काळोखाची गाणी

Submitted by मी मुक्ता.. on 10 January, 2013 - 06:17

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...

मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...

छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...

सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...

कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. Happy

सुंदर!

शेवटून दुसरा शेर तितकासा उलगडला नाही. बाकी गझल सदृश्य रचना खूपच मस्त! Happy आवडली. तुमचे लेखन वाचायला आवडेल.

कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी............
सुंदर कल्पना

मस्त!