द डेथ ट्रॅप भाग ९

Submitted by स्वाती पोतनीस on 27 July, 2019 - 07:48

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग ९
पल्लवी अग्निहोत्री या नावाची पाटी पाहील्यावर क्रांतीने त्या दारावरची घंटी वाजवली. एका मध्यम वयाच्या गृहस्थाने दाराची कडी काढली आणि दार किलकिले उघडले. क्रांतीने आपले विझीटींग कार्ड पुढे केले. कार्ड वाचल्यावर त्यांनी तिघांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले.
“काका, आम्ही आत येऊ का?”
“काय काम आहे?”
“तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे.”
“सांगा काय काम आहे?”
“इथून दारातून नाही बोलता येणार. आमचे पाच मिनिटांचे काम आहे. आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही.” अग्निहोत्रींनी सावधपणे इकडे तिकडे पाहीले. काही न बोलता ते बाजुला सरकले आणि तिघांना आत यायला वाट करून दिली.
“बसा.” मुलीच्या मृत्युच्या दुःखातून ते सावरलेले नाहीत हे स्पष्ट दिसत होते.
“तुम्ही माझ्या मुलीला ओळखत होता का?”
“नाही. आम्ही तिला प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतो. आम्ही तिच्याबद्दल फक्त ऐकले आहे.” अजिंक्य उत्तरला.
“कोणाकडून?”
“विवेक विद्वंस कडून. त्याची पत्नी वेदांती तुमच्या मुलीची जवळची मैत्रीण होती.” नकळत त्यांच्या डोळ्यात विचित्र भाव उमटले. तेवढ्यात आत जाणाऱ्या दारातून एक चेहरा बाहेर डोकावला.
“वृंदा, पाणी आणतेस का? पाहुणे आलेत.”
“हो आणते.” वृंदाताई पाणी घेऊन आल्या.
“ही पल्लवीची आई.” अग्निहोत्रींनी ओळख करून दिली.
“कुठून आलात तुम्ही?” वृंदाताईंनी विचारले.
“पुण्याहून.”
“हे बघ, त्यांनी कार्ड दिले आहे.” कार्ड पाहून वृंदाताईंनी आत जाणाऱ्या दरवाजाकडे पाहीले.
“आपल्या येण्याचे प्रयोजन कळले नाही.” अग्निहोत्री म्हणाले.
“काका आम्ही वेदांतीबद्दल विचारायला आलो आहोत.”
“काय विचारायचे आहे?”
“ती इथे कधी आली होती?”
“पल्लवी गेली त्या दिवशी संध्याकाळी.”
मधेच उठून वृंदाताई आत निघून गेल्या. ते जरा चमत्कारिक वाटले. पण कोणी त्यावर काही प्रतिक्रीया दिली नाही.
“त्यानंतर ती तुम्हाला भेटली होती का?” क्रांतीने विचारले.
“तुम्ही ही चौकशी का करत आहात?”
नरेंद्र म्हणाला, “काका आम्ही भलत्या वेळी आलो आहोत याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. पण एक प्रॉब्लेम झाला आहे.”
“कसला प्रॉब्लेम?”
“अजिंक्य तू सांग.”
“काका मी प्रथम आमची ओळख करून देतो. मी अजिंक्य पै आणि हे माझे सहकारी क्रांती आणि नरेंद्र. आम्ही खाजगी गुप्तहेर आहोत. विवेक अग्निहोत्री माझा मित्र आहे. त्याची पत्नी वेदांती बुधवारी मुंबईला आली होती. शुक्रवारपर्यंत ती विवेकच्या संपर्कात होती. पण शनिवारपासून तिच्याशी संपर्क होत नाही आहे. माझा मित्र खूप काळजीत आहे. आम्हाला वाटते आहे वेदांती कुठल्या तरी संकटात सापडली असावी. तिला शोधायची जबाबदारी आम्ही घेतली आहे.”
“अरे बाप रे. असे झाले आहे का? मी काय मदत करू शकतो तुमची?”
“म्हणजे आम्हाला असे सांगा की ती तुम्हाला शेवटची केव्हा भेटली होती? तिचा फोन आला होता का?”
तेवढ्यात वृंदाताई परत बाहेर येऊन बसल्या.
“वृंदा, हे वेदांतीला शोधायला आले आहेत. आपल्याला तिच्याबद्दल काय माहिती आहे ते विचारत आहेत.” अग्निहोत्रींनी पल्लवीच्या आईला नजरेने काहीतरी इशारा केला. त्यांनी होकारर्थी मान हलवली. आणि त्या म्हणाल्या, “तुम्ही प्लीज आत येता का?”
तिघेजण वृंदाताईंच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेले. आत एक मुलगी साडी नेसून स्वयंपाक करत होती. या लोकांची चाहूल लागल्यावर तिने मागे वळून पाहीले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती वेदांती होती.
.....
अजिंक्यने विवेकला फोन लावून वेदांतीच्या हातात दिला. “आधी विवेकशी बोल.” वेदांतीचा फोन होईपर्यंत सगळेजण आतील दुसऱ्या खोलीत जाऊन बसले. पाच मिनिटांनी वेदांती तिथे आली. “तुम्हाला एवढा त्रास दिल्याबद्दल मी तुमची माफी मागते.”
अजिंक्य म्हणाला, “हा काय प्रकार आहे ते आम्हाला सांगशील का?”
वेदांतीने सुरवातीपासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. नरेंद्र म्हणाला, “आम्ही आत्तापर्यंत इतक्या केसेस हाताळलेल्या आहेत पण एवढया थरारक घटनांचा अनुभव आम्हालाही कधी आला नाही.”
क्रांतीने विचारले, “मॉलमधून इथे कशी आलीस?”
“मला अशा ठिकाणी जायचे होते जिथे मी असेन असे त्यांना स्वप्नातही वाटणार नाही. मी त्या आजोबांच्या गाडीतून मॉलमधून बाहेर आले. मला वाटते मी त्याला चुकविले. त्यांच्या घरी पोहोचल्यावर मी रस्त्यावरच गाडीतून उतरले. मी रिक्षा थांबवत असताना एक बाईक आमच्याइथे येऊन थांबली. बाईकवर मागे बसलेल्या माणसाने माझी पर्स खेचली आणि ते पळून गेले. हे इतके क्षणार्धात घडले की आम्हाला भानावर यायलाच वेळ लागला. त्या आजोबांचा ड्रायव्हर त्यांच्या मागे पळत गेला पण ते केव्हाच पसार झाले होते. आजोबा म्हटले, ‘आपण पोलिसात तक्रार करू या पण मी नको म्हटले. त्यांच्याकडून थोडे पैसे घेऊन मी इथे आले.”
“पर्स मारणारे त्या लोकांचे साथीदार असतील का? काय वाटते तुला?”
“मला नाही तसे वाटत. कारण तो पाठलाग करणारा माणूस त्यानंतर मला दिसला नाही.”
“मग इथे आल्यावर तू घरी फोन का केला नाहीस?”
“इथे तर वेगळेच नाट्य झाले होते. माझ्यापेक्षा काकाच तुम्हाला नीट सांगू शकतील.”
अग्निहोत्री बोलू लागले, “पोलिसांनी प्रेत आमच्या ताब्यात दिल्यावर आम्ही लगेच क्रियाकर्म उरकले. त्या दिवशी आमच्या घरी बरेच नातलग होते त्यामुळे काही घडले नाही. परंतु जसा आमच्याकडचा शेवटचा नातलग बाहेर पडला त्या रात्री दोन गुंड आमच्या घरात घुसले. त्यांनी सगळे सामान अस्ताव्यस्त केले. आमचे मोबाईल उघडून ते बघत होते. आम्ही तर हताश होऊन फक्त बघत राहिलो. त्यांनी बेडरूममधली सगळी कपाटे उघडून पाहिली. त्यांना काही सापडले नाही. तसे त्यांनी आमचे मोबाईल्स फोडून टाकले. ते आम्हाला सारखे विचारत होते, ‘पल्लवीने आम्हाला काही सांगितले का?’ आम्ही त्यांना परत परत सांगत होतो की आम्हाला काहीच माहीत नाही तरी त्यांचा विश्वासच बसत नव्हता. माझा गळा पकडून ते मला सारखे विचारत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की खरंच आम्हाला काही माहित नाही आहे तेव्हा ते निघून गेले. जाताना आम्हाला बजावून गेले की आम्ही नवीन फोन घ्यायचा नाही, कुणालाही फोन करायचा नाही, ते आमच्यावर चोवीस तास नजर ठेवणार आहेत वगैरे. काल संध्याकाळी एकदा पोलीसही येऊन गेले. पण आम्ही त्यांना काहीच सांगितले नाही. कारण तसेही त्यांच्याकडून आम्हाला काही मदत होईल असे वाटत नाही.”
“तुम्हाला कोणी नजर ठेवताना आढळला का?” क्रांतीने विचारले.
वेदांतीनेच उत्तर दिले, “नाही, नजर तर कोणी ठेवत नाही आहे. मला खात्री आहे. पण काल त्यांचा एक माणूस परत येऊन काकांना धमकी देऊन गेला. पोलीस येऊन गेल्यानंतर तो आला होता.”
“काय धमकी दिली.” नरेंद्रने विचारले.
“आम्ही कोणालाही काही सांगायचे नाही. पोलिसात तक्रार करायची नाही. तसे झाले तर ते आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत अशी धमकी त्याने दिली.”
“त्यांनी वेदांती बद्दल काही विचारले नाही?”
“त्याने आत जाऊन पाहीले तेव्हा वेदांती घरकाम करत होती. ती इथे आल्यापासून अशाच कपड्यांमध्ये असल्यामुळे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने मग जास्त चौकशी केली नाही.”
अग्निहोत्रींनी पुढे सांगितले, “वेदांती इथे आली तेव्हा आम्हाला तिच्याकडून सर्व गोष्टी कळल्या. पल्लवीने आम्हाला याबाबत काहीच सांगितले नव्हते. आमच्या लक्षात आले वेदांतीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आम्ही तिला आमच्या घरात कामवालीच्या रुपात रहा असे सांगितले. तिच्या घरी कळवावेसे आम्हालाही वाटत होते परंतु कसे कळवायचे हेच आमच्या लक्षात येत नव्हते. तिने या प्रकरणापासून दूर रहावे यासाठी आम्ही वेदांतीला खूप समजवायचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्यास तयार नाही आहे. ती काल संध्याकाळी इथे आली. त्यानंतर तो माणूस लगेचच घरी आला होता. नशिबाने त्याच्या लक्षात आले नाही म्हणून बरे. ती घरात आहे तोपर्यंत आम्ही तीचे रक्षण करू शकतो. म्हणून आम्ही तिला आज कसेतरी घरात थोपवून धरले आहे. परंतु तिला या गुन्हेगारांना शोधून काढायचे आहे. तुम्हीच तिला समजावून सांगा.”
“या गुन्हेगारांना तर मी शोधून काढणारच आहे. त्यांनी माझ्या मैत्रिणीला मारले आहे. तिला न्याय तर मिळालच पाहिजे. पण इथून बाहेर पडल्याशिवाय मी काहीच काम करू शकणार नाही आहे.” वेदांती म्हणाली.
हे ऐकून अजिंक्य, क्रांती आणि नरेंद्र स्तब्ध झाले.
“वेदांती पल्लवीला न्याय तर मिळायलाच हवा. पण हे प्रकरण साधे नाही आहे. तुझ्या लक्षात येत आहे का हे किती खतरनाक गुंड आहेत.” क्रांती म्हणाली.
“मान्य. पण त्यांना घाबरून मी घरात नाही बसू शकत.”
“हे प्रकरण तू आमच्यावर सोपव. गोष्टी या थराला गेलेल्या असताना आम्हीही गप्प नाही बसू शकत.” नरेंद्र म्हणाला.
“नाही. मी यातून बाहेर पडणार नाही हे नक्की. मला माहीत आहे मला एकटीला हे काम करणे अवघड आहे. तुम्हीही माझ्याबरोबर काम करू शकता.”
“विवेक तुला काम करू देईल?”
“तो मला थांबवू शकत नाही.”
“अजिंक्य तू काहीच बोलत नाही आहेस.” क्रांती म्हणाली.
“मी विचार करत होतो. विवेक हीला काम करू दयायला तयार होणार नाही. आणि ही काही गप्प बसणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी मिळून हे काम केले तर विवेक तिला परवानगी देईल.”
वेदांतीने होकार दिला.
“आपण सुरुवात कुठून करायची?” क्रांतीने विचारले.
“आपण प्रत्येक गोष्टीची चर्चा करूनच पावले उचलूयात. अजिंक्य आपल्याला लीड करेल. त्याचा अनुभव सर्वात जास्त आहे.”
सगळ्यांनी याला मान्यता दिल्यावर अजिंक्यने सर्व सूत्र हातात घेतली आणि काही निर्णय भराभर घेतले. “प्रथम आपण वेदांतीचा फोन मिळवायचा प्रयत्न करू या. तो मिळण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.”
.....
वेदांती आणि अजिंक्य घरातून बाहेर पडले. ते इमारतीच्या बाहेर येऊन अजिंक्यच्या गाडीच्या दिशेने जायला लागले. वेदांती मधेच थांबली. अजिंक्यने तिच्या नजरेच्या दिशेने पाहीले. ती रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका माणसाकडे पहात होती.
अजिंक्यने विचारले, “काय झाले? कोणी ओळखीचा आहे का?”
“मला वाटते तो समोरचा माणूस माझा पाठलाग करतो आहे.” “वेदांती, त्या माणसाकडे न बघता पटकन गाडीत बस.” वेदांती गाडीत बसली आणि अजिंक्यने गाडी सुरु केली. त्या बरोबर तो माणूस बाईकवर बसला आणि त्यांचा पाठलाग करू लागला. त्याने स्वतःला लपविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
“आता सांग तू त्याला कुठे पाहीले होतेस?”
“त्याला मी मॉलमध्ये पाहीले होते. नंतर त्या आजोबांच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हाही तो असाच रस्त्याच्या पलीकडे बाईकवर बसलेला मी पाहीला होता. आत्ता मी त्याला तिसऱ्यांदा बघते आहे.”
“तो आत्ताही आपल्या गाडीच्या मागे आहे.”
दोघे पोलीस स्टेशनमध्ये गेले. एका पोलिसाने त्यांना एफ आय आर नोंदवायला सांगितली. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, “त्यांना काल संध्याकाळी जप्त केलेले मोबाईल दाखवा. आणि काल जे येऊन ओरडत होते त्या दोघांना कळवा त्यांचे फोन मिळालेत ते.” पोलिसाने टेबलाच्या खणातून काही मोबाईल्स काढून त्यांच्या समोर ठेवले. त्यात वेदांतीचा मोबाईल होता. परंतु पर्स काही मिळाली नाही. जरूर ते सर्व सोपस्कार झाल्यावर तिला मोबाईल ताब्यात मिळाला. दोघे पोलीस स्टेशनमधून बाहेर आले. समोर तो माणूस दिसत नव्हता.
वेदांती म्हणाली, “एवढया लवकर मोबाईल मिळेल अशी अपेक्षा नव्हती.”
“मोबाईल चोर बहुतेक पंधरा ते वीस वयातली मुले असतात. पोलीस त्यांना ओळखत असतात. बऱ्याच तक्रारी आल्या की त्या मुलांना पकडून आणतात. अशा वेळेस त्यांच्याकडचे सर्व मोबाईल्स जप्त करतात.”
“मग त्या मुलांना शिक्षा होते की नाही?”
“हे बघ तो वेगळा विषय आहे. आपण त्यात पडायला नको. आधी आपल्या कामाला लागूया. तीन तास आधीच वाया गेलेत.” असे म्हणून अजिंक्यने क्रांतीला फोन लावला आणि त्यांना जवळच्या रेस्टॉरंट मध्ये बोलावले. दोघांनी आधीच जाऊन एक टेबल बुक केले.
“वेदांती, तुझ्या जवळचा डाटा आहे की डिलीट केला आहे ते बघ.”
“आश्चर्य आहे.”
“काय झाले?”
“सर्व डाटा होता तसाच आहे. काहीही डिलीट केलेले नाही.”
“आश्चर्य तर खरेच.”
.....
अजिंक्य आणि वेदांती घरातून बाहेर पडले. नरेंद्र आणि क्रांतीही पाठोपाठ निघाले. नरेंद्रने आपले कार्ड अग्निहोत्रींना दिले, “काका आम्ही काही कामासाठी बाहेर जातो आहोत. या कार्डवर माझा नंबर आहे. कोणालाही एकतर दार उघडू नका. धोका वाटला तर लगेच आम्हाला फोन करा.”
दोघे खाली आले तेव्हा अजिंक्य गाडी सुरु करत होता. त्यांनी पाहीले एक माणूस लगेच गाडीवर बसून त्यांच्या मागे जायला लागला. “नरेंद्र तो माणूस बघ त्यांचा पाठलाग करतो आहे. आपली शंका खरी ठरली.” नरेंद्रने लगेच एक रिक्षा थांबवली. काही अंतर राखून ते त्या माणसाचा पाठलाग करू लागले. जेथून वेदांतीचा मोबाईल चोरीला गेला होता त्या विभागातल्या पोलीस ठाण्यापाशी अजिंक्यने गाडी थांबवली. तसे तो माणूसही काही अंतरावर थांबला. जसे ते दोघे पोलीस ठाण्यात गेले तो माणूस न थांबता पुढे जाऊ लागला. क्रांती आणि नरेंद्र त्याचा पाठलाग करू लागले.
“हा माणूस नक्की कुठे चालला आहे?”
“हा रस्ता तर पल्लवीच्या घराकडे जातो.”
पुढे चाललेला माणूस डावीकडे वळला आणि पोलीस चौकीपाशी जाऊन थांबला.
“ओहो. हा तर पोलिसांचा माणूस आहे. काय करूया?”
“आपण आत जाऊन भेटू.” क्रांती आणि नरेंद्र पोलीस चौकीत शिरले तेव्हा त्यांनी त्या माणसाला इन्स्पेक्टर कोठारे अशी पाटी असलेल्या केबिनमध्ये जाताना पहिले. नरेंद्रने विचारले, “इथे इन्स्पेक्टर कोण आहेत? आम्हाला त्यांना भेटायचे आहे.” असे म्हणून नरेंद्रने आपले कार्ड दिले. थोड्या वेळाने हवालदाराने त्यांना इंस्पेकटर कोठारेंना भेटण्यास सांगितले. नरेंद्रचे कार्ड बघितल्यावर इन्स्पेक्टरने विचारले, “काय करू शकतो मी तुमच्यासाठी.”
क्रांतीने सरळसरळ मुद्द्याला हात घातला, “सर, आत्ता तुमचा माणूस वेदांती विद्वंसचा पाठलाग करत होता.”
“आपले नाव काय म्हणालात मॅडम”
“क्रांती पंडीत.”
“तुम्ही पंडीत साहेबांची कन्या न?”
“होय.” हे म्हणताना तिचा चेहरा थोडा उतरला.
“काय झाले? मी पंडीत सरांचे नाव घेतल्यावर तुम्ही नाराज का झालात?”
“मी कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण केले की मला हा प्रश्न विचारला जातो. पण मी तुम्हाला आधीच सांगते की मी पुण्यात असते. माझे वडील मुंबईत असतात. माझ्या कुठल्याही कामात मी वडिलांची मदत घेत नाही. फक्त जिथे आमचे अधिकार कमी पडतात आणि पोलिसांचीच गरज असते त्यावेळेस फक्त आम्ही पोलिसांची मदत घेतो. बाकी सर्व केसेस मी स्वतः सोडवते.”
“अरे अरे तुम्ही तर नाराज झालात. मी तुमचे नाव ऐकले आहे म्हणून विचारले. तुम्ही आणि तुमचे सहकारी अजिंक्य यांचे नाव सर्वजण आदराने घेतात.” हे बोलणे ऐकल्यावर क्रांती थोडी नरमली.
“सॉरी. मी जरा जास्तच रीऍक्ट झाले.”
“इट्स ओ के. बरं तुम्ही आत्ता मला वेदांती विद्वंसबद्दल काहीतरी विचारत होतात. तुमचा यात काय सहभाग आहे हे मला कळले तर बरे होईल.”
क्रांतीने विवेक विद्वंस त्यांना भेटल्यापासून जे जे झाले ते सर्व सांगितले.
इन्स्पेक्टर म्हणाले, “पल्लवी अग्निहोत्रीची केस माझ्याकडेच आहे.”
“हो पण तो अपघात आहे असे सांगून तुम्ही केस बंद करून टाकलीत.”
“केस अजून बंद केलेली नाही. पण आम्ही उघड तपासही करू शकत नाही. यापूर्वी, तुम्हाला स्पष्टच सांगतो, यापूर्वीही ड्रग्जच्या केसेसमध्ये आमचा अनुभव आहे की वरून दबाव येतो आणि आम्ही पकडलेल्या लोकांना सोडून तरी द्यावे लागते किंवा जे पकडले जातात ती फक्त प्यादी असतात. खरे खिलाडी बाहेर मोकाट फिरत असतात. नवतेज ऍग्रो कंपनीवर आमचे पूर्वीपासून लक्ष आहे. परंतु आम्हाला कोणताही पुरावा मिळालेला नाही. पल्लवीचा मृत्यू हा संशयास्पदच होता. जेव्हा आम्हाला कळले ती या कंपनीत काम करत आहे तेव्हाच आमच्या लक्षात आले की तिला नक्की काहीतरी सापडले असणार.”

“पण सर, तुम्ही तिच्या वडिलांशी असे रुडली का वागलात? तिचे प्रकरण सरळ सरळ दाबून टाकायचा प्रयत्न केला गेला.”
क्रांतीच्या या बोलण्यावर इन्स्पेक्टर कोठारेंनी कोणतीही प्रतिक्रीया दर्शवली नाही. अशा प्रकारे लोकांकडून आरोप होण्याचे प्रसंग त्यांनी यापूर्वीही अनुभवले होते. ते शांतपणे म्हणाले, “त्याचे कारण आम्हाला काही संशय आला आहे हे आम्हाला दाखवून द्यायचे नव्हते. समजा ती काहीतरी शोधत होती ही बातमी बाहेर आली असती तर ते गुन्हेगार सावध झाले असते. पल्लवीच्या घरी आलेल्या सर्वांवर आम्ही नजर ठेऊन होतो. तिच्या घरी आम्हाला बैठकीच्या खोलीत असलेल्या कोलाजमध्ये मैत्रिणींचे फोटो दिसले. त्यात आम्ही वेदांतीचा फोटो पाहीला. जरी आम्ही प्रत्यक्ष जास्त चौकशी केली नाही तरी पल्लवीच्या घरच्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही बारकाईने चौकशी करत होतो. वेदांती पत्रकार आहे हे जेव्हा कळले तेव्हा आम्ही तिची हिस्टरी काढली. तिने केलेली कामे जेव्हा पाहीली तेव्हाच आमच्या लक्षात आले की ‘बाई गप्प बसणार नाहीत.’ आम्ही त्यांच्या घरी चौकशीला गेलो होतो तेव्हा त्या तिकडे वेषांतर करून घरकाम करत होत्या. तेव्हापासून आम्ही एक माणूस त्यांच्या संरक्षणासाठी नेमला.”
“ओह. आणि तिच्या फोनबद्दल काय? तो मिळवून देण्यातही तुमचाच हात होता का?”
“हो. तिचा फोन मारला गेला तेव्हा आमचा माणूस तिच्या मागावरच होता. ती त्या जोडप्याच्या गाडीतून बाहेर आली तेव्हाही तो तिच्या मागावर होता. त्यामुळे आम्ही लगेच मोबाईल चोरांना पकडून तो मोबाईल तिकडच्या पोलीस ठाण्यात पाठवून दिला.”
“म्हणजे त्यापूर्वी तुम्ही सर्व डाटा बघितला असणारच.”
“यापुढेही तुम्ही तिच्या मागे माणूस ठेवणार आहात का?”
“बघूया. कदाचीत संरक्षणासाठी ठेवूसुद्धा. गरज असेल तर.” एवढे बोलून दोघे तेथून बाहेर पडून अजिंक्यने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. अजिंक्य आणि वेदांती त्यांची वाटच पहात होते. त्यांनी घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या. आणि सगळे आता एका मोठ्या मिशनवर जाण्याच्या तयारीला लागले.
क्रमशः
हा भाग कदाचित तुम्हाला तेवढा आवडणार नाही. कारण आधीच्या भागांप्रमाणे यात ट्वीस्ट्स नाही आहेत. परंतु कथानक पुढे चालु राहण्याकरता आणि पुढील भागाशी त्याचा संबंध दाखविण्याकरता काही प्रसंग आणि संवाद घालणे आवश्यक होते. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा पुढचा भाग पण आला लगेचच. मस्त. कृपया कथा अर्धवट सोडू नका ही विनंती. पुलेशु.