परत ये चिऊताई

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 00:49

परत ये चिऊताई

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
मोबाईलच्या लहरींना तू फसलीस का?

मोबाईलच्या लहरींनी दुखते का गं तुझे डोके?
आमच्याच तंत्रज्ञानाचे कळेना आम्हाला धोके!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
खाऊ तुझा तू हरवून बसलीस का?

खाऊसाठी गरज मुळी नव्हतीच तुझी मोठी
धान्याचे दाणे, अळ्या आणि उष्टी खरकटी!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
घरटे तुझे तू हरवून बसलीस का?

घरट्यासाठी गरज मुळी नव्हतीच तुझी मोठी
फोटोची फ्रेम, छोटासा कोनाडा वा भिंतीतल्या फटी!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
नजरेआड दूर दडून तू बसलीस का?

जगण्यासाठी गरज मुळी नव्हतीच तुझी मोठी
आम्ही संपवला तुझा अधिवास खोट्या प्रगतीसाठी!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
काऊदादाच्या भूलथापांना तू फसलीस का?

क्रूरकर्मा, खुनशी, मेला कावळा आहे खरा दादा
घरट्यातल्या पिल्लाचा तुझ्या घास घेतो सदा!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
पोट स्वतःचे बिघडवून तू बसलीस का?

बाग बगीचे आणि धान्यावर घातलेय आम्ही जहर
तुझ्या पुनरागमणासाठी आता झुरतंय सारं शहर!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
चिऊ-काऊचे गाणे ऐकून तू हसलीस का?

चिऊताई चिऊताई येशील का गं तू परत
देऊ तुला दाणे, पाणी आणि घरटे तुझे परत!

(पूर्वप्रसिद्धी: आपलं पर्यावरण, फेब्रुवारी २०१५).

Group content visibility: 
Public - accessible to all site users