उदास राणीची कथा - चिनी लोककथेचा स्वैर अनुवाद

Submitted by रमणी on 31 August, 2019 - 12:02

सगळ्या गोष्टींत असतो तसा याही गोष्टीत एक अगदी तेजस्वी राजपुत्र होता. सगळ्या गोष्टींप्रमाणे त्याच्याकडे जगाच्या पाठीवरची सगळी सुखं हात जोडून उभी होती, अवगुण म्हणून नावाला नव्हता. आं? काय म्हणालात? हो बरोब्बर. एक सुगंधी दुःख हवंच की उराशी. होतं. त्याला मनपसंत राजकन्या मिळाली नव्हती जी त्याच्या हृदयकमलावर नेहमी विराजमान राहील, जी त्याची पट्टराणी बनून त्याच्या ऐश्वर्यसंपन्न प्रसादाची शोभा वाढवेल, जिच्याभोवती तो नेहमीच रुंजी घालू शकेल आणि आपल्या अंतरीच्या अपार प्रेमाला व्यक्त करू शकेल.

शेवटी राजाच व्हायचा तो. किती दिवस असं दुःख उरी बाळगेल? एक दिवस तो निघालाच, आपल्या पट्टरणीच्या शोधमोहिमेवर. सगळा फौजफाटा, जामानिमा, ताकदवान घोडे अश्या आपल्या शक्तीच्या नी ऐश्वर्याच्या साक्ष देणाऱ्या सगळ्या गोष्टी समवेत घेऊन तो आपलं सुगंधी शल्य मिटवायला निघाला.

तो कित्येक महिने सगळ्या राज्यांतून, देशांतून, स्वर्गामधून, पाताळमधून फिरत राहिला. कित्येक सुंदरींनी त्याच्यावर मोहित होऊन त्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला, कित्येक रुपगर्वितांना तो भेटला. पण छे! त्यांत त्याची मनमोहिनी नव्हतीच कुठेही.

आपली सखी, जोडीदारीण कुठे नाहीच की काय अश्या शंकेने व्याकुळ, निराशेने ग्रस्त असा तो एका अंधाऱ्या सायंकाळी नदीच्या विशाल पात्रासमोर उदास पीओनीच्या झुडुपाकडे बघत होता. तोच, एक युवती धीरगंभीर पावले टाकत जवळच्याच स्तब्ध चिनार वृक्षाआडून नदीच्या दिशेने गेली. एका नावड्याला तिने हस्तविक्षेपाने बोलाविले. त्याच्याशी काहीतरी बोलली आणि नावड्याने होकार भरल्यासारखं केलं. ती गजगामीनी नावेत बसली आणि नावाडी नाव वल्हवून पैलतीरावर घेऊन जाऊ लागला.

इकडे उदास राजकुमाराच्या वठत चाललेल्या मनावर चैत्रपालवी फुटली. हीच! हो हीच ती माझ्या हृदयकमळाची विलसिनी. हिलाच तर शोधतोय, इतकं अनुपम सौंदर्य, त्याला गूढ गंभीरतेचं अस्तर...हीच माझ्या मनातली मूर्ती.

त्याने शिपायांना पुकारलं, चटकन आपली नौका काढून दहा नाविकांना ती जलद वल्हविण्याची आज्ञा दिली. आणि त्या पद्माक्षीचे पैलतीरावर आगमन होण्यापूर्वी तिच्या स्वागतासाठी ऐटीत उभा राहिला. ती पोहोचल्यावर तिला स्वहस्ते आधार देत उतरवून घेतले. मग आपल्या हृदयीची चैत्रपालवी तिला समजावी म्हणून म्हणाला," मी चीन देशाचा शक्तिशाली राजपुत्र, देशोदेशी माझी पट्टराणी बनण्यायोग्य सुंदरी शोधत हिंडतो आहे. तुला पाहूनच माझ्या मनाने ग्वाही दिली, की ती तूच आहेस. जर तुला इकडे बांधून घालणारा काही पाश नसेल, तर हे रूपवती, माझ्यासवे माझ्या महाली येशील का? माझी होशील का?"

ती युवती किंचित, भांबावली, क्षणभर थबकली आणि उत्तरली," तर, मी कोण आहे, माझे नाव काय हे सगळे न जाणताच तुला माझ्याशी लग्न करायचे आहे?"

"हे रुपगर्विते, मी तुझ्यावर पुरता भाळलो आहे, तुझ्या अनुपम सौंदर्याने संमोहित झालो आहे. मी तुलाच शोधत होतो ह्याची ग्वाही मला माझ्या अंतर्मनाने दिली आहे. मला आता तुझा होकार हवा. मी तुला जगातली सर्व सुखे अर्पिन. माझ्या तुजवरील प्रेमारुपी सूर्याचा कधी अस्त होणार नाही. केवळ तुझ्याच प्रेमपाशात स्वतःला बांधून घेण्याचे हे मी वचन देत आहे. एकदा नव्हे, त्रिवार!"

आता मात्र त्या युवतीने एक उसासा टाकला आणि डोळे खाली झुकवून मान डोलावली. ह्या मुद्रेत तिचा होकार समजुन आल्याने त्या संधीकाली राजपुत्राचा आनंद त्या नदीकाठी दुथडी भरून वहात होता.

परतीच्या लांबच लांब प्रवासात तो त्याच्या वाङदत्त वधुशी बरंच काही बोलत होता, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याच्या आदर्श राज्यपद्धतीविषयी, त्याच्या राजघराण्याविषयी बरीच माहिती सांगत होता. तीही सगळं ऐकत होती. तिने स्वतःविषयी केवळ एवढेच सांगितले की, ती खूप दुरून आली आहे अन तिने फार मोठा प्रवास केला आहे. कुठून ती आली अन कश्यासाठी तिने प्रवास केला हे मात्र तिने सांगितले नाही आणिक राजपुत्रानेही विचारले नाही. एवढे मात्र त्याला जाणवले की ती अंतरातून दुःखी आहे आणि चुकूनही हसत नाही. तिच्या फिकट स्मितातही असतं, तिचं दुःख... टोचणारं. पण राजपुत्राला वाटले, ह्या लांबच लांब प्रवासांना ती कंटाळली असेल, एकदा का माझ्या सुखासीन प्रासादी पोहोचली की नक्की खुशालेल.

शेवटी तो अनंत भासणारा प्रवास एकदाचा संपला आणि ते दोघे त्याच्या राज्यात पोहोचले. त्याचे लग्न थाटात लागले. तो राजपुत्राचा राजा झाला आणि ती, त्याची पट्टराणी. सगळे प्रजाजन, आप्तेष्ट तिच्या सौंदर्याची, गुणांची तारीफ करताना थकेनात. पण ती कधीच हसू शकली नाही. तिला हसविण्याकरता राजाने कित्येक भाट, विदूषक, नाटके, जादुगार आणवले. पण नव्हेच.

एके दिवशी त्याला एक युक्ती सुचली. आपल्या दरबाऱ्यास तो म्हणाला," आज दुपारी मी जेवणानंतर राणीसाहेबांसामावेत असेन. तेव्हा तू धावत ये अन मला बाहेर शत्रूने हल्ला केल्याची बतावणी सांग. मी असे सोंग घेतो की राणीसाहेब हसल्याच पाहिजेत."

दुपारी जेवणानंतर राजा राणीच्या महाली त्याच्या सागवानी, वेलबुट्टीची नक्षी चितारलेल्या पलंगावर रेशमी अभ्रे घातलेल्या लोडाला टेकून समोर चित्र रंगवीत होता. राणी पाठमोरी बसून तिचे काळेभोर केस विंचरत होती. इतक्यात तो दरबारी धावत आला. विस्कटलेले केस, भाल्यात अडकून फटल्यागत दिसणारी वस्त्रं आणि धपापणारा उर. ओरडून तो म्हणाला," महाराज, अहो घात झाला. दारावर शत्रूने हल्ला केला. आपल्या शिपायांना मारून त्यांचे सैनिक इथंच येताहेत."

"काय?" राजा ताडकन उडी मारत उठला, त्याचा पाय लागून समोरचे जलरंग कलंडले, पलंगपोसंवर रंगांचे ओघळ उमटले. राणीने दचकून मान वळवून त्याच्याकडे पाहिले मात्र, आणि त्याचा भीतीग्रस्त अवतार बघून ती खोखो हसत सुटली. इतकी की हे हसू दाबण्यासाठी तिनं दोन्ही हाताआड तिचे ओठ आणि गाल लपवले. तरीही, तिला तसे पाहून राजाला बरे वाटले. दरबाऱ्याच्या दिशेने गळ्यातला कंठा फेकत तो खुशीत म्हणाला," मी म्हणालो नव्हतो, ह्या बतवणीने ती हसणार!"

मग त्याने तिला हसवण्यासाठी आपण ही बतावणी केल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा राणी आपली उदासच. असेच अजून काही महिने राणी न हसता गेले.

पुन्हा एके दिवशी दुपारी जेवणानंतर राजा राणीच्या महाली त्याच्या सागवानी वेलबुट्टीची नक्षी चितारलेल्या पलंगावर रेशमी अभ्रे घातलेल्या लोडाला टेकून समोर चित्र रंगवीत होता. राणी पाठमोरी बसून तिचे काळेभोर केस विंचरत होती. इतक्यात तोच दरबारी धावत आला. विस्कटलेले केस, भाल्यात अडकून फटल्यागत दिसणारी वस्त्रं आणि धपापणारा उर. ओरडून तो म्हणाला," महाराज, अहो घात झाला. दारावर शत्रूने हल्ला केला. आपल्या शिपायांना मारून त्यांचे सैनिक इथंच येताहेत."

पण ह्या खेपेला मात्र राजाने उडी मारली नाही, तो म्हणाला, "मित्रा, राणीसाहेबांना खुश ठेवण्याची तुझी कळकळ मी समजतो, पण तीच बतावणी दोनदा चालणार नाही रे!"
राजा इतके म्हणतो आहे तोच, दहा बारा शत्रूचे सैनिक खरोखरच आले आणि त्यांनी राजाला ठार केले.

त्यांच्या मागोमाग आता जेता झालेला चीन देशाचा नवा राजा महालात प्रवेश करता झाला. त्या भयकंपित तनुलतेकडे त्याने पाहिले मात्र, आणि तो उद्गारला, "हे रुपगर्विते, मी तुझ्यावर पुरता भाळलो आहे, तुझ्या अनुपम सौंदर्याने संमोहित झालो आहे. मी तुलाच शोधत होतो ह्याची ग्वाही मला माझ्या अंतर्मनाने दिली आहे. मला आता तुझा होकार हवा. मी तुला जगातली सर्व सुखे अर्पिन. माझ्या तुजवरील प्रेमारुपी सूर्याचा कधी अस्त होणार नाही. केवळ तुझ्याच प्रेमपाशात स्वतःला बांधून घेण्याचे हे मी वचन देत आहे. एकदा नव्हे, त्रिवार!"

आणि मग... त्याने तिला त्याची पट्टराणी जाहीर केले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अनुवाद सुंदर केलाय. मुळकथा अजुन सुंदर असावी.. येऊदेत अजुन अनुवाद. वाचायला आवडेल. Happy

राणी पृथ्वीचे/ राज्याचे रुपक असावी.. >हे पटण्यासारखं आहे..

Pages