एकाकी किमर्थम?..परिवारसमवेत: वसन्ति!

Submitted by Sujata Siddha on 1 August, 2019 - 04:03

“काही काही गोष्टीच अशा असतात की कधी कधी आयुष्य संपत आलं तरी त्याचा अर्थ लागत नाही “
कशाबद्दल बोलतोयस तू गोट्या..?बाळ आणि तू अशी विचार बिचार केव्हापासून करायला लागलीस ?" गोटी म्हणजे अक्कांची लाड़की नात, वय वर्षे तेरा .
"काही नाही ग अक्का , तुला काय कळणार ?,तु आपली बस ताक़ घुसळत आणि लोणी काढ़त .”पुढे ती एक लांबलचक सुस्कारा टाकून म्हणाली “दुसरं तुम्ही घरगुती बायका करणार तरी काय म्हणा ?”
"अग हो पण बोलशील तरी काही ? आणि तुझ आयुष्य सुरु तरी झालय का?संपत आलं म्हणायला? काहीतरीच बाई.." अक्कांनी मान वळवली आणि त्या फिरून आपल्या उद्योगला लागल्या , नाही म्हटलं तरी थोडया दुखावल्या गेल्या , या आजकालच्या मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो, जी काही हुशारी आहे ती फ़क्त यांच्याकडेच बाकी मोठी माणसं मूर्ख, बाहेर काम करणाऱ्या हुशार , घरात काम करणाऱ्या मूर्ख , सगळं ह्यंनीच परस्पर ठरवायचं .
मनातच बडबड करत पण वरकरणी काही न बोलता त्या ताक घुसळत राहिल्या. दिवसाची कामे त्यांनी भराभर आटपली , शरयू घरी यायच्या आत काहीतरी बनवून ठेवलं पाहीजे, संध्याकाळी दमूंन घरी येते आणि काही खायला शिल्लक नसलं तर तशीच कामाला सुरूवात करते. शिवाय रात्री तर तिला पोटभरून जेवताना त्यांनी कधी पाहेलच नव्हतं. त्यामुळे त्या तिला आवर्जून काहीतरी बनवून ठेवत.
२० वर्षांपूर्वी मंदार शी लग्न झालं आणि शरयू घरात आली ,दिसायला नक्षत्रासारखी देखणी पण थोडी अबोल वाटली, अगदी शिष्ट वाटण्याइतपत अबोल .आजूबाजूच्या चार भोचक बायकांनी अक्काना लगेच वॉर्निंग द्यायला सुरूवात केली , अक्का बघा बाई सून शिकलेली आहे , देखणी आहे पण शिष्ट वाटते आणि अशा मुली धूर्त असतात बरं त्यात तुम्ही पडल्या एवढ्या भोळ्या स्वभावाच्या ,वेळीच वचक ठेवा नाहेतर हळूहळू न्यायची मंदार ला तुमच्यापासून लांब आणि करायची दुसरा घरोबा “, त्यावर अक्का हसत हसता म्हणाल्या “ नेऊदे की ,मंदार साठीच तर आलीये ना ती. आता संसार तिचाच आहे तिलाच ठरवुदे कसा करायचा .”
पण शरयू शिष्ट वाटली तरी तशी नाहीये हे लवकरच अक्कांच्या लक्षात आलं , आपल्या घरी आलेल्या जीवाला आपणच लळा लावायला पाहिजे तरच ती आपली होईल नाहीतर जन्मभर ती परकी होऊन राहिल हे शिक्षण त्यांना अनुभवाच्या शाळेतून मिळालं होतं ,लवकरच त्या दोघींमध्ये एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं, इतकं की ऑफिस च्या गमती जमती , बॉस चे तर्‍हेवाईक किस्से , सगळं ती त्यांना सांगे ,कधी कधी काही काही गोष्टी दोघींनाही एकमेकीच्या पटायच्या नाहीत , मग दोन चार दिवस दोघींचीही धुसफुस चाले, मंदार त्या दोघींमध्ये कधी पडत नसे , एकतर अक्का जरी आपली आई असली तरी शरयू आणि तिचे स्वतंत्र असे नाते आहे हे तो जाणून होता आणि जशा आपल्याला आईच्या व आईला आपल्या काही गोष्टी पटत नाहीत तशा त्या दोघींच्याही बाबतीत होऊ शकतं , हे कळण्याएवढा समजसही होता. मनाच्या तारा जुळण महत्वाच, आणि त्या तशा जुळल्याही होत्या. त्यामुळे अक्काना कधी एकाकीपणा जाणवला नाही .

सकाळी उगाच उद्धटपणे बोलून क्लासला गेलेली ,गोटी दुपारी येऊन जेवण करून गेली , जेवतानाही गप्प गप्प होती , अक्का पण तिला काही विचारायच्या भानगडीत पडल्या नाहीत , सकाळी ती जे बोलली होती ते त्यांना ठसठसत होतंच , संध्याकाळी शरयू , मंदार आले ,तशी घरात कामाची लगबग सूरू झाली , रात्रीची जेवणं झाल्यावर आवराआवर करतना शरयु ने आठवण करून दिली "अक्का उद्या तिथीने बाबांच श्राद्ध आहे ना?”
'हो गं, मागच्या माहीन्यापासून घोकतेय आणि आज नेमकी विसरले बघ “ अक्का म्हणाल्या , " वड्यांसाठी डाळ भिजवून ठेवते , त्यांना खूप आवडायचे ,तरी मी मघाशीच विचारणार होते एवढ्या भाज्या का आणल्यास, बघ माझं मेलीच डोकं “
“अक्का....बाबा खूप लोकप्रिय होते ना म्हणे?,आपला समस्त आपटे परिवार एकत्र जमला की, खूप कौतुक ऐकते मी त्यांच नेहेमी .”
"हो ना , आपल्या सगळ्या सुना त्यांच्या लाडक्या होत्या गं , मुली कर्तृत्ववान निघाल्या की त्यांना फार कौतुक वाटायच ,म्हणायचे आपल्याला मुलगी नाही याच फार वाईट वाटत मला. तुझं तर फार कौतुक वाटलं असतं त्यांना "
"हो ना , मलाही लग्नाआधी फार वाटायचं की आपल्याला सासरे असावेत , तुम्हाला माहितीये ?स्थळ आलं की मी पहीले बघायचे सासरे आहेत का? सासू नसली तरी चालेल एकवेळेस”शरयू हसत उत्तरली .
तोंडावर हात ठेऊन ,मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पहात अक्कानी म्हटलं “क्काय ?” ....
“हो ना मग काय उभा जन्म मेला हेवेदावे करण्यात जायचा “...मान उडवत शरयू म्हणाली आणि लागलीच बाहेर गोटीच्या रूमकडे हाका मारत वळाली . अक्का मात्र थबकून तिथेच उभ्या राहिल्या .
“अशी का बरं बोलली ही ?” त्यांना एकदम कससच झालं ,डोळे पाण्याने डबडबले. अचानक आपल्याला खूप थकवा आला आहे असं वाटायला लागलं ,खूप परीश्रमाने मिळवलेली एखादी वस्तू हाततातून पाण्यासारखी गळून जावी आणि भरले हात एकाएकी रीक्त व्हावेत ,तसं झालं त्यांना. थकलेल्या मनाने शरीर अंथरूणावर लोटून देताना परत एकदा अश्रूधारा सुरू झाल्या . नकळत त्यांना अप्पा आठवायला लागले , “मला का नाही नेलत हो बरोबर ?..असं एकट्याने जगणं कीती अवघड वाटत , कोणीही आपलं नसतांना आणि कोणालाही आपण नको असताना, खरच या एकदा खाली येऊन राहून बघा कसं वाटत “......गरम अश्रूंचे कढ कीतीतरी वेळ उशीवर झिरपत राहिले .
,काही दिवसांनी रोजच्या व्यवहारात आणि प्रवचन, भजन यांच्या धामधुमीत अक्का काही काळ आपलं दु:ख विसरल्या, चालायचच ,आपलीच माणसं आहेत ,बाहेर कीती लोकांना काय काय त्रास असतात , शारीरिक वेदना असतात , तसं तर आपलं काही नाही ना , देवान आपल्याला हाती पायी धड ठेवलय हे का कमी आहे ?वैगरे टिपिकल फिलोंसोंफी वर आल्या , आणि एकदा प्रवचनावरून संध्याकाळी परतत असताना अक्का जोरात पाय घसरून पडल्या ,घरापासून जवळच पडल्या म्हणून बरं , मंदार आणि शरयू दोघेही धावत आले ,पुढे हॉस्पिटल ,फ्रॅक्चर, मग हाताला plaster हे सगळे सोपस्कार झाले ,डॉक्टरांनी हात महिनाभर plaster मध्येच ठेवायला सांगितला आणि , अक्का परत एकदा नैराश्यात घुसल्या, आधीच आपला काही उपयोग नाही आणि त्यात हे असं , देव तरी कीती सत्व परीक्षा बघतो .........हताश झालेल्या अक्का अशाच अंथरूणावर बसून नामस्मरण करत होत्या , तेव्हढ्यात , दारातून शमाचा आवाज आला "अक्का। ..ए अक्का आहेस का?"
" कोण ? शमा ? ये ये .. अगं तू अजून आठवड्याने येणार होतीस ना अमेरिकेहून ?"
"अगं अक्के तुझं हे कळलं मग राहावलंच नाही गं , मिळाली फ्लाइट आले निघून " शमा म्हणाली ,
" बरं झालं आलीस ,कीत्ती दिवसांनी दिसलीस गं बायो .." अक्का म्हणाल्या, शमा आल्या आल्या त्यांची लगबग सुरू झाली , मोडका हात गळ्यात घेउन त्या शक्य तितकी सरबराई करायला लागल्या , शमाने लागलीच त्यांना हाताला धरून खाली बसवलं ," आगा माझे आई , माझे माऊली तू जरा शांत बस , मी तुला बघायला आलेय ना ?..मग इथे स्वस्थ बस अशी समोर , आणि हलू नकोस आजीबात पुढचा अर्धा तास." अक्का मग निमूट खाली बसल्या आणि मग शमाला हात मोडण्याची सगळी कहाणी सांगून झाली,ती ऐकत होतीच पण तिला अक्कांचा सूर नेहेमीसारखा वाटेना , "अक्का तू नेहमीची अक्का नाही वाटत आहेस, हे तुझ्या नुसत्या हातच दुखणं नाहीये ,काहीतरी मनात खदखदतंय तुझ्या ,काय झालय? कोणी काही बोलल तुला? की अजून वेगळा काही प्रॉब्लेम आहे ? " अक्कांनी नाही म्हणून मान हलवली. “नाही गं , कोणी काहीं बोललं नाही मला "
"मग ?"
"खरं सांगू का शमे ,आजकाल मलाच मेलीला असं वाटू लागलाय की बास झालं आता , न्यावं देवानं... ,पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम असायचं ना खरंच बरोबर होतं . मलाही वाटतंय दूर कुठेतरी निघून जावं ."
"अगं पण एकाएकी का असं वाटायला लागलं तुला काहीतरी घडलं असल्याशिवाय का? तू काही सांगायलाही तयार नाहीस. मी आत्तापर्यत पाहिलेल्या म्हतार्‍यांमध्ये सगळ्यात शहाणी म्हातारी आहेस तू , तूच जर असं काही बोलायला लागलीस तर बाकीचे पण रडायला लागतील की ..."शमा डोळे मिचकावत म्हणाली .
" म्हातारी माणसं म्हणजे काय लहान मुलं वाटली तुला ? एकाने गळा काढला की बाकिच्यांनी भोकाड पसरायला ? आपलं म्हणून तुझ्यापाशी मन मोकळं करावं तर तू गधडे चेष्टाच कर माझी "
"अगं मग काय करू , इतकं चांगलं घर आहे , गुणाचा मुलगा आहे , सोन्यासारखी सून आहे , गोंडस नात आहे , तरी तू रड , तुम्हा so called ज्येष्ठ मंडळींचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो , जरा कोणी काही बोललं की लागले लगेच मरणाच्या गोष्टी करायला ."
"शमे तु माझी बाजू घेण्याच्या ऐवजी मला म्हातारीलाच बोलतेयस "
" ते बघ परत सुरू झालं तुझं म्हातारपुराण, अक्का तू अशी नाहीस , तु मला आवडतेस कारण तुझे विचार वेगळे आहेत , आपल्या प्रत्येक वयाच्या टप्प्यात काय केलं पाहिजे हे तुला नेहेमी कळत आलेलं आहे , तुला मी कधीच असं हतबल होताना पाहिलं नाही, म्हूणन जरा बोलले इतकंच "
"अगं आजकाल ना कोणी काही बोललेलं सहनच होत नाही ,आणि तुम्हा मुलांना पण कळलं पाहिजे ना गं की आता वय झालंय, हळव झालेलं असत मन , एकदम फाडदिशी काही बोलू नये ,लागत गं मनाला "
"अगं पण का ? तुम्हाला हे दरवेळी म्हतारपणाच भांडवल कशाला हवयं पुढे करायला?.. शरीर थकत मान्य आहे, पण मन? ते तर परिपक्व झालं पाहिजे ना ग ? त्या अनुभवाच्या गाठोड्याचा तुम्ही आत्ता नाही उपयोग करणार तर केव्हा? आजकालच आयुष्य बघतेस तू अक्का ,किती ताण असतो, शाळेत चिमूरडी मुलं जातात ना इवलीशी, तिथून सुरू होतं गं टेन्शन त्यांना ते पुढे कॉलेजात जाऊन ,करीअर करून , बस्तान बसेपर्यत , बर तिथेही ते थांबत असं नाही, चालूच असत , अखंड , तुमच्या वेळेला होत का गं असं काही ? आणि त्या तणावात कोणीतरी काहीतरी बोललं की झालं लगेच तुम्हाला वाटायला लागत आता आपण नकोसे झालो , लगेच देवाला पकडायचं , ने बाबा मला लवकर , कशाला ?...कशावरून तुमची आत्ता जायची वेळ आहे ? बघितलं ना आजकाल लहान थोर कोणीही कुठल्याही आजाराने कशानेही जातात ?”
"अक्का तिच्याकडे बघत राहिल्या ," शमे तू अबोल अबोल म्हणून सगळ्यांनी तुझ्या लहानपणी भांडवूंन सोडलं होतं तुझ्या आईला ,आता वाटतं बोलत नव्हतीस तेच बर होत गधडे ,आपल्याच मावशीला एव्हढ बोलतेस ?”
“मग काय मावशी असली म्हणून काय झालं , माझीच आहेस ना .. ? बर आता सांग मुकाट्यान काय झालं? “
“काही नाही गं ..परवा आप्पांच्या श्राद्धाच्या आदल्या दिवशीची गोष्ट..
“परवा म्हणजे 15 दिवसांपूर्वी ?..”
“हो तेच गं ते , परवा शरयू बोलता बोलता म्हणाली की तिला म्हणे सासरे फार आवडायचे “
“पण तिने केव्हा पाहिलं अप्पाना? ते तर तिच्या लग्नाच्या किती तरी आधी गेले “
“ अग लग्नाआधी वाटायच म्हणे तिला असं गं, मग म्हणाली सासू नसलेलीच बरी नाहीतर उभा जन्म हेवा दावा करण्यात जातो .”
“असं म्हणाली ?” शरयू चे डोळे मोठे झाले,
“मग काय ? आता तु सांग मी असं कधी करीन ? शमे आपल्याच मुलीशी कोणी हेवा दावा करील का?..मी तिला मुलगीच मानते गं .”
"अगं अक्के हे ती लग्नाआधीचं बोलली, आणि ती तुला आई मानते , म्हणून तर बिनधास्त आपल्या आईला सांगावं तसं म्हटली ना की सासू नसलेली बरी, म्हणजे बघ तुच घेऊन बसलीयेस सासूपण डोक्यात , ती नाही .”
“तुला नाही कळायच शमे , म्हातारपण आल की समजेल .कोणी काही बोलल की कसं लागत जीवाला “
“ नको अस करूस गं , तू समंजस आहेस ,काय एवढ्या तेव्हढ्या गोष्टी धरून बसतेस? , परवा शरयू असही म्हणाली की मला मंदार पेक्षाही अक्का प्रिय आहेत , मग आता यावर काय म्हणशील तू ?"
"काय म्हणतेस? अशी म्हणाली ती ? केव्हा ? " अक्का तोंडावर हात ठेवून म्हणाल्या , त्यांच्या डोळयात आश्चर्य , कौतुक असे संमिश्र भाव होते .
" मी उगाच कशाला सांगीन ?, फोन वर तुला लागल ते सांगताना म्हणत होती, रडत पण होती , आता मला सांग दोन्ही पैकी कुठलं वाक्य धरून ठेवणार आहेस तू ? एकदा नाती जुळली की पुन्हा असं नसतं ग कधी ,तोलून मापून माणसांना वागवायच , माणसं आहेत चुकतात कधी कधी ,आपलीच माणसं असतात ती, आणि त्यातूनही चुकलीच तर विचारायच सरळ, असं कुढत बसण्यापेक्षा. भरल्या घरात राहतेस, आपल्या परिवारात राहतेस एकाकी किमर्थम ...? आणि असं एकट का पडायच? तुच मला शिकवलंस आणि आता तुच विसरलीस? "
"हो गं बाई !..खरंय तुझं ...चुकलंच माझं , मी तरी अशी एककल्ली कधीपासून झाले कोण जाणे . बरं बाई शमे लवकर आलीस”
"हाहाहाहा , शमा हसायला लागली , "चलो इस बात पे एक एक चाय हो जाए ?..मस्त आलं आणि वेलदोडा कुटून करते तुला आवडतो तसा ."
"हो दे बाई करून मला, चांगला करतेस “.
“हुशार आहेस हो शमिटले चांगलं पटवून दिलस मला.”अक्का अजून मघाच्याच चर्चेत .
“मग ,लहानपणापासूनच आहे मी माझ्या मावशीसारखी हुश्शार .." शमा डोळे मिचकावत म्हणाली आणि दोघी एकदमच हसल्या !!!!.....
.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच...

छानच !!

असं म्हणाली ?” शरयू चे डोळे मोठे झाले, >>>>> शमाचे ना?

Chan

कथा बरी आहे. पण शीर्षक असे झोपेत बडबड केल्यासारखे का लिहिले आहे? एकाकी.. किमर्थम..परिवारसमवेत.. वसन्ति....? म्हणजे काय?
किमर्थम म्हणजे? वसंती कोण?

Parichit :थोडं संस्कृत चं ज्ञान असायला हवं होतं (अगदी थोडं म्हणजे शाळेत शिकवतात तेवढं असतं तरी चाललं असतं .) म्हणजे हे प्रश्न नसते पडले);-)

आम्हाला शाळेत संस्कृत नव्हतं. तसेही हे मराठी संकेतस्थळ आहे. देवनागरी मराठीत इतके चांगले शब्द असताना इंग्लिश/फ्रेंच/संस्कृत/अर्धमागधी/कानडी/मोडीलिपी वगैरेत शीर्षक लिहिण्याची गरज का पडावी हे मला पामराला सांगाल का?

संस्कृत हि आपली आद्य (म्हणजे पहिली ) भाषा ,आहे मराठीच्याहि खूप आधीची हिला देवांची भाषा म्हणतात , त्या भाषेत जे साहित्य लिहिलंय ते अतिशय मौलिक (म्हणजे मूल्यवान ) आहे . मराठीतले तसेच हिंदीतले कितीतरी शब्द हे संस्कृत वरून आले आहेत , आपण त्याचा फारसा वापर करत नाही कारण आपल्याला आपल्याच गोष्टींचे महत्व दुर्दैवाने नसते , या भाषेचा अभ्यास जर्मनी आणि इतर परकीय देशात मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो , उद्या असं नको व्हायला कि आपल्या कडची संपत्ती ते नेतील आणि आपल्याला त्यांचे अनुकरण करावे लागेल , आपल्याकडे हि भाषा आहे त्याची आठवण करून देण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून शीर्षक ते दिले आहे !..
एकाकी किमर्थम?..परिवारसमवेत: वसन्ति! - याचा अर्थ 'कि आपल्या परिवारात आपल्या मुळा माणसात राहूनही एकाकी का वाटतंय ? " : पामरास कळले असावे असे मी समजते):-)

हे भगवान! धाग्याचा उद्देश्य नक्की काय आहे हे ठरवा बुवा आधी. मराठी संकेतस्थळावर कथा/कादंबरी विभागात धागा आहे. कथा सांगणे हा उद्देश असेल तर "आपल्या परिवारात आपल्या मुला-माणसात राहूनही एकाकी का वाटतंय?" असे सर्वाना समजेल असे मराठी शीर्षक देता आले असते ना? अन्यथा संस्कृतचे महत्व सांगणे हा उद्देश असेल तर यासाठी भाषा विभागात "संस्कृतचे महत्व" धागा काढा किंवा अख्खी कथा संस्कृतमध्ये लिहा असे मी सुचवतो. उगाच मराठी कथा विभागात संस्कृत किमर्थनचे मराठीतून समर्थन कशासाठी?

धन्यवाद , कोमल १२३४५६ , पुरंदरे शशांक , आसा., ॲमी , PradnyaW , jayshree deshku... , मन्या ऽ, Urmila Mhatre , माधव , Parichit , अंकु , Akku320 आणि
चैत्रगंधा !!!

संस्कृत सर्वोत्तम भाषा आहे. प्राचीन भारतीय देववाणी आहे.

सुजाता, तुम्ही हे शिर्षक दिलेत त्या निमित्ताने मला आमचा शाळेचा तो संस्कृत भाषेचा तास आठवला. आमच्या शिक्षिकेने लघुकथा सांगायला सुरवात केली होती. ते ही सुस्पष्ट संस्कृत मध्ये! अगदी चित्र वगैरे काढायच्या फळ्यावर. मजा यायची शिकायला. आवडायची भाषा! अजूनही आवडते. Happy