माझी सैन्यगाथा (भाग २६)

Submitted by nimita on 16 August, 2019 - 11:26

ठरल्याप्रमाणे ११ ऑगस्टला पुण्याहून माझी बहिण आणि १३ ऑगस्टला राजौरीहून नितीन - जम्मूला आले. ऐश्वर्या तर खूपच खुश होती. गेले दोन अडीच महिने शांत असलेलं आमचं घर एकदम गजबजून गेलं. पुढच्या काही दिवसांतच आमच्या घरात नवीन छोट्या पाहुण्याचं आगमन झालं... आमची दुसरी मुलगी- सृष्टी!

ऐश्वर्याला तर खूपच आनंद झाला; कारण देवानी तिची इच्छा पूर्ण केली होती ना...माझ्या प्रेग्नन्सी मधे ती रोज देवाची प्रार्थना करायची - "मला बहीण हवी..म्हणजे ती माझ्याबरोबर घर घर खेळेल. जर भाऊ असला तर तो बाहेर जाऊन क्रिकेट खेळेल.. मग माझ्याशी कोण खेळणार? म्हणून बहीण is a must."

मी जेव्हा हॉस्पिटलमधून परत आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे माझ्या बहिणीला पुण्याला परत जावं लागलं. आणि 'दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण खरी करत सुषमा (माझी कामवाली) नी पण कुठलीही पूर्वकल्पना न देता अमर्यादित सुट्टीची गोळी घेतली. त्यामुळे डिलिव्हरीच्या चौथ्या दिवसापासूनच मला अक्षरशः कंबर कसून सगळी कामं करावी लागली... म्हणजे अगदी बाळाची दुपटी धुण्यापासून ते स्वैपाकघरातली भांडी घासण्यापर्यंत ! तरी बरं ; बाळाची मालिश, अंघोळ आणि शेक शेगडी मी स्वतःच करायचं ठरवलं होतं. जर सुषमाच्या भरवशावर राहिले असते तर....

त्या दिवसांत जम्मू मधे जबरदस्त उन्हाळा होता. आणि रोज चार पाच तासांचे पॉवर कट्स अगदी ठरलेले. दुपारच्या वेळात उकाड्यानी जीव अगदी कासावीस व्हायचा. त्यात वीज नसल्यामुळे फॅन्स, कूलर वगैरे नुसत्या शोभेच्या वस्तू झाल्या होत्या.

तरी नितीन होता तोपर्यंत त्याची मदत व्हायची, पण त्याची सुट्टी संपल्यावर तो परत राजौरीला गेला आणि माझी अवस्था पुन्हा 'one (wo)man army' सारखी झाली.

दिवसाचे चोवीस तास देखील मला कमी पडायचे. ऐश्वर्या ची सकाळची शाळा- ७.३० वाजता तिची स्कूल बस यायची. त्याआधी तिचा डबा, तिचा ब्रेकफास्ट बनवणं आणि तिला शाळेकरता तयार करणं अशा तीन तीन आघाड्या एकाच वेळी सांभाळाव्या लागायच्या. त्यात भर म्हणून की काय छोटी सृष्टी बरोब्बर सहाच्या ठोक्याला जागी व्हायची..त्यामुळे रोज पहाटे पाच वाजता सुरू होणारा माझा दिवस रात्री अकरा वाजता संपायचा. पण या सगळ्या धावपळीत, कामांच्या रामरगाड्यात सुद्धा एक गोष्ट मी अगदी कटाक्षानी पाळत होते..... जास्तीत जास्त वेळ सृष्टी बरोबर घालवत होते. ती जागी असताना तिच्याशी खेळता यावं, तिच्या बाल लीला बघता याव्या म्हणून - ती जेव्हा जेव्हा झोपायची तेव्हा मी घरातली सगळी आवश्यक कामं उरकून घेत होते. तिचं पहिल्यांदा पालथं होणं, ऐश्वर्याचा आवाज ऐकल्यावर तिचं तोंडभरून हसणं, तिचं असंबद्ध आवाज काढत स्वतःशीच गप्पा मारणं , तिचं ते लगबगीनी रांगत येणं.... सगळं सगळं मी एन्जॉय करत होते. कारण मला माहित होतं की हे सगळे आनंदाचे , समाधानाचे क्षण आता माझ्या आयुष्यात परत येणार नव्हते.. आपल्या बाळाला असं आपल्या डोळ्यांसमोर मोठं होताना बघायची ही शेवटची संधी होती माझ्याकडे ! आणि म्हणूनच मला त्यातला एकही क्षण गमवायचा नव्हता.. खरं म्हणजे अजूनही एक कारण होतं यामागे- सृष्टीचं हे बालपण नितीनला बघता येत नव्हतं ; पण प्रत्यक्ष जरी शक्य नसलं तरी निदान नंतर माझ्या तोंडून तरी ते त्याला अनुभवता यावं म्हणून मी सगळं काही बघून डोळ्यांत आणि मनात साठवून घेत होते. नंतर त्याला सगळं सांगता यावं म्हणून!

सुरुवातीच्या काही महिन्यात मी सृष्टीआणि ऐश्वर्याला घेऊन माझ्या कार मधून आमच्या आर्मी एरिया मधे जात होते. ऐश्वर्या च्या शाळेत parent teacher meetings करता, कधी तिच्या स्पोर्ट्स डे करता, कधी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधे ! कारच्या मागच्या सीटवर ऐश्वर्या सृष्टीला मांडीवर घेऊन बसायची आणि मग अगदी हळू 30 च्या स्पीडनी आमची तिघींची सवारी निघायची. पण जेव्हा सृष्टीनी रांगायला सुरुवात केली तेव्हापासून आमची ही कार मधली outings बंद झाली. कारण आता तिला कंट्रोल करणं ऐश्वर्याला शक्य नव्हतं..ती सुद्धा जेमतेम साडेपाच सहा वर्षांचीच तर होती!

अशीच एकदा ऐश्वर्याच्या शाळेत जायची वेळ आली. तिची शाळा तशी जवळच होती.. चालत गेलं तर दहा पंधरा मिनिटांच्या अंतरावर . सृष्टीला तिच्या pram मधे ठेवलं आणि आम्ही निघालो. कॅन्टोन्मेंटस मधे शहरातल्या सारखा ट्रॅफिक नसतो. रस्ते जवळजवळ रिकामेच असतात. त्यामुळे pram घेऊन चालत जाणं शक्य होतं. एकीकडे सृष्टीशी गप्पा मारत आम्ही शाळेच्या ऑफिसमधे पोचलो. आमचं ते छोटंसं कॅन्टोन्मेंट आणि त्यातली ती छोटीशी शाळा- त्यामुळे सगळेच सगळ्यांना ओळखत होते. मी जोपर्यंत शाळेची फी भरायचं काम करत होते तोपर्यंत ऑफिसमधले clerks एकीकडे सृष्टीशी बोबड्या गप्पा मारत बसले होते. माझं काम झालं आणि मी निघाले; तेवढ्यात तिथली साफसफाई करणारी एक आया आली. तिनी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या ऐश्वर्या कडे बघितलं, आणि मग pram मधल्या सृष्टीकडे बघत मला विचारलं,"लडका है या लडकी?" माझं "लडकी है" हे उत्तर ऐकून ती म्हणाली," अरे मेमसाब...दुसरी भी लडकी ? पहले पता नहीं करवाया क्या?" मला तिच्या बोलण्याचा रोख कळत होता. आणि मी तिला चांगलं सुनवायचं ठरवलं होतं. पण ती नक्की काय म्हणतीये ते मला ऐकायचं होतं. म्हणून मी तिला विचारलं," उससे क्या फरक पडता है?" त्यावर ती म्हणाली," पहले पता चलता तो सफाई करवा लेते।" तिचं हे वाक्य ऐकलं आणि माझ्या काळजात चर्र् झालं... एकदम वाटलं की सृष्टीला तिच्या नजरेपासून लांब ठेवावं....एकाच वेळी मनात राग,धास्ती, काळजी, मनस्ताप, तगमग अशा खूप सगळ्या भावनांनी गर्दी केली. खूप काही ऐकवावंसं वाटत होतं तिला.. पण सृष्टीला कडेवर घेत तिला एकच वाक्य म्हणाले -" अगर आपकी माँ भी ऐसेही सोचती तो आज आप यहाँ नहीं होती।"

पुढच्या क्षणी दोघी मुलींना घेऊन तिथून बाहेर पडले. तिची सावली पण पडू नये दोघींवर असं वाटत होतं मला. जीवाचा नुसता संताप होत होता.बाहेर आल्यावर सृष्टीला परत pram मधे ठेवलं आणि ऐश्वर्याचा हात घट्ट धरून दुसऱ्या हातानी pram ढकलत मी घरी जायला निघाले. कधी एकदा मुलींना घराच्या सुरक्षित वातावरणात घेऊन जाते असं झालं होतं. पण का कोण जाणे , काही मिनिटांतच सृष्टीनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. कडेवर घेतलं, थोपटून शांत करायचा प्रयत्न केला. ऐश्वर्यानी तिला खेळवण्याचा प्रयत्न केला ; पण काही केल्या गप्प होईना. आता माझ्या मनात हळूहळू एक अनामिक भीती घर करायला लागली होती. घाईघाईत कसंबसं घर गाठलं. तोपर्यंत रडून रडून सृष्टी इतकी दमली होती की काही मिनिटांत झोपली असती.पण घरात शिरल्यावर तिला जागं केलं आणि सगळ्यात आधी तिची दृष्ट काढली. तिला देवाचा अंगारा लावला.. या सगळ्याची गरज होती का; किंवा त्याचा काही फायदा होणार होता का हे सगळं मला नाही माहित. पण या सगळ्यामुळे त्यावेळच्या माझ्या हादरलेल्या मनाला आधार मिळाला हे नक्की !

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

मुलं दृष्टावतात हे पाहीलं आहे. खरंतर खूप असा विश्वास नाही पण कधीकधी मान्य करायला लागतं

असल्या मुर्ख लोकांच्या मुक्ताफळांचा अनुभव मी पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर घेतला आहे. त्या काळात आधीच शरीरात बरेच हार्मोनल बदल सुरू असल्याने मन खुप हळवे झालेले असते त्यात अशी माणसं भेटतात कधी कधी....
दृष्ट लागते मुलांना यावर माझा पण विश्वास बसायला लागला आहे. समोरच्या व्यक्तीची निगेटिव्ह energy याला कारणीभुत असते.

आई .... या नात्याला दुसरा शब्द नाही.... आमचा पण असाच अनुभव आहे.... काही माणसे दिसली की रडारड सुरू... पाणी ठेवून हनुमान भीमरूपी म्हणून ... दिले की शांत...होतात

गाथेतलं हे प्रकरण पण आवडलं. शेवटची घटना खरंच इरिटेटिंग आणि नकोशी आहे.

बाळ मांडीत का? तेव्हा बेबीसाठी कार सीट नसायचे का? खूप वर्षांपूर्वीच्या घटना आहेत का?
सहज कुतूहल म्हणून विचारते आहे, बाकी उद्देश नाही.

सगळ्यात आधी तिची दृष्ट काढली. तिला देवाचा अंगारा लावला.. या सगळ्याची गरज होती का; किंवा त्याचा काही फायदा होणार होता का हे सगळं मला नाही माहित. पण या सगळ्यामुळे त्यावेळच्या माझ्या हादरलेल्या मनाला आधार मिळाला हे नक्की !>>>> होय हे आपल्यातल्या आईने केल.भले ती अंधश्रद्धा असो.ती त्यावेळी दिलासा देते.वेळ निभावून नेते.

प्रकाश जी आपण एक सरळ, साधे व योग्य विचार करणारे व्यक्ती आहात. पण आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यादरम्यान लोलकासारखेच अडकले आहात असे राहून राहून वाटते.

पण आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यादरम्यान लोलकासारखेच अडकले आहात असे राहून राहून वाटते.>> यातून पुरेसे स्पष्ट होत नाही. हा माझ्या लेखनाचा प्रांत आहे हे बरोबर. पण २ आठवडे १ दिवसात हे मत? Happy

प्रकाश जी कोणत्याही विषयाची गाडी शंटींग करून श्रद्धा, अंधश्रद्धेच्या रुळावरून धावायला लावताना तुम्हाला अनेकदा बघतो.
माझ्या आयडीचे वय म्हणजे हिमनगाचा दिसणारा काही मिलीमीटर भाग आहे.

प्रकाश जी कोणत्याही विषयाची गाडी शंटींग करून श्रद्धा, अंधश्रद्धेच्या रुळावरून धावायला लावताना तुम्हाला अनेकदा बघतो.>>> वरचा नमूद प्रसंग हा थेट श्रद्धेशी संबंधीत आहे म्हणून हे भाष्य. शिवाय धागालेखक अजून त्यावर काही भाष्य करु शकतो म्हणुन प्रतिक्रिया. तसेच अनेक विषय हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तुमच्या श्रद्धा समजुती यांच्याशी निगडीत असतात. त्याचा उल्लेख केला की प्रतिक्रियातून कदाचित नवा पैलू यावर मिळू शकतो. ही शक्यता असते.ती मला आजमावायची असते.
माझ्या आयडीचे वय म्हणजे हिमनगाचा दिसणारा काही मिलीमीटर भाग आहे.>>> हो तसेच असण्याची शक्यता पडताळून पहायची होती म्हणून जाणीव पुर्वक उल्लेख. पण एखादेवेळी खरेच एखादी नवीन व्यक्ती असू शकते. डू आयड्या हा स्वतंत्र तापदायक विषय आहे.

उदय, मीरा आणि घाटपांडे यांचे प्रतिसाद दिसल्याने लेख (वरवर) वाचला.
लेखकाने एम्पथेटिक असावे अशी अपेक्षा असते. तर वरचाच प्रसंग 'त्या साफसफाई करणाऱ्या महिला'च्या दृष्टिकोनातून लिहता येईल का?

तर वरचाच प्रसंग 'त्या साफसफाई करणाऱ्या महिला'च्या दृष्टिकोनातून लिहता येईल का?>>> कथानकाचा भाग म्हणून नाहि पण विश्लेषण म्हणून वेगळा लिहिता येईल. किंवा त्या प्रसंगाकडे आज आपण कोणत्या दृष्टीने पहातो ते लिहिता येईल.

निमिता, माझ्या मुलीने संज्ञाने अलिकडेच आर्मी ऒफिसरशी लग्न केले. ती आता पंजाबला तिब्री कॆंटोन्मेंट मधे आहे.मध्यंतरी आम्ही तिच्याकडे जाउन आलो. तीही कधी कधी लिहिते. तिचा ब्लॊग http://soudnya.blogspot.com/
तुमचे लेखन तिलाही आवडेल.माझा कथा कादंबर्‍या ललित वगैरे कडे कल फारसा नसतो. त्यामुळे फार वाचत नाही. माझे आपले श्रध्दा ज्योतिष विवेकवाद समाज वगैरे विषय असतात.
तुम्हाला लेखनाला शुभेच्छा

ती आता पंजाबला तिब्री कॆंटोन्मेंट मधे आहे>> अरे वा हो का? ग्रेट ब्लॉग फॉलो करेन. मी तिब्री कँट ला गेले आहे. भाचा तेव्हा बाळ होता. मागच्या दारात दोरी लावून खूप सारे बारके बेबी पायजमे वाळत पडले होते. गुरु दास पूर चौक भागा त कपडे, पाकिस्तानी सूट मटेरिअल , लेसेस बटन्स खूप मस्त मिळतात. तसेच ताजे सामोसे पन.

ऑफिसरच्या पत्नी खूपच प्रोटे क्टेड सुरक्षित जीवन जगतात त्यांना सिवीलिअन त्यात काश्मिरी जनतेचे प्रश्न फारसे कक्षेत येत नसावेत.

हो विश्लेषण म्हणून किंवा त्या प्रसंगाकडे आज आपण कोणत्या दृष्टीने पहातो म्हणून लिहता येऊ शकते.
पण मी तिलाच निवेदक करण्याबद्दल बोलत होते.

> ऑफिसरच्या पत्नी खूपच प्रोटे क्टेड सुरक्षित जीवन जगतात त्यांना सिवीलिअन त्यात काश्मिरी जनतेचे प्रश्न फारसे कक्षेत येत नसावेत. > खरंय.

कचरा उचलणाऱ्या बाईला कधी वाचता आल्या असतील फुलं वेचणाऱ्या कविता?
कचरा उचलणाऱ्या बाईला कधी मनसोक्त हुंगता आला असेल जाई जुई चाफा केवडा रातराणी गुलाब मोगरा?
कचरा उचलणाऱ्या बाईला कधी हरवून जाता आलं असेल भवतालापलिकडे सणासुदिच्या आनंदी दरवळीत?
कचरा उचलणाऱ्या बाईला काय नेमकं वाटत असेल पॉंड्स, एक्स, लक्स आणि डव्हची सुगंधी हायफाय एचडी जाहिरात बघताना?
कचरा उचलणाऱ्या बाईला भरून घेता येत असेल फुफ्फुसांत एयर फ्रेशनर मारलेला मंद झिंग देणारा कॉस्मोपॉलिटियन आसमंत?
कचरा उचलणाऱ्या बाईला तिच्या पुरुषाच्या मिठीत शिरताना घेता येत असेल त्याच्या छातीचा बेदरकार बेफिकीर बंडखोर वास?
तिला सहजपणे आठवू शकत असतील तेव्हा पॅशनेट स्पर्शाची बॉलिवूडमधली नवीजुनी रोमँस खच्चून उधळणारी शेकडो गाणी?
पुरुषाच्या पाठीवर तिची जगण्याशी आणि कचऱ्याच्या सडण्याशी दररोज भिडणारी बोटं रुतवताना उमटत असेल तिच्या झडत चाललेल्या सर्वांगावर शहारा?
कचरा उचलणाऱ्या बाईला ती पोरसवदा अल्लड वयात असताना कधी वाटलं असेल गर्द झाडाच्या सावलीखाली झोका घेताना कि झोके संपल्यावर, झाडं तुटल्यावर, सावल्या मेल्यावर उचलावी लागेल तिला ही कुजलेल्या गचाळ दुनियेची अजस्त्र दलदल आणि घाण?
कचरा उचलणाऱ्या बाईला काय वाटत असेल ‘प्रत्येक श्रमाला सारखीच प्रतिष्ठा असते’ हा दळभद्री सुविचार वाचताना?
तिने केला असेल कधी खोलात सखोल विचार श्रम, श्रमाचा मोबदला आणि प्रतिष्ठा ह्यांच्या विषम भांडवलशाही गुणोत्तरचा?
कचरा उचलणाऱ्या बाईला कधी वाटत असेल उभं राहावं आपणही ऐटीत सोसायटीच्या लिफ्टच्या आतल्या चकाचक स्टीलच्या दांड्यावर बिनधास्तपणे हात ठेवून, आरामात रेलुन, पर्समधून काढावा स्प्रे आणि फवारावा स्वतःवर आणि लक्झ्युरियस माहोलात अलगद किंवा स्प्रे नसलाच तर ठेवावी नाकाखाली तर्जनी आणि झोडावी इंग्लिशमध्ये ओह्ह फक डिस्गस्टिंग वाली उच्चभ्रू लोकांची हायक्लास शिवी?
कचरा उचलणाऱ्या बाईला कधी सांगावासा वाटला असेल इथल्या भारदस्त
चकचकीत इमारतींवर, मॉलवर, रस्त्यांवर, फाईव्ह स्टार हॉटेलांवर हात पुसून चुरगाळून फेकलेल्या बोळा बोळा झालेल्या कुजलेल्या टिश्यूपेपरइतकाही निर्विवाद हक्क?
कचरा उचलणाऱ्या बाईला, फक्त सोलून काढावी वाटत असेल स्पर्शाची संवेदना, कापून ठेचून टाकावं वाटत असेल आपलं नाक, किंवा चिरडून टाकावीशी वाटत असतील फुफ्फुसं किंवा फक्त आणि फक्त लावावीशी वाटत असेल समग्र दुनियेला आरपार आग.
– मयूर लंकेश्वर