खय्याम ... एक आदरांजली

Submitted by अमर विश्वास on 21 August, 2019 - 05:03

खय्याम ... एक आदरांजली

जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर के जीते हैं
जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

पडद्यावर राज च्या मिठीत हुंदके देणारी मला सिन्हा ... जणू आपल्या स्वत:लाच समजावणारा... भविष्याचे आशादायी चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा राज कपूर , साहिर चे बोचरे शब्द .. मुकेश चा आवाज ... यासगळ्याला संगीतही तसेच तोलामोलाचे हवे. खय्याम या कसोटीवर पुरेपूर उताराला. संपूर्ण गाण्यात कुठेवी तालवाद्य नाहीत. कारण तालावर ठेका धरायची ही वेळच नाही. ही वेदना खय्याम यांने आपल्या संगीतात अचूक पकडली. नवोदित खय्याम यांना चित्रपट सृष्टीत नाव मिळवून दिले ते याच चित्रपटाने.

खय्यामच संगीत असच पडद्यावरचा भावनांना पूरक असायचं... भावसमाधी लावणार.. मग ते शंकर हुसेन मधला लताच “आप यूं फासलोंसे गुजरते रहे” असो किंवा लता रफीच सिमटी हुई ये घडीयां असो...
बहारो मेरा जीवन भी सवारों मध्ये बहारों नंतर पॉज घ्यावा तो खय्यामनीच

रझिया सुलतान या चित्रपटातील हे गाणं .. ऐ दिले नादाँ .. खरतर आधीचा चित्रपट पाहून आपण पुरेसे वैतागलेले असतो.. त्यात हे गाणं संपता संपत नाही .. लताच्या "ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है" या ओळींनंतर अचानक सर्व वाद्ये थांबतात.. संपूर्ण शांतता पसरते... संपूर्ण पडदा व्यापून टाकणारे वाळवंट .. ह्या शांततेला चिरत लताचा आवाज हलवून जातो ... ये ज़मीं चुप है आसमाँ चुप है... कॅमेरा निळ्या आकाशाला गवसणी घालतो ... फिर ये धाडकनसी चार सू क्या है ... वाद्य परत वाजू लागलेली असतात... गाण्याने पुन्हा आपली लय पकडलेली असते. हाच तो खय्याम टच

कभी कभी ... यश चोप्रांचा मॅग्नम ऑपस ... दोन पिढ्यांची कहाणी.. एकीकडे ऋषी-नितु या जोडीसाठी रोमँटिक गाणी तर दुसरीकडे अमिताभ राखी शशी हा त्रिकोण.. एकीकडे "तेरे चेहरेसे नज़र नही हटती" किंवा "प्यार कर लिया तो क्या प्यार है खता नही" अशी उडत्या चालीची गाणी तर दुसरी कडे "कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है" हे गाणं ... या सगळ्यावर कळस म्हणजे "मैं पल दो पल का शायर हूँ" ... यात अमिताभ साठी चक्क मुकेशचा आवाज वापरला होता.. हे गाणं पडद्यावर बघताना ही निवड किती योग्य होती हे जाणवते .. हाच तो खय्याम टच. ह्याच चित्रपटासाठी खय्याम ना पहिले फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते.

उमराव जान ... या चित्रपटाशिवाय खय्याम यांचा सांगीतिक प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. आशाताईंनी अजरामर केलेली उमरावजान ची गाणी तर आहेतच .. पण गुलाम मुस्तफा खाँसाहेबांनी गायलेली रागमाला जरूर ऐका (आमिरनं ते उमरावजान हा कायापालट ह्याच गाण्यात होतो)
पण या सगळ्यावर कळस म्हणजे "जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें " हे गाणं .. तलत अझिझ चा गंभीर आवाज योग्य परिणाम साधतो ... परत एकदा खय्याम टच

अशी अनेक गाणी आहेत ... खय्याम साहेबांनी आपल्यासाठी मागे सोडलेली

..... आदरांजली .......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

करोगे याद तो हर बात याद आएगी
गुजरते वक्त कि हर मौज ठहेर जाएगी

बशर नवाज यांची ही रचना खय्यामजींनी वापरली होती बाज़ार चित्रपटासाठी

सत्तरीतल्या दशकातला उत्तरार्ध आणि ऐंशी च्या दशकाचा पुर्वार्ध यामधली खय्याम यांची गाणी मला खास आवडतात.
थोडी सी बेवफाई, नुरी, बाजार, कभी कभी, रझिया सुलतान, आहिस्ता आहिस्ता, त्रिशुल, शंकर हुसेन, खानदान, दर्द वगैरे चित्रपटातली काही गाणी खुप आवडतात.
आदरांजली...

छान लेख.

हिंदी चित्रपटांत शक्यतो गीतकाराचे नाव गीतात ठवले जात नाही. मात्र, बाजार चित्रपटातील फिर छिडी रात बात फूलों की या गझलेत शायर मोहिद्दीन मखदूम यांचे नाव ठेवत खय्याम यांनी जुनी प्रथा मोडली.
सौजन्य : मटा

खय्याम साहेबांचं हे एक माझ्या आवडिचं गाणं, त्यांच्याच सौ. च्या आवाजात. तुम अपना रंज-ओ-गम... >>> + ११ माझपण आवडत गाणं.

१. हज़ार राहें, मुड़के देखीं
कहीं से कोई सदा ना आई

बड़ी वफ़ा से, निभाई तुमने
हमारी थोड़ी सी बेवफ़ाई ... +++१११ हे गाणे माझे ही प्रचन्ड आवडीचे!

wo subah kabhi to aayegi…
chino arab hamara hindosta hamara..
kaheen ek masoom najuksi ladaki…
jeet hi lenge bazi hum tum..
theheriye hosh mein aaoon to chale jayiyega

अत्यंत अत्यंत आवडते संगीतकार. खूप वाईट वाटले पण या प्रतिभावान कलाकाराला उदंड आयुष्य लाभले त्याचा आनंदही वाटतोय कारण त्यामुळे आपल्याला अजरामर गाण्यांची ठेव मिळाली, नाहीतर किती असामान्य कलाकार आपल्याला अकाली सोडुन गेले आहेत.

त्यांचं बहुतेक जरासं कमी गाजलेलं रझिया सुलतान मधले ‘आयी जंजीर की झंकार‘ हे गाणं त्या गायकाच्या नेहमीपेक्षा वेगळ्या आवाजाने व मधल्या संगीताने अप्रतिम झालं आहे. पण साऊंड सिस्टीमवर ऐकायला हवे म्हणजे त्यातली भव्यता कळते. त्यातलेच ‘जलता है बदन‘ पण सुंदर आहे.
‘उमराव जान‘ मधले ‘यह क्या जगह‘ तर ऐकुच शकत नाही इतके रडायला येते , खास करुन ‘बुला रहा है कोई‘ या ओळींवर. कळत नाही हे संगीतामुळे होते की आशाच्या आवाजातल्या वेदनेमुळे की आपल्या रेखामुळे... पण काय गाणंय ते!

सुनिधी, जंजीर की झंकार चा गायक कब्बन मिर्झा. आकाशवाणी (विविधभाहोते)?) अनाउन्सर होते. त्या कॅरॅक्टरसाठी (हब्शी) सूट होणारा आवाज शोधायला असंख्य लोकांची ऑडिशन घेतली आणि कोणी पसंत पडलं नाही. मग योगायोगाने कब्बन मिर्झाची निवड झाली.

यह क्या जगह है, बद्दल +१. अग दी असंच म ला जूस्तजू जिसकी थी ..बद्दलही वाटतं.

त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचं काव्यही अतिशय सुंदर असतं.

बेगम अख्तरच्या सर्वाधिक गाजलेल्या गझला - ये न थी हमारी किस्मत, ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे, दीवा ना बनाना है तो इत्यादींचं संगीतही त्यांनी केलं होतं.
मीनाकुमारी च्या गझला आणि नझ्मांचा अल्बम I write, I recite यातही खय्यामचं संगीत आहे.

थँक्स भरत. माहिती नव्हते. काय आवाज आहे तो.. वा!
खरं आहे. उमराव जान हे गणित वेगळंच होतं. त्यातलं सगळंच चांगलंय.
तो अल्बम ऐकला नाही कधी. शोधते.

छान लेख.. आणि मस्त आठवण.
लाँग लिव खैय्याम. खैय्याम म्हणजे रझिया सुलतान आणि ऊमराव जान आणि ऊलट असेच समीकरण डोक्यात फिट्ट आहे.

सुनिधी, जंजीर की झंकार चा गायक कब्बन मिर्झा. आकाशवाणी (विविधभाहोते)?) अनाउन्सर होते. त्या कॅरॅक्टरसाठी (हब्शी) सूट होणारा आवाज शोधायला असंख्य लोकांची ऑडिशन घेतली आणि कोणी पसंत पडलं नाही. मग योगायोगाने कब्बन मिर्झाची निवड झाली. >> भरत मी असेही ऐकले आहे की ह्या गाण्यासाठी अमरोहींनी अनेक मातब्बर गायकांची ऑडिशन्स फेल केली. कैक महिन्यानंतर (र.सु. चे शुटिंग बरेच महिने चालले होते) कब्बन मिर्झांच्या आवाजातले रेकॉर्डींग त्यांनी ऐकल्यावर त्यांच्या आवाजाच ध्यास घेत अमरोहींनी मिर्झांना शोधण्यासाठी मुंब्राचे स्लम्स पालथे घातले. मिर्झा आकाशवाणीच्या पटलावरून नाहीसे झाले होते आणि पर्सनल जीवन जगत होते. त्यांच्या कॅन्सरचे निदान ह्या गाण्याआधीचे की नंतरचे हे आणि मिर्झांना सापडण्यात अमरोही बरोबर खैय्याम पण होते का ते नक्की आठवत नाही.

कब्बन मिर्झांच्या आवाजाच्या शोधाबद्दल वाचुन काटाच येतोय अंगावर. आता कळतंय या आवाजाची व गाण्याची भूल का आहे? आणि तरीही एकदाही त्यांच्याबद्दल गुगल केले नाही याची खंत. थँक्स भरत आणि हायझेनबर्ग.

>> कब्बन मिर्झां

क्या बात... एका अनोख्या कलाकाराविषयी माहिती मिळाली. रझिया सुलतान मधली त्यांनी गायिलेली गाणी. या दोन ठिकाणी चांगल्या प्रती मध्ये ऐकायला मिळतात. खरेच. खूप सुंदर अनुभव आहे. पूर्वी ऐकली नव्हती हि गाणी. धन्यवाद.

१. आयी जंजीर की झंकार
२. तेरा हिज्र मेरा नसीब है

हे अजून एक दुर्मिळ गाणे:
https://www.youtube.com/watch?v=HDLlU3byRNs

आकाशवाणीवरचे एक दुर्मिळ रेकॉर्डिंग:
https://www.youtube.com/watch?v=M9JwIxq__g8

त्यांच्याविषयी अतिशय रोचक माहिती इथे वाचायला मिळते (या आर्टिकलनुसार त्यांचा मृत्यू २००३ साली झाला):
https://navbharattimes.indiatimes.com/lknuwa/articleshow/51162566.cms

कब्बन मिर्झा हे शायर देखिल होते का? कुठेतरी वाचल्याचं पुसट स्मरतंय.

खय्याम साहेंबांचं सर्वात मोठ्ठं वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी ऑरकेस्ट्रेशनचा वापर. ठरविक लयीत वाजणारं चर्मवाद्य ही त्यांची सिग्नेचर म्हणावी लागेल.

' हजार राहे..' या गाण्यमधील व्हायोलीनच्या व्हायोलीनच्या सुयोग्य वापरासाठी सी. रामचंद्रांनी खय्याम साहेबांचे फोन करुन कौतुक केले होते अशीही एक आठवण वाचली होती.

लेख वाचले. पुन्हा धन्यवाद. दैवदुर्विलास... असा आवाज कर्करोगाने काढुन घ्यावा?? नियतीचे विचित्र खेळ.