एका फूलवेलीचे मनोगत

Submitted by सामो on 19 September, 2019 - 12:58


............................................................................................................................
निबिड या व‌नी तुवा, कृपेची आस‌ म‌न्म‌ना,तुझ्या च‌र‌णी वाह‌ते हृद‌य‌सुम‌न‌ ही उमा
उघ‌डी न‌य‌न‌ श‌ंक‌रा, प्र‌स‌न्न‌ व्हावे ईश्व‌रा
च‌राच‌रात फुल‌त‌से व‌स‌ंत‌ आज‌ साजिरा.
.
त‌पोनिधी नि:स‌ंग‌ तू ज‌री असे मी जाण‌ते, त‌व‌ च‌र‌णी ईश्व‌रा धुळीचे स्थान माग‌ते
क‌ळे ज‌री म‌ला तुझी अप्राप्य‌ताही मोह‌वे
केव‌ळ‌ त‌व‌ सु-द‌र्श‌नी विर‌ह‌ तुझा साह‌वे
.
दूर‌ असुनी स‌मीप‌ तुझा भास‌ होई म‌न्म‌ना,लोच‌नात उम‌ल‌त‌ असे मूर्ती त‌व‌ ईश्व‌रा
त‌नुल‌तेस अर्पुनी , म‌नोम‌नी विनिट‌ली
लीन‌ तुझ्या शुभ‌च‌र‌णी उमा चित्त‌ र‌ंग‌ली
...........................................................................................................................

अगदी परवा परवा जरी मला कोणी सांगीतले असते की माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्याचा क्षण लवकरच येणार आहे, तर माझा विश्वास तरी बसला असता का? परंतु आता विचार करतेवेळी वाटते खरच, दैवी भाग्योत्कर्ष कधी आणि कसा होईल याचे भाकीत कोण करू शकते बरे? माझ्या पूर्वजन्मीच्या सत्कर्माचे फलच म्हणायची ती घटना. मागे वळून पाहता त्या सावळ्या, तेजस्वी वनकन्येच्या लोभस मूर्तीवरुनच मला हे आकळायला हवे होते की ती तिच्या सुकुमार पावलांनी या वनात दैवी संकेत आणि अनंत पुण्यराशी घेऊन प्रवेशली आहे. मला तो क्षण अजूनही लख्ख आठवतो ज्या क्षणी वार्‍यावर डोलता डोलता अचानक माझी नजर तिच्यावर स्थिरावली. माझे भान हरपून गेले आणि मी त्या अद्वितिय लावण्य आणि कोमलतेचे आकंठ रसपान करत राहीले. माझी समाधीच लागली म्हणा ना.शुभ्र वल्कले ल्यालेली ती कोमल वनकन्या , मला जणू माझ्या अंगावर खेळणार्‍या शुभ्र कलिकेसमान भासली. नक्कीच ऋषीकन्या नाही कारण इतकी सुकुमार मानव कन्य असणे शक्यच नाही. मग कोण असावी ही सुंदर देवता? कोणी वनदेवता अथवा गंधर्व, यक्ष अथवा नागकन्या तर नव्हे? पण आतापर्यंत मी पाहीलेल्या सर्व रुपगर्वितांचे सौंदर्य तिच्या सात्विक तेजापुढे फिकुटले होते. थोडे भानावर येताच माझ्या लक्षात आले की तिचे पाय काट्याकुट्यांनी , दगडांनी सोलवटून निघाले होते. प्रखर सूर्यतेजाने काया रापलेली कळत होती. पण एवढ्या कष्टांपुढेदेखील तिच्या मुखावर म्लानता नव्हती तर आगळेच तेज आणि निर्धार तिच्या डोळ्यात चमकत होता.

काय बरे करीत होती ती? तिने पानांच्या द्रोणात, जवळच्या नदीच्या पात्रातून जल भरुन आणले. आणि दर्भासनावर आसनस्थ होऊन, एकचित्ताने तिने मृत्तिकेच्या सुघड शिवलिंगाची स्थापना केली. काय बरे करणार ही आता, मी विचार करतच होते की ती माझ्याच दिशेने चालत आली व माझ्या अंगावरची शुभ्र फुले खुडू लागली. माझ्या फुलांचा जाडसर हार बनवून तिने तो शिवलिंगास अर्पण केला आणि ती दर्भासनावर आसनस्थ, ध्यानमग्न झाली. हा तिचा अविरत दिनक्रम होता. ध्यान तर ती अनेकानेक तासन तास करत असे. तिला ना ऊनाची पर्वा होती, ना थंडीची ना पावसापाण्याची. पहीले काही महीने ती खाली पडलेली पाने खाऊन राहात होती पण जसजसा ध्यानकालावधी वाढू लागला तसतसे तिने पडलेली पाने खाणेही सोडून दिले. मला कुतूहल वाटत असे ती इतक्या कोवळ्या वयात का बरे हा खडतर दिनक्रम आचरते आहे?
असेच दिवस जात होते, ऋतूमागून ऋतू जात होते, मी या गोष्टीनेच खूष होते की माझी बाळफुले तिच्या कामी येत आहेत. ती कधीकधी तिचे गूज मला सांगत असे.

आणि तो दिवस उजाडला जेव्हा ती पहाटेपासूनच विशेष आनंदी दिसत होती. आज ती नेहमीपेक्षा लवकरच ऊठली होती माझ्याजवळ येऊन ती म्हणाली "सखे, लते आज न जाणो मन का हुरहुरते आहे. आज मी सूर्योदयापूर्वीच ध्यानस्थ होईन म्हणते." मी देखील वार्‍यावर डोलून तिला माझा होकार कळवला. दुपारी कोण जाणे कुठुनसा पण ध्यानमग्न असताना एक देखणा, तेजस्वी विप्र तेथे प्रकटला. काय आश्चर्य कधीही कोणत्याही व्यत्ययाने विचलित न होणार्‍या तिचा त्याच्या नजरेने ध्यानभंग झाला. विप्र रोखून पहातो आहे हे जाणवून क्रोधाने किंचीत आरक्त होत ती ऊभी राहीली. विप्र, त्याची रोखलेली नजर न ढळू देता तिस विचारता झाला , "हे वनकन्ये तू कोणत्या उद्देशाने इतके प्रखर तप आचरीत आहेस? तुझी काया रापली आहे, हातास पडलेले घट्टे दृषमान आहेत, तू अतिरिक्त कृष झाली आहेस. अशी काय गोष्ट आहे या त्रैलोक्यात जिच्या ध्यासाने तू स्वतःची ही अवस्था करुन घेतली आहेस?" विप्रास नमस्कार करत ती उत्तरली, "हे अतिथी, आपण विचारले म्हणून सांगते. त्रैलोक्याचे नाथ , देवाधिदेव महादेव माझे नाथ व्हावेत या एकमेव संकल्पाने मी हे तप आचरीत आहे आणि मी आहे त्या स्थितीत अतिशय समाधानी आहे. आपण व्यर्थ चिंता करु नये." तिच्या या संयमित पण किंचीत रोषपूर्ण भाषणावर , मिष्कील हसत तो विप्र विचारता झाला "त्या बैराग्याकरता तू हे तप आचरीत आहेस? तो जो स्मशानवासी आहे, भूत-पिशाच्च ज्याचे गण आहेत, हत्तीचे जाड कातडे पांघरून जो अंगाला भस्म फासतो तर कधी क्षणात कोपायमान होऊन तांडवनृत्य करतो त्या भणंग जोग्याला वरण्यासाठी तू हे कष्ट उपसत आहेस? तू मनात आणले तर तुला इंद्रच काय प्रत्यक्ष नारायणाची प्राप्ती होऊ शकते मग हे कोमलांगे हे काय भलतेच तू मनात भरून घेतले आहेस? तुझे चित्त तर थार्‍याव आहे?"
विप्राच्या शब्दाशब्दागणीक क्रोधाने आरक्त होत चाललेली ती वनकन्या थरथर कापू लागली. तीक्ष्ण, कोपायमान कटाक्ष विप्रावर टाकून ती उद्गारली, "सर्व जगाचे स्वामी शंकर यांची महती तुझ्यासारख्या कपाळकरंट्याला ती काय कळणार? ज्यांच्या निवासस्थानी सर्व सिद्धी फेरा धरून नाचतात, ज्यांच्या तपोबलाने प्रत्यक्ष इंद्राचे आसन डळमळीत होते. स्वतः विरागी असूनही भक्तांना ऐश्वर्य देण्यास जे समर्थ आहेत त्यांचे महत्त्व मी तुला काय पटवणार आणि तुझ्यासारख्या मूढाला ते काय कळणार? तुझ्यापुढे महादेवांची स्तुती करणे म्हणजे अरण्यरुदनच आहे तेव्हा तू येथून निघून जावे हे उत्तम. अन्यथा माझ्या तोंडून आत्ताच्या आत्ता शापवाणी ....."

वनकन्या हे शब्द उच्चारत असतानाच काय आश्चर्य! विप्र अदृष्य झाला आनि त्याजागी त्रिनेत्रधारी, कोटीसूर्य प्रकाशमान ज्यांचे तेज आहे ते शिवशंकर प्रत्यक्ष प्रकटले. सस्मित मुखाने, मिष्कीलपणे पहात त्यांनी वनकन्येला प्रतिप्रश्न केला "बोल ऊमा थांबलीस का? शापवाणी उच्चारणार होतीस ना?" अन पहाता पहाता क्रोधायमान वनकन्येच्या चेहर्‍यावरील भाव प्रथम अविश्वास, नंतर आनंद व अंती लज्जा यामध्ये परावर्तित झाले. सलज्जा , अधोमुखा तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, तिच्या नेत्रांतून घळघळा अश्रू वाहू लागले, शरीरास सूक्ष्म कंप सुटला, गालांवर ऊषेची लालीमा पसरली.

मी त्याक्षणी धन्य धन्य झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॐ नमः शिवाय
पार्वतीपते हर हर महादेव
सुंदर लेखन
___/\___

सुरेख लिहिल आहे.
ऋतुराज म्हणतो तस प्रसंग किती वाचला तरी पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतो.

छान Happy

ही कविता ऐसीवरती कोणीतरी टाकली होती. ती मी उतरवुन घेतली. अतिशय मस्त आहे, व्याकरण मुद्दम जसेच्या तसे म्हणजे जुने ठेवले आहे.
________
प्रभाकर.
हा कवि शके १६९१ मध्ये जन्मला व १७६५ त वारला. याच्या वडिलांचे नाव जनार्दनपंत असून आडनाव दातार होते. हा हर्णई-मुरुडचा रहाणारा. याने लावण्या, पवाडे वगैरे रचिले आहेत.

लावणी; लक्ष्मी-पार्वती-संवाद (हा विनोद पर आहे)

लक्षुमी गर्वे निंदा बोलुनी झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुष्जार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||०||
स्मशान-वासी भुषण-भयंकर पिंगट मुकुटीं जटा||
भाळ-चंद्र ज्या तीन नेत्र भस्माचा कपाळीं पटा||
व्याघ्रांबर गज-चर्मांबर परि-धान शुद्ध कानफटा||
रुंड-माळा ती कंठी कुंडले भुजंग रुळती कटा||
त्रि-शूळ पाणि त्रि-पुंड्र भाळि लोह-कंकण मनगटा||
नंदी-वहन सर्पाचा सदोदित करि कमरे लंगुटा||
कसा आवडतो शं-कर गीरि-जे सांग तुला मजप्रती||
लक्ष जन्मीचे पातक म्हणवुनि पडलिस ऐशा हती||१||

भोळा माझा सांब ल्क्षुमी उगाच निंदूं नका||
अनाद्यंत ज्या अ-गम्य सुख ते अ-लभ्य ब्रह्मादिका||
सोळा सहस्र शत एक मुख्य तुम्हि आठ जणी नायिका||
कार्य-वादु तो कृष्ण कसा करि पूर्ण मनो-रथ सखा||
वक्रदंत शिशुपाळ कंसही कपटें मर्दुनि बका||
प्र-ताप बहु वर्णिता कशा भाळल्यात गो-रक्षका||
जरासंध-रिपु-भये वसवलीजळात द्वारावती||
तस्करास कसा श्वशूर जडला हा भीमक भू-पती||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||२||

भूप पिशाचे यक्ष ब्रह्म-राक्षस हे ज्याचे दुत||
श्वान सभोते मिळवुनि संगें फिरे भीक मागत||
भुंभुं वाजवी शंख मुखाने चिता-भस्म लावि नित||
शूर्प-कर्ण षण्मुख जयाचे नवल-परीचे सुत||
मना गने तिथे निद्रा करितो जिवंत पहाता भुत||
हिमालयाचे थोर असे असे प्रारब्ध पाहुन वि-स्मित||
धन्य तुझी पार्वती अशाची राखितसे चित-वृती||
दैव-दशा भर्तार तामसी कठीण ते तव गती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||३||

अनंत घेतो जन्म तुझा पति क्षीर-समद्रामधी||
शेषावर निद्रिस्त नाभिवर चार मुखांचा विधी||
वहन विहंगम दिले सु-दर्शन कळुन शंकरे अधीं||
सुरासुरी तुजसाठी मथिला पराक्रमे जल-निधी||
इच्चा करिती प्राणीमात्र तूं चंचळ नाहिंस सु-धी१||
शंख सहोदर२ तुझा लक्षुमी श्रीमंत झालीस कधीं||
कृपा-निधी हा सांब वसे अर्धांगि मी त्याची सती||
लिला तयाची वि-चित्र भासे विदीत सर्वांप्रती||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||४||

तप-सामर्थ्ये करुनि शिवाल अभस्मासुरें जिंकिले||
धरुनि तुला पार्वती त्वरेने स्कंधावर वाहिलें||
लपू लागला सांब तेव्हा मम पतीस पाचारिले||
मोहिनी-रुप प्रत्यक्ष धरुनी त्या राक्षसास मारिले||
गजेंद्र करिता धावा नक्रासह त्या उद्धरिले||
सुधन्व्यास तैलामधि तळता तैल थंड३ जाहले||
अशी घालितो उडी संकटी बघ माझा श्रीपती||
कोमलांग राजीव-नेत्र नव्हे शिवासारखा जती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||५||

नको सांगू बडिवार रिकामा लक्षुमि नाना-परी||
नंदाची गो-धने चारिली कुंजवनाभीतरी||
गवळ्याचे उच्चिष्ठ भक्षिलें नव्हे निर्मळ श्री-हरी||
श्याम-वर्ण सर्वांग, खोंवितो मयूर-पिच्छें शिरीं||
नवनित-चोरे कसे मर्दन केलें दैत्याचे तरी||
लग्न लाविले बसुन रिसा४शीं, कुब्जा होती दुती||
किती एकक गुण सांगूं ऐकतां दु:खित होशिल चितीं||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||६||

अनंत कोटि ब्रह्मांड निर्मिता जगांत जग-वेगळा||
चार वेद सा शास्त्रे धुंडिता कुंतठीत झाल्या कळा||
निराकार निर्गुण स-गुण मी पाहुनि पडले गळां||
जन्मोजन्मी हा असो पती मज घन-श्याम सावळा||
परम सु-शील निष्कलंक वनिं उद्धरलि अहल्या शिळा||
नाम-स्मरणे शीतळ झाला सांब-देह सागळा||
मुगुट-मणी वैकुंठ पीठ ज्या अ-मर सदा वंदिती||
प्राप्त व्हावे हे चरण म्हणुनि किती समाधि-स्थ बैसती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||७||

ताड-पत्र श्रूंगार म्हनुनि छलीले जरी-शंकरा||
प्रसन्न झाला महेश समजावी घेउनि करा||
शृंगाराचे पर्वत पदले अ-मोल एकक हिरा||
कुबेराची संपदा तुळेना अहा रे विश्वेश्वरा||
एक-रुप शिव विष्णू लक्ष्मी गौरी एक स्मरा||
लय लावुनि एकाग्र भजावें मृत्यं-जय-श्री-धरा||
लक्ष्मी-पार्वतीचा सं-वाद ऐसा गोड हा खरा||
भक्तिपुरस्सर जपुनि करावे प्रसन्न नित हरि-हरा||८||

१ सरळ स्वभावाची
२. देवांनी समुद्राचे मंथन करुन १४ रत्ने काढीली. त्यापैकी 'लक्ष्मी' व 'शंख' ही आहेत. म्हणुन शंखाला तिचा सहोदर म्हणजे सख्खा भाऊ म्हटले आहे. (चौदा रत्ने - लक्ष्मी, कौस्तुभ,पारिजातक,सुरा,धन्वंतरी,चंद्रमा,कामधेनु,ऐरावत,अप्सरा,सप्तमुखी अश्व,विष,हरिधनु,शंख आणि अमृत)
३.धर्माने अश्वमेधानिमित्त सोडलेला वारु हंसध्वज राजा (सुधन्व्याचा बाप) ह्याने धरिला, व त्याच्या संरक्षणार्थ आलेल्या पांडव सैन्याशी लढावयाकरितां आपल्या सर्व लोकांस (कोणी आड्न्याभंग केल्यास कढत तेलात त्यास तळूं असे भय घालून,) ताकीद दिली. तथापि त्याचा मुलगा सुधन्वा हा लढावयास आला नाही ह्यामुळे राजाने त्यासतापलेल्या तेलात टाकिले, तेव्हा तो मुलगा परम कृष्णभक्त होता, म्हणुन ते तेल थंड झाले अशी कथा आहे.
४.जाम्बवान नावाच्या अस्वलाची जांबवंती कन्या कृष्णाने वरिली; त्या गोष्टीस अनुलक्षुन लिहीले आहे.

पार्वती वेची बिल्वदळें
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळें
.
धुके तरळते धूसर धूसर
भस्ममाखले दिसे चराचर
उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे
.
फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्‍न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे
- गदिमा