माझी सैन्यगाथा (भाग २५)

Submitted by nimita on 9 August, 2019 - 05:44

मी ICU च्या दिशेनी निघाले खरी पण पायांत जणू मणा मणाचं ओझं बांधलं होतं... पावलं जागेवरून हलायला तयार नव्हती. तेवढ्यात मागून पुन्हा एकदा त्या नर्सिंग असिस्टंटची हाक कानावर आली. मी मागे वळून बघितलं. तो माझ्या दिशेनीच येत होता. घाईघाईत माझ्या समोर येत म्हणाला," मॅम, घाबरायचं काही कारण नाहीये. पहाटे सरांना अचानक खूप थंडी वाजायला लागली म्हणून त्यांना ICU मधे हलवलं होतं .. तिथे त्यांच्यावर नीट लक्ष ठेवता येईल म्हणून फक्त...तुम्हाला वाटतंय तसं सिरीयस काहीच नाहीये. आता सर एकदम ठीक आहेत. " त्याचं ते बोलणं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. तरी पण 'कधी एकदा नितीन ला प्रत्यक्ष बघते' असं झालं होतं मला. मगाशी उभ्या जागी खिळलेले माझे पाय ... त्यांना आता जणू काही पंख फुटले होते. मी आणि ऐश्वर्या एकदाच्या ICU मधे पोचलो. तिथल्या एका क्युबिकल मधे नितीन शांतपणे झोपला होता. आमची दोघींची चाहूल लागताच त्यानी डोळे उघडले. पुढच्या काही मिनिटातच ऐश्वर्यानी त्याला आमच्या 'ऑफिसर्स वॉर्ड ते ICU' या प्रवासाचा आंखों देखा हाल अगदी बारीकसारीक तपशीलांसकट ऐकवला. त्या दोघांच्या त्या रंगलेल्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन देवाचे आभार मानले.पुढच्या काही दिवसांत नितीनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि पुन्हा एकदा आमचं नॉर्मल रुटीन सुरू झालं.

वेलिंग्टन चा तो एक वर्षाचा कोर्स बघता बघता संपत आला आणि मग हळूहळू सगळ्यांना नवीन पोस्टिंग चे वेध लागले. एअर फोर्स आणि नेव्ही वाल्यांपेक्षा आम्हां आर्मी वाल्यांना जास्त उत्सुकता होती. उत्सुकता म्हणण्यापेक्षा एक हलकीशी धाकधूक होती मनात.. peace posting येणार का field posting ? वरवर पाहता जरी हा एक प्रश्न वाटला तरी या एका प्रश्नात बरेच प्रश्न अध्याहृत होते. खास करून फील्ड पोस्टिंग च्या संदर्भात ! उदाहरणार्थ- घरातलं सगळं सामान पॅक करताना नवऱ्याचं सामान वेगळं पॅक करायचं का सगळं एकत्रच ठेवायचं ? वेगळं राहायचं असेल तर कुठल्या गावात राहायचं? तिथे quarters करता apply कधी करायचं ?मुलांच्या शाळेच्या entrance टेस्ट्स कधी असणार ? वगैरे वगैरे सतराशे साठ गोष्टी!

मी तर कोर्स संपायच्या साधारण महिनाभर आधीपासूनच घरातलं सामान पॅक करायला सुरुवात केली होती. या आधीची आमची पोस्टिंग peace स्टेशन मधे होती त्यामुळे आता फील्ड पोस्टिंग येणार हे जवळजवळ नक्की होतं. तरीही मनात कुठेतरी आशेचा एक किरण होता की कदाचित पुढची पोस्टिंग एखाद्या फॅमिली स्टेशन मधे होईल.

पण नाही हो, आमच्या अंदाजाप्रमाणे नितीनची पोस्टिंग जम्मू कश्मीर मधल्या राजौरी येथे झाली...राजौरी हे फील्ड स्टेशन असल्यामुळे आम्हांला त्याच्याबरोबर तिकडे राहायची परवानगी नव्हती. म्हणून मग आम्ही जम्मू मधे SFA (separated family accommodation) घेऊन राहायचं ठरवलं.

वेलिंग्टन ला रामराम ठोकून आम्ही जून १९९९ मधे जम्मूला पोचलो. त्या दिवसांत कारगील युद्ध (Operation Vijay) अगदी चरमसीमेवर होतं. त्यामुळे आम्ही ज्या दिवशी जम्मूला पोचलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीनला राजौरीला जाणं भाग होतं आणि त्याप्रमाणे तो गेलाही ! त्यावेळी माझी अवस्था 'एक कटी आणि एक पोटी' अशी होती....थोडक्यात सांगायचं तर मी 'family way' मधे होते- माझा सातवा महिना चालू होता. तेव्हाच्या एकंदर परिस्थिती बद्दल, सुरुवातीच्या दिवसांत मला आणि ऐश्वर्याला आलेल्या अनुभवांबद्दल मी सैन्यगाथेच्या सतराव्या भागात बरंच काही लिहिलं आहे. त्यामुळे ते सगळं आता परत नाही सांगत!

२६ जुलै १९९९ ला युद्धविराम झाला. साहजिकच माझ्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला. आता मला माझ्या डिलिव्हरी चे वेध लागले होते. डॉक्टरांनी ऑगस्ट महिन्यातली तारीख दिली होती. त्यावेळी नितीन काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन येणार होता. आणि पुण्याहून माझी मोठी बहीण पण थोडे दिवस येऊन राहणार होती.

मी हळूहळू त्या दृष्टीनी तयारी करायला सुरुवात केली. तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे - घरकाम करायला बाई मिळणं खूप अवघड होतं....युद्धाचे पडसाद असेही उमटू शकतात हे जाणवलं त्यावेळी. सिव्हिल एरिया मधून कॅन्टोन्मेंट मधे काम करायला येण्यासाठी कोणीच बायका तयार नव्हत्या.शेवटी महत्प्रयासानी एक जण माझ्याकडे काम करायला तयार झाली. कदाचित माझी त्या वेळची अवघडलेली अवस्था बघून तयार झाली असावी !

माझ्या तिथल्या एका मैत्रिणीनी एकदा मला विचारलं की "तुझी डिलिव्हरी झाल्यावर बाळाची आणि तुझी मालिश, शेक शेगडी वगैरेचं काय करणार आहेस तू ?" हाच प्रश्न माझ्याही मनात आधीपासूनच घोळत होता. बाळाची मालिश, अंघोळ, शेक शेगडी तर मीच करायचं ठरवलं होतं. ऐश्वर्याच्या वेळचा अनुभव असल्यामुळे त्या बाबतीत मी कॉन्फिडन्ट होते. पण बाळाबरोबरच बाळंतिणीची मालिशही तितकीच महत्वाची असते ना! निदान आपल्याकडे तरी आपण तसं मानतो. पण जेव्हा मी माझ्या घरी काम करणाऱ्या सुषमाला विचारलं तेव्हा तिच्या चेहेऱ्यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह दिसलं."आपको मालिश किस लिये ? और वो भी रोज...दिन में दो बार ???" तिला सगळं नीट समजावून सांगितल्यावर मोठ्या मुश्किलीनी तयार झाली ती..पण तिच्या टर्म्स आणि कंडिशन्स वर... रोज दोन वेळा जमणार नाही..एक दिवसाआड आणि तेही फक्त सकाळी...आणि हो ..फक्त मालिश बरं का ! शेक शेगडी वगैरे आपलं आपण करून घ्यायचं. काय करणार -'अडला हरी, .......चे पाय धरी!'

बघता बघता ऑगस्ट महिना उजाडला. दुसऱ्या आठवड्यात पुण्याहून माझी बहिण आणि राजौरी हून नितीन येणार होता. जवळजवळ अडीच महिन्यांनंतर बाबा भेटणार म्हणून ऐश्वर्या खूप खुशीत होती.आणि त्यात भर म्हणून तिची मावशी पण येणार होती. त्यामुळे डबल मजा ! तिचे रोज नवीन प्लॅन्स बनत होते... बाबा आणि मावशी आले की काय काय करायचं त्याचे.. तिच्यासाठी तर ती एक पर्वणीच होती. कारण जून मधे आम्ही त्या घरात राहायला लागल्यापासून आमच्याकडे कोणीच पाहुणे, नातेवाईक आले नव्हते. दिवस रात्र फक्त आम्ही दोघीच असायचो एकमेकींच्या साथीला. कॉलनी मधले तिचे मित्र मैत्रिणी आणि माझ्या काही मैत्रिणी होत्या म्हणा.. पण ऐश्वर्या च्या दृष्टीनी 'पाहुणे म्हणजे जे रात्रीपण आपल्या घरी राहतात ते लोक'! त्यामुळे मावशी येणार हे कळल्यावर ती जाम खुश झाली होती. रोज एकदा तरी तिच्या स्कूल बस मधल्या मुलांना सांगायची," पता है; मेरे घर में गेस्ट आनेवाले हैं।" आणि त्या उत्साहाच्या भरात रोज मला विचारायची," आई, अजून किती दिवस राहिले?"

खरं सांगायचं तर मीसुद्धा खूप उत्साहात होते . त्याला कारणंही तशीच होती ना- सगळ्यात मोठं कारण म्हणजे 'येणाऱ्या नव्या जीवाला कुशीत घ्यायची आस!' त्या निमित्तानी का होईना पण नितीनला सुट्टी मिळाली होती आणि तोही थोडे दिवस घरी येणार होता. त्याशिवाय बहिणीची भेट होणार होती !!

म्हणून मग मी पण कंबर कसून कामाला लागले. पुढच्या दोन एक महिन्यांचं वाणी सामान भरून ठेवणं, मी हॉस्पिटलमधे असताना बहिणीला सोपं जावं म्हणून चिवडा, शंकरपाळी वगैरे कोरडे फराळाचे पदार्थ बनवून ठेवणं, बाळासाठीची दुपटी, कपडे वगैरे धुवून ठेवणं... एक ना अनेक ! ते आठ दहा दिवस घरात अगदी लगीनघाई च होती .

पण आता मी आणि ऐश्वर्या येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करायला अगदी तयार होतो.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
काय करणार -'अडला हरी, .......चे पाय धरी!' कृपया हे बदला. कसं का होईना मदतीला मिळाली हेच खूप झाले. युद्ध पडसादांमुळे कोणी मिळतही नव्हते ना.

तुमचे सगळेच लेखन, अनुभवकथन आवडते.
हा भाग थोडा खंड पडल्यावर आल्यामुळे किंवा मी इथे नियमित येत नसल्यामुळे काही संदर्भ लागेना मला Happy
जमल्यास प्रत्येक भागाच्या सुरवातीला आधीच्या भागाची लिंक द्याल का ?

Icu चं वाचून जीव भांड्यात पडला!
युध्दाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला आणि चिमणीला अश्या अवस्थेत सांभाळलंत. Hats off!
लढाईत एक लढा आत पण चालू असतो. बाहेरच्या लढाईपेक्षा आतली लढाई जिंकून परिस्थितीवर मात करणं खूप खूप कठीण _//\\_