सुगरणीचा खोपा

Submitted by Dr Raju Kasambe on 29 July, 2019 - 02:08

सुगरणीचा खोपा

येता पावसाच्या सरी, पसरते हिरवय
सुरु होते मंग सुगरणीची धावपय !

गुतवून गवताचे पात्याले पाते
जुळवाले पायते पिरेमाचे नाते !

सुगरण बुवा सजते हयद लाऊन
सुगरणीन जाते खोप्यात डोकावून !

खोप्याचा आकार जसा भोपया टांगला
एका खोलीचा महाल आगाशी बांधला !

खोलीत सतरंजी गवताच्या पात्याची
मऊशार गादी म्हातारीच्या कापसाची !

उन, पाऊस, वादळाची जान सुगरणीले
देते गाट्याचा लेप खोप्याच्या वयचनिले !

झोडपणार वादळ, पाऊस पश्चिम दिशेले
बांधते साजरे घरटे पूर्व दिशेले !

कवा ताड, माड तर कवा बाभईवर
कवा नदीवर तर कवा विहिरीवर !

टांगते खोपा आगाशी असा उंचावर
काटा येते दुष्मनाच्या आंगावर !

हेलकावते खोपा वादळ पावसाचा
जीव होते खालीवर इवल्या जीवाचा !

खोप्याची कलाकारी दुनियेत भारी
सुगरणीन परखते नराची हुशारी !

जोखून घेते खोप्याची कलाकारी
भुलते सुगरणीन, गुतते संसारी !

शायना सुगरण फसवते सुगरणीले
देऊन वंशवेल ताब्यात रिझवतो दुसरीले !

बांधतो दुसरा घरठाव, दुसरी सुगरण
पुरुषाची जात, पाप कुठीसा भरन !

पिल्लाची कायजी वाहते सुगरणीन बाई
नाई उमगत तिले पुरुषाची चतुराई !

खोप्यामंदी खोपा सुगरणीचा भारी
मनुष्याले नाई साधली अशी कलाकारी !

अरे मानसा मानसा, पाय सुगरणीचा खोपा
मिळे कष्टानं यश, नाही मार्ग सोपा !

डॉ. राजू कसंबे
फेब्रुवारी 2015

(बहिणाबाई चौधरी ह्यांच्या प्रसिद्ध कवितेवरून प्रेरणा घेऊन).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! म्हणजे सुगरण नर पक्षी त्याच विणीच्या हंगामात परत दुसऱ्या मादीसाठी नवा खोपा बांधतो का? हे माहिती नव्हते. मला वाटलं होतं की तो २-३ खोपे अर्धवट बांधतो आणि मग मादी एक पसंत करते आणि मग दोघे मिळून तो खोपा पुरा करतात.

टिटवी, चिऊ, सुगरण. डॉक्टर तुम्ही पक्षीप्रेमी दिसता.
हिरवय, धावपय. माझ्या एका आतेबहीणीला र, ळ उच्चारता येत नाहीत. ती य म्हणते. तसं का ?
पण लिहीताना काय प्रॉब्लेम आहे ?