माझी सैन्यगाथा (भाग २७)

Submitted by nimita on 28 August, 2019 - 08:54

जम्मू मधल्या त्या दोन वर्षांत नितीन अधेमधे घरी यायचा. म्हणजे जर कधी एखाद्या official कामासाठी राजौरीहून नगरोटा किंवा जम्मूला आला तर मग काम झाल्यावर दुपारी जेवायला घरी यायचा आणि जेवण झाल्यावर परत राजौरीला रवाना व्हायचा.. तेवढीच धावती भेट व्हायची आमची आणि त्याची.

या संदर्भातली सृष्टीची एक गंमत आठवली. त्या दिवसांत नितीन photochromatic चष्मा वापरायचा. साहजिकच दुपारी तो घरी पोचेपर्यंत चष्म्याच्या काचा काळ्या झालेल्या असायच्या...गॉगल्स सारख्या . त्यामुळे बहुदा सृष्टीच्या बालमनात तिच्या बाबांची जी प्रतिमा होती ती 'गॉगल्स घातलेला माणूस' अशी असावी. खरं सांगायचं तर आमच्या कोणाच्या हे लक्षातही नव्हतं आलं.पण एका रविवारी ऐश्वर्या आणि मी दोघी मिळून टीव्ही वर कार्टून शो बघत होतो. सृष्टीपण तिथेच होती. अचानक टीव्ही कडे बघून ती म्हणाली," बाबा ...बाबा..." सुरुवातीला थोडा वेळ मला कळलंच नाही की ही त्या कार्टून्स ना बघून 'बाबा' का म्हणतीये - वाटलं कदाचित आठवण आली असेल बाबांची पण अजून नीट बोलता येत नाही म्हणून नुसतीच त्याला हाक मारत असेल. तेवढ्यात परत स्क्रीनकडे बोट दाखवत ती म्हणाली,"बाबा..." बघितलं तर स्क्रीनवर 'johny bravo' दिसत होता... पिवळे केस, काळा टी शर्ट आणि डोळ्यांवर काळे गॉगल्स !

ऐश्वर्या तिला समजावत म्हणाली,"ते बाबा नाहीयेत गं .. johny bravo आहे तो!" पण जेव्हा जेव्हा तो दिसायचा तेव्हा तिचं 'बाबा,बाबा' चालूच होतं.त्या johny bravo मधे आणि तिच्या बाबांमधे जर काही साम्य असेल तर ते म्हणजे डोळ्यांवरचा काळा चष्मा! आणि गंमत म्हणजे, ती फक्त त्या johny ला च बाबा नाही म्हणायची तर तिच्या आजूबाजूला तिला जे कोणी काळे गॉगल्स घातलेले दिसायचे त्या प्रत्येकाला ती बाबा म्हणायची....टीव्ही वर प्रेस कॉन्फरन्स मधे गॉगल्स घालून आलेला सलमान खान, माझ्याकडच्या 'Top Gun' च्या पोस्टर मधला Tom Cruise , वगैरे वगैरे !!! तिला बहुतेक वाटत होतं की 'जे असे गॉगल्स घालतात त्यांचं नाव बाबा असतं'.

वरवर जरी मी हे सगळं हसण्यावारी नेत असले तरी मनातून मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं.. कारण ज्या वयात फक्त आई बाबा हेच लहान बाळांचं विश्व असतं त्या वयात सृष्टी साठी तिचे बाबा हे तिच्यासाठी फक्त एक व्यक्ती होते...अधूनमधून थोड्या वेळाकरता येऊन जाणारे ... त्या नात्याची आणि तिची ओळखच नव्हती झाली. ती दोन वर्षांची होईपर्यंत तिच्या भावविश्वात कायमस्वरूपी म्हणता येतील अशा 'आई आणि ताई' या दोनच व्यक्ती होत्या. कारण 'बाबा' म्हणून नितीनची ओळख होईपर्यंत त्याची जम्मूहून निघायची वेळ आलेली असायची.

पण त्यामुळे ऐश्वर्या आणि सृष्टीचं नातं अगदी पक्कं झालं. रोज सकाळी शाळेत जाताना सृष्टीला कुशीत घेऊन 'bye' म्हटल्याखेरीज ऐश्वर्या चा पाय नाही निघायचा घरातून.. आणि दुपारी शाळेतून परत आल्यावर हातपाय धुवून ती आधी सृष्टीकडे पळायची. सृष्टीला सुद्धा ताईबरोबर खेळायला खूप आवडायचं. ऐश्वर्याची शाळेतून यायची वेळ झाली की सृष्टी रांगत रांगत मुख्य जाळीच्या दारापाशी जाऊन बसायची. तिला कसं कळायचं कोण जाणे ! पण तिचा तो वेळेचा अंदाज अगदी बरोब्बर असायचा. बाहेर रस्त्यावर स्कूल बस थांबली की ही आतून आपल्याच भाषेत ताईला हाका मारायला सुरुवात करायची.

ऐश्वर्याला पैशांचं आणि बचतीचं महत्व कळावं म्हणून मी तेव्हा दर महिन्याला तिला अगदी जुजबी असा पॉकेट मनी देत होते. ते पैसे तिनी कुठे आणि कसे खर्च करायचे ते ठरवायची पूर्ण मुभा होती तिला. पण ती ते सगळे पैसे तिच्या पिगी बँक मधे साठवून ठेवायची. जेव्हा तिला विचारलं की 'तू हे पैसे खर्च का नाही करत?' तर म्हणाली," मला सृष्टीच्या फर्स्ट बर्थडे ला तिला एक मस्त गिफ्ट द्यायचं आहे , म्हणून सेव्ह करतीये!" इतकं समाधान वाटलं मला तिचं हे उत्तर ऐकून . शेवटी एकदाचा सृष्टीचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस महिन्याभरावर आला. नितीनला त्या वेळी सुट्टी मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या फोटोज वरच समाधान मानावं लागणार होतं. आमच्या नेहेमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही दोन वेळा तिचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला...एकदा तिच्या जन्मतारखे प्रमाणे आणि दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही चौघं एकत्र असू तेव्हा! असे कितीतरी वाढदिवस आणि anniversaries आम्ही दोन दोन वेळा साजरे केले आहेत. म्हणतात ना..'साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा ' तसंच काहीसं...'चौघे एकत्र असती जेव्हा, सण समारंभ घडती तेव्हा !'

पण ऐश्वर्या चा उत्साह मात्र खूप दांडगा होता. रोज सृष्टीला सांगायची," आता तुझा वाढदिवस येणारेय. आपण खूप मज्जा करूया, बरं का!"आणि तिचा हा उत्साह बघून मी पण अगदी जोरात तयारीला लागले. आमच्या कॉलनीतल्या ऐश्वर्या च्या सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवायचं ठरलं. एक दिवस आम्ही कॉलनी मधल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधे गेलो - ऐश्वर्याला सृष्टीसाठी एक छानसं गिफ्ट घ्यायचं होतं ; त्याशिवाय पार्टीला येणाऱ्या मुलांकरता रिटर्न गिफ्ट्स वगैरे पण बघायची होती.

ऐश्वर्यानी तिच्या पिगी बँक मधले सगळे पैसे काढून माझ्याकडे दिले होते. त्या गिफ्ट्स च्या दुकानात तिनी खूप खेळणी, soft toys वगैरे बघितली; पण प्रत्येक वेळी 'हे नाही आवडणार सृष्टीला,' असं म्हणत ती सगळी नापास केली. शेवटी एकदाचं तिच्या मनासारखं एक 'building blocks' चं खेळणं मिळालं आणि त्या दुकानदाराला आणि मला दोघांनाही 'हुश्श' झालं ! मी पैसे देऊन बाहेर निघणार इतक्यात ती मला म्हणाली," आई, मला तुझ्यासाठी पण एक खूप मस्त गिफ्ट घ्यायचंय." मी तिला विचारलं," अगं, पण वाढदिवस तर सृष्टीचा आहे. मग मला कशाला गिफ्ट ?" त्यावर ती म्हणाली," तू रोज आमच्यासाठी कित्ती काम करतेस, आम्हांला टेस्टी टेस्टी खायला करून देतेस, बाबांची आठवण आली की त्यांच्या छान छान गोष्टी सांगतेस.... म्हणून तुला पण गिफ्ट देणारेय मी. माझ्या पॉकेट मनी मधून !" आज अचानक ही जाणीव कशी काय झाली असावी - हा विचार करत होते तेवढ्यात आठवलं- आदल्याच दिवशी तिच्या टीचर नी त्यांना 'मातृदेवो भव' चा अर्थ समजावून सांगितला होता.

मग आमची स्वारी पुन्हा दुकानात शिरली. पण यावेळी शोधाशोध करायच्या भानगडीत न पडता ती मला म्हणाली," तुला जे आवडेल ते घे !" त्यावेळचे तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून कुबेर पण लाजला असता.... जणूकाही त्या क्षणी ती जगातली सगळ्यात श्रीमंत मुलगी होती आणि तिच्या आईला जे पाहिजे ते विकत घ्यायची तिची तयारी होती. पण सृष्टीचं गिफ्ट घेतल्यानंतर आता तिच्याकडची गंगाजळी खूपच आटली होती. एकदा विचार आला- तिला म्हणावं - मी देते या गिफ्टचे पैसे. पण तिचा तो एकंदर उत्साह आणि 'स्वतःच्या पैशातून आईला गिफ्ट देण्याचा' तो अभिमान आठवला आणि मी गप्प बसले. मी दुसऱ्या पद्धतीनी तिला मदत करायचं ठरवलं. त्या राहिलेल्या पैशांत घेता येईल अशी वस्तू सिलेक्ट केली... एक छोटासा ट्रे ... माझा चॉईस तिला अजिबात नाही आवडला. कपाळावर आठ्या घालत ती म्हणाली," ए, इतकं छोटं गिफ्ट नाही काही; खूप मोठ्ठं घे काहीतरी." आणि ती स्वतः शोधायला लागली...काचेचा टी सेट, एक मोठ्ठी पर्स, 'I love you' असं लिहिलेलं एक टेडी बेअर..... तिची ती धडपड बघून एकीकडे तिच्याबद्दल खूप कौतुक ,खूप प्रेम वाटत होतं ; पण सत्य स्थिती माहीत असल्यामुळे तितकंच वाईटही वाटत होतं. कारण त्या सगळ्या वस्तू तिच्या बजेट मधे बसणाऱ्या नव्हत्या. पण हे कटू सत्य तिला कळू न देता मी काहीबाही कारणं सांगून त्या सगळ्या वस्तू बाजूला सारल्या आणि तो छोटासा ट्रे पुन्हा तिच्या समोर धरत म्हणाले, "मला हाच खूप आवडलाय. प्लीज, मला हाच घेऊन दे ना ." माझ्या विनवणी चा योग्य तो परिणाम झाला आणि शेवटी माझ्या गिफ्टची पण खरेदी झाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलय
किती गोड आणि समजूतदार आहेत मुली! >>+११११

मस्त!
या गॉगल घातलेल्या बाबावरून आठवलं. माझ्या एका भावाला मोठी दाढी आहे. माझा धाकटा मुलगा त्याच्याशी एकदा व्हिडीओ कॉलवर बोलला होता. भाऊ परदेशात असल्याने त्या दोघांची भेट झालेलीच नव्हती. माझ्या मुलाच्या लक्षात एवढंच राहिलं की लांब दाढी असलेला माणूस म्हणजे मामा. तेव्हापासून सगळे दाढीवाले त्याचे मामा झाले, इतकंच काय, सांताक्लॉजही मामाच! Lol

तुमच्या दोन्ही मुली खूपच cute आहेत.
इतक्या लहान वयात इतका समजूतदारपणा आणि जबाबदारपणा! हॅट्स ऑफ! त्यांच्या खोड्या वैगरे पण लिहा, शक्य असेल तर गंमत म्हणून. आई एकटीच सगळी आघाडी सांभाळते आहे ही जाणीव फार लवकर येते मुलींना. I hope त्यामुळे त्यांचे बाळहट्ट जे त्या त्या वयात असायला हवेत, ते पण होते.