द डेथ ट्रॅप भाग ११

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 05:52

स्वाती पोतनीस
(हा भाग वाचण्यापूर्वी मला वाचकांना काही सांगायचे आहे. मी ड्रग्ज किंवा ड्रग ऍडीक्शन या विषयातली तज्ञ नाही. यात मी त्यासंबंधी जी माहिती लिहिली आहे ती मी बाहेरून मिळवलेली आहे. त्याची सत्यासत्यता किंवा चूक / बरोबर वगैरे मी पडताळून पाहीलेले नाही. या कथेची रंजकता वाढावी एवढाच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तरी क्षमस्व. वाचकांना विनंती जर यात काही चूक असेल तर तो विषय समजून घेण्यातली माझी अल्पमती हे कारण आहे. धन्यवाद.)
द डेथ ट्रॅप
भाग ११

अजिंक्य आणि नरेंद्र घरातून निघाले आणि नरेन्द्रचा फोन वाजला. त्याचे फोनवर बोलणे होईपर्यंत अजिंक्यने गाडी सुरु केली होती. तो पळतपळत गाडीत येऊन बसला.
“अजिंक्य, सुहानी आणि विक्रम बारा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील.” सुहानी आणि विक्रम हेही त्यांच्याबरोबर एक वर्षापासून काम करीत होते. जरी त्यांच्यावर अजुनपर्यंत फार मोठी जबाबदारी टाकलेली नसली तरी ते दोघेही बेमालूमपणे पाठलाग करण्यात आणि माहिती काढण्यात निष्णात होते. या प्रकरणात बरीच माणसे गुंतलेली असल्याने त्या दोघांची नक्कीच गरज लागणार होती.
दोघे वेदांतीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. इमारतीच्या टोकाला असलेल्या दारातून वाहनतळात जाण्यासाठी रस्ता होता. त्यांनी गाडी लावली आणि दोघे त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आले. ती नऊ मजली इमारत होती. तळमजल्यावर रस्त्याच्या बाजुला वेगवेगळी दुकाने होती. पायऱ्या चढून दोघे इमारतीत शिरले आणि जिन्यापाशी गेले. बाजुला लावलेल्या पाटीवरील नावे ते वाचू लागले. बहुतेक मजल्यांवर कंपन्यांची कार्यालये नाहीतर इस्पितळ, दवाखाने वगैरे होते. तिसऱ्या मजल्यावर जीम होते, तर सातव्या मजल्यावर एका मानसशास्त्रज्ञाचा दवाखाना होता. नवव्या मजल्यावर पब होता. दोघे लिफ्टमध्ये शिरले.
“आपण जिमची चौकशी करूया का?” नरेंद्रने विचारले. अजिंक्यने हसून तिसऱ्या मजल्याचे बटण दाबले. काचेचे दार ढकलून दोघे आत गेले. समोरच टेबलापाशी एक मध्यम वयाचा इसम बसलेला होता. त्याची शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती. त्याच्या पाठीमागे आर्नोल्डचा फोटो लावलेला होता. त्या पार्श्वभूमीवर हा माणूस अगदी विसंगत दिसत होता. त्या इसमाजवळ जाऊन त्यांनी चौकशी केली. तो सांगत असलेली माहिती अजिंक्य शांतपणे ऐकून घेऊ लागला. बोलण्यातून त्याला कळले त्या इसमाचे आडनाव कारंडे होते. कारंडे दिवसभर ऑफिसमध्ये थांबून सर्व व्यवस्था बघत असत. नरेंद्रकडे त्यांचे बोलणे ऐकत बसण्याएवढा संयम नव्हता. त्याने त्यांचे बोलणे मधेच तोडले आणि म्हणाला, “आम्ही जरा आधी जीम बघून घेऊ का? सभासद होताना तुमच्याकडून बाकीची माहिती घेऊच.”
“हो चालेल न. चला मी तुम्हाला जीम दाखवतो.”
जिममध्ये आत्ता फारसे सदस्य नव्हते. अकरा वाजल्यामुळे असेल. दहा बाराजण वेगवेगळ्या उपकरणांवर वर्कआऊट करीत होते. एक दणकट मुलगा त्यांच्यावर लक्ष ठेवत होता. त्याच्या शरीरयष्टीवरून त्याच्या ताकदीची कल्पना येत होती. तो स्वतः वेगवेळ्या यंत्रांवर बरेच तास घालवत असणार हे लक्षात येत होते. कारंडे त्यांना सगळ्या उपकरणांची माहिती देऊ लागले. दोघे जरी त्याचे ऐकत आहेत असे वाटले तरी त्यांचे लक्ष मात्र आजूबाजूला होते. दहा मिनिटे फिरल्यावर जीमचा बराचसा भाग बघून झाला होता. आत्तापर्यंत तरी काही संशयास्पद दिसले नाही. कोपऱ्यात एक काचेचे दार होते. दार उघडून ते आत गेले. ती मध्यम आकाराची खोली होती. त्या खोलीत चार पाच खोल्यांचे दरवाजे उघडत होते. त्यातील एका दारावर ‘लॉकर’ अशी पाटी होती, तर दुसऱ्या दारावर ‘चेंजिंग रूम’ अशी पाटी होती. त्या खोलीला एकच छोटी खिडकी होती. त्यामुळे फारसा उजेड नव्हता. मध्यभागी एक दिवा लावलेला होता. त्याचा अगदी मंद उजेड पडला होता. एका कोपऱ्यात एक दुधट काचेचे दार असलेली खोली होती. तिच्या दारावर सौना बाथ असे लिहिलेले होते. बाहेर बाकावर ऍटेंडंट बसला होता.
कारंडेंनी ‘चेंजिंग रूम’ अशी पाटी असलेल्या खोलीचे दार उघडले. ही खोलीही तशी अंधारीच होती. या खोलीला खिडकी नव्हती. कारंड्यांच्या पाठोपाठ अजिंक्य आत शिरला. आत शिरताच कारंडे स्तब्ध होऊन उभे राहिले. अजिंक्यने त्यांच्या नजरेच्या दिशेने पहिले. कोपऱ्यात एक मनुष्याकृती अस्ताव्यस्त पडली होती. नरेंद्रने पटकन दिवा लावला. तो एक विशीतला युवक होता. त्याच्या अंगावर जिमचे कपडे होते. डाव्या हाताला शेजारी सॅक आणि एक पाण्याची बाटली पडली होती. आधी तो भिंतीला टेकून बसला असावा आणि नंतर तो घसरला असावा असे अजिंक्यला वाटले. कारण त्याच्या निम्म्या पाठीपर्यन्तचा भाग अजूनही भिंतीला टेकलेला होता. शरीराचा बाकीचा भाग मात्र जमिनीवर पसरला होता. त्याचा चेहरा शांत दिसत होता. आकडी आल्यासारखे वाटत नव्हते.
कारंडे उद्गारले, “अरे बापरे. याला काय झाले?”
अजिंक्य पुढे झाला. त्याने त्या मुलाचा हात उचलून नाडी आजमावण्याचा प्रयत्न केला. नाडी मंद लागत होती. त्याने नरेंद्रला काहीतरी सांगितले आणि नरेंद्र पळत पळत जिमच्या बाहेर गेला.
अजिंक्यने कारंडयांना विचारले, “हा आला तेव्हा व्यवस्थित होता का?”
“हो होता. मी त्याला वर्कआउट करताना पाहीले.”
“मग आत्ताच त्याला काय झाले?” एकूण आवाजावरून काहीतरी गडबड झाल्याचे बाहेर कळले असावे. ऍटेंडंट घाईघाईने आत आला आणि त्या मुलाजवळ गेला. तो अजिंक्यला म्हणाला, “मी बघतो साहेब यांना काय झाले आहे ते?”
“बाप रे. हे काय नसते लफडे. अरे बघत काय उभा राहिलास. जा आधी जॉर्जला बोलावून आण.” कारंडे त्याच्यावर खेकसले. तो मुलगा पळत बाहेर गेला.
अजिंक्य म्हणाला, “जरा मदत करता का? आपण याला बाहेर मोकळ्या जागेत नेऊ या.” अजिंक्य त्या मुलाच्या उजव्या बाजुला गेला. त्याने त्या मुलाच्या पाठीमागे हात घालून त्याला सरळ बसवले. त्यावेळेस अजिंक्यचे लक्ष भिंतीकडे गेले. जमिनीवर भिंतीलगत एक इंजेक्शनची सिरींज पडली होती. कारंडेंच्या मदतीने अजिंक्यने बाहेरच्या खोलीत आणून त्या मुलाला बाकावर आडवे निजवले. तेवढ्यात कुणीतरी मागून जोरात बोलले. “तुम्ही इथे काय करत आहात. कारंडे, कोण आहेत हे?”
“हे जिमच्या चौकशीसाठी आले आहेत.”
“मग त्यांना बाहेर नेऊन माहिती द्या.”
कारंडे म्हणाले, “अरे जॉर्ज या मुलाला काय झाले आहे ते आधी बघ.”
“मी बघतो. तुम्ही यांना घेऊन बाहेर जा.”
तोपर्यंत अजिंक्य त्या मुलाला गालावर हलके चापट्या मारून जागे करायचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या प्रयत्नांना त्या मुलाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. जॉर्ज नावाचा तो इन्स्ट्रक्टर अजिंक्यवर ओरडला, “ओ, तुम्हाला सांगितलेले कळत नाही का? आधी बाहेर जा.” त्याने हाताने अजिंक्यला बाजुला करायचा प्रयत्न केला. पण अजिंक्य बाजुला सरकला नाही. “याला ट्रीटमेंटची गरज आहे. माझा मित्र डॉक्टरांना आणायला गेला आहे.”
“तुम्हाला कुणी सांगितले या फंदात पडायला?”
“एक मुलगा इथे सिरीयस आजारी झाला आहे. मी त्याला मदत करायचा प्रयत्न करतो आहे.”
“कुणाच्या परवानगीने?”
“त्यासाठी मला कुणाची परवानगी घ्यायची गरज वाटत नाही.” यावर तो इन्स्ट्रक्टर जॉर्ज अरेतुरेवर उतरला.
“ए तुला परत सांगतो आहे जा इथून. नाहीतर महागात पडेल.” अजिंक्यने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तो मुलगा आता निपचित पडला होता. मान डावीकडे कलली होती आणि डावा हात खाली लोंबकळत होता. अजिंक्यने त्याचा हात उचलला आणि नाडीचे ठोके आजमवायला लागला. अजिंक्य आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे हे पाहून जॉर्ज रागावला आणि अजिंक्यच्या अंगावर धावून गेला. अजिंक्य खाली वाकलेला असला तरी हात उगारलेली सावली त्याने पाहीली आणि तो सरळ झाला. त्याने डावा हात वर केला आणि जॉर्जच्या हाताचा फटका आडवला. त्यावरून जॉर्जला अजिंक्यच्या ताकदीची कल्पना आली. काय करावे हे न कळून तो गप्प उभा राहीला.
तेवढ्यात नरेंद्र आला. त्याच्याबरोबर डॉक्टर होते. त्याने ओळख करून दिली, “अजिंक्य हे प्रसिध्द डॉक्टर,
डॉक्टर विधाते. यांचा पहिल्या मजल्यावर दवाखाना आहे.”
डॉक्टरांनी त्या मुलाला तपासले. “हा मुलगा गेलेला आहे. तुम्ही पोलिसांना बोलवा.”
जॉर्ज आणि कारंडे दोघेही गडबडले. “पोलीस कशाला?”
“याचा मृत्यू संशयास्पद वाटतो आहे.”
कारंडे आणि जॉर्ज बाहेर पोलिसांना फोन करायला गेले. तेव्हा अजिंक्यने त्यांना इंजेक्शनच्या सिरींज बद्दल सांगितले. डॉक्टर म्हणाले, “मलाही याला तपासल्यावर आश्चर्य वाटले. कारण याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे असे वाटते. तुम्ही म्हणता आहात त्यावरून जर याने हेरोईनचे इंजेक्शन सिरींजद्वारे घेतले असेल तर हृदय बंद पडून असा मृत्यू होऊ शकतो.”
“डॉक्टर जरा सविस्तर सांगू शकाल का?”
“हेरोईन घ्यायच्या अनेक पद्धती आहेत. ते स्मोकिंग करून घेऊ शकतात किंवा सुंघून, खाऊनही घेऊ शकतात. परंतु त्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो. त्याऐवजी पाण्यात मिसळून इंजेक्शन घेतले असता परिणाम लवकर जाणवतो. वेदना नाहीशा होतात. आणि शरीराला खूप प्रमाणात आराम मिळतो. म्हणून इंजेक्शन घेण्याचे प्रमाण जास्त असते.”
“मग हृदयविकाराच्या झटक्याने याला मृत्यू येण्याचे कारण काय?”
“हेरोईन घेतल्यामुळे शांत वाटते आणि थोडीशी झोप आल्यासारखे वाटते. पण जर हेच हेरोईन प्रमाणाबाहेर घेतले तर मनुष्य गाढ झोपी जातो आणि त्याचा श्वसनमार्ग बंद होतो. त्याचे शरीर श्वास घेण्यास विसरते. मग त्याचा मृत्यू होतो.”
“म्हणजे याने हेरोईनचा ओव्हरडोस घेतला आहे का?” नरेंद्रने विचारले.
“ती एक शक्यता मी तुम्हाला सांगितली. पूर्ण तपासणी केल्याशिवाय मी अधिकृत विधान करू शकत नाही.”
मधल्या वेळात अजिंक्य आणि नरेंद्रने फोनचा आवाज बंद करून ठेवला. बरेचदा दोघांनाही फोन येत असल्याची जाणीव होत होती. परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
पोलीस आल्यावर डॉक्टरांनी त्यांना आपल्याला वाटलेला संशय व्यक्त केला. पोलिसांनी कारंडेंकडून त्या मुलाची माहिती विचारून घेतली. कारंडेंनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलाचे नाव विकी लाल होते. तो जिममध्ये अधुनमधून येत असे. वर्कआऊट करण्यामधे त्याचे फारसे लक्ष नसे. आलेला इन्स्पेक्टर फारसा हुशार वाटत नव्हता. त्यात अजिंक्य आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व पाहिल्यावर त्याला आपल्या खुजेपणाची जाणीव झाली असावी. एकदोन वेळा अजिंक्यने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण इन्स्पेक्टरने त्यांना बाजुला बसून रहाण्यास सांगितले आणि तो कारंडेंशी बोलण्यात मग्न झाला.
“हे बघा. तुम्ही तिथे बसून रहा. माझे महत्वाचे काम झाले की मी तुमच्याशी बोलीन. तोपर्यंत इथून हालू नका.”
बऱ्याच वेळाने इन्स्पेक्टरने अजिंक्य आणि नरेंद्रला जुजबी प्रश्न विचारले. ते पुण्याचे आहेत म्हटल्यावर त्या दोघांची नावे, नंबर हवालदाराला लिहून घेण्यास सांगितले. हे सगळे झाल्यावर तिथून बाहेर पडेपर्यंत त्यांना तीन वाजले.
बाहेर आल्यावर नरेंद्रने प्रथम मोबाईल पाहीला. क्रांतीचे बरेच फोन येऊन गेले होते. सुहानी आणि विक्रमनेही बऱ्याच वेळा फोन केलेला होता. तो त्यांना फोन लावणार तेवढ्यात अजिंक्यने त्याला थांबवले.
“थांब नरेंद्र. फोन नको लावूस.”
“का रे?”
“ते बघ.” त्याने पाहीले, विक्रम आणि सुहानी त्यांच्या दिशेने येत होते.
“अरे, तुम्ही इथे कसे काय आलात?”
“आम्हाला क्रांतीने इथला पत्ता दिला. ती म्हणाली, ‘तिथे जाऊन दोघे जिवंत आहेत न ते बघून या’. अरे किती फोन करायचे तुम्हाला.”
अजिंक्यने कबुली दिली. “हो. पोलीस येणार म्हटल्यावर आम्ही फोन बंद करून ठेवला.”
“बरं आमच्यासाठी काय काम आहे?” सुहानीने विचारले.
“तुम्ही पबमधे जायचे आहे.” यावर नरेंद्र म्हणाला, “अजिंक्य आधी आपण जेवू या.”
“ठीक आहे. गाडी इथेच ठेऊन आपण जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. तुम्ही दोघे पण चला. जेवता जेवता मी तुम्हाला सांगतो काय करायचे आहे ते.”
“आमचे दोघांचेही जेवण झाले आहे. मी नुसता बरोबर येतो. पण सुहानी परत जेवू शकेल. ती कायम ह्पापलेलीच असते.”
नरेंद्र म्हणाला, “पबमधे जाऊन भांडू नका. तिथे तुम्हाला मित्र मैत्रीण म्हणून जायचे आहे.”
“नरेंद्र, तुझ्या लक्षात आले का, या सगळ्या गदारोळात जॉर्जकुठेतरी गायब झाला होता.”
“हो. तो पोलिसांसमोर आलाच नाही.”
“म्हणजे जिममधेच कुठेतरी पाणी नक्की मुरते आहे. मग यांनी पबमधे जायची गरज आहे का?”
“हो जायलाच पाहीजे. तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, जेव्हा आपल्यासमोर दोन शक्यता आहेत तेव्हा त्या दोन्ही पडताळून पाहील्या पाहिजेत.”
“क्रांतीने तुम्हाला प्रकरण काय आहे ते सांगितले का?”
“हो सांगितले. शिवाय आज काय काय झाले तेही सांगितले.” असे म्हणून विक्रमने क्रांती आणि वेदांतीने सांगितलेल्या सगळ्या घटनांची माहिती दिली. “अजिंक्य तिने तुम्हाला त्या दाराचा फोटोही पाठवलेला आहे.”
दोघांनी मोबाईलमध्ये बघितले. दारा एका माणसाला मारत असतानाचा एक फोटो होता. त्यात त्याचा चेहरा बाजूने दिसत असला तरी त्याच्या मजबूत शरीर यष्टीची कल्पना येत होती. दुसरा फोटो समोरून होता. यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यावरून त्याच्या क्रूर स्वभावाची कल्पना येत होती. समोरच्या माणसाला त्याने किती मारले असेल याचीही कल्पना येत होती. तो नक्कीच महिनाभर इस्पितळात पडून राहील असे अजिंक्यला वाटले. आपला सामना कशा प्रकारच्या माणसांशी आहे हे एव्हाना त्याने चांगलेच ओळखले होते. प्रतिस्पर्ध्याला कधी कमी लेखायचे नाही हे त्याने कायम मनाशी पक्के केल्यामुळे तो सावध राहून योग्य ती खबरदारी घेत असे.
चौघे जेवून बाहेर आले. सुहानी आणि विक्रम पबच्या दिशेने गेले.
नरेंद्र म्हणाला, “आपण काव्या बेकरीत जायचे का?”
“हो जाऊया. पण आधी आपल्याला गाडी घ्यायला परत त्या इमारतीत जायला लागेल.” असे म्हणून तो उजव्या दिशेला वळला. थोड्या अंतरावर त्याने एक रिक्षा थांबलेली पाहीली. रिक्षेत एक माणूस बसलेला होता. तो ओळखीचा आहे असे वाटून अजिंक्य थांबून पाहू लागला. त्या माणसाने कुणाला तरी खुण केली. कडेच्या दुकानातून एक माणूस येऊन रिक्षेत बसू लागला. अजिंक्यने ओळखले. तो जॉर्ज होता. रिक्षा सुरु झाली आणि त्यांच्या समोरून जाऊ लागली. आत आधीच बसलेला माणूस त्यांना ओझरता दिसला. तो दारा होता.
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users