आंबट गोड गाभुळलेल्या चिंचा

Submitted by चकाकी on 7 August, 2019 - 16:58

आंबट गोड गाभुळलेल्या चिंचा

एक दिवस सकाळी उठून फोन हातात घेते, तर अचानक एका व्हॉट्सऍप ग्रुप चं आमंत्रण येऊन पडलेलं असतं. अजून एक ? आधीच इतके ग्रुप्स आहेत की मॅनेज होत नाहीयेत. आता अजून एक कुठला ? बघायला गेले तर पहिलीच्या शाळेचं नाव दिसतं - आता जरा उत्सुकता ताणली जाते. हे कोण असेल? डोळे चोळत, दोन वर्षांपूर्वीच लागलेला चष्मा घालून क्लिक करते तर काय ! एकदम जादूनगरीचा दरवाजा उघडल्यासारखं वाटतं.

भराभरा मेसेजेस पडत असतात - पाहिलं तर बरेच जण माझ्याविषयीच बोलत असतात. कुणी माझं स्वागत करत असतात - कुणी माझं सासरचं नाव पाहून मी कोण म्हणून इतरांना विचारत असतात. मग कुणी त्यांना माझं शाळेतलं टोपण नाव परस्पर सांगत असतात. मी आनंदाश्चर्यानं नुसतीच वाचत सुटते. जिने माझा नंबर ऍडमिनला दिलेला असतो, ती मधेच अवतीर्ण होऊन सांगते "तिला काहीच माहिती नाहीये, मी तिला सांगितलंच नाही तिला आपण ग्रुप वर घेणारोत म्हणून !" मला आणखीनच मजा वाटायला लागते. हे इतके सगळे जण आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आलेले - एकदम एकत्रित पणे 30-40 वर्षांनी असे भेटतील अशी कल्पना पण कधी माझ्या डोक्यात आलेली नसते.

मी हळूहळू धक्क्यातून बाहेर येते आणि सगळ्यांना हॅलो करायला लागते. एकेकाचे प्रोफाइल फोटो बघायला लागते. मुलींपेक्षा मुलांचे चेहेरे इतके बदललेले असतात ! कुणी तरी इयत्ता पहिलीचा ग्रुप फोटो अपलोड केलेला असतो - मी तो मोठा करून आणि डोळे बारीक करून एकेकाला ओळखायचा प्रयत्न करते. आणि कमालीची खूष होते स्वतःवरच ! मला कल्पनाच नसते की मी इतक्या जणांना माझ्या मनात इतकी वर्ष सुखरूप सांभाळून ठेवलं होतं, म्हणून ! आणि हा विचार करतानाच लक्षात येतं, की यातल्या अनेकांच्या मनात मी ही दडून बसलेली होते इतकी वर्ष ! मी खरं तर लहान असताना अतिशय नगण्य आणि बुजरी होते, असा माझा स्वतःविषयीचा समज असतो आणि ही मंडळी, ज्यातल्या अनेकांना मी चौथीनंतर कधीही कुठेही पाहिलेलं नसतं, ते मला टोपण नावासहित ओळखत असतात !

.........नवरा मधेच माझी तंद्री मोडतो.......विचारत असतो, "काय आज दांडी आहे का ऑफिस ला ?" मी त्याच्याकडेच अनोळखी नजरेनी पाहात राहते. आजची सकाळ मोरपीस घेऊन आलेली असते, एवढंच फक्त त्या क्षणाला माझ्या मनात नमूद होतं.

मग सुरुवात होते - मंतरलेल्या दिवसांची ! रोजचे चारशे-पाचशे मेसेजेस, पण फॉर्वर्डस मात्र जवळजवळ नाहीतच! फक्त गप्पा ! एकमेकांच्याविषयीच्या आस्थेने केलेल्या चौकश्या, स्वतःविषयीचे तपशील, ग्रुप मधल्या कर्तृत्ववान मंडळींचं अभिमानाने केलेलं कौतुक, खाण्यापिण्यावरच्या चर्चा, एकमेकांची मजेमजेत उडवलेली खिल्ली, आईवडील आणि शाळेतल्या शिक्षकांच्या आठवणी, शाळेतल्या जुन्या प्रार्थना, मातीकामाचे आणि हस्तकलेचे वर्ग, शाळेतली झाडं, फुलं, ससे, पुस्तकात ठेवलेली रंगीत पिसं, जाळीदार पिंपळपानं, अशोकाच्या बियांचे संग्रह आणि आंबटगोड गाभुळलेल्या चिंचा .....सगळंच अद् भुत, जादूगाराच्या पोतडीतून निघाल्यासारखं !

ग्रुप मधले बरेच जण अजूनही "happily ever after" च्या चालीवर आमच्या लहानपणीच्याच शहरात मजेत राहत असतात. काही जण थोडे दूर, पण भारतातच स्थायिक असतात. अगदी मोजकेच काही जण आमच्यासारखे सात-समुद्र किंवा काही जण तीन-चार समुद्र पार करून वसलेले असतात. त्या आमच्या शहरातले सगळे जण प्रत्यक्ष भेटायचे बेत करायला लागतात, आणि ते बेत प्रत्यक्षातही आणायला लागतात. प्रत्यक्ष भेटणारे आणि भेटू न शकणारे, कुणाच्याच उत्साहात किंवा जवळिकीत फरक होत नाही.

मग गोष्टी सुरु होतात शाळेत मेळावा करण्याविषयीच्या ! उत्साहाला नवीन धुमारे फुटायला लागतात. कुणाला बोलवायचं, दिवस कसा आखायचा, शाळेला देणगी किती द्यायची, कार्यक्रम पत्रिका, आठवणींसाठी फोटो, व्हिडीओ, भेटवस्तू, आणि बरंच काही. तिथे हजर न राहू शकण्याची खंत बाजूला ठेवून आम्ही गावाबाहेरचे आणि देशाबाहेरचे लोकही त्या धमाल बेतांच्या आखणीमधे हिरीरीने भाग घ्यायला लागतो. प्लॅनिंगला उधाण येतं , आमच्या वेळच्या अनेक शिक्षकांना आमंत्रणं जातात, खरेद्या होतात, जेवणाची व्यवस्था होते, कार्यक्रम ठरतात. आणि प्रत्यक्ष "त्या" दिवशी सगळं काही ठरल्यापेक्षा काकणभर जास्तच सरस होऊन पावतं. व्हिडिओच्या क्लिप्स पाहात, मनानी स्वतःला तिथे उभे करत आम्ही दुरूनही तितकेच भावनाप्रधान होतो, किंबहुना रेषभर जास्तच ! ग्रुपमधले लेखक, लेखिका वगैरे मंडळी पेपर मधे लेख लिहून आणि डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी डीव्हीडी बनवून आठवणींचं आयुष्य वाढवत असतात. चार दिवस ग्रुप अल्लाउद्दीनच्या जादुई चटईवरून अलगद उडत राहातो - विषय मेळाव्याच्या बाहेर पडायलाच तयार नसतो.

आणि मग एक दिवस सकाळी जागी झाल्यावर फोन हातात घेते, तर नेहेमीसारखे २००-४०० मेसेजेस दिसत नाहीत. कुणीतरी नुसतंच "सुप्रभात" असं म्हणत फुलांचा फोटो पोस्ट केलेला असतो. काही जणांनी काहीतरी उडत उडत लिहिलेलं असतं , कुणीतरी एखादा फॉरवर्ड पाठवलेला असतो आणि काही नुसतेच इमोजी पडलेले असतात. मी भराभर अस्वस्थ मनानी पुढे पुढे जात राहाते आणि एकीचा मेसेज दिसतो " आता मेळावा संपलाय, आपला उत्साह संपवायला नको. आज इतकी शांतता का? तीन तासात एकही पोस्ट नाही....!" काही जण तिला दुजोरा देत असतात, काही जण दुसऱ्या आळसावलेल्या ग्रुप्सचे दाखले देत असतात. मी तटकन उठून बसते. अनोश्या पोटाला निराळाच खड्डा जाणवतो. सातासमुद्रापलीकडून गुंतून गेलेलं मन चरकतं. मी तर अजून भेटले पण नाही या सगळ्यांना. आणि आता काय होईल? शांतता वाढेल? सगळे पांगतील ? काही जण आधीच जेमतेम सहभाग घेतात. हळूहळू बाकीचेही त्यांच्यासारखेच होतील? मी घाईघाईने काही-बाही लिहिते. मेसेजेसची माळ गुंफत राहिली पाहिजे....आता तिकडे रात्र होईल, मग अजूनच खंड पडणार....बेचैनीतच दिवस सुरु होतो. युनिव्हर्सिटीच्या गावाहून घरी आलेली लाडकी लेक चेहरा पाहून विचारते, "बरं वाटत नाहीये का आई?" मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून कामाला लागते. दहा दहा मिनिटांनी ग्रुपवर जाऊन पाहात राहाते. कुणी काही, कुणी काही लिहीत राहतं, पण मन तितकंसं बहरत नाही. दिवस असाच जातो. ऑफिसमधून घरी येतानाचं तासाभराचं ड्रायव्हिंग म्हणजे शिक्षा वाटते - आता तिथे सकाळ होत असेल, किती जण उठले असतील? पोस्ट्स पडत असतील ना? की नुसतेच सुप्रभात आणि सुविचार, इतर ग्रुप्स सारखे? घरी येऊन गाडीतून बाहेर न पडताच आधी व्हॉट्सऍप उघडते. का कुणास ठाऊक पण कान गरम झालेले असतात आणि हात थंडगार. ८५ नवीन मेसेजेस ! हुश्श! आत्ताच ८५? अजून तर फक्त सुरुवात आहे... आत्ताशी उजाडतंय तिकडे ! आनंदानी काही मजेशीर उत्तरं देऊन मी घरात शिरते. मस्त स्वैपाक करते, लवकरच काही नवीन रेसिपी करून ग्रुप वर फोटो टाकण्याचा संकल्प करते. मध्यरात्रीपर्यंत ग्रुपवर नवीन पालवी फुटलेली असते. गालात हसत मेसेजेस वाचत मी झोपेच्या आधीन होते.

दिवस-रात्र, आठवडे, महिने जात राहातात. मी अजूनही माझ्या आटपाट नगरात गेलेली नसते. कुणालाही प्रत्यक्ष भेटलेली नसते. पण तिकडे उत्साहाला सुमार नसतो. सतत मी कधी येणार अशी चौकशी चालू असते आणि मला ती सुखावत असते. तिकडे वाढदिवस, सहली, भेटीगाठी, कार्यक्रम, सारं काही अव्याहत चालू राहतं. आम्ही मोजकेच परदेशशस्थ मेंबर्स आमच्या बाजूचा वसा हाती धरून नीट उभे असतो. सकाळ असो वा रात्र, दिवा तेवत राहतो. चेष्टा मस्करी होत राहाते, तशा गंभीर चर्चाही ! एकमेकांशी सहमत होताना कधी तात्विक वादही होत राहतात. सातासमद्रापलिकडून कुणी काही कारणाने उड्डाण करतात, तेव्हा आवर्जून भेटत राहातात. खाऊ, गिफ्ट्स अधूनमधून फिरत राहातात. वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होत राहातात. एखाद्या चुकार आळसावलेल्या दिवशी कुणी अजूनही लिहितं, "सव्वा दोन तास शांतता ?..." ते वाचून थोडंसं ओकंबोकं वाटतं पण आता सैरभैर वाटत नाही, तर खुद्कन हसू येतं. घरातल्या लोकांना मी दिवसेंदिवस जास्त हलकी-फुलकी होत चालल्याचा आनंद असतो, आणि मी या "प्रत्यक्ष न भेटणाऱ्या" मित्र-मत्रिणींच्या नादात घरातल्यांकडे कधीकधी दुर्लक्ष करत असल्याची गंमतशीर खंतही ! जुन्या आठवणी जागवताना नव्या आठवणी तयार होत असतात.

एका शनिवारी नेहेमीच्या मित्रमत्रिणींच्या सोबतीने सुंदर हाईक करून पायथ्याला आल्याबरोबर मी नेहेमीप्रमाणे व्हॉट्सऍप उघडते. इतकी सुंदर निसर्गाची किमया पाहून, भारावून परत आल्यावर शाळेतल्या सवंगड्यांना फोटो गेलेच पाहिजेत! कुणीतरी माझा फोन काढून घेत म्हणतं, "झालं का तुझं सुरु!" माझ्या मनात कसलीतरी धून गुणगुणत असते. हरवलेल्या आवाजात मी म्हणते, "'आंबटगोड गाभुळलेल्या चिंचां'ना इंग्लिशमधे काय म्हणतात रे ?....."

Group content visibility: 
Use group defaults

वा ! भावना किती सुंदर मांडल्या आहेत. अतिशय आवडला लेख. हलकीफुलकी आणि साधीशी शैली पण छान आहे. लेखाचं शीर्षक एकदम apt Happy

लेख आवडला, पटला
समर्पक आणि चपखल शीर्षक
शाळेच्या whatsapp group वर पाठवतो आहे
आम्हीही सध्या गप्पा आणि ढकला ढकली (forwards)स्थितीत आहोत

मस्त लिहिलंयस,

आपल्या शाळेतलं चिंचेचं झाड आणि त्याचा पार आठवला एकदम...

मस्त!
रंगीत पिसं, जाळीदार पिंपळपानं, अशोकाच्या बियांचे संग्रह, मातीकामाचा वर्ग, ससे > नवीन मराठी !(हो ना ?) भारीच ! ( बालपणीच्या खजिन्यातील अजुन काही - बँड चा गोल, टिंक्चर आयोडिन, साच्याचा गणपती, शाळेतली भाजी , पालखी , हॉलमध्ये पसायदान )