'नमष्कार, मैं रवीश कुमार!' - श्री. श्रीरंजन आवटे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.

रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.

raveesh.jpg

इथं राहणं शक्य नाही, ये अपने बस की बात नहीं, असं स्वतःशी पुटपुटत तो स्टेशनवर आला. उंचच उंच इमारती पाहून त्याला आपण आणखीच खुजे आहोत, असं वाटू लागलं. जनरल डब्यातल्या माणसानं एसी कम्पार्टमेन्टकडं औत्सुक्यानं, भीतीनं पाहावं, तसा तो या शहराकडं पाहत राहिला. मॉल्स-हॉटेल्स-फ्लायओव्हर्स…. सारी आधुनिक संस्कृती आपल्या अंगावर धावून येते आहे, हे पाहून जीव मुठीत धरून तो गावी पळू लागला. इंग्रजी भाषेतल्या व्यवहारानं जणू त्याला धमकी दिली. ही देशाची राजधानी. ये महफिल मेरे काम की नहीं. गड्या आपला गाव बरा, अशी मनाची समजूत घालत तो निघाला. त्याचा गावचा दोस्त चंद्रशेखर सोबत होता. दोघांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. निघताना एकवार त्यानं वळून पाहिलं शहराकडं, तर शहर त्याला खुणावत होतं. एक सुप्त आमंत्रण देत होतं आणि तो म्हणाला -

मैं आज स्माल टाउन-सा फील कर रहा हूं
और मैं मेट्रो- सी ।
हां, जब तुम साउथ एक्स से गुजरती हो, मै करावल नगर-सा फील करता हूं ।
चुप करो। तुम पागल हो। दिल्ली में सब दिल्ली-सा फील करते हैं ।
ऐसा नहीं है । दिल्ली में सब दिल्ली नहीं है । जैसे हर किसी के आंखो में इश्क नही होता..
अच्छा, तो मैं साउथ एक्स कैसे हो गयी ?
जैसे की मै करावल नगर हो गया ।
सही कहा तुमने..
ये बारापुला फ्लाइओवर ना होता तो साउथ एक्स और
सराय काले खां की दूर कम न होती ।
तुम मुझसे प्यार करते हो या शहर से ?
शहर से; क्योंकि मेरा शहर तुम हो ।

त्याला हा आवाज ऐकू आला तेव्हा चंद्रशेखर गावी परतला होता, पण तो मात्र परत या शहराकडं वळला होता आणि त्याचं अवघ शहर प्रेमात बुडालं होतं! शहराला त्यानं कवेत घेतलं होतं आणि शहरानंही त्याला. ‘इश्क में शहर होना’ या रवीश कुमारच्या लप्रेक मधील ही एक. लप्रेक म्हणजे लघु प्रेम कथा. फेसबुकवर थोडक्यात लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक झालं.

बिहारच्या चंपारण जिल्ह्यातल्या छोट्याशा मोतीहारी गावातला रवीश नावाचा तरुण जेव्हा दिल्लीत आला तेव्हा दिल्ली तो बहुत दूर है असं वाटून परत फिरता फिरता मागे वळला आणि ‘रवीश कुमार’ झाला, त्याची ही गोष्ट.

अर्थातच हा प्रवास काही सोपा नव्हता. घरचं वातावरण अतिशय कर्मठ, पारंपरिक. वडील कनिष्ठ सरकारी नोकरीत.नातेवाइकांमध्ये जमिनीवरून वाद. अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेला रवीश कुमार दिल्लीत आला आणि त्याच्यासाठी अवघं विश्वच बदललं. ग्रामीण सरंजामी परिवेशातून ‘ग्लोबल’, ‘मॉडर्न’ होत चाललेल्या दिल्लीत त्यानं पाऊल ठेवलं. खाजगीकरण-उदारीकरणातून आकाराला आलेल्या जागतिकीकरणाच्या प्राथमिक अवस्थेत सारंच बदलत होतं. सारा चेहरामोहरा बदलत होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणा-या पत्रकारितेत होणारे बदल तर अधिक ठळक होते. एकीकडे प्रिंट मिडीयाचा आणखी विस्तार होत होता, तर इलेक्ट्रॉनिक मिडीया नव्यानेच उदयाला येत होता. पत्रकारिता अधिकाधिक ‘प्रोफेशनल’ बनत चालली होती. पत्रकारितेला ग्लॅमर मिळू लागलं होतं. अशा काळात बीए हिस्ट्री करून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन'मधून पूर्ण करून रवीशने एनडीटीवी जॉइन केलं. वार्ताहर म्हणून अल्पवेतनावर तो काम करू लागला; पण एनडीटीव्ही म्हणजे जणू नासाचं ऑफिस आहे, इतकं अनोळखी आणि भीतीदायक त्याला तिथे वाटत होतं. देशभरातून आलेले अनेक वार्ताहर एनडीटीव्हीत रुजू झालेले. एनडीटीव्हीत पडेल ते काम त्यानं केलं. आपण जी स्टोरी कव्हर करतोय ती इतरांच्या इतकीच, त्याच दर्जाची असेल का, अशी भीतीही त्याच्या मनात होती. त्यावेळी राजदीप सरदेसाई यांचा खूप धाक होता. त्यांची भीती वाटायची म्हणून मी मागच्या दरवाजाने ऑफिसला येत असे, असं रवीश सांगतो. एके दिवशी रवीशनं वाढवलेल्या केसांवर चिडून राजदीप म्हणाले, “ तुम यहां रिपोर्टर बनने आये हो या हिरो बनने? क्या देवानंद जैसे बाल बढा रखे है !” या आणि अशा अनेक गोष्टींनी दबलेला रवीश रिपोर्टिंग करू लागला, तेव्हा त्याच्या मनात कमालीची भीती होती. त्याची भाषा गावंढळ आहे, स्टाइल गावठी आहे वगैरे टीका अभिजन-प्रस्थापित पत्रकारांनी केली; पण गावाकडची आपली मुळं न विसरता तो शहरानं परिघाबाहेर ढकललेल्या लोकांचे प्रश्न मांडू लागला. ‘रवीश की रिपोर्ट’ या त्याच्या वार्तांकनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कुठल्याही प्रश्नाच्या मुळापर्यंत जायची त्याची वृत्ती त्याला झोपडपट्टीपासून ते अगदी जी. बी. रोडपर्यंत घेऊन गेली. ‘जी बी रोड-एक अंतहीन सडक’ हे त्याचं रिपोर्टिंग रेड लाइट एरियाच्या आसपास राहणा-या इतर लोकांना तोंड द्याव्या लागणा-या समस्यांच्या बाबत होतं. केवळ पत्त्यात जी. बी. रोडचा उल्लेख आहे म्हणून इतर समाजानं तिथं राहणार्‍यांवर टाकलेला बहिष्कार, असा वेगळा विषय प्रभावीपणे त्यानं मांडला.

त्याच्या रिपोर्टिंगचं वेगळेपण अनेक गोष्टींमध्ये आहे. मुळात आपण टीव्हीवर आहोत, याचा कुठलाच आवेश त्याच्या सबंध देहबोलीत नसतो. जिथे जातो तिथल्या माणसांमध्ये इतक्या सहजपणे मिसळून जातो की, हातात माइक नसला की तो त्या वस्तीतच अनेक वर्षांपासून राहतो आहे, असं प्रेक्षकाला आणि त्या वस्तीतल्या माणसांनाही वाटतं. कधी कामगारांच्या सोबत त्यांच्या ताटात जेवता जेवता रिपोर्टिंग करतोय, तर कधी मायावतींच्या प्रचारसभा हत्तीवर बसून कव्हर करतोय, तर कधीकधी गलिच्छ वस्त्यांमधल्या अरुंद बोळातून जात, कारमधून, सायकल-रिक्शेतून, कुठल्यातरी इमारतीच्या गच्चीतून अशा वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्टिंग करण्याचं त्याचं अफलातून कसब अनुकरणीय आहे. ट्रायपॉड न वापरता रिपोर्टिंग करणं त्यानं सुरू केलं. त्यामुळे अनेक अंधा-या जागांपर्यंत तो पोहोचू शकला. त्या त्या ठिकाणाच्या लोकांनाही तो सहज बोलतं करू लागला. कॅमेरामुळं येणारं अवघडलेपण त्याच्या देहबोलीत कधीच परावर्तित होत नाही. अनेक वेळा रवीश बोलत असतो आणि कॅमेरा मात्र रवीशच्या ऐवजी तो परिसर किंवा तो विषय अधिक नीट समजेल अशा गोष्टींवरून फिरत असतो. त्यावरून रवीश किती उत्तम दिग्दर्शक आहे, याची प्रचिती येत राहते. रवीश बोलत असतो स्वच्छ भारत मोहिमेविषयी आणि कॅमेरा फील्डवरच्या कचर्‍याच्या ढिगावरुन फिरत असतो. राजकीय संघटनांचा व्यापक पट त्याच्या कथनात, तर गल्लीबोळांमध्ये लावलेल्या छोट्यामोठ्या राजकीय संघटनांचे पोस्टर आपण टीव्हीवर पाह्त असतो. मुळात रिपोर्टिंग करताना कुठलाच पूर्वग्रह त्याच्या मनात नसतो. फील्ड-स्टोरीसाठी आपण कधीही गूगल सर्च केला नसल्याचं तो सांगतो. फील्डवर त्याला स्वतःला आणि प्रेक्षकाला वास्तवाचा चिमूटभर तुकडा एकाच वेळी गवसत असतो. हे वास्तवाचं आकलन आणि त्याचं विश्लेषित स्वरूप तो थोड्या वेळात प्रेक्षकापर्यंत संक्रमित करत जातो. त्याची भाषा इतकी साधी आणि प्रवाही असते की त्यातून सामान्य प्रेक्षकासोबत त्याची पटकन नाळ जुळते. ‘ है ना’ हे खास बिहारी टोनमध्ये म्हणत तो सर्वांसोबत दिलखुलास हसतो. या रिपोर्टिंगला अनेक चाहत्यांचे, प्रेक्षकांचे इमेल्स, फोन येऊ लागले त्यातूनच आपल्याला प्रेक्षकाला काय हवे, हे समजू लागल्याचं रवीश सांगतो. त्याच्या बोलण्यात असलेला हलकासा उपरोध किंवा कोपरखळी हे खास रवीश-शैलीतलं अगदी युनिक असतं. एका कामगारवस्तीत डबक्यावर असलेल्या एक फूट रुंदीच्या फळीवरुन जाताना रवीश म्हणतो-“ प्लीज मनमोहनसिंग वॉच रवीश की रिपोर्ट. इंग्लिश में वैसे भी इंडिया हमेशा डेवलप्ड ही लगता है !”

‘रवीश की रिपोर्ट’ नंतर 'प्राइम टाइम' सुरू झालं आणि रात्री ९ ते १०चा स्लॉट रवीशला मिळाला. या प्राइम टाइममध्ये त्यानं अनेक बदल केले. पॅनेलिस्ट सोबत घेऊन केल्या जाणा-या चर्चेतही किमान ४ ते कमाल ७ मिनिटांची त्याची प्रस्तावना असते. त्याच्या प्रस्तावनेच्या नंतर उर्वरित कार्यक्रम पाहिला नाही तरी किमान विषयाची प्राथमिक माहिती प्रेक्षकाला झालेली असते. या प्रस्तावनेत विषयाची शक्य तितकी सखोल, सर्वांगीण ओळख करुन देण्याचा तो प्रयत्न करतो. माहिती किंवा विश्लेषण यांचे संदर्भस्रोत तो सांगतो. त्यानंतर केल्या जाणा-या चर्चेतही आरडाओरडा न करता सर्वांना बोलायला तो वेळ देतो. त्यात स्वतःचा पूर्वग्रह बाजूला सारुन तो चर्चा घडवून आणतो. युपीएससीच्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेत इंग्रजी माध्यम आणि पूर्व परीक्षेतील सीसॅट पेपरमध्ये इंग्रजीचे प्रश्न वगळणे या संदर्भात चर्चा सुरू होती आणि शांतपणे चर्चा सुरु असताना रवीश म्हणाला, “अब समझ में नही आ रहा है अपनी राय क्या बनाये - दोनो साइड में तथ्य है..” या त्याच्या विधानावरून तो चर्चेत स्वतःसह प्रेक्षकांना बदलण्याची, त्यांचं मतपरिवर्तन करण्याची दारं किलकिली करतो, हे लक्षात येतं. मुख्य म्हणजे रवीशचा प्राइम टाइम शांतपणे ऐकता येतो. सहसा इतर बहुतांश चर्चांमध्ये इतका गोंधळ असतो की कोणताच मुद्दा धड पोहोचत नाही. त्यात ॲन्करचा अभिनिवेश असेल तर एकतर्फी चर्चा होत राहते. या प्राइम टाइमच्या स्वरूपातही त्याने अनेक बदल केले. खूप वेळा फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करत त्याने तो तो विषय मांडला. प्राइम टाइमची प्रयोगशीलता हा खरंतर स्वतंत्र विषय आहे. त्यातल्या काही निवडक कार्यक्रमांचा आढावा घेतला, तरी या प्रयोगांचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. हरियाणातल्या खाप पंचायतीच्या संदर्भात शो करताना या पंचायतीच्या बळी असलेल्या स्त्रियांनाच त्यानं शोमध्ये बोलावलं. त्यांच्या कथनातून खाप पंचायतीच्या कर्मठ, जुलुमी, समांतर ‘न्याय’यंत्रणेची विदारक अवस्था अधोरेखित झाली. मागील आंबेडकर जयंतीला भीमजयंतीच्या विविध कार्यक्रमांतून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बातचीत करत आंबेडकर विचार कितपत झिरपलाय, याची चाचपणी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. अगदी पाच सप्टेंबरला जेव्हा मोदींनी त्यांचं भाषण ऐकणं शाळाशाळांमध्ये कम्पलसरी केलं, तेव्हा रवीश एका सरकारी शाळेत गेला आणि स्वत: काहीही न बोलता तिथल्या मुलांशी, शिक्षकांशी बोलताना त्यानं भाषणाच्या सक्तीतला पोकळपणा समोर आणला. सेल्फी हा राष्ट्रीय रोग आहे, असं रवीशचं एक आवडतं वाक्य. कुठेही, कसाही सेल्फी काढण्याचा होत असलेला अतिरेक याविषयी त्यानं एक शो केला. या शोमध्ये पूर्ण वेळ तो एकटाच बोलत होता - सेल्फी काढण्याची वृत्ती आणि त्यातल्या समूह मानसिकतच्या विविध पैलूंविषयी.

सामूहिक संस्कृतीचं संचित समजावं आणि त्यातून आपल्या हाती काही ठोस यावं, असा त्याचा प्रयत्न असतो. यासाठी लोककथा, लोकसंस्कृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महम्मूद फारुकी यांच्यासह विक्रमादित्याच्या काही कथांवर दास्तानगोईचा रवीशने एक शो केला. अखलाखच्या हत्येनंतर सर्वांत प्रथम तो त्या दादरीला पोहोचला आणि तिथल्या गावकर्‍यांमध्ये पसरलेली दहशत आणि अखलाखच्या सामूहिक खुनाचं सत्य समोर न येऊ देण्यासाठी केलेला कट पाहून जणू अखलाख मेलाच नाही - हवां का एक झोंका आया और अखलाक चला गया - असं तो म्हणाला. जणू तो गेला ही अफवाच होती की काय असं वाटावं, असं निर्मिलेलं वातावरण त्यानं जेव्हा समोर आणलं तेव्हा अंगावर काटा आला. अगदी अलीकडेच त्यानं १५ ऑगस्टपूर्वी एक शो केला. यात 'तुम्ही पंतप्रधान झालात तर लाल किल्ल्यावरून काय भाषण कराल', असा प्रश्न विचारून त्यातून जनमानसाची नस शोधण्याचा प्रयत्न केला. जेएनयुमधील कथित 'देशविरोधी' घोषणांनंतर काही वृत्तवाहिन्यांनी मिडिया ट्रायल घेत कन्हैय्याकुमारसह काहीजणांना देशद्रोही म्हणून घोषित केलं. एखादी घोषणा देणं अथवा न देणं ही देशभक्तीची / देशद्रोहाची पूर्वअट बनवणं आणि घटनेची सत्यता न पडताळता केलेलं वृत्तांकन हे बेजबाबदारपणाचं लक्षण होतं. रवीशनं या सार्‍या परिस्थितीवर एक अभूतपूर्व शो केला. स्क्रीन पूर्ण अंधारमय. ‘मैं आपको अंधेरे में लेकर आया हूं - यही आजकी टीवी की तस्वीर है- आपके टीवी का सिग्नल बिलकुल ठीक है’ असं सांगत तो आजच्या टीव्ही पत्रकारितेची अवस्था आणि इथेतिथे सर्वत्र विस्तारत चाललेला उन्माद यांचे केवळ आवाज ऐकवत राहिला. टीव्ही डिबेटमधले अभिनिवेशी, रागीट, आक्रस्ताळे आवाज, घोषणांचे आवाज, धमकावणारे आवाज... असे सारे आवाज तो ऐकवत राहिला. सारी स्क्रीन अंधारमय. तीवर काही अक्षरं उमटत राहिली आणि टीव्हीचा सिग्नल व्यवस्थित असल्याबाबत आश्वस्त करताना खूप काही अस्वस्थ करणारं तो सांगत राहिला. अंधार्‍या वास्तवाला विखारी आवाजांचं पार्श्वसंगीत असं प्रतीकात्मक दर्शन घडवणारा तो शो सीएनबीसी-आवाज या चॅनलनं एनडीटीवीच्या सौजन्यानं प्रसारित केला. सीएनबीसी-आवाजसारखा पूर्णतः व्यावसायिक चॅनलनं एनडीटीवीचा शो प्रसारित करणं, यासारखी घटना टीव्ही पत्रकारितेतली कदाचित एकमेव अथवा पहिलीच असावी.

रवीशनं घेतलेल्या मुलाखती हा एक स्वतंत्र अध्याय आहे. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, तिचा आधी पूर्ण अभ्यास करून तो आलेला असतो. काही वेळा त्याच्या हातात आकडेवारी, वृत्त, संदर्भ लिहिलेला कागदही असतो. कन्हैय्या असो वा योगेंद्र यादव वा लालूप्रसाद, कुणालाही अवघड प्रश्न विचारताना तो जरासाही कचरत नाही. नेत्यांच्या सबगोलंकारी उत्तरांना आव्हान देत तो पुन्हा त्यांना तोडून प्रश्न विचारत राहतो. त्यातही निवडणूक-काळात त्यानं केलेलं वार्तांकन आणि मुलाखती अधिक विशेष. दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी रवीशनं किरण बेदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यानं किरण बेदी यांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयापासून ते आण्णा आंदोलनात त्यांनी केलेल्या भाष्यापासून ते त्यांच्या आश्वासनापर्यंत सर्व बाबींवर प्रश्न विचारले. बागेत चालत चालत घेतलेल्या या मुलाखतीच्या दरम्यान किरण बेदी गोंधळल्या. रवीशच्या साध्या साध्या प्रश्नांना उत्तरं देता येईनात, तेव्हा त्यांनी आपल्याकडे वेळ नसल्याचं कारण सांगितलं. दिल्लीमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवात रवीशनं घेतलेली ही मुलाखत हेही एक कारण आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. याच मुलाखतीमध्ये किरण बेदींच्या उत्तरांना ‘ ओह याह यस’ असा रवीश उपरोधिक प्रतिसाद देत असताना किरण बेदी चिडून ‘ यह यस यस का क्या मतलब है ?” असं विचारतात. रवीश हसत म्हणतो, “कुछ नही, अंग्रेजी बोलने का प्रयास करता रहता हूं.” किरण बेदींच्या मुलाखतीत असं म्हणण्याचा इरादा वेगळा, पण इंग्रजीचं माजवलेलं अवडंबर याविषयी तो अनेकदा बोलत असतो. बिहारच्या शाळांमध्ये मातृभाषा न शिकवता इंग्रजी शिकवण्याचा अट्टहास त्यानं अशाच एका रिपोर्टमध्ये मांडला होता. 'इश्क में शहर होना' या पुस्तकाच्या निमित्तानं जयपूर फेस्टिवलमध्ये बोलताना रवीश म्हणतो, “जब से ये अंग्रेजी में फ्युचर परफेक्ट टेन्स आया है ना, तब से मै अंग्रेजी नही सिख सका. मै एक विदाउट टेन्स इंग्लिश बना रहा हूं जिस में कोई टेन्स नही होगा. पास्ट इम्परफेक्ट, प्रेझेन्ट कनट्युनियस सब टेन्स से मुक्ती!” हसतखेळत सहज मुद्दे पोहोचवण्याची त्याची शैली सुंदर आहे.

या सा-या पत्रकारितेत रवीशच्या धैर्याला दाद द्यायला हवी. त्याला जे हवं ते तो परिणामांची पर्वा न करता बोलत आला आहे. ‘रवीश की रिपोर्ट’पासून हवा तो विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला वाहिनीनं दिल्याचं तो आवर्जून सांगतो. २०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एप्रिलमध्ये ‘क्या सचमुच हमारे बीच कोई हिटलर है?” या विषयावर त्यानं घेतलेली चर्चा असो वा राना अय्युबच्या गोध्रा दंगल आणि फेक एन्काउन्टरचा पर्दाफाश करणार्‍या ‘गुजरात फाइल्स’ या पुस्तकावर त्यानं केलेला शो असो, तो धाडसानं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत राहिला आहे. अगदी एवढंच नव्हे, तर एका कर्मठ कुटुंबातून आलेल्या रवीशनं नयना दासगुप्तासोबत आंतरजातीय प्रेमविवाह करणं, हेही त्याचं धाडस होतं. आजही त्याच्या काही नातेवाइकांनी त्यानं आंतरजातीय विवाह केला, म्हणून त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर बहिष्कार टाकला आहे. घरी येणं बंद केलं आहे. जात किती खोलवर रुतली असल्याचं सांगताना रवीश त्याच्या मनातला सल बोलून दाखवतो.

मी रवीशला पहिल्यांदा भेटलो ते त्याच्या ब्लॉगमुळे. यू. आर. अनंतमूर्ती यांना रवीशनं लिहिलेलं पत्र माझ्या एका मैत्रिणीनं फेसबुकवर शेअर केलं होतं. ते पत्र वाचून मी त्याच्या कस्बा या ब्लॉगवरचे लेख वाचू लागलो. ‘हे जग असं का आहे’ याचं दुःख आणि ते बदलण्याची आस, तळमळ त्याच्या लेखनातून मला जाणवली. ब्लॉगच्या लेखनातही हलक्या उपरोधाचा तो शस्त्र म्हणून वापर करतो. कोणी काय खावं, यात राज्यसंस्था हस्तक्षेप करत असल्याच्या संदर्भात लिहिताना आता ‘राष्ट्रीय बिर्याणी कमिशन’ स्थापन करायला हवा, असं तो म्हणतो. विनोदाचा आधार घेत तो त्याला मांडायचा असलेला मुद्दा अधिक परिणामकारक पद्धतीनं मांडतो. अगदी फेसबुकवर बजेटविषयी लिहितानाही त्यानं लिहिलं होतं -

“तू पसंद है किसी और की
तुझे चाहता कोई और है”
ये बजट की नही बॉलीवूड के गाने की लाइन है !

हंसल मेहताचा 'सिटीलाइट्स्' पाहून गहिवरून आलेला रवीश जेव्हा हंसल मेहतांना पत्र लिहितो, तेव्हा त्याच्या आत आत खोलवर असलेलं माणूसपण लख्ख दिसू लागतं. पत्र लिहिणं हेदेखील रवीशचं खास वैशिष्ट्य. हंसल मेहतांपासून ते अनंतमूर्ती ते राजनाथ सिंग, एम जे अकबर, मोदी या सार्‍यांशी पत्रातून रवीश संवाद साधतो साध्यासोप्या भाषेत. रस्त्यावरचा सामान्य माणूस ज्या पद्धतीनं बोलेल, त्याच पद्धतीनं तो बोलतो. मात्र त्याची मांडणी तर्कावर, विवेकावर आधारलेली असते. त्यातला ओलावा विचारधारेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो.

त्याच्या लेखातून, ब्लॉगमधून होणारी भेट ही अर्धी भेट होती. रवीशला प्रत्यक्ष भेटण्याचा योग मागच्या वर्षी रवीशला एका व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हा झाली. एका अलिशान हॉटेलमध्ये रवीशच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रवीश आल्यानंतर अवघ्या पंधराव्या मिनिटाला हॉटेलच्या खाली आला आणि एकटाच चालू लागला. थोड्या वेळानं विद्यापीठात जायचं म्हणून आम्ही पाहायला गेलो, तर रवीश समोरच असलेल्या रस्त्यावरच्या माणसांना भेटून पुण्याविषयी समजून घेत होता. कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून त्याला मिळत असलेली वागणूकही त्याला व्हीआयपी ट्रीटमेन्ट वाटत होती. कार्यक्रमाच्या स्थळी असलेल्या व्हीआयपी रूममध्ये जातानाही त्यानं ‘नो व्हीआयपी’ ही सुरू केलेली मालिका अनेकांना आठवली. आपण सामान्य आहोत, माध्यमामुळे आपल्याला वलय प्राप्त होतं आणि आपल्याला सामान्य माणसाप्रमाणेच वागणूक मिळावी, अशी त्याची प्रामाणिक धारणा आहे. त्याच्या भाषणाच्या स्क्रिप्टची प्रिंट काढायला त्यानं मला सांगितलं. गंमत म्हणजे रवीशची ओळख करुन देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याची करून दिलेली ओळख त्याला आवडल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. अवघ्या तीस मिनिटांच्या भाषणात त्यानं अतिशय सूत्रबद्ध अशी मांडणी केली. सहसा मोठ्या व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्यातल्या लक्षवेधक विसंगती पाहून मी त्यांच्यापासून दूर गेलो आहे. रवीश हा काही मोजक्या व्यक्तींपैकी एक आहे, ज्याच्या सार्वजनिक प्रतिमेपेक्षाही त्याचं व्यक्तिगत अस्तित्व अधिक खरंखुरं आहे, असं मला वाटलं. मध्यंतरी रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या बाबत असलेल्या एका शोमध्ये रवीशनं स्मृती इराणी यांनी संसदेत केलेल्या भाषणात सांगितलेल्या अनेक खोट्या, चुकीच्या गोष्टींचा समाचार घेतला. तो शो आवडल्याचं माझ्या एका मैत्रिणीनं मेसेज करून कळवलं. त्यावर रवीशनं उत्तर दिलं - शुक्रिया| लेकिन मुझे जरा ज्यादाही गुस्सा आया| नही करना चाहिये ऐसा!

टीआरपी मिळो अथवा न मिळो, रवीशनं त्याच्या विवेकबुद्धीला पटतील, असे विषय हाताळले. लोकानुरंजनवादी पत्रकारिता करण्यात तो रमला नाही. लोकांची अभिरुची बदलण्याचाच त्यानं प्रयत्न केला. सांस्कृतिक अस्तर बदलून नवी मांडणी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. ल्युटेन पत्रकारितेला वलय मिळत असताना तो खेडोपाड्यात, वस्तीत, जिथे ओबी व्हॅन पोहोचत नाहीत तिथवर जाऊन पोहोचला. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ यांची एक सुव्यवस्थित अशी विकेंद्रिकरणाची व्यवस्था आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. मात्र त्याचं नीट विकेंद्रीकरण झालेलं नाही. पत्रकारितेचं पंचायत राज मांडण्याची आवश्यकता रवीशच्या वार्तांकनातून व्यक्त झाली. पत्रकारितेतून वार्तांकन हरवत चालल्याची खंत तो व्यक्त करतो. ‘समाजाचा आरसा’ हे बिरुद माध्यमांना अभिमानानं मिरवायचं असेल, तर त्यांना त्यांच्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर येऊन वास्तवाला भिडावं लागेल. आजच्या मिडीयाचा विस्फोट झालेल्या जगातही बहुतांश माध्यमांचा केंद्रबिंदू पी. साईनाथ यांच्या भाषेत 'एबीसी' एवढाच आहे. एबीस म्हणजे - एडव्हरटाइजमेन्ट, बॉलीवूड आणि क्रिकेट. रवीशनं हे रूढ समीकरण बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मानवतेच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि वागणं हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. जातधर्माच्या पल्याड तर तो आहेच, पण कुठल्याच कंपूत तो नाही. एका लप्रेक मध्ये तो म्हणतो -
“यह नीले कोटवाला किताब को छाती से लगाए क्यों खडा है? इश्क के लाजवाब क्षणों में उलझ जाना उसकी फितरत रही है। इसलिए वह चुप रहा।उसके बालों मे उंगलियों को उलझाने लगा।बैचेन होती सांसें जातिविहीन समाज बनाने की अंबेडकर की बातों से गुजरने लगी - देखना यही किताब हमें हमेशा के लिए बदल देगी!”

आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उभ्या असलेल्या प्रेमात पडलेल्या त्याला जातीच्या अडथळ्याच्या कल्पनेनंच घुसमटायला होतं आणि रवीश आंबेडकरांना दलित तबक्यातून बाहेर आणून ह्युमनाइज करतो. तो म्हणतो, प्रेमात असताना आपण जग आणखी सुंदर बनावं म्हणून प्रयत्न करतो. शहराच्या कानाकोपर्‍यात जातो. अनोळखी गल्लीबोळांतून फिरतो. प्रेमात असणं म्हणजे केवळ हातात हात घालून फिरणं नव्हे, तर जग सुंदर बनवण्याच्या नव्या शक्यतांचा वेध घेणं असतं!

रवीशचं हळवं अगदी बावनकशी माणूस असणं पत्रकारितेसारख्या क्षेत्रात टिकण्यासाठी पुरेसं नाही, किंबहुना दुर्बळस्थान आहे, असं वाटावं इतका तो सच्चा आहे. सोशल मिडीयावरच्या विखारी कमेन्ट्स् आणि केवळ वादासाठी वाद घालण्याच्या प्रक्रियेला कंटाळून त्यानं फेसबुक आणि ट्विटरही काही काळ बंद केलं. प्रेक्षकांच्या, वाचकांच्या शिव्याशापांनी व्यथित होणारा रवीश कविता करत नसला तरी कवीमनाचा आहे. त्याची अस्वस्थता प्रेक्षकांपर्यंत संक्रमित करून त्यातून सर्जक काही गवसेल का, याच्या शक्यता तो आजमावतो. यामुळेच कलबुर्गींना श्रद्धांजली वाहताना अचानक पाश त्याला आठवतो -

“मेहनत की लूट सबसे ख़तरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे ख़तरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे ख़तरनाक नहीं होती
बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है
पर सबसे ख़तरनाक नहीं होती
सबसे ख़तरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना!”

स्वप्नांचे धागे विरून जातील की काय, असं वाटत असताना रवीश नव्या स्वप्नांची बुनियाद विणण्याची गोष्ट करतो. देशातला ३२ टक्के इलेक्ट्रॉनिक मिडीया एका व्यक्तीच्या हातात असताना, हस्तिदंती मनोर्‍यात बसून ‘नेशन वॉन्टस टू नो’चा आक्रस्ताळा आवाज वाढत असताना आणि टेबल पत्रकारितेचा सुळसुळाट झालेला असताना तो विहिरीच्या तळापर्यंत जातो. त्यातला गाळ उपसून काढण्याचा प्रयत्न करतो. त्याची आणि त्याच्यासारखा प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाची दमछाक होतेच, पण ती सोसणं अटळ आहे, हे लक्षात घेऊन तो पुन्हा जोरानं धावू लागतो. शहर त्याला भीती घालतं. तो त्याच नवख्या नजरेनं पुन्हा शहराकडं पाहू लागतो. शाळेतल्या त्याच्या गुरुजींनी सांगितलेलं वाक्य त्याला आठवतं -
शौक ए दीदार अगर है तो नजर पैदा कर !
तो ते आठवतो आणि प्रकाशाच्या दिशेनं चालू लागतो…

***

पूर्वप्रसिद्धी - 'अनुभव' (दिवाळी - २०१६)

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानही दिल्याबद्दल श्री. श्रीरंजन आवटे, अनुभव मासिक, युनिक फीचर्स व श्रीमती गौरी कानेटकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 
शब्दखुणा: 

रविश कुमार सारख्या नकली तटस्थ पत्रकाराला मॅगासेसे पुरस्कार मिळाला म्हणून आनंदी होणारे पाहून मजा वाटते.

अरविंद केजरीवालला सुध्दा तो खुप आधी मिळाला आहे. Lol

रविश कुमार सारख्या नकली तटस्थ पत्रकाराला मॅगासेसे पुरस्कार मिळाला म्हणून आनंदी होणारे पाहून मजा वाटते.

अरविंद केजरीवालला सुध्दा तो खुप आधी मिळाला आहे. Lol

नवीन Submitted by जिंदादिल. on 4 August, 2019 - +११११११
मला तर तो कसलेला अभिनेता जास्त वाटतो. बऱ्याचदा महत्त्वाकांक्षी माणूस वैफल्यग्रस्त झाला तर जसा दिसेल तसा दिसतो.

केजरीवालांना त्यांच्या "आप" च्या आधीच्या कामांमुळे मिळाला ना? त्यात तर काही वादग्रस्त नसावे. "आप" नंतरच्या नौट्ंकी मुळे तर दिलेला नाही.

रवीश कुमार चे एक दोन कार्यक्रम मी पाहिले आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न टीआरपी वाले नसले तरी तो त्यात उभे करतो. सरकारला प्रश्न विचारतो. अशा पत्रकाराची दखल घेतली जाणे चांगलेच आहे. त्याचे अभिनंदन करायला त्याच्या सगळ्या गोष्टी पटायला हव्यात, सहमत असावे अशी काही गरज नाही.

रवीश कुमार चे एक दोन कार्यक्रम मी पाहिले आहेत. >>>> एक दोन कार्यक्रमावरून जसे तुम्ही ठरवत आहात तसा विचार अनेकजण करतील म्हणून मला वरील प्रतिसाद द्यावा लागला. हा माणुस स्वतःला तटस्थ पत्रकार म्हणतो पण एक नंबर ढोंगी आहे. सत्ताधारी असो वा विरोधक पत्रकाराने चांगल्याला चांगले वा वाईटाला वाईट नाही म्हटले तरी ठीक... पण बातमी ही तटस्थपणे द्यायला हवी. पण हेच तर तो करत नाही.
एक उदाहरण: अभिनंदन वर्थमान याची पाकिस्तानने सुटका केल्यानंतर हा व्यक्ती भारतीय जनता आता पाकीस्तानी सरकारला धन्यवाद म्हणणार का असे विचारत होता आणि धन्यवाद म्हणणे का गरजेचे आहे ते सुध्दा सांगत होता. अनेक अतिरेकी हल्ल्यांनंतर हा पाकिस्तान अथवा अतिरेकी संघटनांचे भारतीय नागरिकांनी निषेध करावा असे सांगू शकतो का? तुम्ही पत्रकार आहात तटस्थपणे बातमी द्या, कोणी काय करावे हे शिकवू नये. अशी अनेक उदाहरणे आहेत.

रविश कुमारला सारख्या नौटंकी पत्रकाराला मायबोलीवर एक लेख लिहुन मानाच स्थान देणार्याची कीव वाटते !! बुद्धी भ्रष्ट !!
रविश कुमारचा भाऊ बलात्काराच्या आरोपात जेल मध्ये आहे ! त्याची केस कपिल सिब्बल लढवत आहे !
पत्रकाराने तटस्थ असावे असा संकेत असताना सुद्धा निवडणुकीत खुले आम भाजपा विरुद्ध मोदी विरुद्ध पवित्रा ह्याने घेतलेला सर्वांनी बघितलेला आहे !! तुकडे गँगचा हिरो कन्हया कुमारला मदत करायला रविश कुमार बिहारला पळाला होता !!
रविश कुमार व तो काम करणार्या NDTV बद्दल जितक कमी बोलाल तितक बर आहे !!
४१० कोटीचा NPA व चिदंबरम चे ५००० कोटी NDTV मध्ये पार्क केलेले आहेत !!
२००० सालांपासुन रोमॅन मॅगसेसे पुरस्कार अर्बन नक्षल लोकांनाच देण्यात आलेला आहे ! भारतात UPNA कायदा पास होण्यात व रविश कुमारला हा पुरस्कार मिळण्यात संबंध आहे अस म्हणतात!!

ज्या किरण बेदीला भाजपने पवित्र म्हणुन पंखाखाली घेतले , निवडणुकीचे तिकिट दिले आणी पुदुचेरीची राज्यपाल केले तिला देखिल मॅगसेसे मिळला आहे.

बाकी युनिससारख्या लोकांच्या पोष्टीमुळे संघोटे-भाजप्ये यांना किती पोटशूळ झाला आहे हे दिसुन येतेच आहे. पत्रकाराने तटस्थ असावे हा सकेत अर्णब भु़ंक स्बामी किती आणि कसा पाळतो हे जरा पाहिले असते तर बरे झाले असते. त्याच्या भावावे बलात्काराचा आरोप आहे हे थोबाड वर करुन सांगणरे महोदय भाजपमधे असताना सेनगरचे काय कारनामे आहेत यावर एक अक्षर देखिल बोलत नाहीत. NDTV मोदीसाठी काम करत नाही म्हणुन यांची ही तडफड!!

रविश कुमारचे अभिनंदन!!

रविश कुमार ला हा पुरस्कार मिळाला याचे सोशल मीडिया व इतरत्र कुणाला कौतुक झालेलं दिसलं नाही. एकुणच दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Pages