रामनुजाचार्य - भाग १

Submitted by दासानु दास on 30 July, 2018 - 07:13

एक हजार वर्षांपूर्वीपर्यंत श्री संप्रदायात अनेक महान भक्त होऊन गेले, ज्यांपैकी ११ भक्तांना एक विषेश स्थान आहे. या अकरा भक्तांना सामुहिकरित्या अलवार म्हणून ओळखले जाते. अलवारांनंतरही श्री संप्रदायात अनेक महान भक्त झाले ज्यांच्यापैकी एक होते, श्री नाथमुनी. नाथमुनी, श्री विष्णूंचे अत्यंत शुद्ध भक्त होते, आणि त्याचबरोबर अष्टांग योगामध्येही ते अत्यंत प्रविण होते, अनेक प्रकारच्या योगसिद्धी त्यांच्याजवळ होत्या. त्यांनी खूप परिश्रम करून आणि विद्वत्तेने श्री संप्रदायाच्या सर्व सिद्धांतांना एका ठिकाणी संग्रहित केले. सर्व अलवारांनी तामिळ भाषेत अनेक प्रार्थना लिहिल्या होत्या, ज्या नाथमुनींनी एका ठिकाणी संग्रहित केल्या. याच संग्रहाला पुढे जाऊन दिव्य-प्रबंधम नावाने संबोधित केले गेले. काही लोक याच संग्रहाला तामिळ भाषेतील वेद म्हणूनही ओळखतात. आपण सर्वच जाणतो, की वेद संस्कृत भाषेत आहेत, परंतू वेदांचे सार आहे, कृष्णभक्ती. आणि सर्व अलवारांनी त्यांच्या हृदयातील भक्ती या प्रार्थनांद्वारे प्रकट केली. इतिहासात नाथमुनीच असे प्रथम भक्त होते, ज्यांनी तामिळ वेद आणि संस्कृत वेद दोघंही समोर ठेऊन लोकांना शिकवण दिली, जेणेकरून साधारण लोकांना वैदीक सिद्धांत सहजपणे समजणे सोपे होईल.

श्री संप्रदायाचे प्रमुख स्थान आहे, श्रीरंगम. येथेच भगवान श्री विष्णू, ज्यांना येथे श्री रंगनाथ नावाने संबोधित केले जाते, अनंत शेषावर शयन करतात. हा विग्रह खूप मोठा आहे, आणि त्याचबरोबर अत्यंत सुंदरही आहे. अनेक भक्त हजारो वर्षांपासून येथे श्री रंगनाथजींची सेवा करत आले आहेत, आजही येथे त्याच प्रकारे सेवा केली जाते. श्री नाथमुनी यांचेही वस्तव्य याच ठिकाणी होते, आणि त्यांनीही अनेक वर्ष श्री रंगनाथजींची सेवा केली, काही वर्ष तेच या मंदिराचे मठाधीश होते.

नाथमुनींचे एक पुत्र होते, ईश्वरमुनी. श्री ईश्वरमुनी सुद्धा अत्यंत पुण्यवान आणि विद्वान होते. एकदा ईश्वरमुनी आपली पत्नी, आई आणि वडिल सर्वांसमवेत तीर्थयात्रेला गेले होते. त्यांनी भारतातल्या अनेक तीर्थस्थानांचे भ्रमण केले. याच कालावधीत त्यांच्या पत्नीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. ईश्वरमुनींनी विचार केला, ‘आपण ईतक्या तीर्थस्थानांचे भ्रमण केले, परंतू सर्वांत दयाळू होते, व्रंदावनचे श्री कृष्ण.’ म्हणून त्यांनी वृंदावन आणि कृष्ण यांच्या अठवणीत, वृंदावनातील पवित्र नदी यमुनेच्या नावावरून आपल्या पुत्राचे नामकरण केले, यामुना.

असेच अनेक महिने गेले आणि अचानक एका आजाराने ईश्वरमुनी यांचा मृत्यू झाला. जेंव्हा नाथमुनींनी त्यांच्या तरूण मुलाचा मृत्यू पाहिला, त्यांना अत्यंत दु:ख झाले, त्यांना संसाराशी ईतकी विरक्ती झाली, की त्यांनी संन्यास आश्रम ग्रहण केले. याच कारणांस्तव बालपणी यामुनाचे पालण केवळ त्यांची आई आणि आजी यांनी केले. घरात कोणीच कर्ता पुरूष नसल्याकारणाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत यामुनांचे बालपण गेले.

जेंव्हा यामुना पाच वर्षांचे झाले, तेंव्हा त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी गुरूकुलात पाठवण्यात आले. त्या गुरूकुलातील गुरू होते, श्री भाष्याचार्य. श्री भाष्याचार्य अत्यंत विद्वान, नम्र आणि सर्व सद्गुणसंपन्न होते. बालक यामुना तेथे राहून वेदांचे अध्ययन करू लागले आणि काही दिवसांतच ते आपल्या गुरुचे प्रिय शिष्य बनले; कारण त्यांचाही स्वभाव अत्यंत नम्र आणि सौम्य होता. यामुनांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा, कधीच ते कुणाशीही भांडत नसत. त्याचबरोबर यामुना अभ्यासातही अत्यंत हुशार होते, केवळ एकदाच ऐकून त्यांना सहजपणे लक्षात राहत असे. भाष्याचार्य असा शिष्य प्राप्त करून अत्यंत खुश होते.

त्या काळात पांड्य वंशाचे राजा तेथील राज्यावर राज्य करत होते. दक्षिण भारतात त्या वेळी अनेक प्रसिद्ध राजघराणे होऊन गेले, जसे पांड्य, चोल ई. पांड्य राजाच्या दरबारात तेंव्हा एक पंडीत असायचे, जे खूप विद्वान होते. त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान होते, त्याचबरोबर त्यांची बुद्धीही अत्यंत कुशाग्र होती. ह्याच ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक पंडीतांना आणि ब्राह्मणांना शस्त्रार्थात हरविले होते. परंतू, असे अनेक वेळेस पहावयास मिळते, की जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त ज्ञान असेल आणि ती व्यक्ती भगवंतांची भक्त नसेल, तर तितकाच अहंकार त्या व्यक्तीत असतो. म्हणूनच जितके ज्ञान ह्या राजपंडितांकडे होते तितकाच त्यांना स्वत:च्या ज्ञानाचा अहंकारही होता. ते राजपंडीत राजाचे अत्यंत प्रिय होते. राजपंडीताने जणू राजाला वशीभूत करून ठेवले होते. हे राजपंडीत अनेक ठिकाणी जाऊन दुसर्या पंडीतांना शर्त्रार्थासाठी आवाहन करित असत आणि त्यांचा पराभव करून अपमानित करित असत. राजपंडिताने असा नियमही बनविला, की ज्या पंडीतांचा राजपंडीताकडून पराभव होईल, ते पंडीत दरवर्षी राजपंडीताला कर प्रदान करतील. राजानेही असा नियम बनविला, की जो ब्राह्मण किंवा पंडीत राजपंडीताला हरवू शकत नसेल, आणि करही देत नसेल, तर त्याला मृत्यूदंड देण्यात येईल. हा नियम ऐकून सारे ब्राह्मण घाबरले आणि सर्वांनी कर देण्यास सुरुवात केली. सारे विद्वान पंडीत या राजपंडीताला घाबरत असल्याने त्या राजपंडीताला विद्वाज्जन कोलाहल नावाने ओळखले जाऊ लागले. विद्वाज्जन कोलाहल म्हणजे, ज्यांच्यामुळे सर्व विद्वान पंडीतांत कोलाहल माजत असे. राजाला खूप अभिमान होता, की ‘माझ्या राजदरबारात असा विद्वान पंडीत आहे.’

एके दिवशी भाष्याचार्य काही कामानिमित्त आश्रमातून बाहेर गेले होते आणि अन्य विद्यार्थीसुद्धा त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. केवळ यामुना एकटेच आश्रमात होते, त्यावेळी ते केवळ १२ वर्षांचे बालक होते. त्याच वेळी विद्वाज्जन कोलाहल यांचा एक शिष्य कर वसूल करण्यासाठी भाष्याचार्यांच्या आश्रमात आला. भाष्याचार्यांनाही राजपंडीताने हरविले होते, आणि नियमानुसार भाष्याचार्यांनासुद्धा कर देणे बंधनकारक होते. परंतू गरिबीची परिस्थिती असल्याकारणाने सलग दोन वर्ष भाष्याचार्य कर देऊ शकले नव्हते. सलग दोन वर्ष कर न मिळाल्यामुळेच तो शिष्य तेथे आला होता. तो शिष्य यामुनांसमोर आला आणि अत्यंत अहंकाराने छाती फुगवून विचारू लागला, “कुठे आहेत भाष्याचार्य?”

यामुनांनी नम्रपणे आणि मधुर शब्दांत ऊत्तर दिले, “भाष्याचार्य जरा बाहेर गेले आहेत आणि त्यांचे अन्य शिष्यही काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत. मी तुमची काय सेवा करू शकतो? आणि जर आपली आज्ञा असेल, तर मी जाणू शकतो का, की आपण कोठून आला आहात आणि आपणांस कोणी पाठविले आहे?”

हे ऐकून तो शिष्य अहंकाराने क्रोधीत होऊन बोलू लागला, “काय? तुला हे सुद्धा माहिती नाही, की मी महान राजपंडीतांचा शिष्य आहे? आणि तुझे गुरू स्वत:ला काय समजतात? सलग दोन वर्षांपासून त्यांनी माझ्या गुरूंना कर प्रदान केलेला नाहीये. तुझ्या गुरूंना अहंकारामुळे असं वाटतंय का, की ते माझ्या गुरूंना हरवू शकतात? कर न देण्याचा अर्थ आहे, तो ब्राह्मण असे समजतो, की तो माझ्या गुरूंपेक्षा जास्त विद्वान आणि बुद्धीमान आहे.”

हे ऐकून यामुनांना खूप दु:ख झाले; कारण त्यांचे त्यांच्या गुरूवर खूप प्रेम होते. त्यांना हे सहन नाही झाले, की ईतक्या सज्जन, नम्र, विद्वान आणि सद्गुणांनी संपन्न भाष्याचार्यांची निंदा कोणी अश्या प्रकारे करतोय. यामुना जरी नम्र असले, तरी आपल्या गुरुच्या या अपमानाला ते सहन नाही करू शकले, आणि ते ऊत्तरले, “तुमचे गुरु मुर्ख आहेत आणि तुम्ही सुद्धा मुर्ख आहात; कारण एक मुर्ख गुरुच आपल्या शिष्याला ईतका अहंकारी बनवू शकतो. विद्या प्राप्त करण्याचे उद्देश्य आहे, की व्यक्तीने नम्र आणि सज्जन बनले पाहिजे. परंतू, तुम्हीच ईतके अहंकारी आहात, तर तुमचे गुरु किती मोठे अहंकारी असतील! त्यामुळे तुम्ही दोघे मुर्ख आहात. जा आणि जाऊन सांगा तुमच्या गुरुंना की, ‘भाष्याचार्यांचा एक शिष्य तुमच्याशी वाद करेल आणि तुम्हाला हरवेल.’”

जेंव्हा त्या शिष्याने हे ऐकले, त्याला विश्वास नाही झाला. तो विचार करु लागला, ‘हा बारा वर्षांचा लहान बालक, माझ्या गुरुंशी वाद करेल? आजपर्यंत अनेक महान पंडीत आले आणि गेले, परंतू एकही पंडीत माझ्या गुरुसमोर टिकू शकला नाही, आणि हा बालक माझ्या गुरुंना आवाहन करतोय?’ परंतू तो काही बोलू शकला नाही. तसाच क्रोधीत होऊन तो शिष्य माघारी गेला.

जेंव्हा त्या शिष्याने ही बातमी राजपंडीताला सांगितली, राजपंडीत केवळ हसत होते. ते म्हणाले, “येऊ दे त्या मुलाला, पाहून घेऊ!” परंतू राजा विचार करु लागला, ‘हा बारा वर्षांचा बालक साक्षात राजपंडीताला आवाहन करतोय?’ राजाने तपास करण्यासाठी त्यांचा एक दूत पाठविला. ‘हा मुलगा वेडा तर नाही ना? आणि खरंच तो आवाहन करू ईच्छीतो, की केवळ क्रोधाच्या आवेशात बोलून गेला?’ असे अनेक प्रश्न राजाला पडले होते.

राजदूत आश्रमात गेला तेंव्हा यामुना राजदूताला म्हणाले, “मी राजांच्या आज्ञेचे नक्कीच पालन करेल, जर राजा मला दरबारात बोलावतील तर मी नक्कीच येण्यास तैयार आहे. परंतू, कोलाहल एक राजपंडीत आहेत आणि मी राजपंडीतांना आवाहन केलंय म्हणून मलाही त्याच दर्जाचे स्थान मिळायला हवे. मी दरबारात येईल, परंतू त्याच थाटात, ज्या थाटात राजपंडीतांचे आगमन होते. मला नेण्यासाठी सुद्धा सुंदर पालखी, नोकर-चाकर, सैनिक सर्व यायला हवेत. जा सांगा हे सर्व राजांना.”

राजदूताने सर्व माहिती राजाला जशीच्या तशी सांगितली. राजा विचार करू लागला, ‘हा मुलगा खरंच खूप बुद्धीमान दिसतोय.’ राजाने त्यांच्या अन्य मंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला की, “यामुना जर राजपंडीताशी वाद करण्यास येत आहेत तर या सर्व मागण्यांची पूर्तता करणे योग्यच आहे.”

लगेचच यामुनांकरिता एका सोन्याच्या पालखीची व्यवस्था केली गेली. अनेक सैनिक, नोकर-चाकर वाजत गाजत यामुनांना आणण्याकरिता सज्ज झाले. संपूर्ण मदुरै शहरात ही बातमी पसरली आणि हाहाकार माजला, की राजपंडीताला एक लहान बालक आवाहन करतोय. त्याच वेळी भाष्याचार्य आश्रमात परतत होते आणि त्यांच्याही कानांपर्यंत ही बातमी पोहोचली. भाष्याचार्य तर मुळातून हादरले की, ‘माझा लहानसा शिष्य राजपंडीताशी कसा वाद करू शकेल? तसे तर राजा पुण्यवान आहेत परंतू या राजपंडीताच्या सांगण्यामुळे जर राजाने यामुनाला काही बरे-वाईट केले तर? मृत्यूदंड दिला तर?’ अश्या नको त्या शंका त्यांच्या डोक्यात येऊ लागल्या. लवकरात लवकर ते आश्रमात आले. त्यावेळी पालखी तेथेच होती, वाजा वाजत होता, आणि यामुनांनी आपल्या गुरुंना पाहिले. तात्काळ त्यांनी गुरुंना साष्टांग प्रणाम केला आणि म्हणाले, “गुरुदेव, तुमच्या कृपेने सर्व काही ठीक होईल, आपण अजिबात चिंता करू नका. तुमचं नाव मी पुन्हा एकदा स्वच्छ करेन; कारण तुमच्या प्रति राजपंडीताचा शिष्य अनेक अपशब्द बोलत होता.” हे ऐकून भाष्याचार्यांनी यामुनांना आलिंगण केले आणि त्यांना हृदयापासून अनेक आशिर्वाद दिले. केवळ भाष्याचार्यांनीच नाही, मदुरैतील सर्वच ब्राह्मणांनी यामुनांना आशिर्वाद दिला, “ज्या प्रकारे वामनदेवाने बली महाराजांचे सर्वस्व हरण केले, त्याच प्रमाणे आम्ही तुला आशिर्वाद देतो, आज तू सुद्धा राजपंडीताचा अहंकार नष्ट करशील.” त्यानंतर यामुना पालखीत बसले आणि तात्काळ त्यांची पालखी राजदरबाराकडे रवाना झाली.

आश्रमात हे सर्व चालू असताना राजदरबारातही राजा आणि राणी यांमध्ये चर्चा सुरु होती. राजा म्हणत होते, “ईतका लहान बालक, राजपंडीत कोलाहलशी वाद करेल? मला असे वाटतेय, की ज्या प्रमाणे एक मांजर उंदराशी थोडा वेळ क्रिडा करते आणि दुसर्याच क्षणी त्याला गिळंकृत करते, त्याचप्रमाणे कोलाहल त्या बालकाशी थोडा वेळ क्रिडा करतील आणि सहजपणे हरवतील.” परंतू राणी म्हणाली, “माझ्या मते, हा बालक केवळ एक साधारण बालक नाहीये. ज्याप्रमाणे एक छोटीशी ठिणगी कापसाच्या मोठ्या ढिगार्याला सुद्धा आग लावू शकते, त्याचप्रमाणे हा बालकसुद्धा कोलाहलच्या पर्वतासारख्या अहंकाराला चूर-चूर करेल.” हा सर्व संवाद राजदरबारात सर्वांसमोर चालला होता आणि कोलाहलसुद्धा सारा संवाद ऐकत होते. राणीचे मत ऐकून राजपंडीताला राग तर आलाच होता, परंतू त्याला राणीसमोर काहीच बोलणे शक्य नव्हते; म्हणून तो शांत होता.

आता राजा आणि राणी दोघांमध्ये मतभेद असल्याकारणाने त्यांना पैंज लावण्याची ईच्छा झाली. राणी राजाला म्हणाली, “जर आज हा बालक राजपंडीतासमोर शस्त्रार्थात परास्त झाला, तर मी आजीवन तुमच्या सर्व दासींची दासी बनून सेवा करेल.” राजाला तर हे ऐकून धक्काच बसला. राणीने खरेच खूप मोठी गोष्ट पणाला लावली होती. आता राजालाही काहीतरी करून राणीशी बरोबरी करणे भाग होते. मग राजाही आपल्या आसणावरून ऊठला आणि संपूर्ण राजदरबारात घोषणा केली, “जर आज या बालकाने राजपंडीत कोलाहल यांना शस्त्रार्थात परास्त केले, तर बक्षिस म्हणून माझे अर्धे राज्य मी त्या बालकाला प्रदान करेल.” राजा आणि राणी दोघांनीही मोठे डाव मांडले होते.

काही क्षणांतच मोठ्या थाटात यामुनांचे राजदरबारात आगमन झाले. यामुनाकडे पाहताच राजपंडीत त्यांच्या आसनावरून ऊठले आणि मोठ्या गर्वाने राणीकडे पाहून त्यांनी घोषणा केली, “आलबंदार! आलबंदार! आलबंदार!” तामिळ भाषेत आलबंदार म्हणजे, ज्याने सर्वांवर विजय प्राप्त केलाय. परंतू ही घोषणा राजपंडीताने केवळ राणी आणि यामुनांची गंमत करण्याकरिता केली होती. राणीने राजपंडीताकडे पाहीले आणि मनातल्या मनात म्हणाली, “हो! हा आलबंदारच आहे.” परंतू संपूर्ण दरबारासमोर राणीही काही बोलू शकली नाही.

सर्व औपचारिकता आटोपल्यानंतर यामुना आणि राजपंडित वाद करण्यासाठी समोरासमोर बसले, सगळीकडे एकदम शांतता पसरली. सर्व जणांचे कान केवळ या दोन पंडितांचे शब्द वेचण्यासाठी जणू आतुर होते. सर्व लोक हा विशेष संवाद सुरू होण्याची वाट पाहत होते. सुरूवात मात्र राजपंडीतांनीच केली. अनेक प्रकारचे प्रश्न ते यामुनांना विचारू लागले. व्याकरण, न्याय, वेदीक ज्ञान अश्या अनेक विषयांवरील प्रश्न यामुनांना विचारले जाऊ लागले. आधी थोडे सोपे प्रश्न विचारले गेले, आणि हळूहळू कठीण प्रश्न विचारले जाऊ लागले. परंतू जितके प्रश्न विचारले जात, त्या सर्व प्रश्नांचे बरोबर उत्तर यामुना सहजपणे आणि विद्वत्तेने देत होते.

अनेक प्रश्न झाल्यानंतर यामुना राजपंडीतांना म्हणाले, “हे विद्वान पंडित, ईतके सरळ प्रश्न विचारुन तर आपण माझा अपमान करित आहात. तुम्हाला माझे लहान शरीर पाहून असे वाटतेय का, की मी कठीण प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकणार? तुम्ही विसरता आहात, जेंव्हा अष्टावक्र ने जनक राजाच्या दरबारात दिग्विजय पंडिताला हरविले, तेंव्हा अष्टावक्र सुद्धा केवळ माझ्याच वयाचे होते. जर शरीरावरून विद्वत्ता ठरत असती, तर एखाद्या रेड्याला तुमच्यापेक्षा मोठा पंडित मानले गेले असते.” हे ऐकून दरबारातील सर्वच लोक हसू लागले. राजपंडीतांचा चेहरा तर हे ऐकून लाल झाला होता, परंतू त्यांना त्यांचा क्रोध आवरणे भाग होते.

कोलाहल म्हणाले, “जर तू स्वतःला ईतका मोठा पंडीत समजतोस, तर तू मला प्रश्न विचार.”

“ठीक आहे! मी आता तुमच्यासमोर तीन वाक्य बोलेल. त्या तीनही वाक्यांचे तुम्हाला खंडन करावे लागेल, म्हणजेच त्या तीनही वाक्यांना तुम्हाला चुकीचे सिद्ध करावे लागेल. जर तुम्ही माझ्या तीनही वाक्यांना चुकीचे सिद्ध केले, तर या शस्त्रार्थाचे विजयी तुम्ही असाल, परंतू जर तुम्ही माझ्या तीन वाक्यांचे खंडन नाही करू शकलात, तर मी विजयी असेन. मंजूर आहे?”

“ठीक आहे..” कोलाहल विचार करित होते, ‘काय विचारेल हा लहान बालक, मी तर ईतका महान पंडित आहे!”

यामुनाने त्यांचे तीन वाक्य सांगायला सुरुवात केली, “माझे पहिले वाक्य आहे, ‘तुमची आई वंध्या नव्हती.’ याचे खंडन करा.” वंध्या म्हणजे ज्या स्त्रीला संतान होत नाही ती.

हे वाक्य ऐकून कोलाहल विचार करू लागले, ‘माझी आई वंध्या नव्हती. ह्या वाक्याचे खंडन करणे म्हणजे, माझी आई वंध्या होती. आणि माझी आई वंध्या असती, तर माझा जन्म कसा झाला? ह्या वाक्याचे खंडन करणे झाले, तर माझा जन्म व्हावयास नको होता.’ कोलाहल शांत बसले, काहीच ऊत्तर नाही देऊ शकले. परंतू संपूर्ण राजदरबारात चर्चा सुरु झाली. सर्व जण एकमेकांना आपापले मतप्रदर्शन करित होते.

यामुना पुढे बोलू लागले, “माझे दुसरे वाक्य आहे, ‘आपले राजा परम पुण्यवान व्यक्ती आहेत.’ याचे खंडन करा.”

कोलाहल पुन्हा विचार करू लागले, ‘जर या वाक्याचे खंडन केले, तर राजा तात्काळ मृत्यूदंड देतील.’ ह्या वेळेसही कोलाहल काहीच बोलू नाही शकले.

“ठीक आहे, याचेही खंडन जमत नसेल, तर माझे तीसरे वाक्य आहे, ‘राजांची धर्मपत्नी, आपल्या राज्याची महाराणी, सावित्री देवींसारखी पतीव्रता आहे.’ याचे खंडन करा.”

हे वाक्य ऐकून तर सारे दरबारी दचकले. कोलाहलही विचार करित होते, ‘ह्या वाक्याचे कसे खंडन होईल, राणी तर पतिव्रता आहेतच.’ रागाने कोलाहल लालबुंद झाले होते. शेवटी त्यांना राग सहन झाला नाही आणि ते आपल्या आसनावरून ऊठले, आणि अत्यंत क्रोधात बोलू लागले, “अरे मुर्ख! संपूर्ण प्रजेत असा कोण व्यक्ती असेल, जो तुझ्या ह्या तीन वाक्यांचे खंडन करू शकेल? जर आपण सांगितले, की राजा पुन्यवान नाहित आणि राणी पतिव्रता नाही, तर आपण राजा आणि राणी यांच्या विरोधात बोलत आहोत. तू तरी बोलू शकतोस का हे सर्व? देऊ शकतोस तुझ्या स्वतःच्या प्रश्नांची ऊत्तरे?” त्यावेळी तेथे जमलेले सारे लोक आपापले मत प्रस्तुत करू लागले. संपूर्ण दरबारात हाहाकार माजलेला होता.

त्याचवेळी यामुनांनी हात वर केला आणि म्हणाले, “शांतता राखा! मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची ऊत्तरे सांगतो.” तात्काळ सगळीकडे पुन्हा शांतता पसरली, राजा-राणी दोघेही यामुनाच्या अगदी समोर येऊन बसले. यामुनांनी ऊत्तरे सांगण्यास सुरूवात केली, “हे पंडितजी, माझे पहिले वाक्य होते, ‘तुमची आई वंध्या नव्हती.’ आणि याचे खंडन करायचे होते. वंध्या कोणत्या स्त्रीला म्हटले जाते, हे मनुसंहितेत सांगितले आहे. आणि मनुसंहितेनुसार जर स्त्रीला केवळ एकच अपत्य असेल, तर तीलाही वंध्या म्हटले जाते. तुम्ही तुमच्या आईचे एकमात्र पुत्र आहात आणि तुमच्या आईला तुमच्याव्यतिरीक्त दुसरी संतान नाहीये; म्हणून मनुसंहितेच्या आधारावर तुमच्या आईला वंध्य म्हणता येईल, आणि माझ्या पहिल्या वाक्याचे खंडन होईल.” कोणी काहीच बोलले नाही, सर्व शांतपणे ऐकत होते. “दुसरे वाक्य, ‘आपले राजा परम पुण्यवान व्यक्ती आहेत.’ वास्तविकता पाहता आपले राजा परम पुण्यवान आहेत, परंतू मनुसंहितेत सांगितले आहे की, प्रजेचे एक षष्ठांश पाप आणि पुण्य राजाला भोगावे लागते. आणि हे तर कलीयुग आहे आणि कलीयुगात लोक खूप पाप करतात; म्हणून जरी राजा स्वतः पुण्यवान असले, तरीही प्रजेच्या पापाचा एक भाग त्यांच्यावर आहे, आणि त्यामुळे माझ्या दुसर्या वाक्याचे खंडन होते. आणि माझे तीसरे वाक्य, ‘राजांची धर्मपत्नी, आपल्या राज्याची महाराणी, सावित्री देवींसारखी पतीव्रता आहे.’” आता जमलेले सारे लोक चिंतीत झाले, सर्व जण विचार करित होते, ‘कसे खंडन करता येईल या वाक्याचे?’ कारण खुल्या दरबारात राणीला अपतिव्रता ठरवणे खरेच धोकादायक होते. यामुना बोलू लागले, “पुन्हा एकदा मी मनुसंहितेचा आधार घेऊन प्रमाण देऊ इच्छितो, मनुसंहितेच्या आधारे राजा हा आठ देवतांचा प्रतिनिधी असतो, जसे की ईंद्र, चंद्र, वायू, सुर्य, कुबेर ई., आणि त्या आठ देवता राजात निवास करतात. यावरून आपण म्हणू शकतो की, राजाशी विवाह करताना राणीने आठ लोकांशी विवाह केलाय, आणि या आधारावर माझ्या शेवटच्या वाक्याचे खंडन होते.”

हे ऐकून राणी अत्यंत प्रसन्न झाली आणि आपल्या आसनावरून उठून जोरात घोषणा केली, “आलबंदार! आलबंदार!”

राजासुद्धा अत्यंत खुश झाले, ते यामुनाजवळ आले आणि त्यांनी यामुनाचे आलिंगण केले. राजा बोलू लागले, “आज आपण पाहिले, की सूर्यासमोर लहान तारे आपले अस्तित्त्व स्थापित करू शकत नाहीत. अतिशय ऊत्तम प्रकारे यामुनाने कोलाहलचा पर्वतासारखा अहंकार चूर-चूर करून टाकलाय.” ते यामुनाला म्हणाले, “आता तुला जे हवे ते तू या राजपंडिताबरोबर करू शकतो. आणि माझ्या घोषणेप्रमाणे आज मी माझे अर्धे राज्य तुला प्रदान करतो.” यामुना स्वभावाने नम्र असल्याकारणाने त्यांनी कोलाहलला जाऊ दिले. कोलाहल काहीच न बोलता मान खाली करुन दरबारातून निघून गेले. यामुनांच्या विजयामुळे प्रजासुद्धा अत्यंत आनंदीत होती.

अश्या प्रकारे केवळ बारा वर्षांचे असताना यामुना राजा बनले. राजा बनताच गुप्तहेरांमार्फत यामुनांना कळाले की, बारा वर्षांचे यामुना नुकतेच राजा बनल्यामुळे आसपासचे काही राजे यामुनांवर आक्रमण करण्याची योजना आखत आहेत. यामुनांनी विचार केला, की वेळ वाया घालविण्यात काही अर्थ नाही. यामुनांनी स्वतःच सैन्य तैयार करून आसपासच्या राज्यांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी बाकी राजे केवळ युद्धाची तैयारीच करित होते, त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की, ईतक्या लवकर हाच आपल्यावर आक्रमण करेल. अश्या प्रकारे आक्रमण करून आसपासचे राज्य सुद्धा यामुनांनी आपल्या राज्यात सामावून घेतले. आणि अश्या प्रकारे यामुना आपल्या राज्यावर राज्य करू लागले.

असेच अनेक वर्ष गेले, आणि यामुना ३५ वर्षांचे झाले. यामुना एक महान प्रतापी राजा बनले होते. याचदरम्यान एक घटना घडली, यामुनांचे आजोबा नाथमुनी यांनीही आपला देहत्याग केला आणि परत वैकुंठाला गेले.

नाथमुनी अत्यंत खुश होते जेंव्हा यामुना आश्रमात विष्णूभक्ती करित होते, परंतू जेंव्हा त्यांना कळाले की यामुना आता एक राजा बनलाय आणि भोग, ऐश्वर्यात तो त्याचे आयुष्य वाया घालवतोय, नाथमुनींना खूप दुःख झाले. नाथमुनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत हाच विचार करित की, ‘कोणत्या प्रकारे यामुनाला पुन्हा एकदा विष्णूभक्तीत आणावे?’ नाथमुनींचे एक प्रिय शिष्य होते, ज्यांचे नाव होते, राम मिश्र. नाथमुनींनी त्यांच्या अंतिम क्षणांत राम मिश्रला एक विनंती केली, “माझी वेळ आता संपलेली आहे. परंतू जातानाही माझ्या मनात एक दुःख आहे, की यामुना अजुनही केवळ ईंद्रियतृप्तीतच व्यग्र आहे. आपल्या प्रिय रंगनाथजींना तो विसरलाय. काहीतरी करून कृपया तुम्ही त्याला रंगनाथजींच्या चरणकमळांपाशी परत आणा.” राम मिश्रंनीही आपल्या गुरूच्या या आदेशाला आपल्या जीवनाचे उद्देश्य मानले. काही दिवसांतच नाथमुनींना वैकुंठवास झाला.

जेंव्हा यामुना 35 वर्षांचे झाले, राम मिश्र त्यांच्या राजधानीत आले. अनेक वर्ष त्यांनी आपल्या गुरुच्या आदेशाला आपल्या मनात ठेवले होते. परंतू राम मिश्रंनी पाहिले, की आत जाऊन यामुनांना भेटने त्यांना मुळीच शक्य नव्हते. मोठमोठे राजा, ज्यांना यामुनांना भेटण्याची इच्छा होती, रांगेत ऊभे होते. कारण आलबंदारला भेटायला अनेक राजे-महाराजे येत असत. एका गरिब संन्यास्याला तर कुणीच स्थान दिले नसते. म्हणून राम मिश्र दुसरा काहीतरी उपाय शोधू लागले.

राम मिश्र केवळ शास्त्रांमध्येच नाही, तर आयुर्वेदातही निपुण होते. राम मिश्रंनी पाहिले, की महालाजवळच तुडुवलई नावाची एक जडीबुटी उपलब्ध होती. ह्या जडिबुटीचे सेवन केल्याने व्यक्ती सतोगुणी होतो, मन शांत होते आणि बुद्धी आद्यात्मिक विषयांमध्ये आकृष्ट होते. एके दिवशी राम मिश्र यामुनांच्या स्वयंपाकीला भेटले आणि ही जडिबुटी त्यांनी त्या स्वयंपाकीला दिली. राम मिश्र म्हणाले, “आपल्या राजांवर खूप मोठ्या जबाबदार्या आहेत, कामाचा व्याप खूपच मोठा आहे. अनेक परकीय आक्रमणेही होतंच असतात, म्हणून राजांच्या मनःशांतीसाठी मी ही तुडुवलई नावाची जडिबुटी आणली आहे. याची भाजी बनवून तुम्ही राजांना खाऊ घाला.” स्वयंपाकीनेही लगेचच ती जडीबुटी ओळखली आणि तो सुद्धा खुश झाला, तो सुद्धा राजाला ती भाजी खाऊ घालण्यास ऊत्सुक झाला. त्याने त्याच दिवशी ती भाजी बनवून यामुनांना खाऊ घातली आणि यामुनांनाही ती भाजी अत्यंत आवडली. अश्या प्रकारे रोज राम मिश्र ती भाजी त्या स्वयंपाकीला देत असत आणि स्वयंपाकीही रोज ती भाजी यामुनांना खावू घालत असे. अनेक महिने हा नित्यक्रम चालू राहिला.

राम मिश्र अत्यंत बुद्धीमान होते. कोणतेहि कार्य संपन्न करण्यासाठी धैर्य बाळगणे अत्यंत गरजेचे असते. बुद्धीमान व्यक्ती जाणतो, की कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य एकाच दिवसात पार पाडणे शक्य नसते. ज्या व्यक्तीकडे धैर्य नसते, आणि अत्यंत कमी कालावधीत अनेक मोठे कार्य पार पाडण्याची चेष्टा करतो, तो निराष होवून ते कार्य सोडून देतो. अनेक महिन्यांनी एके दिवशी मुद्दामच राम मिश्रंनी ती भाजी स्वयंपाकीला नाही दिली आणि म्हणूनच स्वयंपाकीने ती भाजी नाही बनवली. यामुनांनाही तुडुवलई नाही, हे पाहून आश्चर्य वाटले, त्यांनी तात्काळ स्वयंपाकीकडे याबद्दल विचारणा केली; कारण त्यांना रोजच ती भाजी खाण्याची सवय झाली होती. स्वयंपाकीने सांगितले, “रोज एक महात्मा ही भाजी देऊन जात असत, परंतू काही कारणास्तव आज ते आले नाहीत. त्यामुळे मी आज तुडुवलई नाही बनवू शकलो.”

यामुनांनी विचारले, “कोण आहेत ते, आणि काय मुल्य मागतात या भाजीच्या बदल्यात?”

“ते साधू तर केवळ आपले हितचिंतक आहेत. तुमचे मन शांत असावे, आणि तुमची मनोवृत्ती शुद्ध होत रहावी म्हणून ही भाजी ते देवून जातात. दुसरे कुठलेच मुल्य त्यांना नको असते.” हे सर्व ऐकून राजांनी राम मिश्रंना भेटण्याची ईच्छा प्रकट केली आणि हेच राम मिश्रंना हवे होते.

दुसर्या दिवशी राम मिश्र पुन्हा तुडुवलई घेऊन गेले, आणि स्वयंपाकीने राजाची ईच्छा त्यांना सांगितली. मग राम मिश्र यामुनांसमोर गेले. यामुना बोलू लागले, “तुम्ही रोज माझ्यासाठी न चुकता ही भाजी आणता, त्या बदल्यात मी आपणांस काय देऊ शकतो?”

राम मिश्र म्हणाले, “मला तुमच्याशी एकांतात थोडे बोलायचे आहे.” राजाने लगेचच स्वयंपाकी, बाकी मंत्री सर्वांना बाहेर पाठविले.

एकांतात राम मिश्रंनी यामुनांना सांगितले, “मी तुमच्या आजोबांचा, श्री नाथमुनींचा शिष्य आहे. श्री नाथमुनींना तर वैकुंठवास झालाय, परंतू जाताना त्यांचे मन फार दुखी होते. त्यांची ईच्छा होती, की मी पुन्हा तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या मार्गावर आणावे. तुमच्या आजोबांनी तुमच्यासाठी खूप मोठी संपत्ती ठेवलीये आणि त्या संपत्तीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी माझ्याकडे सोपविलेले आहे.”

हे ऐकून तर यामुनांना आनंद झाला. ते ऊत्सुकतेने राम मिश्रंना म्हणाले, “माझे बरेच शत्रू माझ्यावर आक्रमण करण्याची तैयारी करित आहेत आणि त्यामुळे मलाही माझे सैन्य तैयार करण्याकरिता धनाची आवश्यकता आहे. कुठे मिळेल मला ती संपत्ती? माझ्या आजोबांनी ती माझ्याकरिता ठेवलीये!”

राम मिश्र यामुनांना सांगू लागले, “मी तुम्हाला त्या संपत्तीपर्यंत घेऊन जाईल, तुम्हाला माझासोबत यावे लागेल. ती संपत्ती सात भिंतींच्या आत बंद आहे, एक मोठा नाग त्या संपत्तीचे संरक्षण करतो आणि ही संपत्ती दोन नद्यांच्या मधोमध आहे. बारा वर्षांतून एकदा एक राक्षस तेथे संपत्तीचे निरीक्षण करण्यास येतो आणि निरीक्षण करून परत जातो. ह्या संपत्तीच्या रक्षणाकरिता एक मंत्र आहे, जो जाणून घेतल्यानंतर संपत्ती तुमचीच असेल.”

यामुना तात्काळ राम मिश्रंसोबत जाण्यास उत्सुक होते. त्यांनी शक्य तितक्या लवकर सारा राज्यकारभार काही दिवसांकरिता आपल्या मंत्र्यांवर सोपविला आणि ते एकटेच राम मिश्रंसोबत जाण्यास सज्ज झाले. त्यांचा प्रवास खूप लांब असल्यामूळे अनेक दिवस ते सोबतच होते. असाच प्रवास चालू असताना एके दिवशी दुपारी कडक ऊन असल्यामुळे ते दोघेही एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्याबसल्या अत्यंत मधुर स्वरात राम मिश्र भगवद्गीतेतील श्लोकांचे उच्चारण करू लागले अणि यामुनाही ते श्लोक अगदी मन लावून ऐकू लागले. यामुनांना ते श्लोक ऐकून त्यांच्या बालपणाची आठवण येऊ लागली, की कश्या प्रकारे ते बालपणी या श्लोकांचे उच्चारण करित असत. यामुनासुद्धा महान पंडित असल्यामुळे त्यांनाही हे सर्व श्लोक माहिती होते. हे श्लोक ऐकत असताना त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या नजरेसमोरून जात होते. त्यांना हळूहळू जाणीव व्हायला लागली की ऐश्वर्यात त्यांनी अनेक वर्षे वाया घालवली.

अश्या प्रकारे गायन करत करत राम मिश्र बाराव्या अध्यायापर्यंत पोहोचले, ते बाराव्या अध्यायातील आठव्या श्लोकाचे गायन करू लागले...
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥
“माझ्यावर (पुरूषोत्तम भगवंतांवर) तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निःसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील.”

जेंव्हा हा श्लोक यामुनांनी ऐकला, त्यांच्याकडून राहावले नाही. ते जोरात उद्गारले, “हेच, हेच मला हवंय! ईतके दिवस मी माझे आयुष्य विलासात आणि ऐश्वर्यात वाया घालवले. परंतू, आज ईतक्या दिवसांनी श्री कृष्ण मला मिळाले. मी आता समजलोय की हा संसार केवळ एक बंधनाचे आणि दुःखाचे कारण आहे. आज मी तुम्हाला शरण आलोय, कृपा करून मला आपला शिष्य स्विकार करा आणि यापुढील ज्ञान प्रदान करा.” हे ऐकून राम मिश्रंनी भगवद्गीतेतील सर्व ७०० श्लोकांचे मधुरपणे ऊच्चारण केले. परंतू यामुनांनी त्यांना अजून ज्ञान प्रदान करण्याची विनंती केली.

यामुनांची ही विनंती ऐकून राम मिश्र म्हणाले, “अवश्य! ज्ञान केवळ येथेच संपलेले नाहीये, परंतू मी आपल्या आजोबांना वचन दिलेय, की ती संपत्ती मी तुम्हाला अवश्य प्रदान करेल. आता आपल्याला पुढे निघायला हवे, केवळ काहीच दिवसांचा प्रवास आता उरलाय.”

पुढे चालत चालत ते दोघेही श्रीरंगम येथे पोहोचले आणि त्यांनी श्री रंगनाथजींच्या मंदीरात प्रवेश केला. श्री रंगनाथजींचे मंदीर एका किल्ल्याप्रमाणे आहे, ज्याला सर्व बाजूंनी एकानंतर एक अशा सात भिंतिंची तटबंदी आहे. जवळजवळ संपूर्ण श्रीरंगम शहरच त्या सात भिंतींच्या आत स्थापित आहे. ह्या सात भिंती पार करूनच व्यक्ती मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मंदिरात श्री रंगनाथ अनंत शेषावर शयन करतात. श्रीरंगम शहर कावेरी नदीच्या दोन भागांच्या दरम्यान वसलेले आहे. त्यामूळे राम मिश्र जेंव्हा संपत्तीवषयी चर्चा करित होते, तेंव्हा ते अप्रत्यक्षपणे श्री रंगनाथजींना संबोधीत करीत होते. असे म्हटले जाते की आजही रामभक्त विभीषण बारा वर्षांतून एकदा पुजा करण्यासाठी या मंदिरात येतात, आणि हेच ते बारा वर्षातून एकदा येणारे असूर आहेत. आणि तो मंत्र आहे, ‘ॐ नमो नारायणाय्॥‘ जो श्री संप्रदायाचा मंत्र आहे.

जेंव्हा यामुनांनी श्री रंगनाथजींचे दर्शन केले, ते ईतके विचलित झाले की ते भावविभोर होऊन श्री रंगनाथजींच्या चरणांत बेशुद्ध पडले. जेंव्हा ते शुद्धीवर आले, त्यांनी राम मिश्रंना आपले गुरू म्हणून स्विकार केले. त्यानंतर ते कधीच श्रीरंगम सोडून गेले नाहीत, त्यांनी ऊरलेले आयुष्य रंगनाथजींच्याच सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राज्याचा काही भाग पांड्य राजाला परत दिला आणि ऊरलेला भाग श्री रंगनाथजींच्या सेवेसाठी ठेवून घेतला. पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनीही संन्यास आश्रमाचा स्विकार केला. नाथमुनींनंतर यामुनाच श्री संप्रदायातील प्रमुख वैष्णव मानले गेले. काही वर्षांनंतर राम मिश्रही वैकुंठाला परत गेले आणि यामुना, जे श्री संप्रदायातील आचार्य बनले, यामुनाचार्य नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर यामुनाचार्य श्री रंगनाथजींची सेवा करत असतानाच भक्तीचा प्रचारही करू लागले.

यामुनाचार्यांनी अनेक सुंदर ग्रंथ लिहिले, जसे स्तोत्ररत्न, चतुःश्लोकी, सिद्धीत्रयम, अगम-प्रमण्य, गीतार्थ संग्रह, मायावाद खंडणम् ई.

वाचकांना वाटत असेल, की मालिका रामानुजाचार्यांच्या आयुष्यावर आहे आणि वर्णन केवळ यामुनाचार्यांचे चाललेय. परंतू, यामुनाचार्य आणि रामानुजाचार्य दोहोंमध्ये घनिष्ठ संबंध होता, जरी ते एकमेकांना कधीच भेटले नाहीत तरीही! आणि त्यामुळेच सर्वांत आधी यामुनाचार्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे मला महत्त्वाचे वाटले. रामानुजाचार्य आणि यामुनाचार्य यांच्यात काय संबंध होता, रामानुजाचार्यांचे प्राकट्य कसे झाले, ते ज्ञानार्जन करून कसे महान विद्वान बनले आणि कश्या प्रकारे त्यांनी भक्तीचा प्रचार केला, हे आपण पुढील भागापासून पाहू....

धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदैश्च सर्वैर अहं एव वेद्यो....... >>> हे गीता म्हणतेय. वेदांमध्ये कृष्णभक्तीचा उल्लेख आहे का? अर्थात वेदांविषयी मला फारशी माहित नाही. ऊत्सुकता म्हणून विचारतोय.

वेदांमध्ये कृष्णभक्तीचा उल्लेख आहे का?>>> हो!

हे गीता म्हणतेय.>>> हो! गीताच म्हणतेय की वेदांचा निष्कर्ष कृष्णभक्ती आहे.....

छान कथा!
पण या मालिकेतील पुढील भाग येणार की नाही?
रामानुजाचार्यांबद्दल माहिती वाचायला नक्कीच आवडेल..

पण या मालिकेतील पुढील भाग येणार की नाही?>>> आधी मी ललितलेखन विभागात लेखन करित होतो, कारण लोकं तेथील लेख वाचतात. आता ही मालिका धार्मिक मध्ये शिफ्ट केली आणि अनेक लोक, "येथील लिखाण सेंटीमेंटल असतं" या गैरसमजामुळे येथील लेख वाचत नाहीत. म्हणून माझा टायपायचा ऊत्साहच गेलाय. हा माझा गैरसमजही असू शकतो...

प्रत्येक ग्रुपचा विशिष्ट ऑडियन्स? वाचक वर्ग असतो. कृपया आपण लिहावे. थोडे लहान लेख असावेत असे मला वाटते.