अनामिक कथा

Submitted by मी मधुरा on 10 September, 2019 - 06:07

रात्र.... पाऊस...... कशाची तमा न बाळगता ती चालत सुटली. गणपत चौकात येईपर्यंत तिचे कपडे भिजून अंगाला घट्ट चिकटले होते. तिच्या नकळत २ जणांची वखवखलेली नजर.... तिच्या कपड्यांच्या आरपार पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या खांद्याला कसलासा स्पर्श झाला तसे दचकून तिने मागे पाहिले.
"कहॉ चली मोहतरमा?" तिच्या खांद्यावर हात घासत पहिला म्हणाला. तिला त्या स्पर्शाची जबरदस्त किळस वाटली. तिने हात झटकत घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तितक्यात दुसऱ्याने तिला मागून पकडलं.
"वाचवा.... वाचवा..... हेल्प!" जीवाच्या आकांताने ती ओरडू लागली. प्रतिकार कमी झाल्याची संधी घेत पहिल्याने पुढून पकडलं.
"वाचवा...."
"का वाचवू?" थंड आवाज.
कोणती तरी आकृती अंधुक प्रकाशात तिला दिसली.
"हे.... हे.... मला...."
"अबे चूप कर छोकरी!" दुसरा ओरडला.
"वाचव मला plz.... वाचव...." तिने त्या आकृती कडे बघत याचना करणे सुरु ठेवले.
"आधी उत्तर दे. मी का वाचवू?"
"अरे हा काय प्रश्न आहे..... वाचव, कारण हे मला......" ती जवळ जवळ किंचाळत होती.
"ये फिर चिल्ला रही है." पहिला.
"मुह बंद कर इसका पेहेले." दुसरा.
"रेहेने दे.... कोई आने वाला नही यहाँ पर."
"वाचवा....." आकृतीकडे बघत तिने पुन्हा आर्त हाक मारली.
"नाही."
"अरे पण का?" ती काकुळतीला आली होती.

रस्त्यावरून एक कार येत होती. आशेचा किरण! तिने हाका मारायला सुरवात केली. पण कार जवळ आली तसा चालकाने वेग वाढवला. शेजारून कार भरधाव वेगाने गेली तसे तिचे डोळे पाण्याने भरले. डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. ते दोघे तिला खेचत रस्त्याच्या कडेला नेऊ लागले.
आकृती तशीच उभी.

"वाचव! plz help...."
"बरं.......तू केसांना काय बांधले आहेस?"
"काय?" ती गोंधळली.
"उत्तर दे."
"क्लिप."
"एकदम घट्ट असलेली कणिक मळू शकतेस?"
"अरे हे काय प्रश्न आहेत?"
"उत्तर दे..."
"हो."
"तुला माहिती आहे, शरीरावर मान, डोळे आणि काही नाजूक जागा असतात?"
"हो. हो. हो."
"मग काय तर.... निघतो मी." आकृती छोटी होऊ लागली.
"ए... थांब.... मदत कर मला." जागच्या जागी उड्या मारत तिने सुटण्याचा प्रयत्न केला.
"मी का करू?" प्रश्न विचारत आकृती निघून गेली.
आता ती एकटी होती. दोघे तिच्याकडे मादक नजरेने बघत तिच्या अंगाला स्पर्श करणार तितक्यात तिच्या काही लक्षात आलं.
सुटण्याचे प्रयत्न थांबवून तिने क्लिप काढली. पहिला क्षणभर नुसताच बघत उभा राहिला. वाऱ्याच्या वेगाने तिने पहिल्याच्या मानेवर टोकदार क्लिप आतपर्यंत खुपसली. विव्हळत त्याने तिच्या ओढणीवरची पकड सोडली.
दुसऱ्याला काही कळण्याच्या आत तिने हात डोक्यामागे नेऊन अंदाजे त्याच्या डोळ्यांत बोटे खुपसली. सगळं बळ एकटवून. नखेही रुतावीत याची खबरदारी घेत. शेजारी तिला भलामोठ्ठा दगड पडलेला दिसला. दुसऱ्याला धक्का देत तिने जमिनीवर पाडले आणि हातात दगड घेतला. दोघांनी तिच्या या आक्रमक उत्तराची अपेक्षाही केली नव्हती.
"निघून जा इकडून..... निघून जा."
दोघातल्या एकाने एक पाऊल तिच्याकडे टाकलं आणि तिने हातातला दगड जोरात त्याच्या पोटाच्या दिशेने भिरकावला. पहिला आघाताने बेशुद्ध होऊन जमिनीवर निपचित पडला. ते पाहून दुसरा घाबरला आणि आडमार्गाने पळून गेला..... ती अजूनही थरथरत होती.
बेशुद्ध पडलेल्याकडे पाहत तिने खाली पडलेली बॅग उचलली. आणि घराकडे जवळ जवळ धावत निघाली.
_______________

"तू मदत का नाही केलीस रे तिला?"
"मी का करू?" त्याने हसून विचारले.
"अरे? हे बघ, मी तुला परत सांगतो आहे.... निदान मला तरी सरळ सरळ उत्तर देत जा."
"बर. मग नेमकं मदत म्हणजे अजून काय करायला हवे होते मी दाऊ?"
"त्या दोघांवर विजेचा मारा करायला हवा होतास."
"ते माझ्या हातात आहे?"
"मग सरळ चक्र फिरवायचेस मानेवरून... नाहीतर कोणाला मदतीला तरी पाठवायचेस."
"आणि हे किती वेळा करणार मी, दाऊ?"
"म्हणजे?"
"म्हणजे, सगळं मीच करू लागलो तर ज्यांना सबल शरीर दिलं, शक्ती दिली, हात-पाय दिले ते काय करणार?"
"पण आज ही मुलगी वाचली म्हणून प्रश्न संपतो का?"
"प्रत्येक वेळी मी मध्ये पडलो तर नारीला तिची ताकद कशी कळणार दाऊ?"
"नारीची ताकद? पुरुषांपुढे निभाव लागेल तिच्या शक्तीचा?"
"का नाही? तिच्यातही माझीच शक्ती आहे, दाऊ!"
"मग द्रौपदीला का नाही म्हणलास 'तूच चालव बाण' म्हणून? सीतेला अंगठी पाठवण्याऐवजी तलवार का नाही पाठवलीस?"
"वृत्ती, दाऊ. नारीची वृत्ती सृजनशील आहे. विनाश करणे त्यांच्याकरता क्रूरकर्म! पण म्हणून त्यांना ते जमतच नाही असे नाही ना?"
"मग हिला आज करायला लावलेस ते?"
"गरज! वेळेनुसार सर्व बदलते. बदलावे लागते."
"म्हणजे?"
"रामाची जागा कृष्ण आणि कृष्णाची जागा राम नाही घेऊ शकत, दाऊ. जर वैचारिक सारथ्य करून विजय मिळणार असेल तर बाण चालवायची काय गरज?"
"पण अनुज....."
"काळ बदललाय, दाऊ. पण आजही अर्जुनाला त्याची लढाई स्वतःच लढावी लागते!"

©मधुरा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पण आजही अर्जुनाला त्याची लढाई स्वतःच लढावी लागते!" >>> खरंय. आणि हाच संसाराचा नियम आहे. पण हा संसार देखील कृष्णाची मायाच आहे. जेंव्हा या संसारचक्रातून कायमची मुक्ती मिळेल तेंव्हाच खरी लढाई जिंकली असे म्हणता येईल. तोपर्यंत सगळंच
क्षणिकम् क्षणिकम् सर्वम् क्षणिकम् | अनित्यम् अनित्यम् सर्वम् अनित्यम् | दुःखम् दुःखम् सर्वम् दुःखम् |

क: अहम् क: अहम् ? स: अहम् स: अहम् (सोहं सोहं)

मेसेज चांगला आहे. पण एक्झिक्युशन कन्विंसिंग नाही वाटते.
कथेतली पात्र अवाच्या-सवा अचाट दाक्षिणात्य/ बॉलिवुडी भडक प्रकारे वागताहेत असा फील येत राहतोय.

व्वा....
खूप मदत लिहिली आहे आपण...

आवडली Happy

कथेतली पात्र अवाच्या-सवा अचाट दाक्षिणात्य/ बॉलिवुडी भडक प्रकारे वागताहेत असा फील येत राहतोय. >>>> प्रत्यक्षात जेव्हा स्त्रिया अश्या प्रसंगांना तोंड देत असतील तेव्हा spot वर ह्यापेक्षाही भयानक घडत असेल.

तुमची इच्छा असेल तर हे नाव कथेला देऊ शकता
"कलयुगातील कृष्ण - द्रौपदी " >>> मग नावातच सगळी कथा उलगडली .
अनामिक वाचून थोडातरी सस्पेन्स रहात होता Happy

Chan

मस्त.

Pages