कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:40

कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार

१९९६ मधली गोष्ट आहे. हिंदुस्तान सीबा गायगी कंपनीत निवड होऊन ट्रेनिंग साठी गोरेगावात (हे मुंबईचे एक उपनगर आहे) मुक्कामी होतो. ट्रेनिंग साठी संपूर्ण भारतातून निवडक ३० जण आले होते. त्यापैकी काही जण जरा ‘रसिक’ होते. त्यांना प्रत्यक्ष नाचणार्‍या ‘बार गर्ल’ असणारे डान्स बार बघायचे होते. ते म्हणायचे

“तू तो महाराष्ट्र का हैना, तेरेकु तो मालूमच होंगी सब बंबई?”

अशा प्रकारे वाटाण्याच्या झाडावर चढून मी फसलो व मी दोघा जणांना डान्स बार मध्ये घेऊन गेलो (त्यासाठी मी इकडून तिकडून माहिती काढली). पाच रुपयाची असलेली ‘थंप्स अप’ ह्या शीतपेयाची बाटली तिथे पन्नास रुपयाला होती. पण माझा खर्च ते ‘शौकीन’ मित्रच करणार होते. त्यामुळे ‘थंप्स अप’च्या एका बाटलीसोबत दोन प्लेट चकणा खाऊन मी गम्मत बघत राहिलो. त्यावेळेस बियरची एक बाटली दीडशेला लावत असावेत असे आठवते. बाहेर पन्नासाला मिळत असावी (अशी भाषा वापरण्याचे कारण असे की मी पित नाही हे तुम्हाला कळावे).

भडक मेकअप व पेहराव केलेल्या तरुण नर्तकी समोरच्या मंचावर वेगवेगळ्या सेक्सी गाण्यांवर ठेका धरत होत्या. खरे तर त्यांचे हावभाव कुठल्याही अर्थाने नृत्य वगैरे म्हणण्याच्या लायकीचे नव्हते. चाळे म्हणता येईल कदाचित. डिस्को प्रकाश योजना केलेली होती. एखाद्या ग्राहकाने (पिणार्‍याने) दहाची नोट वर केली की (ती बरोबर दोन बोटाच्या चिमटीत धरीत) लागलीच एखादी नर्तकी मंचावरून उतरून लचकत मुरडत जाऊन त्याच्या कानाशी लागायची. नोट सरकवुन तो गाण्याची फर्माईश करायचा. ते गाणे थोडा वेळ वाजते न वाजते तोच दूसरा कुणीतरी दहाची नोट सरकवुन स्वतःची फर्माईश करायचा. लगेच गाणे बदलायचे. मी काही एक खडकु खर्च केला नाही. मला त्या डान्स बारची काही विशेष मजा पण वाटली नाही.

असे रात्री अकरापर्यंत बघून झाल्यावर आम्ही सेंटरला पोचलो. दुसर्‍या दिवशी माझी किर्ति पसरली. मला मुंबईचे सगळे डान्स बार माहिती आहेत अशा अर्थाने! खरे तर मी सुद्धा करमणुकीचा हा प्रकार पहिल्यांदाच बघितला होता. मी ह्याचे ‘नोटा फेको, तमाशा देखो’ असे वर्णन करीन.
दुसर्‍या रविवारी परत दोन प्रशीक्षनार्थिंनी मला जबरदस्तीने ‘कोल्ड ड्रिंक पाजतो, तुझा खर्च आम्ही करतो’ ह्या सबबीवर डान्स बारला न्यायला मजबूर केले. आज मात्र माझ्यासोबत हिमाचलचा एक मुलगा होता. तो बियर वर बियर रिचवायला लागला. नाचणार्‍या मुलींना पुन्हा पुन्हा बोलावून दहाची सरकवू लागला. त्याला एक मुलगी विशेष आवडल्याचे दिसत होते.

‘ए ऐसेही झुमते रहेंगी क्या?’

ह्या पहिल्या प्रश्न पासून त्याची मजल

‘ए मेरे साथ आएंगी क्या?’

ह्या प्रश्नापर्यन्त गेली. मोहमयी दुनियेत तो हरवुन गेला. तिच्या मादक (खरे तर भडक) सौंदर्याने त्याच्यावर मोहिनी घातली होती. त्याच्या दृष्टीने पैसे आता ‘मूल्यहीन’ झाले होते. नाचणार्‍या सुंदरीने त्याला आपल्या मोहपाशात गुंडाळले होते. त्याने तिला ‘दूसरा’ प्रश्न आणि तिचे नाव विचारून घेतले. ‘डॉली’. बस्स. थोड्या वेळानंतर बियर बार बंद झाल्यावर मागील दाराने जाऊन तो तिला भेटणार होता. ठरले तर!!

आता मी एकटाच शुद्धीवर होतो. फुकटच्या कोल्ड ड्रिंक आणि चकण्याला जागत होतो! रात्रीचे अकरा वाजून गेले होते. डान्स बारच्या दारवानाने सल्युट मारताच आमच्या मित्राने त्याला पन्नाशी सरकवली. नर्तकीच्या नावाची त्याने दारवानाकडून खात्री करून घेतली. दारवान हसला. सगळे ओके असल्याचा त्याने इशारा दिला. मला मात्र त्याच्या नजरेत कपट स्पष्ट दिसले. मी माझ्या मित्राची कंबरेची पैशाची बॅग काढून माझ्या कंबरेला घट्ट बांधली. एक टॅक्सी पकडून ठेवली. त्याचा मात्र डॉलीला भेटण्याचा अट्टाहास होता. मी बियर बारच्या मागील दरवाज्यापर्यन्त त्याच्या सोबत गेलो. त्याला म्हटले तिला भेटून ये. दगा फटका झाला तर धावत बाहेर ये. आम्ही बाहेर वाट बघतो (पळायला सोपे)!

तो एकटाच आत गेला. पोटात ‘औषध’ असल्यामुळे त्याला जगातील कशा कशाची भीती नव्हतीच. केवळ पाचच मिनिटात तो धडपडत बाहेर आला. त्याला आतमध्ये आडदांड तरुणांनी चांगलाच बुकलून काढला (त्यांना बाऊन्सर म्हणतात हे अनेक वर्षांनी कळले).

‘डॉलीने मुझे धोका दिया. शी चिट मी’

असे तो बरळत होता. आम्ही दोघांनी त्याला फरफटत नेऊन टॅक्सीत घातले आणि टॅक्सी पळवली. तो असंच काहीबाही बरळत राहिला. त्याचा ‘हार्ट ब्रेक’ झाला होता. मी हदरलो होतो. पण अंतर्मनात कुठेतरी मंद स्मित चमकत होते. अनुभव केवळ थोडक्या प्रसादात आटोपला होता. विशेष म्हणजे सर्वांचे उरलेले पैसे माझ्याजवळ सुरक्षित होते.

त्यानंतर मी कानाला खडा लावला. कुणी मला कितीही कोल्ड ड्रिंक पाजायचे आणि अनलिमिटेड चकणा खाऊ घालायचे आमिष दिले तरी मी डान्स बारची पायरी चढलो नाही!!
(अप्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी आहे अनुभव, लिखाणातला प्रामाणिकपणा आवडला.
तुम्ही सुदैवी आहात. मी मित्रांसोबत जायचो आणि ते जेव्हा 'प्यायचे' तेव्हा मी दोन दोन ज्युस प्यायचो तर मला माझे मित्र खूप खर्च करतोस म्हणून ओरडायचे Proud

छान वर्णन केले आहे. मलाही मुंबईतील एका नातेवाईकाने चलण्याचा आग्रह केला होता. पण मी देशीप्रेमी असल्याने गेलो नाही. पुढे तो नातेवाईक कर्जात इतका बुडाला की अजूनही बेकार परिस्थिती मध्ये जीवन जगतोय. मी फार कंजूस माणूस असल्याने मला दारू प्यायला कंपनी लागत नव्हती.

माणसाला चांगल्या वाईट सर्व गोष्टीचा अनुभव असावा असा विचार करणारा मी असल्या मुळे
मी पण २/३ वेळा गेलो आहे .
पण त्यात काय एन्जॉय आहे असे तर मला वाटलं नाही .
फुकट पैशाचा अपव्यय आहे

मिसळपाववर मागे एका लेखकाने स्वत:चे डांबा चे अनुभव लिहीले होते. लाखोंनी पैसे उडवले हेही सांगितले होते.

ठिकय अनुभव.

> (अशी भाषा वापरण्याचे कारण असे की मी पित नाही हे तुम्हाला कळावे). > इथे भरपूर सोशल ड्रिंकर्स आहेत. त्यामुळे पित असला तरी तुम्हाला कोणी वाईट, वाया गेलेला समजणार नाही. आणि पित नाही म्हणून फार ब्राऊनी पॉइंट्स मिळतील असेही नाही.

> पण चुकून इथे अपलोड केला. पण कसा डिलीट करायचा ते माहीत नाही. > असुदेत लेख. डिलीट करण्यासारखं काही नाही त्यात. पुढचे भागपण टाका.

शेवटचा हाणामारीचा भाग काल्पनिक वाटतो. मित्रांसोबत मी २००० पासून अनेकदा गेलोय तिथे. पण कधीही कुणाला असा अनुभव आल्याचे ऐकण्यात नाही. हो बाउन्सर असतात तिथे. पण जगाच्या पाठीवर सर्वच डाबा मध्ये ते असतात. कोणी ग्राहकांने आगाऊपणा केला कि त्याला बाहेर काढणे (वेळप्रसंगी माफक प्रसाद देऊन) इतकेच काम असते त्यांचे. चांगला पैसेवाला ग्राहक असेल तर त्याने पुन्हा यावे वाटते त्यांना. त्याला कशाला मारतील? बारबालेला बाहेर भेटण्यासाठी विचारणे हे सुध्दा खूप कॉमन आहे. ग्राहक नेहमी येत असेल व त्याच्याबरोबर ती कम्फर्ट असेल तरच ती तयार होते अन्यथा नाही. रिस्क तिला जास्त असते हे लक्षात घ्या.

परिचित योग्य सांगितलेत. पण घटना घडली ही खरी की मिठमिरची लावून लावून लिहिण्याचं स्वातंत्र्य लेखकाला मिळाले पाहिजे व तो जे सांगतोय त्याच्यावर वाचकांनी विश्वास ठेवला पाहिजे असे मला वाटते.