वयाची ऐशीतैशी...

Submitted by मोहना on 12 February, 2013 - 22:49

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकर्त्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोटाळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."
"इऽऽऽऽऽऽऽऽ, पिल्लू काय गं, मी काय आता लहान आहे का?" पिल्लूला पंख कधी फुटतील याची घाई.
"अगं केस पांढरे झाले आहेत का काय ते पाहते आहे."
" ग्रेसफुली एजिंग आई, ग्रेसफुली एजिंग. पांढरे केस चांगले दिसतात, कशाला ते रंग बिंग लावायचे?."
"ए, ते ग्रेसफुली एजिंग नट्यानांच शोभतं हं. म्हणजे सगळे उपाय करायचे, उपाशी तपाशी राहून शरीर थकवायचं पण तरी वय वाढणं काही थांबवता येत नाही की असं म्हणायचं. वा रे वा (इथे मी मुलीला ओरडते तशी त्या अदृश्य अनामिक नटीला ओरडले). आणि केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काही संबंध नसतो." आपल्या दु:खावर आपण्च मलमपट्टी केलेली बरी.
"बरं, तुला इमेल आलं आहे बघ. ’पंखा’ आहे तुझा. लिहलय, मला ’अहो, जाहो’ नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहान आहे." दु:खावर मीठ चोळणार्‍या त्या वाक्याने मी मुलीला, माझं इ मेल तू कशाला वाचतेस हे ही विचारायला विसरले.
"ह्यांना कसं काय कळतं कोण जाणे, मी मोठी आणि त्या लहानच असणार ते." लेक ढिम्म उभी बघून मला चेव चढला. " आमचं मेलं सगळं जगासमोर मांडलेलं. तरी बरं, संकेतस्थळांवर फोटो पाळण्यात असतानाचे टाकले आहेत. उभं राहून फोटो काढायचा तर एक पाय पुढे धरुन तो काहीसा वाकवून, मग पोट आत घेऊनच उभी राहते. या कसरती कमी म्हणून की काय चीजऽऽऽ म्हणताना नुकत्याच दि्सायला सुरुवात झालेल्या डोळ्याच्या बाजूच्या एक दोन (?) सुरकुत्या दिसणार नाहीत असं हसायचं. इतकं करुन्ही कशा या बायका माझं वय काढतात, स्वत:ला लहान समजतात?" एखादी शोकांतिका समोर घडत असल्यासारखा चेहरा झाला असावा माझा.
"अगं आई तू लिहतेस ना, त्यातून कळतं तुझं वय. म्हणजे मुलांच्या वयाचे उल्लेख असतात ना त्यावरुन."
मोट्ठा शोध लागला असं वाटलं, चला यापुढे लेखनातून मुलं वगैरे बाद एकदम. खूप आनंद झाला समस्या शोधून उपाय केल्याचा म्हणजे ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही......’ संपल्यासारखं वाटलं. पण काही क्षणच. प्रश्न पडला, मग मी लिहू तरी काय? माझी ही इतकी ’गुणी’ मुलंच तर सातत्याने विषय पुरवत असतात भलतंसलतं वागून माझ्या लेखनाला. माझ्या विनोदाचं मर्मस्थानच नष्ट केल्यासारखं होईल अशाने. तितक्यात लहान मुलाची समजूत घातल्यासारखी मुलगी म्हणाली.
"पण खरं तर तू आहेस त्यापेक्षा पाच वर्षानी लहान दिसतेस ते त्यांना कसं माहित असणार ना? ते वाचक आहेत प्रेक्षक नव्हेत."
"खरंच? म्हणजे काय वय वाटत असेल गं माझं?" उत्तर काय येतं याची धाकधूक होती परिक्षेला बसल्यासारखी. पण त्यातून तरुन निघाल्याचा आनंद वाढवतील ती आपली मुलं कसली. गणिताची बोंब असल्यासारखा लेकीचा हिशोब चुकला. माझ्या वयातली पाच वर्ष कमी होण्याऐवजी दहा वाढली. माझ्या एकाचवेळी पडलेल्या, लटकलेल्या, रागावून लाल झालेल्या चेहर्‍याकडे पाहून धोक्याचा इशारा तिने अलगद झेलला. विषयाचं तोंड दुसरीकडे फिरवण्याचा चतुरपणा ती वडिलांकडून शिकली आहेच.

"आई, तुझं बाई काही समजत नाही. इकडे सर्वांनी तुला अगं तुगं करावं असं वाटतं, पण आपण मागच्यावेळी पुण्यात दुकानात गेलो होतो....."
ती काय विचारणार ते लगेच कळलं. पोरगासा दुकानदार.
"इकडे ये." हातातली थप्पी दाखवत तो म्हणाला. नुकत्याच मिसरुड फुटलेल्या मुलाकडून, ए......ऐकल्यावर मस्तक फिरलंच.
"मी काही शाळकरी पोरगी नाही. तुम्ही अगं तुगं का करताय?" फुत्कारत प्रश्न टाकला. तो हसला.
"नाही, जीन्समध्ये असलं कुणी की अहो, जाहो नाही करायचं असं बाबांनी बजावलं आहे." कुठे गेला तो तुझा बाबा हा प्रश्न मी न विचारताही त्याने जोखला.
"बाबा संध्याकाळी येतात दुकानात."
भरपूर कपडे पाहायचे पण घ्यायचं काहीच नाही. मी मनोमन बदला घ्यायचा ठरवलं आणि तस्संच केलंदेखील.
दोन पौंड वजन कमी केल्यासारखा आनंद झाला बदला घेतल्यावर. त्या आनंदात तरळत नवथर उत्साहात दुकानाच्या पायर्‍या उतरले. आत्ताही चेहर्‍यावर तसे भाव आले असावेत.
"आई...." मुलीने लक्ष वेधलं.
"अगं ते वेगळं. म्हणजे बघ कंडक्टर, रोजच्या कामवाल्या आजी, भाजीवाली सगळे कितीही मोठे असले तरी त्यांनी आपल्याला अगं तुगं करुन कसं चालेल?"
"असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो."
"हं... ते वेगळं." उत्तर न सुचून पुन्हा ते वेगळं चा सूर पकडला मी.

सध्या माझी मोहीम सगळ्या ब्लॉग ना भेटी द्यायच्या, खालच्या कॉमेंट्स वाचायच्या आणि खुषीने उड्या मारायच्या अशी आहे. म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.
काही ब्लॉगर्सची आधीच विनंती असते ’अगं/ अरे’ म्हणायची, नाहीतर काही ठीकाणी
मला कृपया ’अहो’ म्हणू नका, ’सर काहीतरीच वाटतं बुवा’ अशी आर्जवे,
त्याला छोट्यांनी
’नाही तुम्ही मोठे आहात/मोठ्या आहात, मी लहान आहे’ ची जोडलेली पुष्टी. मग ब्लॉगर्सचा प्रश्न
’तुला कसं कळल’
’पोस्ट वाचून.....’ वाचकाचं उत्तर.

रोज भेटणारी कितीतरी माणसं, त्यांनी आपल्याला ’अगं तुगं, अरे’ केलेलं चालत नाही आपल्याला, पण ब्लॉगवरच्या कधीही न पाहिलेल्या मंडळीना मात्र आपला आग्रह किंवा अधूनमधून भेटणार्‍या मैत्रीणींच्या मैत्रीणींनी ही आपल्याला अगं तुगं करावं ही अपेक्षा.... एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........का बरं ही अशी गुंतागुत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
- म्हणजे प्रत्येकजण या अनुभवातून कधीना कधी जातोच तर हे समाधान त्या खुषीच्या उड्यांमागे.:-)
- "असंही असतं? आमच्या इंग्लिशमध्ये सगळ्यांसाठी सारखाच नियम असतो." Happy Happy

>>एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........का बरं ही अशी गुंतागुत?>>

मस्त मस्त मोहनाजी ( Happy ) मजा आली .पुनःप्रत्यय की काय म्हणतात ते Happy

खुपच खुशखुशीत लेख आहे..............पुढे काय बंर म्हणू असं विचारात पडलेली बाहुली Happy

साती, एक प्रतिसादक, भारतीजीऽऽऽ :-), शूम्पी, वंदना, शेवगा (काहीही म्हटलंस तरी चालेल गं:-), कल्पु, इन्द्रधनु, स्मिता सर्व अरे, अगं ना धन्यवाद.

हं.........मस्त जमलाय लेख!
.का बरं ही अशी गुंतागुत?>>>>>>> असते खरी अशीच गुंतागुंत!

एकूणच लहानांना मोठं व्हायचा ध्यास, मोठ्यांना लहान म्हणवून घ्यायचा सोस आणि लहानांना आपण कित्ती ’ज्युनिअर’ हे ’सिनियर्स’ ना ठणकावून सांगायची घाई..........का बरं ही अशी गुंतागुत?>> +1
मस्त आहे लेख.

Mohna, Rocks!!!!
प्रत्येक वाक्याला हहपुवा, जियो