही. चर्च मधील सर्व विधी व्यवस्थित पार पडले जसं काही चर्च फ्रान्सिसच्या मालकीचं होत. चर्चच्या लोकांनी मुलीला देतात तसा फ्रान्सिसला निरोप दिला कारण फ्रान्सिस आता फिलोमिनाच्या घरी राहायला जाणार होता. एक छोटी पार्टी घरीच ठेवली होती. थोड्या लोकांना बोलावलं होतं. फुटबॉल टीम मधील सर्व जण आले होते अगदी अॅडलेक्स सुद्धा. विश करताना अॅ लेक्स म्हणाला
"फ्रान्सिस यु आर लकी ब्रदर ! आय ऑल मोस्ट स्टोल युअर वाईफ. मी दुबईला जॉब घेतला आहे. कधी आलो कि भेटेन. " फ्रान्सिसला वाटले कि आता मैत्रीत काही कटुता उरली नाही.
फ्रान्सिसने डोळे उघडले, त्याचा हॉस्पिटलचा चहा ग्लास मध्ये येऊन बराच वेळ झाला असावा.
आता वॉर्डात जराशी वर्दळ सुरु झाले होती. नर्सने येऊन ताप घेतला आणि हातात गोळ्या ठेऊन सांगून गेली कि आज केमोथेरपीची इंजेक्षन नाहीत म्हणून. ढमाली सिस्टर आली आणि उगीचच आरडा ओरडा केला सर्वांच्यावर. फ्रान्सिस कडे येता तिचा आवाज मृदू झाला. तिने विचारले " माझी बाय फिलोमिना खैं असा ? तिका सांग हांव तिच्या खातर केक हाडला. फ्रान्सिस तुका मेळचो नाय हां !" शरीराला मोट्ठे झोके देत ती निघून गेली.
फ्रान्सिसला लग्ना नंतरचे दिवस आठवले. फिलोमिनाच्या मोठ्ठा काळ्याभोर डोळ्यातून मोग आणि त्याच्या विषयी आगळेच कौतुंक ओसंडून जात होते. ती जशी ढगातून वावरते असे तिला पाहणाऱ्याला वाटावे इतकी ती सुखात होती. सुट्टीच्या दिवशी तो फिलोमिनाला मोटरसायकल वरून दुधसागर धबदबा पाहायला घेऊन गेला होता . खूप पाऊस पडला आणि तरीही ते पाण्यात उतरले होते. तिला पूर्ण भिजलेले पाहताना फ्रान्सिसला आपण किती लकी आहोत असे वाटले. त्या नी तेथेच तिला मिठीत घेतले होते.
फिलोमिना तर स्वर्गात होती, तिला आता पूर्ण खात्री पटली होती कि देवाने त्या दोघांना एकमेकासाठीच बनवले आहे. संद्याकाळी ती देवासमोर मेणबत्ती लावताना देवाचे खूप आभार मानायची. संध्याकाळी जेवायला बसल्यावर फ्रान्सिसने प्रेयर न करता पावाला हात लावला तर ती त्याच्या हातावर फटका द्यायची.
फ्रान्सिसला वाटले आज फेलोमिनाला जास्तच उशीर होतो आहे. चर्च मधले मास तर आतापर्यंत संपले असेल. दोन दिवसां पूर्वीच फिलोमिना म्हणाली होती कि अॅनलेक्स सुट्टीवर आला आहे म्हणून. आज चर्च मधे तिला भेटला असेल का? कोणास ठाऊक तो इतक्या लवकर मासला जाईल का नाही! फ्रान्सिसला अॅ्लेक्स आवडत असे. अगदी शाळेत असल्यापासून त्यांची दोस्ती होती. फ्रान्सिसने उशिरा शाळा सुरु केली त्यामुळे तो वर्गात सर्वांपेक्षा थोडा मोठ्ठा होता. कितीतरी वेळा अॅरलेक्सला त्याने दुष्ट पोरांन पासून वाचवले होते आणि अॅकलेक्सने भावा सारखा आपला खाण्याचा डबा फ्रान्सिस बरोबर वाटून खाल्ला होता.
या आठवणीने फ्रान्सिसचा उर भरून आला. त्याला वाटले कि त्याने अॅेलेक्स बरोबर भांडायला नको होते. आज फिलोमिना अॅभलेक्सची बायको असती तर किती सुखी असती. त्या दिवशी अॅंलेक्सने चिथवले नसते तर फ्रान्सिसचा फिलोमिनाशी बोलायचा धीरच झाला नसता. सगळे कसे व्यवस्थित झाले असते. फिलोमिना आता पर्यंत आई पण झाली असती. त्याच्या डोळ्यासमोर अॅ्लेक्स आणि फिलोमिना त्यांच्या बाळाला घेऊन त्याला भेटायला येत आहेत असे चित्र उभे राहिले. फिलोमिना किती सुंदर दिसत होती. तिच्या चेहेऱ्यावर सुखाचे तेज झळकत होते. अॅनलेक्स पण चांगलाच संतुष्ट दिसत होता आणि बाळ तर गुटगुटीत आणि फिलोमिना सारखे गोरे होते. त्याला क्षणभर हा चित्रपट पाहून आनंद झाला आणि त्याचा चेहेरा खुलला. त्याला त्याची फिलोमिना सुखी आणि हसरी दिसायला हवी होती. त्याच्या या आजारपणात न बोलताही दोघांना काय होणार हे कळून चुकलं होतं. रात्री फिलोमिनाचे दबलेले हुंदके त्याला ऐकू येत तेंव्हा तो तिला थोपटत असे. त्याच्या लक्षात आले की फिलोमिना तर पहिल्या पासून त्याच्या उदंड प्रेमात होती, पण फ्रान्सिसला आपल्या हृदयातून आणि अंतर्मनातून तिच्या वरच्या प्रेमाची खोल भावना आत्ता कळायला लागली होती. फ्रान्सिसला आता रडू कोसळलं. त्याला आता मरणाचं काही भय वाटत नव्हतं. त्याला आपण फिलोमिनाच्या प्रेमाला मुकणार याच विचारानं अतिशय दुख होत होतं आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
किती तरी महिने झाले त्या गोष्टीला. त्यांच्या फुटबॉल क्लबच्या डॉक्टरनी एका रुटीन तपासणी नंतर त्याला असिलो हॉस्पिटलात अधिक तपासण्या करायला सांगितल होतं. त्या नंतर त्यांच्या सुखानं चाललेल्या आयुष्याला मोठ्ठा झटका बसला होता.
त्यानं रडू आवरलं कारण आता फिलोमिना कधीही येण्याची शक्यता होती. तिच्या समोर आपण किती अगतिक झालो हे फ्रान्सिसला दाखवायच नव्हतं त्याला अजूनही फिलोमिनाला आपण किती डॅशिंग आहोत आणि खूप ब्रेव्ह आहोत हेच दाखवायचं होत. फ्रान्सिसला वाटलं कि आजच अॅशलेक्सशी आपण बोलावं. पुढे तो भेटेल न भेटेल. फ्रान्सिसला फिलोमिनाच्या भवितव्याची काळजी वाटत होती.
त्यानं टॉवेल वर पाणी शिंपडून तोंड पुसलं. आज फिलोमिना नव्हती त्याला पुसून काढायला. त्याला त्याचा रडवेला चेहेरा नव्हता अॅंलेक्सला दाखवायचा.
एवढ्यात फिलोमिना आली, त्याला ती दरवाज्याच्या उजेडात एका परी सारखी वाटली. आज तिने केस छान विंचरले होते, सुंदर फुलांच्या प्रिंटचा फ्रॉक होता. पावडर लावलेला चेहेरा आज ताजा तवाना दिसत होता. तिच्या गालांची गोलाई हल्ली उतरली होती पण त्यामुळे तिचे नाक अधिकच धारधार दिसत होते. फ्रान्सिसला वाटले, कोणीही तिच्या मोगान पडेल इतकी सुंदर आणि निरागस ती दिसते.
तिच्या मागून अॅचलेक्स आला. फ्रान्सिसला कळले आज का फिलोमिना इतकी सुंदर दिसते आहे. त्याच्या अंतकरणात तिच्या विषयी अचानक भावना अधिक उभारून आल्या. फिलोमिना किती कणखर आहे हे त्याला कळून चुकले होते. ती कितीही रडली असेल तरीही त्याच्या समोर तिने आपला चेहेरा नेहमी शांत ठेवला होता. त्याला कळले कि अॅललेक्स पुढे तिला अगदी काही झाले नसल्या सारखे वागायचे होते. तिला कुठलीही दया किंवा सांत्वन दुसऱ्यांकडून नको होते.
अॅललेक्सने त्याच्या कडे पाहून स्मित हास्य केले आणि म्हणाला " हाय ब्रदर. कसा आहेस? कसं वाटतंय आज?"
फ्रान्सिस म्हणाला " मी ठीक आहे अॅ लेक्स. तू कसा आहेस?"
"मी मस्त आहे. आठवड्या साठी आलो होतो डाडाची तब्येत बिघडली होती. आता बरे आहेत." अॅरलेक्स म्हणाला.
फिलोमिना म्हणाली " तुम्ही बोला, मी सिस्टरला भेटून येते."
फिलोमिना गेल्यावर फ्रान्सिस म्हणाला " अॅ लेक्स बस. तुला कळते ना माझी परिस्थिती?"
अॅललेक्स बोलला " हो रे. आत्ता बरा होशील. ट्रीटमेंट लागू पडते आहे असे फादर लोबो म्हणत होते."
"अॅनलेक्स ऐक. मी काही यातून उठत नाही. काही महिन्याचा सोबती आहे. तू मला माझ्या छोट्या भावासारखा. माझ ऐकशील? " एका श्वासात बोलून फ्रान्सिसला धाप लागली होती
"फ्रान्सिस हळू. हे घे पाणी " अॅवलेक्सने पाणी पुढे केले " अरे तुला काही होत नाही. जस्ट रिलॅक्स"
"नाही अॅसलेक्स. मला बोलू दे. हे बघ. फिलोमिनाशी लग्न करून माझी चूक झाली. ती खूप सुंदर आहे. प्रेमळ आहे, तरुण आहे. पण तिचे माझ्यावर प्रेम नाही. ती तुझ्यावर प्रेम करते. मी तुमचे लग्न होऊ द्यायला पाहिजे होते. तुला पण तिच्याशी लग्न करायचे होते नं? आता मी जगत नाही . तू तिच्याशी लग्न कर. तुम्ही एकमेकावर प्रेम करता. तुम्ही सुखी व्हाल. मी अडथळा आता राहणार नाही. करशील ना फिलोमिनाला सुखी ?" फ्रान्सिसचे डोळे करूण दिसत होते आणि त्यात अगतिकता ओथंबली होती.
त्याच्या कडे पाहून अलेक्सच्या डोळ्यात अश्रू आले "माय ब्रदर. तुला काही होत नाही. काळजी नको करूस. तुला मुंबईला हलवायची सोय करण्यासाठी मी दुबई वरून आलोय. तू ठीक होशील."
अचानक अॅालेक्सच्या भावनांचा उद्रेक झाला. तो डोळ्यात अश्रू असताना चिडून बोलला "आणि डुकरा, तुला कोणी सांगितलं कि मला फिलोमिनाशी लग्न करायचं होतं म्हणून? अरे मूर्ख माणसा एवढा चागला फुटबॉल खेळतोस आणि तुला छोटी ट्रिक समजली नाही गाढवा?" अॅमलेक्सने खुर्ची पुढे घेतली आणि म्हणाला "चार वर्ष ती तुझ्या प्रेमात तुझ्या मागं वेड्यासारखी फिरत होती पण तुला प्रेमाची ग्वाही द्यायला माझी धास्ती वाटावी?"
फ्रान्सिस आता पराभूत माणसा सारखा कोसळला होता. त्याला खूप वाईट वाटलं कि त्याने अॅरलेक्सला ओळखलंच नाही.
"हे बघ फ्रान्सिस. तू बरा होशील का नाही हे देवाच्या हाती आहे. पण तू जर म्हणशील फिलोमिनाने परत लग्न करावे तर ते देवाच्या पण हातात नाही. तिने तुझ्यावर अतोनात प्रेम केलय, करते आहे आणि करत राहील. या बाबतीत ती देवाचही ऐकणार नाही. आणि तिच्या पुढच्या भवितव्याची चिंता सोड. तिने तिची सोय आत्ताच लावून ठेवलेली आहे."
फ्रान्सिसला अॅ लेक्स्च्या शब्दांची कुबडी नको होती. त्याने फिलोमिनाचा मोघ अंतरात्म्यातून अनुभवला होता त्याचे शब्दांनी वर्णन करणे कोणालाच शक्य नव्हते.
अॅुलेक्स पुढे म्हणाला "तू जरा ठीक होऊन घरी परतलास की ती तुझ्या शाळेत म्हणजे आपल्या चर्चच्या शाळेत आई वडील नसलेल्या मुलांना शिकवणार आहे. तिने हेच पुढे करायचं ठरवलं आहे आणि फादर लोबोचा त्याला पाठींबा आहे. तेंव्हा तिची चिंता सोड." अॅालेक्स आता भावना विवश झाला होता. त्याला खुर्चीत बसवेना. तो उठून तडक बाहेर निघून गेला.
फ्रान्सिसला हुंदके आवरेनासे झाले. तो हसमसून रडू लागला. पण त्याचे मन आता शांत होत होते. त्याला नेहमीच्या ओळखीचा स्पर्श झाला. त्याने मान वर करून पहिले. फिलोमिना उभी होती. ती खूप सुंदर दिसत होती. त्याला दिसले एखाद्या एन्जेल सारखा तिच्या भोवती प्रकाश पडला आहे. तिने त्याच्याकडे बघून एक स्माईल दिले आणि ती त्याच्या पाठीवर हाताने थोपटू लागली जसे लहान मुलाला शांत करण्यासाठी थोपटतात तसे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान कथा आहे Happy परंतु अॅलेक्स हे नाव खरंच तुम्ही किती वेगवेगळे लिहिलय प्रत्येक वेळी.. उगाच रसभंग होतो अश्याने.
तेवढं फक्त करेक्ट करता का प्लिज

छान कथा आहे.
अॅखडमि हे अ‍ॅडमीट अस हव होत ना.
अॅलेक्स च ?
लेखनशैल्ली म्हणायची का याला ?

सुंदर! गोव्यात घडलेली कहाणी वाटतेय. टायपो दुरुस्ती केली तर खूप छान होईल. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

>>>>>>> फिलोमिनाचा मोघ अंतरात्म्यातून अनुभवला >>>>>> मोघ शब्दाचा अर्थ कळला नाही.
खरोखर अतिशय आशावादी सुंदर कथा आहे.