सजवूत आम्ही

Submitted by निशिकांत on 24 August, 2019 - 00:16

सजवूत आम्ही

वेदनांना छानसे सजवूत आम्ही
सुरकुत्यांनाही करू मजबूत आम्ही

रंग खलुनी घेतले अश्रूत आम्ही
वस्त्र आयुष्या तुझे खुलवूत आम्ही

दु:ख असते पाचवीला पूजलेले
आज सटवाईसही हरवूत आम्ही

का उदासी सांजवेळेला असावी?
बाल आयुष्यात रेंगाळूत आम्ही

पान पिकलेले तरीही देठ हिरवा
निश्चयाने तत्व हे पाळूत आम्ही

वृध्द असुनी मस्त सैलानी कलंदर
काल फिरलो आजही मिरवूत आम्ही

शेवटी जे व्हायचे होईलही पण
आज आकाशी खुल्या विहरूत आम्ही

हासवावे अन् हसावे ब्रीद अमुचे
स्वर्ग आयुष्यात आकारूत आम्ही

स्वप्न हे "निशिकांत"ला पडले पहाटे
दु:ख केले हासुनी काबूत आम्ही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users