मेथीचे आळण

Submitted by योकु on 29 July, 2019 - 18:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहेमी केल्या जाणारा प्रकार आहे हा. मायबोलीवर काही सापडला नाही. क्ष च्या कृतीत टिंब आहेत आणि तिच्या ब्लॉगवर आळण म्हणून जे आहे त्याला आमच्याइथे मेथीची पीठ पेरून भाजी किंवा झुणका म्हणतात. आमच्याइथे आळण म्हणजे पालेभाजी + ताक घालून पिठलं टाईप असतं. ही त्याची कृती. आजची रेस्पी बायडी फेमस आहे. सुपरटेस्टी होते तिच्या हातचं आळण, ही ती रेसीपी.
तर साहित्य -

ओंजळभर मेथी किंवा आवडत असेल तर जास्तही
दोन मध्यम टोमॅटो
वाटीभर साधं दही
अर्धी - पाऊण वाटी चण्याच्या डाळीचं पीठ
हळद
हवं असेलच तर लाल तिखट
मीठ
चिमूट्भर 'च' साखर
दोन-तीन लहान चमचे तेल
चिमूटभर मोहोरी

यांवर वरून फोडणी घातलेली अतिशय सुरेख दिसते आणि अर्थातच अत्यंत चविष्ट लागते सो त्याकरता -
३-४ पळ्या तेल
८-१० लसूण पाकळ्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा मोहोरी + जिरं

क्रमवार पाककृती: 

लोखडी कढई तापत घालावी आणि मग मेथी धूवून ओबडधोबड चिरून घ्यावी. टोमॅटोही चिरून घ्यावा.
सणकून तापली कढई की त्यात तेल घालून मोहोरी तडतडू द्यावी आणि त्यावर टोमॅटो आणि मेथीही घालावी.
हे प्रकरण दोन तीन मिनिटं मोठ्याच आचेवर चांगलं हडसून खडसून परतावं.
आता आचं जरा मंद करून परतत असतांनाच थोडं थोडं करून दही घालावं. असं केल्यानी दही फाटत नाही.
पूर्ण दही वापरल्या गेलं की चवीनुसार मीठ + चिमूटभर साखर घालून वर दीड कप पाणी घालावं. आता आच मोठी करून पाण्याला उकळी येऊ द्यावी.

पाण्याला उकळी आली की कढईतलं प्रकरण चमच्यानी हाटत असतांनाच त्याला बेसन लावावं. बेसनाची गुठळी होउ द्यायची नाही.
जरा पातळसर असतांनाच पीठ लावणं थांबवून एकदा चांगलं ढवळून वर झाकण घालून चांगलं शिजू द्यावं आळण. या स्टेज ला फारच दाट वाटत असेल तर अजून अर्धा कप पाणी वाढवता येइल.

पिठलं प्रकारची कन्सिस्टन्सी आली आणि पीठ चांगलं शिजलं म्हण्जे आळण तयार आहे. गरमागरम हलक्या पिवळ्या रंगाचं मधून मधून हिरवीगार मेथी डोकावणारं सुपरटेस्टी आळण वर पुढे दिलेली लसणीची फोडणी घेऊन गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबही फार उत्तम लागतं.

फोडणी - वरून घेण्याकरता -
४-५ पळ्या तेल तापत घालावं लहान कढल्यात आणि तापलं की त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी.
यावर हिंग फसफसू द्यावा आणि आच अगदी बारीक करून ओबडधोबड चिरलेला लसूण घालून मस्त लाल होऊ द्यावा.
आता आच बंद करून कोरड्या चमच्यात तिखटपूड घेऊन ती तेलात पोळू द्यावी म्हणजे लाल रंग चांगला येइल.
ही फोडणी गरम असतांनाच आळणावर प्रत्येक सर्विंग वर थोडी थोडी घ्यावी.

फटू. लई आळस झटकून काढलाय. मारकं द्या गप आता. लोखंडी कढई पण सणकून तापवलीय सो मारकं अज्याब्बात कापायचे न्हायी.
IMG_20190729_193906.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे. पण पिठलं कॅटेगरी असल्यानी जरा जास्तच लागतं. या क्वांटीटीनी बनवलेलं दोघांना भरपूर झालं.
अधिक टिपा: 

दही थंड नको, कढईत घालण्यापूर्वी. तसंच ते थोडं थोंड करत परतत परतत च वापरायचंय. नाहीतर फाटेल दही.
टोमॅटो + दही असलं तरी आंबट अजिबात होत नाही
आळणात तिखट वापरलेलं नाहीय पण हवं असेल तर वापरता येइल. फोडणीतच घालायचं.

माहितीचा स्रोत: 
नेहेमीचा प्रकार आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्त. सही लागतं हे.
साधारण असंच पण टोमॅटोच्या ऐवजी आमसुलं, ओंजळभर ऐवजी भरपूर मेथी आणि चिमूटभर साखरे ऐवजी गोड चव बर्‍यापैकी पुढे येईल इतका गूळ घालून करतो. दही घालून करुन बघेन पुढच्या वेळी.
वरुन तिखट पोळलेली क्रिस्पी लसूण आणि मोहोरीची फोडनी इज द की!

वा वा भूक लागली, सही दिसतंय.

असं मेथीचं पिठलं करतो आम्ही असं पण टोमाटो घालून नाही केलं. वरून फोडणीची आयडिया जाम भारी, आता असं करून बघेन. ताकातली मेथीपण करतो पण ती पातळ करतो आणि पीठ थोडं लावतो तेव्हा.

योकु, कालच ह्याची रेसिपी शोधात होते कारणं पुण्याच्या ह्या ट्रिप मध्ये खाल्लं होतं सासूबाईंनी केलेलं. फक्त ते पातळ होतं. पण मग रेसिपी मिळाली नाही म्हणुन मग मेथी मटर
मलई केलं. आता 100% ह्याचाच नंबर. फक्त दही परतणे व नंतर गुठळी ना होऊ देता बेसन लावणे ह्या स्टेप्स रिस्की आहे पण प्रयत्नांती परमेश्वर.
पहिला पॅरा ला अगदी अगदी

शेवगाच्या शेंगाचे पीठलं करतो पण. बेसन आणि ताक लवून.
ताकात बेसनघुसळायचणं.
अंजू म्हणते तशी मेथी ताकातली करतो बेसन लावून.
पण टॉमेटो अजाबात नाही घालत असल्या भाज्यात. टोटल नो नो.

आवडली पाकृ. काहीही फरक न करता जशीच्या तशी करून पहाण्यात येईल.

तुम्ही लोखंडी कढई मध्ये दही कसं शिजवलं? चालत नाही ना?

मीरा, आमची ही कढई अलमोस्ट रोज वापरात आहे त्यामुळे असेल कदाचित पण झाडून सगळे प्रकार आंबटासकट त्यात केले तरीही पदार्थ कधी कळकला नाहीय किंवा चवही नाही बदलली. हा एखादवेळेस रंगच काय तो जरा काळपट होतो. आम्ही तसाही करून लगेच मटकावून टाकतो पदार्थ सो जास्तवेळ राहीला असं होतं नाही कधी.

आम्ही करतो त्यात पीठ एवढं नसतं. म्हणजे ते पिठलं कॅटॅगरी न होता भाजी कॅटॅगरीच असतं. आणि टोमॅटो नाही घालत ह्यात.

शप्पथ काय फोटो आहे.... किती दुष्ट असावं माणसाने >> +११अगदी
पण पाकृ सोबत फोटो जोडल्याने १०० पैकी १०० मार्क .. शिवाय सणकून तापलेली कढई आणि चिमूटभर साखर आहेच ..
आता मला इथे(जर्मनी त ) मेथी मिळाली कि तुमच्या रेसिपीचं भाग्य लगेच उजळवण्यात येईल Wink
बहुतेक टोमॅटो वगळून करण्यात येईल .. पण लसणीची चरचरीत फोडणी हवीच !

मस्त !!
मी ऐकलं होतं अशा प्रकारच्या भाजीबद्द्ल. तुमच्या फोटो सहित रेसीपी मुळे लगेच करून बघेन आता.; फक्त टोमॉटो न घालता..
पीठ आणि दही एकत्र करून घातलं तर चवीत फरक पडेल का?

छान! फक्त फोटो काढताना भाजी डिश च्या 'ह्या' साईडला वाढली असती तर आणखी सुंदर आला असता...साईड च्या डिझाईन मुळे ज ss रा रसभंग होतोय !! Happy . बाकी मस्तच !
आम्ही टोमॅटो नाही घालत व दही जरा आंबट हवं !
(अकोला - अमरावतीला 'दारावर' जे दही येतं...त्याचीच चव खरी तर मस्त लागते. घरी विरजलेल्या साईच्या दह्याला ती चव नाही !)

सही ! आमच्या कडे ह्याला मेथीची मुद्दा भाजी म्हणतात. कुठ्लीही पिठ पेरुन भजी ती मुद्दा भाजी :). फक्त टोमॅटो आणि ताक्/दही नाही घालत. आता अशी करुन बघेन. ( आमच्या कडे म्हण्जे माझ्या साबांची पध्दत.) वरुन चरचरीत लसणीची फोडणी मस्ट्च आहे. Happy

मस्तच. सकाळी वाचलेली पण आत्ता प्रतिसाद द्यायला वेळ झाला. माझ्याक डे लै भारी दही मिळते . व फक्त मेथी आणावी लागेल. मी भाजीवाल्याकडून फक्त भेंडी घेत असते अर्धा किलो पण यावेळी घेइन मेथी. माझ्याकडे इंडक्षन कुक टॉप आहे त्यामुळे भाकरी काही जम णार नाही पण आंबे मोहोर भात व गरम पोळ्या नक्की.

आजच घरातलं फक्त चिकन खाणारं विद्यार्थी भूत पुण्याला परत गेलंय. त्यामुळे जै शाकाहारी बाबा.

बीएस, पाण्यात/ताकात पीठ कालवून मग ते फोडणीत घातल्यानी चवीत नक्की फरक पडतो. जरा सपक होतं हे मा वै म.
पाणी फोडणीत घालोन त्याला पीठ लावल्यानी पदार्थ जास्त खमंग होतो.
हे म्हणजे, कुणी सत्यदत्त म्हणतात तर कुणी सत्य नारायण म्हणतात तसा प्रकार आहे पण बरीक फरक असतोच.

अमा नक्की करून पाहा. नसेल पोळी भाकरी तरी चालेल या थंडगार पावसाळी संध्याकाळी वाफाळता भात आणि आळाण हिट आयटम आहे.

ऑसम!
हा पदार्थ ऐकला होता; आज रेसिपी समजली.
मेथी फेवरिट आहे; त्यामुळे करून बघणारच. (फक्त दह्याची जरा कसरत आहे. पच्चीस साल का एक्सपिरिअन्स कामाला लावावा लागेल. Proud )

Pages