नजरेत मी कुणाच्या

Submitted by द्वैत on 15 July, 2019 - 12:20

नजरेत मी कुणाच्या इतका पडून गेलो
नुसतेच श्वास घेतो बाकी मरून गेलो

वाटेमध्ये कुणीही धरला न हात माझा
अपुले नशीब अपुल्या हाती धरून गेलो

देता कुणीही हाक मी गोंधळून बघतो
बहुतेक नाव माझे मी विस्मरून गेलो

काही करावयाची जाता निघून संधी
हे ही करून गेलो ते ही करून गेलो

शोधून पाहिले मी कित्येकदा स्वतःला
कित्येकदा मी माझ्या दारावरून गेलो

घेता कधी न आला एक श्वास मोकळा ही
दुनियेत सज्जनांच्या मी गुदमरून गेलो

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुनियेत शायरीच्या हल्ली कधी न जातो
पण वाचता गझल ही वा मी म्हणून गेलो

गुरू पौर्णिमेची गुरू बेफिकीर यांना सप्रेम भेट

वाह! मस्तच.

BLACKCAT तुमचाही शेर भारी आहे.