पृथ्वीचे नवे प्रेमगीत

Submitted by shriramb on 6 September, 2019 - 13:06

पृथ्वीचे नवे प्रेमगीत

युगानूयुगे पाहिली वाट त्याची
उभा जन्म फिरले तयाभोवती
प्रभा, तेज, सामर्थ्य पाहून त्याचे
भुलले अशी की न उरली मती

परंतू न ढळला जराही रवी तो
दुर्लक्षिली प्रीतिची आर्जवे
कळू लागले हे मलाही अताशा
वाट्यास माझ्या खुजे काजवे

इथे माझिया जगति माणूस झाला
शत्रूच माझा विध्वंसकारी
अंगात माझ्या निखारे निखारे
सभोवताली वायू विषारी

अता आस रे फक्त तूझी सुधांशू
तुझी शीत छाया मला भावली
युगानूयुगांच्या तुझ्या वंचनेची
मला चूक माझी खरी भोवली

हळूसा कसा तू न्याहाळशी मज
डोकावुनी अन् कलेने कलेने
मला नाहि अज्ञात तुझी प्रीत, मीही
न्हाऊन घेते तुझे चांदणे

प्रतीक्षा कराया तुझ्या उत्तराची
नेत्रात जमले जणू पंचप्राण
संदेश देण्या तुला धाडले मी
अलौकीक हे गोमटे चांद्रयान!

~श्रीराम

Group content visibility: 
Use group defaults

छान!