© मना घडवी संस्कार

Submitted by onlynit26 on 10 September, 2019 - 02:42

रात्री आठ वाजता जेव्हा मानसी घरी आली तेव्हा अशोक बेडरूममध्ये कण्हत होता. मानस त्याच्या पायशी बसून होता.
" खूप त्रास होतोय काय रे?" अशोकच्या डोकं आणि पोटाला आळीपाळीने हात लावत मानसी म्हणाली.
" आताच डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतली आहेत, वाटेल बरं."
" ममा बाबांना मी पेज पण भरवली." चिमुकला मानस आपल्या बोबड्या शब्दात असे म्हणाल्यावर अशोक आणि मानसीने कौतुकभऱ्या नजरेने त्याच्या कडे पाहिले.
" हो रे माझ्या सोन्या. " अस बोलत मानसीने त्याच्या गालावर ओली पप्पी दिली.
त्याबरोबर तो खूपच खूश झाला. त्याला ओली पप्पी खूप आवडायची.
" बरं, तू आता आराम कर, संगिताने किचनमध्ये कितपत आवरले ते बघते." अशोकच्या डोक्यावरून हात फिरवत मानसी म्हणाली. मानसने पण आपला चिमुकला हात तसाच बाबांच्या चेहऱ्यावर फिरवत गोड हसला.
मानसी आणि अशोक त्याच्या या कृतीकडे पाहतच राहिले. अशोकला त्याला जवळ घ्यावेसे वाटले. पण त्याला व्हायरल इन्फेक्शन व्हायला नको म्हणून स्वताला रोखले.
" मानस चल आपण बाहेर जाऊ." मानसी मानसचा हात पकडत म्हणाली.
" मी बाबांकडे बसतो ना थोडावेळ." मानस हट्ट करत होता.
" नको ना मना, बाबांना आराम करू दे म्हणजे ते लवकर बरे होतील आणि तुला ओली पप्पी मिळेल आणि फिरायला देखील जायला मिळेल." असे मानसी बोलल्यावर त्याला पटले असावे. मायलेक बेडरूममधून बाहेर पडले.

मानसी किचनमध्ये आली तेव्हा संगिता रात्रीचे जेवण करून सगळे आवरून गेली होती. तिला हायसे वाटले. कधी कधी संगिताला सगळे आवरायला जमत नसायचे. तिच्या घरी लहान बाळ असल्याने मानसीला पण काही हरकत नसायची. पण आज मात्र तिने सगळे काम संपवले होते.

मानसी बाहेर येऊन बसली. तिला मानसच्या वागण्याचे कौतुक आणि आश्चर्य देखील वाटले. या आधी तो सांगितलेले अजिबात ऐकायचा नसायचा. पण शेजारच्या देसाई काकांनी अशोक आणि मानसीला दिलेल्या कानमंत्राने काम करायला सुरुवात केली होती. अशोक खूप दिवसांनी एवढा आजारी पडला होता आणि त्याला चिंता त्या देवघरातील देवांची होती. आजारपणामुळे दोन दिवस हॉस्पिटलमध्ये गेले. त्यामुळे त्याला सलग दोन देवपूजा करता आली नव्हती. देवपूजेबाबतीत तो खूप काटेकोर होता. एकवेळ सगळे चुकेल पण त्याची नित्यपूजा चूकत नव्हती. याउलट मानसीचा स्वभाव जवळपास नास्तिकतेकडे झुकणारा पण ती मानसपूजेला मानायची.

मानस आणि मानसीचे जेवण आटोपले. सगळे आवरून झाल्यावर ती दोघे झोपण्यासाठी बेडरूममध्ये आले. अशोकला खूप घाम आला होता. तिने तो पुसला. त्यातच तो जागा झाला.
" मानसी उद्या गुरूपौर्णिमा आहे . "
" हं " तिने अंथरूण घालत हूंकार भरला.
" मला लवकर उठव."
" अशोक प्लीज तुझ्यात अजिबात त्राण नाहीये आणि तुला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे ना? एकवर्षी गुरूपौर्णिमेची पूजा चुकली तर काही होणार नाही. तुझ्या देवाला सगळे समजते ना?"
यावर अशोक काही बोलला नाही. उगाच शब्दाला शब्द वाढेल आणि भांडण होईल. हल्ली त्यांनी मानस समोर असताना वादावादी करणे सोडले होते.

रात्री उशिरा अशोकच्या कण्हण्याने मानसीला जाग आली. तो जागाच होता. त्याने खूणेनेच पाणी मागितले. त्याचा घसा सुकला होता. तिने त्याला पाणी दिले. अंगावर पांघरूण घालत त्याला थोपटत राहीली. तो तळमळत होता तोपर्यंत ती जागी होती. पहाटे उशीरा त्याचा डोळा लागला. तशी ती खाली येऊन झोपली.

सकाळी सातच्या सुमारास मानसीला जाग आली. शेजारी झोपलेला मानस तिथे नव्हता. एवढ्या सकाळी उठून हा कुठे गेला असेल. तिने हाक मारली. त्याचा ओ काही आला नाही. तिने बाथरूममध्ये पाहिले तिथेही तो नव्हता. ती हॉलमध्ये आली तेव्हा मुख्य दरवाजा उघडा दिसला. ती हाक मारत आता बाहेर आली. पण लगेच अशोकला उठवायला आत आली. खरंतर त्याला उठवायला तिला जीवावर आले पण नाईलाज होता.
" अशोक उठ, आपला मानस कुठे दिसत नाहीये."
" आं, काय बोलतेस." तो अंगात त्राण नसताना पण डोळे चोळत उठला.
दोघे बाहेर आले. मानसी देसाई काकांकडे गेली. अशोक हळूहळू उतरत खाली गेला.
" मानसी बेटा घाबरू नको, कुठे जाणार नाही मानस. आपण सी.सी. टिव्ही फुटेज तपासू."
मानसी पुरती घाबरून गेली होती. अशोकही मनातून हादरला होता.
देसाई काकानी सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन सी सी टि व्ही फुटेज तपासायला घेतले. सोबत अशोक आणि मानसी पण होते. सकाळी सहाच्या सुमारास मानस एकटाच बाहेर पडताना दिसला. सोसायटीच्या बी विंग प्रवेशदरवाज्यातून तो समोरील गार्डनमध्ये गेला आणि काहीवेळाने परत तो बिल्डिंगमध्ये जाताना दिसला. त्यानंतर तो बाहेर आलाच नाही.
" अशोक चला वर, मानस वरतीच कुठेतरी आहे." देसाई काकांच्या शब्दानी दोघांना धीर आला.
ते दुसऱ्या मजल्यावर आले तेव्हा देसाई काकूनी तोंडावर बोट ठेवत चूप राहायला सांगितले. कोणालाच काही कळेना.
घरात आल्यावर त्यांनी देवघरात डोकवायला सांगितले.
सगळेजण देवघरात पाहतात तर मानस देवपूजा करण्यात गुंतला होता. सगळे देव त्याने एका भांड्यात काढले होते आणि त्यांना पाण्याने साफ करत होता. बागेतील चार पाच ताजी फुले त्याने एका बाजूला ठेवली होती. तेलकट निरंजन तसेच धुतल्यामुळे त्यातली वात भिजली होती. देव्हाऱ्यात जिकडे तिकडे पाणी पडले होते.
" मानस "
मागून आवाज आल्यावर तो दचकला. तो काहीच बोलला नाही. तो उठून उभा राहीला. त्या एकंदरीत अवतारावरून त्याने स्वताच आंघोळ केलेली दिसली. कानात साबण तसाच होता.
देसाई काकूनी मानसने घातलेला पूजाघाट आवरायला घेतला.
मानसीला मानसचा राग आला होता.
" मानस, मी एवढी हाका मारत होते तर ओ द्यायला काय झालं?" मानस अशोकला बिलगला होता आणि रडू लागला.
" बाबा कुठे पूजा करताना बोलतात?"
त्याच्या एका वाक्याने सारेच गार झाले.
" मानसी आणि अशोक तुमच्या लक्षात येतंय का काही ?"
" काय काका?" ते दोघे एकसुरात म्हणाले.
" मी दिलेला कानमंत्र कामी येतोय, मूलं सांगून ऐकत नसतात. त्यांचे वागणे अनुकरणीय असते. आज त्याने गोंधळ घातला, पण त्याला करावेसे तर वाटले. ही तर सुरुवात आहे. मुलं स्वताहून काही करत असतील त्यावेळी फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज असते "
" खरं आहे काका, खरंतर माझेच चुकले. मी देवघराकडे लक्ष दिले नाही . शिवाय आमच्या देवघराचे दार बंद असते आणि या गुलामाने पण दार बंद ठेऊनच पूजाघाट घातला." मानसचे गाल ओढत मानसी म्हणानी.
" ममा, मला पूजा करू दे ना."
" मना थांब थोडावेळ, मला घरातील कचरा काढू दे, त्यानंतर देसाई काकू सांगतील तशीच पूजा करायची.
" हो ममा."
" अशोक तुला खरा वारसदार मिळाला बघ. फक्त मी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेव. मुलांसमोर आपले वागने नीट राहूदे. मुलं सांगून ऐकत नाहीत तर त्यांचा अनुकरण करण्यावर भर असतो. तुम्ही संस्कारी बना मुलं आपोआप संस्कारी होतील." देसाई काका म्हणाले.

अशोक मनोमन सुखावला होता. तो 'मना' कडे एक संस्कारक्षम मुलगा म्हणून पाहायला लागला.
इतक्यात दुरवर ' मना घडवी संस्कार ' हे गाणे ऐकायला येत होते..

समाप्त...

सदर लघुकथा सकाळ - पुणे Today या वर्तमानपत्रात दिनांक ०१.०९.२०१९ रोजी प्रकाशित झालेली आहे .

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - डोंबिवली (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
२४.०७.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults