माझ्या काकू

Submitted by nimita on 12 August, 2019 - 14:58

मी कॉलेजच्या थर्ड इयरमधे असताना आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकदा 'आराधना' सिनेमा पाहायला गेलो होतो. खरं म्हणजे आमच्या दृष्टीनी तसा जुनाच होता तो सिनेमा... म्हणजे आमच्या आधीच्या जनरेशन चा म्हणावा इतका जुना ! पण त्या काळात खूप गाजलेला सिनेमा...अर्थपूर्ण गाणी, कर्णमधुर संगीत, सौंदर्यवती शर्मिला आणि तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हँडसम राजेश खन्ना (आणि तोही डबल रोल मधे...म्हणजे अगदी buy one get one offer सारखा)

ज्या दिवशी आम्हां मैत्रिणींचा सिनेमाला जायचा प्रोग्राम ठरला त्या दिवशी आम्हांला फक्त याच सिनेमाची तिकिटं मिळाली; म्हणून आम्ही काहीशा नाईलाजानीच गेलो. पण जेव्हा सिनेमा बघून बाहेर आलो तेव्हा माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मैत्रिणी राजेश खन्नाच्या दिवान्या झाल्या होत्या...नाही नाही अरुणच्या नाही...सूरजच्या !!

पण माझ्या डोळ्यांसमोरून मात्र काही केल्या शर्मिला टागोर हलत नव्हती. तिनी साकारलेली वंदना माझ्या मनात घर करून बसली होती. आणि त्याला तसंच सबळ कारणही होतं. त्या 'reel life' मधल्या वंदनानी मला 'real life' मधल्या अशाच एका आईच्या त्यागाची आठवण करून दिली होती.

आणि ती आई म्हणजे 'माझ्या काकू'.....

यातला 'माझ्या' हा शब्द बहुवचनी नसून आदरार्थी आहे!

मी आत्तापर्यंत दोनच स्त्रियांना नेहेमी फक्त 'काकू' म्हणून संबोधलं...त्यातली पहिली म्हणजे माझी सख्खी काकू आणि दुसरी स्त्री म्हणजे 'माझ्या काकू' !!

हो, त्यांना मी नेहेमी फक्त 'काकू' म्हणूनच संबोधलं ......त्यांचं आणि माझं रक्ताचं नातं नव्हतं, पण काही नात्यांना ही अशी बंधनं लागू नसतात. जणू काही ती नाती म्हणजे तुमच्या आयुष्यातलं एक default setting असतं- तुम्ही काही करा किंवा नका करू - ही नाती जुळतातच. आणि नुसती जुळत नाहीत तर तुमचं आयुष्य समृद्ध करून जातात.

मी जेव्हा काकूंना भेटले तेव्हा मी अकरावीत होते. कॉलेजमधे आमचा एक ट्रेकिंग चा ग्रुप होता.त्या ग्रुप मधल्या एका मित्राची आई म्हणजे 'माझ्या काकू' !

मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हाच त्या मला खूप आवडल्या होत्या... मनमोकळ्या स्वभावाच्या, उत्साही, नीटनेटक्या आणि हसतमुख ! आणि हसणं सुद्धा उगीच तोंडदेखलं नाही बरं का ; तर अगदी हृदयाच्या तळातून निघालेलं - खळखळणारं , समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर देखील हसू आणणारं !!

जशीजशी आमची दोघींची ओळख वाढत गेली तसंतसं आमचं नातंही खुलत गेलं. थोड्याच दिवसांत माझी आई आणि माझ्या काकू एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. काकू जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा माझ्या आई करता एक अगदी टवटवीत फुलांचा गुच्छ घेऊन आल्या होत्या. आईच्या हातात ती फुलं देताना म्हणाल्या," मी पहिल्यांदाच येतीये तुमच्या घरी..रिकाम्या हाती कसं यायचं !" तेव्हाचं त्यांचं ते वाक्य आणि ते gesture जणू काही माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं...आज इतक्या वर्षानंतरही मी ते तंतोतंत पाळते.

काकूंच्या भूतकाळाबद्दल मला फारसं माहित नव्हतं; आणि मला त्याची कधी गरजही नाही वाटली . पण कधीतरी त्यांच्याच बोलण्यातून जे थोडंफार कळलं होतं त्यामुळे माझ्या मनातला त्यांच्या बद्दलचा आदर कितीतरी पटींनी वाढला होता.

त्यांचं लग्न भारतीय वायू सेनेतल्या एका फायटर पायलटशी झालं होतं. दोघांचा संसार सुखात चालू होता. लवकरच त्यांच्या संसाराचं नवं पर्व सुरू होणार होतं...त्यांना एका नव्या, तान्ह्या जीवाची चाहूल लागली होती..सगळं कसं अगदी दृष्ट लागण्यासारखं ! आणि नेमकं तेच झालं- काका काकूंच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. एके दिवशी काका जे विमान चालवत होते ते विमान अचानक क्षतीग्रस्त होऊन जमिनीवर कोसळलं. त्या आघातामुळे उठणाऱ्या ज्वाळांनी विमानाबरोबरच आतील सर्व सदस्यांनाही आपल्या कवेत घेतलं. आपल्या पत्नीला आणि तिच्या पोटातल्या आपल्या बाळाला मागे सोडून काका कायमचे निघून गेले...त्यांची आणि त्यांच्या बाळाची साधी नजरभेट सुद्धा नाही झाली.

पतीच्या अशा अचानक जाण्यामुळे काकूंच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही नाही करू शकत. पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपलं आयुष्य पुन्हा एकदा जगायला सुरुवात केली. स्वतः साठी नाही तर त्यांच्या मुलासाठी .... त्यांचं सगळं आयुष्य आता त्यांच्या मुलातच सामावलेलं होतं.

काकूंच्या बोलण्यात त्यांच्या सासरच्या लोकांचा फारसा उल्लेख नसायचा. त्यामागचं कारण काय हे माहित करायचा मी कधीच प्रयत्न नाही केला. नक्कीच काहीतरी सबळ कारण असणार.

पण आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये म्हणून त्यांनी त्या काळात (आजपासून जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी) बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, त्याला त्याच्या वडिलांची उणीव भासू नये म्हणून त्या रात्रंदिवस झटत राहिल्या. आपल्या मुलाला त्याच्या मित्रांबरोबर वावरताना कधीही आर्थिक कारणांमुळे न्यूनगंड येऊ नये ; यासाठी काकूंनी बँकेतल्या नोकरीबरोबरच जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षक( invigilator) म्हणूनही काम केलं. एकदा असंच भावुक होऊन बोलताना त्या मला म्हणाल्या होत्या," माझा मुलगा शाळेत असताना मला कायम एकच काळजी असायची...त्याच्या इतर मित्रांच्या तुलनेत तो कुठे कमी पडता कामा नये. त्याच्या मनात कधीही 'आज माझे वडील असते तर '.... हा विचार येऊ नये. " आणि यासाठीच त्यांची सगळी धडपड चालू असायची.

दिवाळी मधे नोकरीला जाण्याआधी पहाटे उठून फराळाचे पदार्थ करून ठेवणं, मुलाच्या शाळेत होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांत आणि उपक्रमांत त्याला सहभागी होता यावं यासाठी वेळोवेळी आर्थिक तरतूद करून ठेवणं.... किती ओढाताण झाली असेल त्या माऊलीची !

त्या काळच्या समाजात एका स्त्रीला असं स्वावलंबी होऊन आपलं आयुष्य जगताना किती संकटांना तोंड द्यावं लागलं असेल. प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना समाजाच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या बोचक नजरा आणि खोचक चौकशा त्यांचा पाठलाग करत असतील.

आणि या अशा परिस्थितीत आपल्या मुलावर चांगले संस्कार करणं, त्याला आवश्यक त्या सर्व सुखसुविधा पुरवणं, चांगलं शिक्षण देणं ...एकाच वेळी त्याची आई आणि वडील अशा दुहेरी भूमिका अगदी चोखपणे निभावणं .....आणि मुख्य म्हणजे ही सगळी तारेवरची कसरत करत असताना कुठेही राग, चिडचिड नाही; नशिबाला दोष देणं नाही ! काकूंच्या बोलण्यातून कधीच कोणासाठी राग, नाराजी किंवा अपशब्द नाही निघाले.स्वतःच्या भूतकाळाबद्दल बोलताना कधीही त्यांच्या चेहेऱ्यावर दुःख किंवा कष्ट दिसले नाहीत.. नेहेमी तेच प्रसन्न हास्य !!!

अशा प्रकारे स्वतःच्या जीवपेक्षाही जास्त जपलेल्या त्यांच्या मुलानी जेव्हा स्वतः एअर फोर्स मधे फायटर पायलट बनायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी अगदी हसत हसत त्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.... जणूकाही त्या दोघां मायलेकांच्या मते हाच एकमेव आणि योग्य विचार होता.

धन्य आहे ती कूस जिनी असा जिगरबाज मुलगा जन्माला घातला आणि त्याच्यावर देशप्रेमाचे संस्कार केले....आणि धन्य आहे तो मुलगा ज्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचं कारण माहित असूनदेखील त्यानी त्यांचाच वसा पुढे न्यायचं ठरवलं आणि तेही त्यांच्याच मार्गावर चालत ! या जगावेगळ्या मायलेकांना माझा मानाचा मुजरा !!!!

आम्ही सगळे मित्र मैत्रिणी जेव्हा कॉलेज च्या कॅन्टीनमधे चकाट्या पिटत बसायचो तेव्हा आमचा हा मित्र कॉलेजच्या लायब्ररी मधे बसून NDA च्या entrance exam ची तयारी करायचा...दिवसभर - अगदी तहानभूक विसरून ! त्या कोवळ्या बालिश वयात जेव्हा आम्हांला 'बारावी नंतर काय ?' हा प्रश्न भेडसावत होता तेव्हा आमच्याच वयाच्या या मित्रानी त्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं....'आपल्या वडिलांसारखं स्वतःला देशसेवेत समर्पित करण्याचं ' ध्येय ! आणि त्याच्या या ध्येयपूर्तीसाठी त्याच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता.. पुढच्या काही महिन्यांतच आमचा मित्र NDA मधे गेला - त्याच्या वडिलांसारखाच तोही फायटर पायलट बनला. (आणि आज तो भारतीय वायू सेनेत एका उच्च पदावर कार्यरत आहे !)

पण त्याच्या जवळ नसण्यामुळे माझ्या आणि काकूंच्या नात्यात अजिबात फरक पडला नाही. आमचं दोघींचं अधून मधून भेटणं, आणि प्रत्येक भेटीत अगदी भरभरून बोलणं चालूच राहिलं. आणि त्या प्रत्येक भेटीतून मी काकूंकडून काही न काही शिकत राहिले....आमच्या दोघींच्याही नकळत !

माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक महत्वपूर्ण घटनेत काकू नेहेमीच सहभागी व्हायच्या....मग ते आमच्या घरात होणारे वेगवेगळे यज्ञ असोत किंवा माझ्या बहिण भावांची लग्नं ! माझ्या गेस्ट लिस्ट मधलं पहिलं नाव काकूंचं असायचं. मी जेव्हा माझ्या लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायला त्यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता. नितीन बद्दल, माझ्या सासरच्या लोकांबद्दल ऐकून इतक्या खुश झाल्या होत्या ! मला जवळ बसवून घेत खूप काही सांगत राहिल्या... आयुष्याबद्दल, एका विवाहितेच्या जीवनात येणाऱ्या अनेकविध आव्हानांबद्दल .... जणू काही माझ्या आईची उणीव त्या भरून काढत होत्या !

काकू जशा माझ्या प्रत्येक आनंदाच्या साक्षीदार होत्या तशाच प्रत्येक हळव्या क्षणी देखील त्या माझ्या बरोबर होत्या....जेव्हा शक्य झालं तेव्हा प्रत्यक्षरित्या -पण माझ्या लग्नानंतर बऱ्याच वेळा मी पुण्याबाहेर असल्यामुळे ते शक्य नव्हतं... तरीही कधी पत्रातून तर कधी फोनवर बोलून त्यांनी प्रत्येक वेळी मला धीर दिला, आधार दिला !

मी जेव्हा जेव्हा पुण्यात जायचे तेव्हा माझा एक दिवस खास काकूंसाठी राखून ठेवलेला असायचा. हो ना....इतकं काही असायचं बोलायला , एकमेकींना सांगायला...की तो एक दिवस पण कधी कधी अपुरा पडायचा. त्या भेटींमधे बऱ्याचदा काकू त्यांचं मन माझ्यापाशी मोकळं करायच्या. कदाचित त्यांच्या आयुष्यातली मुलीची उणीव त्या पूर्ण करत असाव्यात. त्यामुळे त्यांचं मन हलकं होत असेल कदाचित, पण त्यानंतर त्यांना तसं एकटं सोडून निघताना माझ्या जीवाची मात्र खूप घुसमट व्हायची. पण मला निरोप देताना त्यांच्या चेहेऱ्यावर मात्र त्यांचं तेच नेहेमीचं निखळ हास्य असायचं ...

तर अशा होत्या माझ्या काकू... lady with a golden heart !!!

त्यांचं आणि माझं शेवटचं बोलणं झालं तो दिवस मला अजूनही आठवतोय....माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला फोन केला होता , २००८ साली .. त्यावर्षी आम्ही नुकतेच हैदराबाद मधे शिफ्ट झालो होतो. त्यामुळे माझा इथला फोन नंबर त्यांच्याकडे नव्हता. पण माझ्याशी बोलायची इच्छा तर होती. मग त्यांनी माझ्या बहिणीला फोन करून तिच्याकडून माझा नंबर घेतला आणि मला फोन केला. कितीतरी वेळ बोलत होतो आम्ही दोघी. एकमेकींची ख्याली खुशाली विचारत होतो. दोघींपैकी कोणालाच कॉल बंद करावासा वाटत नव्हता... त्या दिवशीचं त्यांचं शेवटचं वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे ; काकू म्हणाल्या होत्या," खूप सुखात राहा नेहेमी. माझे आशीर्वाद आयुष्यभर तुझ्या पाठीशी आहेत." त्या दिवसानंतर आजपर्यंत माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला काकूंचे ते शब्द आठवतात ...जणू काही त्या न चुकता स्वर्गातून मला दरवर्षी माझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा देतात !!( हो, त्यांच्यासारखी देवमाणसं स्वर्गातच राहतात.)

आज अचानक हे सगळं लिहायला कारण ही तसंच आहे...आज १३ ऑगस्ट...काकूंचा जन्मदिवस ! आज जर त्या या जगात असत्या तर हा त्यांचा कितवा वाढदिवस असता .....मला नाही माहित....पण त्यानी काय फरक पडतो ! माझ्या मनात त्यांचं जे स्थान आहे, त्यांच्या बद्दल जो आदर आणि प्रेम आहे - ते तर कायमच अबाधित राहणार आहे !

काकू, तुम्हांला तुमच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! <3

Group content visibility: 
Public - accessible to all site users