सरस्वती - एक चिंतन

Submitted by सामो on 20 September, 2019 - 16:16


.
मिनेपोलिसचे एक मंदीर आहे. ज्यात सर्वच अमेरिकन देवळांप्रमाणे महावीर ते दत्त ते मारुती ते नवग्रह व अधे मध्ये येणाऱ्या अन्य सर्व देवॆदेवतांचॆ रेलचेल आहे. सर्व भक्तांना खूष ठेवावं लागतं शेवटी. ते एक जाउ दे. पण या देवळातील सरस्वती अतिशय सुमुखी आहे, तेजस्वी व प्रेमळ मुद्रा यांमुळे मला ती विलोभनीय वाटते. त्या देवळात अन्य कोणाही देवतेचे दर्शन घेण्याआधी मी सरस्वतीचे दर्शन घेते. आणि शेवटी परत तिच्या समोर बसून तिचे रुपडे न्याहाळते. मग घरच्यांनी घाइघाइ केली की निघावेच लागते.पण तिचे रुप साठवून मन काही भरत नाही.
.
सरस्वती-लक्ष्मी-पार्वती या तीनही देवता त्यांच्या आपापल्या परीने १००% श्रेष्ठ चा आहेत. अन्य देवता गायत्री, ललीता, शाकंभरी देवी वगैरे सुद्धा. पण मला वैयक्तिक तुलना करायची झाली तर, लक्ष्मीबद्दल, तिच्यामागे लागलेल्या लोभी भक्तगणांमुळे ममत्व नाही. तर पार्वतीची अर्थात शक्ती उपासना एकदमच वेगळा प्रांत वाटतो. मात्र सरस्वती अतिशय आवडते. पांढर्‍या शुभ्र कमळात , धूतवस्त्रे ल्यालेली व हाती वीणा, पुस्तक, कमंडलु व शुभ्र स्फ़टीकांची अक्षमाळ घेतलेली सरस्वती अतिशय सात्विक व पूर्ण चंद्रासम तेजाळलेली अशी aesthetically pleasing वाटली नाही तरच नवल.
.
कार्तिकस्वामी ही शब्दाची देवता आहे. शब्द-ब्रह्म-समुद्र असे वर्णन "प्रज्ञा-विवर्धन" स्तोत्रात येते तर गणपती ही बुद्धीची देवता आहे. शुक्र या ग्रहाकडे व सरस्वती कडे "कवित्व शक्ती" येते. पैकी सरस्वतीच्या अखत्यारीत वाणी देखील येते. माझा अनुभव तरी असा आहे की जेव्हा मनात विचार येतो तेव्हा तो "प्रतिमा" रुपात पहिल्यांदा येतो व मागोमाग त्वरीत शब्द येतात. पण पहिल्यांदा प्रतिमाच येते. उदा- पुण्याची पर्वती. पहिल्यांदा डोळ्यासमोर पर्वती येते व मग nano सेकंदात शब्द "पर्वती" हा येतो आणि मग बरोबरच अनेक प्रतिमाच प्रतिमा - मित्रमंडळ चौक, आपले सकाळचे लक्ष्मीनारायण ते मित्रमंडळ ते पर्वती रपेट घेणे अशा अनेक प्रतिमा स्फुरण पावतात. पक्ष्यांचे, प्राण्यांचेही काही संकेत असतात, बोली असते. परंतु ते अतिशय मर्यादित असतात. पण त्यांनाही मेंदूत ही प्रतिमा पहिल्यांदा येत असावी बहुतेक, माणसात अन अन्य प्राण्यात हाच फरक असावा की प्रतिमेपश्चात शब्दांचे स्फुरण होते. आणि हे जे स्फुरण होते , मेंदूत जे हे जे electrodes लावून मोजता येते ते म्हणजे सरस्वतीचे कार्यक्षेत्र असावे
.
मला जर २ सर्वात मोठ्ठ्या भीती विचारल्या तर मी सांगेन - दृष्टी जाणे व स्तोत्रे वाचण्यास मुकणे, अन दुसरी alzaimer . दोन्हींचे भीतीं चे नाते स्मृती-शब्द यांचेशी आहे. सांगायचा मुद्दा हा की सरस्वती अतिशय लाडकी देवी आहे. रामरक्षेतील एक ओळ सर्वात जास्त आवडते आणि ती आहे - "आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मिकी कोकीलम" अर्थात कवितारुपी फ़ांदीवर ती (डौलाने) विराजमान झालेल्या वाल्मिकी नामक कोकीळेस माझा प्रणाम असो. एरवी मी म्हटले असते की सरस्वतीच्या वरदहस्ताखेरीज इतकी गोड कल्पना सुचलीच नसती. पण साक्षात शंकरांनी हे स्तोत्र , पहाटे बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाउन त्यांना सांगितले असल्याने, शंकरांवरती, सरस्वतीचा वरदहस्त असावा असले विधान मला करायचे नाही.
.
उत्तम लेखकांचे अनंत प्रकार आहेत. पैकी एक आहे, ज्यात लेखक संपूर्ण वर्णनात्मक बैठक तयार करतो व अलगद आपल्याला ज्या मुद्द्या वर आणायचे त्याच्या मनात पहिल्यापासून असते त्या मुद्द्यावर आणून पोचवतो. हे म्हणजे अक्षरक्ष: झाडीझुंडपातून, पठार मैदानातून, भुलवून भुलवून , खुणावत , एखाद्या रम्य तळ्यापाशी किंवा वनराजी ने नटलेल्या दरीपर्यंत, घळी पर्यंत वाचकास घेउन जाउन अतिशय उत्कट सुंदर दृश्याचा नजारा घडविणे असे असते. लेखकांच्या लेखना मध्ये ही जी आकर्षणशक्ती असते तो सरस्वतीचा वरदहस्त असे म्हणता येईल का?
.
इथे तर अनेक कवी, लेखक आहेत. माझ्यासारखाच त्यांनाही अनुभव असेल, एखादी गोष्ट, ललित , कविता सुचत असते तेव्हा पहिल्यांदा घालमेल होते, आभाळ भरून आल्यासारखं होतं, हृदयातून फुटून एखादा झरा बाहेर येईल असे वाटते, आत्मिक Orgasm येइल असे काहीतरी वाटते . अन मग आपण कागद-पेन घेउन बसतो. ते विचार कागदावर उतरवल्यावर हायसे वाटते, हलके वाटते. अर्थात मी असे म्हणत नाही की इतके उत्कट आणि तीव्र वाटल्यामुळे कलाकृती खास, उत्तम बनते. मला फक्त मी अनुभवलेली प्रोसेस इथे सांगायची आहे. आणि या अशा inspiration ची देवी सरस्वती असावी. म्हणजे तिने कालीदासाकडे, आदि शंकराचार्यांकडे तर प्रेमळ कटाक्षच टाकला असावा की ते इतकं नवरसमय काव्य प्रसवू शकले. सामान्य लेखकांकडे देवी कसला कटाक्ष टाकतेय पण तरीही तिची कृपाच १००% असणारच त्याशिवाय सुचणारच नाही. परत अतिसुमार लेखनाच्या बढाया मारायच्या नाहीत तर मेंदू,हृदय यांनी अनुभवलेली प्रोसेस सांगायची आहे.
.
वाग्वाणी, वाड्मयी ,वागीशवल्लभा, वेदजननी, विधीप्रिया, विद्या, बुद्धिरूपा, अविद्याज्ञानसंहर्त्री, जाड्यविध्वंसनकरी अशा नाना नामांनी ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती देवीस माझा नमस्कार असो, असे बोलून या चिंतनाचा शेवट करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय. मला सर्व देवींमध्ये पार्वती माता जास्त आवडते. तिचा भगवान शंकराशी चाललेला वार्तालाप, शास्रचर्चा व शंकानिरसन करून घेणं पाहिलं की सर्वात प्रगल्भ देवी वाटते ती मला.

धन्यवाद अमर,
शुभांगी भडभडे यांची 'शिवप्रिया' नावाची कादंबरी वाचा. त्यात खूप सुरेख वर्णन आहे. की स्त्रिया आताशा पुरुषांशी स्पर्धा करु शकतात, त्यांच्या खांद्यास खांदा लावुन, समान म्हणवुन घेउ शकतात. पण तेव्हा म्हणजे पुराणात, सर्व देवी-देवतांमध्ये फक्त पार्वती चे असे रेखाटन आहे की ती तिच्या पतीसमवेत द्युत खेळते, त्यांच्याशी चर्चा करते. ही कादंबरी मी फार लहानपणी वाचली होती.