साथ

Submitted by सुनिल परचुरे on 31 October, 2009 - 07:55

साथ
``आता शांतपणे पडा बघु, डोळे मिटुन घ्या“, नानाजींनी मोहनरावांना सांगितले, हलकेच त्यांच्या डोक्यावर थापटल्यासारखे केले व उजव्या हाताचा अंगठा भ्रुकुटीमध्ये दाबून त्यांचे कपाळ चोळू लागले.
``आता तुमचे मन एकदम शांत होईल, कसलेही विचार डोक्यात आणु नका. थोडावेळ झोपा बघु. तुम्हाला नक्की बर वाटेल“, नानाजींचा धीरगंभीर आवाज चालु होता. हलके हलके मोहनरावांना झोप लागली.
``वहिनी जरा पाणी द्या बघु. ह्यांना थोडावेळ डुलकी लागेल. आपण हॉलमध्येच बसून बोलू“ अस म्हणत नानाजी उठले, येतायेता बेसीनवर जरा तोंड धुतले व रुमालाने ते पुसत बाहेर हॉलमध्ये येऊन बसले.
``हं हे घ्या पाणी“ वहिनी पाण्याचा ग्लास पुढे करत म्हणाल्या. डोळे मिटून सोफ्यावर बसलेले नानाजी जरा सावरुन बसले.
नानाजींचा मित्र परिवार जरी त्यांना महाराज म्हणत होता तरी त्यांना स्वताला ते आवडायचे नाही. त्यांनि सरकारी खात्यात नोकरी केली. फक्त संसारात राहुन सतत नामस्मरण, ध्यानधारणा हे न चुकता करत आले. सर्व प्रकारचे ग्रंथ, पुस्तके यांचे दांडगे वाचन. त्यामुळे समोरच्याचे दुःख जाणून ते कमी करण्याचे प्रयत्न त्यांनी निष्काम मनाने केले. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही मोठा होता. मोहनराव दाते हे त्यांतलेच एक. स्वताच्या मेहनतीवर व जिद्दीवर आता चार कारखान्याचे मालक झाले. वय जरी साठीकडे झुकलेल तरी दिवसभर एक मिनिटांचीही फुरसद नसे. त्यांना मुल नाही ही गोष्ट सोडली तर बाकी लौकिकार्थाने ते सुखी होते.
``नानाजी मी तुम्हाला मुद्दामच भेटायला यायला सांगितले. खरतर तुम्हाला इथे बोलवायचे म्हणजे" वहिंनींचे शब्द मध्येच तोडत नानाजी म्हणाले " अहो मला समजत का नाही वहिनी . तस काही कारण असेल म्हणुनच तुम्ही निरोप दिलात न . आपण सर्व एकाच कुटुंबातले आहोत , अहो त्यात वाईट काय वाटून घेता? हं , आता सांगा काय मी करु शकतो ते ?“
``तुम्हाला माहीतीच आहे. ह्यांनी लहानपण गरीबीत काढले . स्वताच्या हुषारीवर एक एक करत आता चार कारखाने झालेत. तसे ह्यांना कधी सादा तापसुध्दा कित्येक वर्षात आल्याचे मला आठवत नाही. पण काही महिन्यांपासून सतत ह्यांना काहीना काही व्हायच . अग साठी जवळ यायला लागली तर अशा थोडयाफार तक्रारी चालायच्याच अस म्हणते ते नेहमी टाळाटाळ करायचे. कधी औषधपाणी वेळेवर घेतले नाही. कामापुढे शरिराची आबाळच केली. मधेमध्ये सतत ताप असायचा, पण हे फॉरीन कंपनीबरोबर कोलॅबोरेशचे काम संपल की मग डांक्टरांना दाखवू म्हणायचे. गेल्याच महिन्यात ते काम झाले आणि अचानक एक दिवस ऑफिसमध्ये बेशुध्दच पडले. मग डॉक्टर हॉस्पिटल्स, सगळ्या टेस्ट झाल्या. त्यात कळल की ह्यांना कॅन्सर झालाय ,कॅन्सर ..लास्ट स्टेज. काही महिन्यांचे किंवा दिवसांचे ........" वहिनिंना राहावल नाही. डोळ्यातून येणारे पाणी त्यांनी हळूच पुसले.
नानाजी शांत चितांने सर्व ए‍कत होते. वहिनी रडायच्या थांबलेल्या पाहिल्या, त्यांनी समोरील तांब्यातून पाण्याचा ग्लास भरला. वहिनींना प्यायला दिला, पाणी प्यायल्यावर वहिनींना बर वाटल.
``डॉक्टरांनी अस सांगितल्यापासून तर मला काही सुचेनासच झालय. गेली 3० वर्षे ह्यांच्याबरोबर संसार करतेय. पण इतक एकाकीपण, भकासपण मी कधीच अनुभवल नव्हत. साठीशांत ह्यांची झोकात करायची अस मनाशी ठरवत होते. कारण मुल नसल्याने घरात शुभप्रसंग नाहीच. तेव्हा हा प्रसंग मोठया प्रमाणात साजरा करु अस मनात होते. पण आता - “
``हे बघा वहिनी शांत व्हा. असा धीर सोडू नका. बर हे सगळ मोहनरावांना... “
``हो माहितेय .प्रत्येक रिपोर्ट ते वाचतात. मध्ये एक दिवस त्यांच्या समोर बसले असतांना मला राहावल नाही. रडु लागले तर म्हणाले अग मी गेल्या सारखी रडतेस काय. डॉक्टर काहीही सांगोत, मी मरणार नाही आणि त्या गोष्टींची चर्चाही माझ्यासमोर नको“.
``मनात कसले कसले विचार येतात. डॉक्टर म्हणतात तसच जर खर झाल तर पुढे काय होणार, एवढा मोठा पसारा , ह्याच मी काय करु ? इतक्या वर्षात ह्या असल्या त-हेचे विचार करायची सवयच नव्हती - त्यामुळे मी खरोखरीच गांगरुन गेलेय , म्हणून....“
``मी सर्व समजलो , वहिनी तुम्ही कसलीही काळजी करु नका. मगाशी मी त्यांचा चेहरा पाहिला . डॉक्टर म्हणतात तसे .. अगदी जरी त्याप्रमाणे घडले तरी त्यांना जास्त त्रास होणार नाही एवढा मी प्रयत्न करतो .जीवनदान देणे हे जरी माझ्या हातात नाही, तरी पुढे तुम्हालाही त्रास होऊ नये एवढे मी बघतो. आता माझी एक विनंती आहे की मी जरा अर्धा तास तुमच्या देवघरात बसतो. कुणालाही आत पाठवु नका . फक्त बाहेर आल्यावर एक कप गरम चहा तयार ठेवा " नानाजी म्हणाले.
त्यांनी बाथरुममध्ये जाऊन हातपाय धुतले व ते देवघरात ध्यानास बसले.
``वहिनी मोहन जागा झालाय. तुला बोलवतोय“ माधवराव म्हणजे मोहनरावांचे धाकटे बंधु येऊन सांगुन गेले. ``चहा ठेवलाय. तो झाला की आलेच हं“ म्हणत वहिनी स्वैपाकघरात गेल्या.
``काय म्हणता मोहनराव, आता कस वाटतय ?“ नानाजी ध्यान संपवून त्यांच्या रुममध्ये शिरत म्हणाले.
``अहो खुप बर वाटतय, तुम्ही आल्यामुळे असेल पण मनाची मरगळ दुर झाली“.
``चहा - ``वहिनी आत येत म्हणाल्या“ आज मुड एकदम चांगला दिसतोय“.
``नानाजींना मी तेच सांगणार होतो की रोज थोडावेळ इथे येऊन जा मी एकदम फीट होईन व परत पहिल्यासारखा कामाला लागेन. नानाजी मला सांगा ह्या डॉक्टरांच काम काय असत ? अहो पेशंटच्या मनावरचे टेन्शन दुर करायचे. इथे तर ते उलटा सुलटा रिपोर्ट देऊन सगळ्यांना घाबरवून सोडतात आणि असा घाबरणारा रिपोर्ट देऊन वर पेसे सोडत नाहीत“.
चहा संपवुन नानाजी म्हणाले ``वहिनी तुम्हीही इथं थांबा. आपण तिघेच इथे असु एवढ बघा“.
``हो - हो आम्ही बाहेर थांबतो“ अस म्हणत मोहनरावांचे आलेले बाकीचे नातेवाईक उठले.
आता बेडरुममध्ये फक्त तिघेच राहिले. नानाजी उठले . माधवरावांच्या बेडवर बसले, त्यांचा हात आपल्या हातात घेतला व तो ते कुरवाळु लागले. आपल्या तेजस्वी डोळ्यांनी त्यांनी मोहनरावांकडे पाहिले.
कसा कोण जाणे इतके दिवस मुश्किलीने बांधलेला मनाचा बांध फुटला व मोहनराव ओक्साबोक्सी एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले. वहिनींना तर हे अनपेक्षीतच होत. नानाजी धीराने उभे राहिले. मोहनरावांना जवळ घेतले व त्यांच्या पाठीवरुन हात फिरवू लागले.
पहिला दुःखाचा भार हलका झाल्यावर त्यांनी नानाजींचे हात पकडत प्रश्न केला,
``नानाजी डॉक्टरांचा रिपोर्ट म्हणतो मी काही दिवसांचाच सोबती आहे . हा.. हा रिपोर्ट खोटा आहे . मला अजुन खुप आयुष्य जगायचय . तुला काहीही होणार नाही एवढेच तुम्ही सांगा . बस मग माझा मनावरील भार हलका होईल `` अपेक्षेने नानाजींकडे पहात मोहनराव म्हणाले.
``हे बघा शांत व्हा. हा रिपोर्ट खरा का खोटा, मी सांगितले की काय होईल ह्यापेक्षा सुजाण डोळ्यांनी आयुष्य म्हणजे काय हे बघा . ते कळले की पुढे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. लहानपणी तुम्ही गरीबित दिवस काढलेत. गरिबी म्हणजे काय ते अनुभवलत. त्याच्यावर मात करत जिद्दीने व सचोटीने धंदा केलात आता चार कारखाने आहेत .चाराचे दहा होतील पुढे काय ? माणसाचे आयुष्य हे किती वर्षांचे असते ? फार तर 60-80 वर्षे. त्यातली पहिली 25 वर्षे ही लहानपण , शिक्षण ह्यातच जातात. उरलेल्यातलि निम्मी वर्षे ही झोपण्यात व प्रवासात जातात , निम्मी कामात. मग हे जे देवाने मोलाचे आयुष्य तुम्हाला दिले आहे ते जगणार कधी , त्याचा आस्वाद घेणार कधी ?
आयुष्यभर तुम्ही काम करता कोणा करता तर कुटुंबाकरता . त्यांना सुख मिळावे म्हणून , घरात फ्रीज, टि.व्ही., गाडी आहे, बंगले आहेत, भरपुर पैसे आहेत म्हणजे कुटुंबातले सर्व सुखी झाले कां ?
एक विचार करा तुम्ही कधी पत्नी बरोबर सुख दुःखाच्या गोष्टी बोलत बसलायत ? तिला आपण जास्त वेळ देऊ शकत नाही तर त्याचा तिच्यावर काय परिणाम होत असेल ह्याचा विचार केलात ? मला सांगा चार नाही दहा कारखाने असलेत,बाहेर पडल्यावर शोफरसह गाडी दिमतीला असेल पण जर त्यात तुम्ही बरोबर नसलात तर तिला काय मजा वाटेल ? हे मी तुम्हाला बोलतोय असे समजू नका. एकंदरच सध्याचे वातावरण ,त्यात राहणारी माणसे, त्यांचे विचार कसे बदलताहेत त्याबद्दल बोलतोय.
आता आपण एकाच कुटुंबातले. तुम्ही मला मानता म्हणून सांगतो . वहिनींच्या अँगलने विचार करा . तुम्ही दिवसभर कामात असल्याने तुमचा वेळ कसा जायचा ते तुम्हालाच कळायच नाही.पण वहिनी, त्या दिवसभर एकटयाच असायच्या. त्यांचा कधि विचार केलात? मी त्यांच्याबाजूने बोलतोय अस कृपया समजु नका . मला त्यांना पण हेच सांगायचय की बायकोनेही नव-यावर वचक ठेवावा अस मी म्हणत नाही, पण तो जर वेळ देत नसेल , आपल्या काही समस्या असतील तर त्या वेळच्यावेळी त्याच्या नजरेस आणून द्यावयास हव्यात एवढा हक्क तरी त्याच्यावर बजावता आलाच पाहिजे.
मोहनराव आमचे गुरुजी रात्री झोपतांना नेहमी म्हणत ``आज माझ्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला . राहिलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दुस-याच्या उपयोगी पडेल अशी शक्ति दे“
आपण किती जगतो ह्याला अर्थ नाही. कसे जगतो ह्याला अर्थ आहे. जसे तुमच्याकडे पाहतांना लहानपण हलाखीत गेल्यावरही जी धडाडी तुम्ही तुमच्या मनगटात दाखवलीत व आज एक यशस्वी पुरुष म्हणून समाजा समोर उभे आहात ," ठेविले अनंती तैसेची रहावे“ यापेक्षा करिन ति पूर्वदिशा म्हणत आज यशस्वी झालात. त्यामुळे तुम्हाला काय झालय, किती जगणार ह्यापेक्षा जे जगलात ते एखाद्या योध्यासारखे जगलात ह्यातच सर्व काही आले.
पण माधवराव जगताना फक्त माणसाचे एकच होते की तो सर्वस्व एकाच दिशेला झोकुन देतो .पण हे एकांडे जगणे होते . जगणे कसे हवे, सर्व कलांनी किकसित होत होत असावे. अहो जगात इतक्या सुंदर-सुंदर गोष्टी आजुबाजूला विखुरल्यात की त्या शोधायला शोधक नजर हवी.
एक सहज जाताजाता गोष्ट म्हणुन सांगतो. आपण एखादी चांगली गोष्ट केली व ती मनासारखी झाली की म्हणतो... मी केली. तेच ती चांगली झाली नाही की म्हणतो... देव दुष्ट आहे, त्याने मला साथ दिली नाही . ह्या देवाला हे स्तोत्र म्हटले तर तो चांगले करेल, नाही म्हटले तर तो वाईट करेल .अहो देव म्हणजे काय माणूस आहे? त्यानेच तर हे सुंदर आयुष्य आपल्याला दिले आहे . ते कशा प्रकारे भोगायचे ते सर्वस्वी आपल्या मनावर अवलंबुन आहे. तुम्ही दोघे कंटाळलात तर नाही ना माझ्या या बडबडीला ?“
``नाही - हो“ भारावून मोहनराव म्हणाले.
"एक सांगा मोहनराव. देव म्हणा किंवा ईश्वर ही एक पूर्णत्व पावलेली शक्ति आहे. आपल्या ग्रहमालेत आत्तापर्यंत फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे. ती बनायलाही लाखो वर्षे जावी लागली. देवाने माणसाला जन्माला घातले म्हणजे मनात आले की लगेच बनवले असे नाही, तर देव म्हणजे ही मोठा पोहोचलेला शास्त्रज्ञच. त्यालाही जिवसृष्टीतुन माकडापासून माणूस बनवायला कितितरी वर्षे लागली. अग आपण तर किती क्षुद्र जीव. तर देवाने आपल्याला सर्वात चांगली गोष्ट कुठली दिली आहे ?
``पंचेद्रिये“ मोहनराव म्हणाले -
``नाही. मला विचाराल तर मला असे वाटते की प्रत्येक जिवास मृत्यु ही सर्वांत मोठी देणगी दिली आहे. प्रत्येक सजीव तो माणूस असुदे की प्राणी जर मरण पावला नाही तर पृथ्वीवर काय हाहाःकार माजेल विचार करा. तेव्हा मृत्यु आहे म्हणून जगण्याला अर्थ आहे. मला एवढेच तुम्हाला सांगायचे आहे की आयुष्यातला एकभाग जो झगडत यशस्वी व्हायचा तो तुम्ही अपेक्षेबाहेर पुर्णत्वास आणला, पण दुस-या त-हेने अजुनही राहिलेले आयुष्य जाऊन तुम्ही पुर्णत्वास जाऊ शकता“.
नानाजींनी एवढे बोलून डोळे मिटले. दोनमिनिटे ध्यान केले व हवेतच हात जोडले.
.............................................................................................................................
नानाजी घरी येऊन गेल्याला एक आठवडा झाला. त्यात मोहनराव शरिराने नाही तरी मनाने खुपच सावरले.
``अग सुमन घरी असल्यापासून बघतोय, किति काम करत असतेस, माणस आहेत न घरातकामाला, तु कशाला उभी असतेस ?"
``अहो नुसते उभे राहून भागत नाही. माणसांना निट समजुन सांगितल्या शिवाय कोणी कामच करत नाही. माणस आहेत ती.. करतील काम.. अस म्हणून भागत नाही. "
``खरच - ये - इथे बस ना“ आपल्या बायकोचा हात हातात घेत मोहनराव म्हणाले.
``खर सांगु , ह्या आजारपणापासून म्हणजे मी घरी असल्यापासून तुला बघतोय. तुझ्याशी बोलतोय . आता मला काय वाटत माहीती आहे, आय रियली मिस्ड यु, माझ्यातला पुरुषी कमीपणा लपवण्यासाठी मला मी ह्या धंद्यात झोकून दिले व तसाच वाहावत गेलो. तुझ्याशी हवा तसा संवादच साधु शकलो नाही. आणि त्याची जी टोचणी आहे ती ह्या शरीराच्या दुःखापेक्षाही भयानक मोठी आहे“.
``अहो काहीतरीच काय “ -
``नाही-नाही मला बोलु दे . दोन दिवसापुर्वी मी तुझ्या ज्या कागदावर सह्या घेतल्यातन त्या एवढयाच करता की तुला मि आता आपल्या कंपनीत डायरेक्टर म्हणून घेतले आहे. आपल्या सी.एं. ना त्या विषयी सर्व कागदपत्रे पुर्ण करण्यास सांगिते आहे. तु एवढे घर छान सांभाळतेस तर माझी खात्री आहे की आपली कंपनीही छान सांभाळशील.
मला वाटत माणसालाच 40-45 वयाच्या आसपास एकदा तरी असा आजार व्हावा की जेणेकरुन तो महिनाभर घरी राहील. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाशी म्हणजे बायकोशी मुलांशी जास्त संवाद साधता येईल. चुका सुधारण्यास वाव मिळेल. हाच माझा आजार जर आधि -
``अहो काही तरीच काय बोलताय“.
``म्हणजे हाच नाही, तरी कुठलाही ... की जेणेकरुन .. मला माझी चुक .." अस म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी आले. "माझा खरतर पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. पण आता वाटतय की पुढचा जन्म जर मिळालाच तर त्यात तु माझी बायको असावीस की जेणेकरुन मला ह्या जन्मातल्या चुकांची दुरुस्ती करता येईल“. आणि रडतच बायकोचा हात हातात घेतला. तो स्पर्श जणु अशीच साथ पुढच्या जन्मीही मिळावी हेच सुचवत होता.

गुलमोहर: 

``आज माझ्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला . राहिलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दुस-याच्या उपयोगी पडेल अशी शक्ति दे“>>>> मस्तच

जगताना फक्त माणसाचे एकच होते की तो सर्वस्व एकाच दिशेला झोकुन देतो .पण हे एकांडे जगणे होते . जगणे कसे हवे, सर्व कलांनी किकसित होत होत असावे. अहो जगात इतक्या सुंदर-सुंदर गोष्टी आजुबाजूला विखुरल्यात की त्या शोधायला शोधक नजर हवी.>>>> लाखमोलाची गोष्ट..

गोष्ट म्हणुन छानच आहे, पण सुमनला आयुष्यात काय मिळाले? फक्त एकटेपणा, उशिरा सुचलेल शहाणपण काय कामाचं?
आयुष्यभर तीला टेकन फॉर ग्रान्टेड घेउन, अखेरीस कबुली देउन काय साधते? असो.
गोष्टिची शब्दमान्डणी छानच आहे. पुलेशु!! Happy

सुंदर !!!
फक्त सुमन विशयी वाईट वाटतेय..मोहनरावांच्या उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे...
पण सुंदर !!!