पुष्पक

Submitted by झुलेलाल on 20 August, 2019 - 02:19

रीपोस्ट... सहज!

भगवान ब्रह्मदेवास एकदा घाईघाईने पृथ्वीवर जायचे होते. एका पुण्यात्म्याच्या महानिर्वाणाचा मुहूर्त जवळ येत होता, त्याला सन्मानाने स्वर्गलोकी आणण्याचे काम इंद्रदेवाने ब्रह्मावर सोपविले होते.
सारी तयारी करून ब्रह्मदेव विमानतळावर आले. पुष्पक तेथे सज्जच होते. ब्रह्मदेव विमानात बसले आणि सारथ्याने पुष्पकाची आरंभकळ दाबली. पण दुर्दैव. विमान सुरू झालेच नाही. गरूडही गप्प उभा होता. चालकाने पुन्हा प्रयत्न केला. तोही फसला. खूप वेळा प्रयत्न करूनही पुष्पक स्टार्ट होत नसल्याने वैमानिक हताश झाला. ब्रह्मदेवही काळजात पडले.. मुहूर्त तर जवळ येऊन ठेपला होता.
विमानतळाच्या बाजूच्याच वाटेने एक मानव स्वर्गाच्या दिशेने चालत होता. नुकतेच त्याचा स्वर्गवास सुरू होणार होता. तो कुतूहलाने चिंतातुर ब्रह्मदेव आणि हताश, दमलेल्या वैमानिकाकडे पाहात होता.
अखेर त्याला देवाची दया आली.
पुण्यात्माच तो!... तो ब्रह्मदेवाजवळ गेला आणि भक्तिभावाने प्रणाम करून त्याने विचारले, ‘भगवन, आपली अनुमती असेल तर मी एकवार प्रयत्न करून पाहू?’
ब्रह्मदेवाने अगोदर त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले. जे स्वर्गलोकीच्या प्रशिक्षित अनुभवी अभियंता वैमानिकास जमले नाही ते हा य:कश्चित मानव काय करणार’ असा विचारही त्याच्या मनात आला. पण अगोदरच हताश असल्याने, प्रयत्नाची संधी देण्यास काय हरकत आहे असा विचार करून त्याने त्या मानवास अनुमती दिली.
तो मनुष्य पुष्पक विमानाजवळ गेला. निरखून पाहात त्याने एक प्रदक्षिणा घातली, व डाव्या बाजूस उभा राहिला. .. मग त्याने वैमानिकासही खाली उतरावयास सांगितले.
दोघांनीही मिळून, गरुडास पंख पसरण्याचे आवाहन केले. गरुडाने काहीसे नाखुशीनेच पंख पसरताच, पृथ्वीवरून आलेल्या त्या माणसाने डावा पंख पाय देऊन जोराने खाली दाबला.
पाठीवरचे विमान डावीकडे झुकवून दोन मिनिटांनी त्याने आपला पाय उचलला व वैमानिकास आरंभकळ दाबण्यास सांगितले.
आणि काय आश्चर्य?... विमान चक्क सुरू झाले होते.
ब्रह्मदेवाने आश्चर्याने डोळे विस्फारून तोंडातही बोट घातले होते.
‘हे मानवा, तू कोण आहेस? कोठून आलास? तुला हे अवघड काम सहज कसे साधले?’ अचंबित ब्रह्माने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, आणि तो माणूस लाजला.
‘ब्रह्मन, मी पुण्याचा असून पूर्वी पुष्पक स्कूटरमध्येच अभियंता होतो...’ तो नम्रतेने म्हणाला.
ब्रह्मदेवाने त्यास आदरपूर्वक प्रणाम केला व पुष्पकाने पृथ्वीच्या दिशेने झेप घेतली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अवांतर:
अमेरिकेने अग्निबाण बनवला , अनेक देशांच्या लोकांना, शास्त्रज्ञांना उड्डाण पहायला आमंत्रित केले होते. काऊंटडाऊन सुरू झालं. पाच चार तीन दोन एक... फस्स. अग्निबाण उडाला नाही. अमेरिकन शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केले पण सक्सेस नाही. रशिया.. चीन.. जपानी शास्त्रज्ञांनी हात टेकले. भारतातून शर्मा नावाचा एक प्रेक्षक म्हणून गेला होता. तो पुढे जाऊन म्हणाला मी उडवून दाखवतो. रॉकेट को राईट मे ४५ डिग्री घुमाव, नही नही लेफ्ट मे झुकाव. अमेरिकन लोकांनी तसे केले. अब सिधा करो. काउंटडाऊन स्टार्ट करो. चार, तीन, दोन..एक.. बु...म आवाज करत अग्निबाण अवकाशात झेपावला.
सगळे शास्त्रज्ञ, पत्रकार पळत शर्माकडे आले. आपने ये कैसा कर दिया? शर्मा म्हणाला " उसमे क्या खास बात है? हमारे इंडिया में स्कुटर ऐसाही चालू होता हैं."