मी पिशाच्च बनलो होतो  

Submitted by निशिकांत on 20 September, 2019 - 00:04

( अतृप्त भटकत्या आत्म्याचे पण कांही मनोगत असते? असेलच तर ते जाणून घेण्याची योग्य वेळ म्हणजेच सध्या चालू असलेला पक्ष पंधरवाडा! बघा काय आहे मनोगत ते. )

प्रेमात आपुल्यांच्या
एवढा गुंतलो होतो !
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

आजही भटकतो आत्मा
का आसपास पोरांच्या ?
राबता सुखांचा राहो
भरभरून दारी त्यांच्या
दिसताच नात रडताना
पळभर गलबललो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

सळसळ पिंपळ पानांची
जी होती तशीच आहे
अंगणात फुलवेलींची
थरथरही जुनीच आहे
मी मेलो, काय बदलले?
प्रश्नात गुंतलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

पिंडदान करतेवेळी
कावळा शिवेना जेंव्हा
" काळजी नीट आईची
घेऊत" म्हणाले तेंव्हा
पोरांच्या विश्वासावर
पिंडाला शिवलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

श्राध्दा दिवशी माझ्या मी
पाहिले, घरी फिरताना
मोबाइल, संगणकावर
सारेच काम करताना
विसरले मला! मी माझ्या
डोळ्यातुन झरलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

अजरामर का हा आत्मा
भटकावयास जगदिशा ?
जीवना ! हारलो बाजी
ना मनात उरली ईर्षा
प्रेमाचे घेउन ओझे
मरणोत्तर फिरलो होतो
ज्या क्षणी जाहला मृत्यू
मी पिशाच्च बनलो होतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! छान लिहिले आहे.
आत्म्याचे दु:ख आणि तळमळ छान मांडलीत.
_________
फक्त पिशाच्च रक्त पितो ( त्रास देतो या अर्थी) आणि या कवितेतल्या भूताची पिडा आहे यात, त्याने घेतलेला बदला नाही. त्यामुळे तो पिशाच्च नसून (अतृप्त आत्मा) भूत आहे.
हे मा वै म