बेहता है मन कही...

Submitted by अजय चव्हाण on 19 August, 2019 - 02:30

जुलै महीन्यातली सुंदर दुपार.खिडकीच्या गजांमधून नुकत्याच ओसरत आलेल्या पाऊसाचे काही थेंब मोत्यांसारखे ओघळतायेत घरात गार वारा पिंगा घालतोय आणि त्यामूळे वातावरणात
एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालयं.गॅसवर ठेवलेल्या चहाचा
तो गंध त्या गार वार्यात पुर्णपणे सामाऊन जाऊन थकलेल्या मनाला तजेला आणतोय आणि मध्येच दिवानखान्यात लावलेल्या रेडीओवर -

"बेहता है मन कही..कहाॅ जानती नही..
कोई रोकले यही...भागे रे मन कही...
आगे रे मन चला, जाने किधर जानू ना"

हे गाणं वाजतयं..आता हे गाणं लागावं आणि त्या गाण्यात स्वतःला वाहवत जाऊ द्याव असं मनात वाटत असतानाच अनपेक्षितपणे तेच गाणं रेडीओवर लागलेलं पाहून मुग्धाला एक प्रकारचा सुखद धक्काच मिळालाय आणि त्याच धक्क्यात ती स्वतः हे गाणं गुणगुणत एकीकडे चहाकडे लक्ष देत स्वतःभोवती गिरकी घेतेय.
मधल्या म्युझिकल गॅपमध्ये तिने गॅस बंद करून चहा जवळच्याच मगात ओतून घेतलासुद्धा.चहाचा घोट घेता घेता तिला "तो" आठवला..त्यालाही हे गाणं खुप आवडायचं..कित्येकदा घरी एकटी असताना तो आला की, ह्या गाण्यांवर ते हमखास नाचायचे..अगदी डोळ्यांत डोळे घालून गाणं संपेपर्यंत संपूर्ण गाणं फिल करत त्यावर नुसतेच डोलायचे. गाणं संपल्यानंतर कमरेवरचा त्याचा हात हळूच वर सरकायचा आणि तिलाही त्याचा तो उबदार स्पर्श हवाहवासा वाटायचा...तिच्या अंगावर आलेला शहारा पाहून तो गालात हसायचा आणि मग ती त्याच्या मिठीत हळूच विरघळायची..दुधात साखर विरघळावी ना अगदी तशीच..

चर्चर्र...नकळतपणे गरम घोटाने चटका लागल्यावर मुग्धा भानावर आली. गाणं केव्हाचं संपलं होतं आता RJ ची नुसतीच बडबड चालू होती.त्याच्या आठवणीने मुग्धा थोडीशी गहिवरली आणि तिच्याही नकळत दोन अश्रू गालावरून ओघळले.चूक त्याची नव्हतीच मुळी त्याच्या जागी कुणीही असतं तर त्यानेही हेच केलं असतं.तिने मुकाट्याने आपले अश्रू पुसले व त्या आठवणी टाळण्यासाठी तिने चहाची भांडी घासायला घेतली..

"भांड्याचं बरं असतं नाही? कुठलेही डाग अगदी पाच- दहाच्या साबणाने काढता येतात ..असाच एक साबण असता तर...?"

आठवणी टाळता याव्यात म्हणून तिने भांडी घासायला घेतली तरी ते विचार आणि आठवणी येतच होत्या..

तिला आठवलं..हाॅस्टेलवर असताना त्याने केलेलं प्रपोज मग हो नाही करत तिने कळवलेला होकार मग चोरट्या भेटीगाठी,
पहिलं प्रेम आणि पहिलं चुंबन..असाच धो धो पाऊस...
अशीच जुलैची दुपार आणि आमची पहिली लाॅग ड्राईव्ह..

लोणावळ्याजवळच्या निर्जन टेकडीवरून गाडीतल्या खिडकीतूनच पाहीलेल्या त्या सरी आणि दुरवर दिसणारे हिरवे गालिचे...
मग एखाद्या सरीने गाडीच्या काचेवर जमा झालेले ते थेंबाचे ओघळ आणि त्यात बोट धरून त्याने लिहलेलं त्याचं नि माझं नाव.
त्याच्या बोटांचा तो गार स्पर्श..अंगावर आलेला तो सुखद शहारा..

गाडीत दोघे एकटेच निशब्द पण भावना पोहचलेल्या ..
ड्रायव्हर सीटवर तो आणि बाजुला मी..गाडीतली ती गार
एसीची हवा आणि डेकवर लागलेलं हेचं गाणं..
नकळतपणे एकमेकांत हात गुंफलेले..त्याच्या त्या तळहाताचा कडक स्पर्श आणि नकळतपणे त्याने ओठांवर टेकवलेले त्याचे गुलाबी मधाळ ओठ....

ईश्शऽऽ...तिच्याही नकळत "ती" लाजली..साबणाचा हात अवचितपणे चेहर्यावर आला आणि ओल्या त्या स्पर्शाने पुन्हा ती भानावर आली.गालावर थोडा फेस लागलेला.तो तसाच राहू देत राहीलेली भांडी तिने घासून व्यवस्थित ठेवली.हात स्वच्छ धुऊन ती बेसिनजवळ गेली.बेसिनजवळच्या आरशात तिला तिचं प्रतिबिंब दिसलं.तिच्या सावळ्या आकर्षक गालावर पांढर्या डागांनी जम बसवलेला आणि त्याच डागांवर साबणाचा फेस लागलेला..तिने काढण्यासाठी हात वर घेतला आणि नेमकं पुन्हा कुणाच्या तरी रिक्वेस्टवरून रेडीओवर पुन्हा तेच गाणं लागलेलं...

"बेहता है मन कही..कहाॅ जानती नही..
कोई रोकले यही...भागे रे मन कही.
आगे रे मन चला, जाने किधर जानू ना"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय Happy

बरंच काही लिहावंस वाटतंय पण थांबते आणि कथा वाचल्या नंतर येणारी फिलिंग एंजॉय करते

थोडक्यात सुंदर ! मस्त लिहिली आहे कथा. अख्या कथेतल्या दोन शब्दांमध्ये लव्ह स्टोरीचा भूतकाळ कळला आणि कथानायिकेच्या भविष्यासाठी हुरहूर वाटली. खूप छान.

ते दिवानखाणा झालं आहे ते दिवाणखाना करणार का?

छान आहे..
रच्याकने, यामुळे माझं एक जुनं लिखाण आठवलं. मिसळपाववर की ऐसी वर टाकलं होतं कदाचित.. इथेदेखील टाकलं आहे आता. रिक्षा Wink
https://www.maayboli.com/node/71099

धन्यवाद दिप्ती ताई...पुढे सुचलं तर बघू...

धन्यवाद रिया..

.धन्यवाद मीरा.. बदल केला आहे...

धन्यवाद सस्मित, भाग्यश्री, अजिंक्यराव, किट्टू21, आसा, अक्कू320

ते 'पोत्यात घालून धू धू धुतला' लिहणारे तुम्हीच ना ओ?
तुमची नैसर्गिक शैली कोणती आहे ही की ती? कि दोन्ही तितकेच सहज जमते?

छान लिहिलयं खरचं. बेहता है गाण पण आवडत आहे पण ऐकायलाच. बघायला नाही. गाणं आणि गाण्यावरचा डान्स वगैरे अगदीच विसंगत.

धन्यवाद अमर, Diyu, बोकलत, अमर विश्वास..

@ ॲमी हो मीच लिहली होती ती कथा...माझी ठराविक अशी शैली नाहीये..जी शैली कथेला सुट होईल त्याच शैलीत लिहतो..

आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल "पुरी भाजी आणी प्रेम" ही कथा फक्त टाईमपास म्हणून लिहली होती....एक एक्सपेरिंमेंट..

लोकांना इतकं आवडेल असं वाटलचं नव्हतं..

@सीमा -धन्यवाद..गाण्यावरचा डान्स विसंगत असतला तरी करिना खुप छान दिसते त्यात...(.डोळ्यात बदाम असलेला बाहुला)

बेहता म्हणजे काय? वहाणे अशा अर्थाचे असेल तर बहुतेक हिंदीत बहता असे लिहितात, पण उच्चार बे होतो.
कथा छोटीशी चांगलीये.

हम्म. मस्त होती ती गोष्ट.
कदाचित टाईमपास, कॅज्युअल प्रयोग म्हणून लिहल्यामुळेच लोकांना जास्त आवडली असेल. लोकांना आवडावी म्हणून (विनाकारण!) घेतलेली मेहनत गोष्टीला बोटॉक्सि स्टीफ बनवत असेल....