पुनर्भेट

Submitted by Ravi Shenolikar on 17 September, 2019 - 10:54

त्या लग्नसोहळ्यात गेल्यापासून सारंगची नजर भिरभिरत होती. त्याला माहित होते की संगीता या लग्नाला नक्की येईल. काॅलेज ग्रूप मधल्या एका मित्राच्या मुलीचे लग्न होते. संगीता ह्या ग्रूपमधे सक्रीय आहे हे त्याला माहित होते. ग्रूपच्या एकदोनदा भेटीगाठी, संमेलन वगैरे झाले होते. पण तेव्हा तो जाऊ शकला नव्हता. पण आजच्या ह्या सोहळ्यात तिची भेट होणे जवळजवळ नक्की होते. आणि अचानक ती त्याच्या समोर आली. अठ्ठावीस वर्षांनंतर. एकेकाळच्या अनुपम सौंदर्याच्या खाणाखुणा अजुनही तिच्या चेहर्‍यावर दिसत होत्या. तेच सुंदर, भावपूर्ण डोळे. तेच लोभस हास्य. तीच खळाळती ऊर्जा व आत्मविश्वास.
"हाय संगीता. काय म्हणतेस? कशी आहेस?"
"मजेत. तू कसा आहेस सारंग? किती वर्षांनी भेटलास!"
" हो ना. मी पण मजेत आहे."
"एकटाच आला आहेस का?"
"हो. तुझं काय?"
"मीही एकटीच आलिये."
पूर्वी त्यांचे संभाषण प्रवाही, न संपणारे असायचे. पण इतक्या वर्षांनी भेटल्यावर काय बोलावे ते दोघांनाही सुचेना. मग एकमेकांची थोडी वास्तपुस्त, जुजबी चौकशी करून ते दोघे इतर लोकांमध्ये मिसळले.
सारंगला काॅलेजचे दिवस आठवले. वार्षिक संमेलनात होणार्‍या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती व मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला फार वेळ लागला नाही. मग ते एकत्र फिरणे, एकत्र स्वप्ने बघणे, कँटीन मध्ये तासनतास बसून गप्पा मारणे, बसमधून एकत्र जाणे. लवकरच काॅलेजात त्यांच्या जोडीला सगळे गृहितच धरू लागले होते. सर्व मुलामुलींमध्ये व प्राध्यापकांतही ते चर्चेचा विषय झाले होते.
पण संगीता एक महत्वाकांक्षी मुलगी होती. तिचे आयुष्यातले ध्येय स्पष्ट होते व ते मिळवण्याचा आत्मविश्वास तिच्यात होता. त्यासाठी कितीही मेहनत करायची तिच्यात क्षमता होती. सारंग हा आकर्षक व्यक्तीमत्वाचा उमदा तरूण होता. सरळ स्वभाव व बिनधास्त वृत्तीच्या सारंगला तसं काही ठराविक इप्सित साध्य करायची फिकीर नव्हती. त्याला कलेची आवड होती, क्रिकेटवर प्रेम होते. चित्रपट पाहणे, काॅलेजच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेणे अशा अनेक गोष्टींमध्ये त्याचा सहभाग असे. आला दिवस तो समरसून व मजेत घालवत असे. त्याच्या ह्या वृत्तीचाच संगीताला राग येई. परोपरीने ती त्याला त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगत असे. पण सारंगचा तो स्वभावधर्मच नव्हता त्याला तो तरी काय करणार! ह्यावरून मग त्यांच्यात खटके उडू लागले. मग पॅच अप, पुन्हा खटके, पुन्हा पॅच अप असे काही दिवस चालले. संगीताचे म्हणणे सारंगला कळत होते पण वळत नव्हते. एकमार्गी राहण्याचा, वागण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. पण तो त्याचा पिंड नव्हता. आयुष्यातील अनेक गोष्टी त्याला आकर्षित करत. त्याचे कुतुहल त्याला कधी स्वस्थ बसू देत नसे. एकाच गोष्टीच्या पाठी जाणे त्याला काही जमत नसे.
संगीताला कळून चुकले की सारंग बदलणार नाही. ध्येयाचा एकमार्गी पाठपुरावा करणे त्याच्या स्वभावात बसत नाही. अखेर संगीताने हे प्रकरण संपवण्याचा निर्णय घेतला व सारंगला तसे स्पष्ट सांगितले. दोघांना ही गोष्ट पचवणे जड गेले. कारण दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम होते. त्यात मित्र, मैत्रिणींकडून विचारणा, अनाहुत सल्ले हे सर्व सहन करावे लागले ते वेगळे.
काही दिवसातच संगीताचे लग्न एका उच्चशिक्षित श्रीमंत मुलाशी जमल्याचे सारंगला समजले. एक दिवस हे होणारच होते. तरीही सारंगला ह्या गोष्टीचा मनस्ताप झाल्याशिवाय राहिला नाही. सारंग तिच्या लग्नाला उपस्थित राहिला. नवीन दांपत्याला भेटतात तसा तो तिला भेटला व तिचे अभिनंदन केले. क्षणभरच दोघांची नजरभेट झाली आणि दोघांनी नजर दुसरीकडे वळवली. सारंग फार वेळ न थांबता लगेच निघून गेला.
सारंगही त्याच्या कुवतीनुसार आयुष्यात प्रगती करत गेला व यथावकाश लग्न करून आपल्या संसारात गुंतून गेला. सारंग व संगीता दोघे आपापल्या संसारात स्थिरावले. दोघांच्या मनातील सल काळानुसार विझून गेला.
पण ह्या गोष्टी पूर्णपणे विसरणे शक्य असते का? आज ह्या भेटीमुळे दोघांच्या दबलेल्या भावना उफाळून वर आल्या होत्या. जुन्या स्मृती जाग्या झाल्या होत्या. मधला काळ जणू काही गायब झाला होता. जे मतभेद त्याकाळी महत्वाचे वाटले होते ते आज क्षुल्लक व पोरकट वाटत होते. मात्र ती अनेक वर्षांपूर्वीची प्रेमभावना....तिला काळ बोथट करू शकला नव्हता. ती आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत होती. पण आज शांत वाटत होते. पूर्वीची बेचैनी जाणवत नव्हती. परिस्थितीचा स्वीकार दोघांनी केला होता. प्रेमात निस्वार्थीपणा आला होता. आसक्ती नाहिशी झाली होती व फक्त निरपेक्ष प्रेमाची ओल मागे राहिली होती.
सारंग समाधानाने स्वत:शीच हसला. थोडा वेळ थांबून तो हाॅलमधून बाहेर पडला. जेवढा वेळ तो तिथे होता तेवढा वेळ त्याची नजर संगीताला व संगीताची नजर त्याला शोधत राहिली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users