थिबा पॅलेस

Submitted by झुलेलाल on 23 September, 2019 - 01:11

गेल्या काही वर्षांत शेकडो वेळा रत्नांग्रीस जाणं झालं असेल. पण तिथला तो फेमस थिबा पॅलेस आतून पहायची कधी संधीच मिळाली नाही. जांभ्या रंगाच्या अस्सल कोकणी मातीशी नातं सांगणाऱ्या लाल भिंतींची ती ऐसपैस इमारत लांबूनच कितीतरी वेळा खुणावायची. पण थिबा पॅलेसला मुद्दाम भेट द्यावी असंही कधी सुचलं नाही. तसंही, रत्नांगिरीत आवर्जून पहायला जावं आणि ते पाहिल्यावर छान वाटावं असं समुद्रकिनाऱ्याशिवाय दुसरं काही आढळलं नव्हतंच. परवाच्या एक दिवसाच्या रत्नागिरी भेटीत मात्र, गावात थोडं भटकायचं ठरवलं. बहिणीची स्कूटर घेतली आणि बाहेर पडून थिबा पॅलेस गाठून तीन रुपये शुल्क भरून पाहून आलो.
या वास्तूला एक इतिहास आहे. कदाचित त्यामुळे असेल, पण गेटातून आत शिरताच मला ती गूढ वाटू लागली. समोरच्या विस्तीर्ण परिसरात अस्ताव्यस्त वाढलेलं गवत आणि वास्तूच्या एकाकीपणात भर घालत होतं.
आता थिबा राजाचा हा ‘महाल’ पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. तेथे एक वस्तुसंग्रहालय- म्युझियम- आहे, असे प्रवेशद्वारावरच्या फलकामुळे कळते. आत शिरताच एक व्यक्ती तीन रुपये सुट्टे घेऊन तिकीट देते, आणि ‘बघून या’ असे सांगते. मग जिन्याने वर गेलं की एका दालनात थिबा राजाच्या वापरातील एक भव्य टेबल व काही वस्तू मांडलेल्या दिसतात, आणि बाकीच्या एकदोन दालनांमध्ये, किनारपट्टीवर कुठेकुठे असलेल्या मंदिरांच्या परिसरांतील काही मोजक्याच मूर्ती मांडून ठेवलेल्या दिसतात. बऱ्याचशा मूर्ती संगमेश्वरजवळच्या कसबा या मंदिरग्रामांतून आणलेल्या असून त्या भग्नावस्थेत आहेत. त्यांची एका ओळीतील माहिती असलेली चिठ्ठी प्रत्येक मूर्तीशेजारी चिकटवलेली दिसते. अशा पंधरावीस मूर्तींचे दालन म्हणजे हे संग्रहालय!
महालाच्या बाकीच्या दालनांचा वापर नसल्याने व तेथे जाण्याचा गॅलरीतील मार्ग बांबूच्या काठ्या आडव्यातिडव्या लावून बंद केला असल्याने, बंद दरवाजाआडच्या त्या दालनांत आणखीनच एकाकी गूढ दडले असावे असे उगीचच वाटू लागते.
एकूणच या वास्तूची निगुतीने जपणूक करावी अशी काही या खात्याची इच्छा असावी असे वाटत नाही.
त्यामुळे, फेरफटक्याआधी दिलेले तीन रुपयेदेखील वसूल झाले असे वाटत नाहीच.
पाचसात मिनिटांत महालाचे बरेचसे बंद दरवाजे पाहून आपला फेरफटका पूर्ण करून बाहेर आल्यावर सहज मागे वळून पहावे...
ती वास्तू ओशाळल्यागत मान पाडून बसलेली वाटू लागते.
काही वर्षांपूर्वी याच वास्तूत मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कार्यालय होते. तेव्हा कदाचित या महालाने मरगळ झटकली असावी.
आता पुन्हा तो महाल मरगळ पांघरून बसलाय...
एकाकी! नजरकैदेत असताना थिबा राजा बसायचा, तसाच!
या वास्तूचे भविष्यही असेच गूढ, एकाकीपणातच लपेटलेले राहणार या विचाराने वाईट वाटते, आणि... ‘उगीच गेलो’ असा विचार नंतर छळत राहातो!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता या पॅलेस चे रीस्टोरेशन चे काम पूर्ण झाले आहे आणि काही खोल्या उघडल्या आहेत असे ऐकण्यात आले,

पूर्वी सुद्धा थिबा चा दरबार वगैरे खोल्या व्यवस्थित होत्या.

जानेवारीच्या सुमारास तिकडे एक कल्चरल फेस्टिवल होतो, आतून उजळलेला palace लोभसवाणा दिसतो

पॅलेस पासून थोडे पुढे एक गार्डन आहे, त्यात थिबा पॉईंट म्हणून जागा आहे, थिबा तिकडे उभा राहून तासंतास समुद्र बघत असे,
तिकडून खूप छान दृष्य दिसते

एकूणच या वास्तूची निगुतीने जपणूक करावी अशी काही या खात्याची इच्छा असावी असे वाटत नाही.>> खरे! Sad

ती वास्तू ओशाळल्यागत मान पाडून बसलेली वाटू लागते.>> तुम्ही म्हटल्यावर ५-७ वर्षापूर्वी गेलेलो ते आठवले. एकदम चपखल शब्दात तुम्ही व्यक्त केले आहे.

आता पुन्हा तो महाल मरगळ पांघरून बसलाय...
एकाकी! नजरकैदेत असताना थिबा राजा बसायचा, तसाच!>>> Sad

थिबा पॉइंट बघितला आहे. पॅलेस मात्र नाही पाहिला.

खूप खूप वर्षांपूर्वी चित्रलेखा साप्ताहिकात या थिबा राजाच्या नातीची (की पणती असेल?) माहिती आली होती. तिचं नाव टिटू की असंच काहीसं होतं. तीही रत्नागिरीतच रहायची बहुतेक. तेव्हाच ती म्हातारी होती. आता हयात नसेलही.

खूप खूप वर्षांपूर्वी चित्रलेखा साप्ताहिकात या थिबा राजाच्या नातीची (की पणती असेल?) माहिती आली >>>> हो.मीही वाचले होते. तिने बहुतेक सावंतशी लग्न केले होते.

*जानेवारीच्या सुमारास तिकडे एक कल्चरल फेस्टिवल होतो, आतून उजळलेला palace लोभसवाणा दिसतो* - एका वर्षी मीही या सोहळ्यास गेलो होतो. (अचयुत पालव यांची calligraphyची जादूई प्रात्यक्षिकं पहायला मिळाली होतीं ). पण तेंव्हांही एकाकीपणाचं सावट जाणवतच होतं या वास्तूवरचं.
* .रत्नागिरीतच रहायची बहुतेक. तेव्हाच ती म्हातारी होती* - अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याचं खूप यायचं पेपरात. त्या राजाचे व कटुंबाचे शापच तर नाही ना आतां भोवताहेत ब्रिटिशांना !

थिबा राजाबद्दल काहीही माहित नाही. >>> अमिताव घोष ह्यांची The Glass Palace ही कादंबरी थिबा राजा आणि त्याच्या कुटुंबकबिला, नोकर दास्या ह्यांच्यावर आधारीत आहे. त्याच्या लहानपणापासून रत्नागिरी पर्यन्तचा ६०-७० वर्षाचा कालावधी येतो.
कादंबरीची ऐतिहासिक सत्यता मला माहीत नाही. पण ६०% जरी सत्य असले तरी जुजबी माहितीसाठी ठीक आहे. कथा स्वरुपामुळे वाचनीय होईल.
https://en.wikipedia.org/wiki/The_Glass_Palace

गूढपणा व उदासीबद्दल जे म्हणताय ते खरे आहे . १९९२-९६ या काळात मी पॉलिटेक्निक ला असताना आम्ही रोज तिकडे जायचो . त्या वाड्यात बसून परीक्षेचा अभ्यास करणे अगदी कॉमन होते , कॉलेजची बरीचशी पोरंपोरी तिकडेच पडिक असायची . त्यावेळी पॅलेसमध्ये जाण्यावर काही बन्धने नसायची , आम्ही अगदी बिनधास्त दुसर्‍या मजल्यापर्यन्त येजा करीत असू. खरेतर पॉलिटेक्निकची इमारत व्हायच्या अगोदर कॉलेज त्या पॅलेस मध्येच भरायचे !
त्यावेळी आम्ही FM Radio वर एक प्रोजेक्ट करत होतो. आणि पॅलेसच्या दुसर्‍या मजल्यावर उंची जास्त असल्याने अ‍ॅन्टेना अ‍ॅड्जस्ट केल्यास रेडियोवर अगदी ओमान सौदी पाकिस्तान पासून ते मुंबई गोवा पुणे बेंगलोर ची एफ एम स्टेशन्स ऐकू यायची . त्याला Long Distance FM or FM DX असे म्हणतात . या प्रोजेक्ट साठी तासनतास आम्ही पॅलेसला पडिक असायचो !
पण आत जाताना सुरुवातीला एक अनामिक भीती अथवा गूढतेचे / निराशेचे सावट नक्की जाणवायचे !

>> Submitted by वावे on 23 September, 2019 - 15:29

सेम पिंच. मी असेच काहीसे लिहायला आलो होतो. खूप खूप खूप वर्षांपूर्वी मटा मध्ये लेख आला होता थिबा राजा विषयी. तेंव्हा पहिल्यांदा त्याच्याविषयी कळले. त्या लेखात एका अतिशय थकलेल्या वृद्धेचा फोटो होता व खाली लिहिले होते "थिबाचे नात टूटु" हे सुद्धा आठवते (तेंव्हा ती हयात होती).

ब्रिटिशांनी राजाला रत्नागिरीला आणल्यानंतर त्याची जी परवड सुरु झाली त्याविषयी नंतर अधून मधून वाचायला मिळत गेले. चैनविलासाची सवय असलेल्या राजाने इथे आल्यानंतर आपली जीवनशैली बदलली नाही. अखेरच्या काळात एकेक वस्तू विकून त्याने गुजराण केल्याचे वाचायला मिळते. या लेखात "एका दालनात थिबा राजाच्या वापरातील एक भव्य टेबल व काही वस्तू" असा उल्लेख आहे. बरोबर आहे. त्याने काही ठेवलेच नाही. उरलेले बरेचसे वंशजांनी विकून टाकले. थिबाच्या मुलीनी कुणा वाटेल त्याच्या बरोबर पळून जाऊन लग्ने केली. थिबाचे वंशज इतरांच्या घरी नोकराची कामे करणे गुरे राखणे अशी कामे करून उदरनिर्वाह करत होते असे उल्लेख आहेत.

रत्नागिरीला फार फार क्वचित जाणे झाले/होते. हा वाडा बघितला होता. आत काय असेल कसे असेल याची उत्सुकता होती. त्याविषयी तुम्ही लेख लिहिला व ती उत्सुकता संपली. चांगले लिहिले आहे. तिथे जाऊन आल्यासारखे वाटते. बाकी तीन रुपये तिकीट लावून शंभर वर्षानंतरही राजाची परवड अजूनही सुरूच ठेवली आहे असेच क्षणभर वाटले. स्वच्छतागृहात जायला सुद्धा आजकाल पाच-दहा रुपये घेतात. विदारक वस्तुस्थिती आहे.