युगांतर- आरंभ अंताचा भाग ९

Submitted by मी मधुरा on 24 July, 2019 - 05:24

हस्तिनापुराच्या महालात युवराज देवव्रत चिंताग्रस्त होऊन फेऱ्या घालत होते. महाराजांची प्रकृती गेल्या सप्ताहात बरीच खालावली होती. वैद्यांनीही हात टेकले होते. तरीही राजवैद्य सतत प्रयत्न करत होते. महाराजांची प्रकृती अशी खंगावत चाललेली पाहत रहाणे आता देवव्रतसाठी कठीण झाले होते. माताश्री आणि पिताश्री यांचे प्रेम कधी एकत्र लाभलेच नाही. माताश्री तर पित्याची सेवा करण्याचा आदेश देउन निघून गेल्या आणि पिताश्रींची तब्येत अशी! आपण वैद्यकशास्त्र अवगत केले असते तर आज ही वेळच आली नसती. तत क्षणी बाकी सर्व विद्या देवव्रतला व्यर्थ वाटत होत्या.
राजवैद्य महाराजांच्या कक्षातून बाहेर आले. देवव्रतला पाहून त्याने नमन केले, " युवराज, महराज शंतनू औषधांना प्रतिसादच देत नाहीत. "
" राजवैद्य, तुमच्यावर धन्वंतरीचा वरदहस्त आहे असे मानतात. तुम्ही असे हार मानून कसे चालेल?"
"युवराज, अभय मिळाले तर...." राजवैद्य म्हणाले, तसा देवव्रत हादरला.
"काय झालय महाराजांना?" वैद्य काहीच बोलेनात.
वैद्य कुठल्यातरी असाध्य दुर्धर रोगाचे नाव घेणार की काय अशी भिती मनात डोकावत होती.
मन खंबीर करत त्याने वैद्याला विचारले, "दिले अभय! बोलावे."
" महाराजांचा हा आजार शारीरिक वाटत नाही, युवराज. मानसिकरित्या त्यांनी जगण्याची आशा सोडल्या सारखे भासते. मनाची उलघालच त्यांच्या या अवस्थेचे कारण आहे."
जगण्याची आशा सोडली? महाराज शंतनू यांनी? पत्नी विरह, पुत्र वियोग सहन करत ज्याने या हस्तिनापुरसाठी आयुष्य सत्कारणी लावले..... त्यानी? का? असे काय झाले?
देवव्रताने शंतनूच्या कक्षात प्रवेश केला. शंतनू खिडकीकडे नजर लाऊन शय्येवर पडला होता. डोळ्यांखाली काळे अर्धगोल, निस्तेज चेहरा, गादीवर खिळून पडलेला देह! देवव्रत शंतनूच्या पायशी बसला.
" देवव्रत! "
"महाराज"
"काय झालय तुला देवव्रता?"
"काही नाही...."
"पिताश्री न म्हणता महाराज म्हणालास... नक्की काहीतरी बिघडलेले आहे.आणि तुला किती वेळा सांगितले मी! असा पायाशी बसत जाऊ नकोस. तुझं स्थान माझ्या राजगादीवर आहे. माझ्या हृदयात आहे."
"मग मला तुमच्या हृदयातील पिडेवर सुद्धा अधिकार आहे पिताश्री!"
" देवव्रत? " शंतनूच्या चेहऱ्यावर मनावर आलेल्या तणावाची झलक दिसली.
"कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला आतून त्रास देतेय ?"
शंतनूने काहीही उत्तर न देता दुसरी कडे नजर फिरवली.
"तुम्हाला होणाऱ्या त्रासाचे कारण मी आहे का पिताश्री?" दु:खी होत देवव्रत ने विचारले.
"नाही देवव्रत! तु नाहीस. तु कधी कोणाच्या पिडेचे कारण असूच शकत नाहीस!" शय्येवर उठून बसत शंतनू म्हणाला, "आपल्या इच्छा असतात या पिडांचे बिज."
"आपली कोणती इच्छा अपूर्ण आहे जी पूर्ण करणे शक्य नाहीये असे वाटते?"
"काही इच्छा पूर्ण न करण्यात सर्वांचे हित असते देवव्रता! तू जा. तुझा राज्याभिषेक करण्याचा मुहूर्त केवळ काही मास दूर आहे. माझ्या या अश्या अवस्थेमुळे राज्याभिषेकाच्या तयारीची जबाबदारी तुझ्यावरच आहे. हस्तिनापुरात धर्म आणि न्यायाचे राज्य टिकून राहावे ही माझी परमइच्छा आहे."
देवव्रताने नमन करून महाराजांचा कक्ष सोडला. त्याला मनोमन ठाऊक होते की महराजांची खरी इच्छा त्यांनी व्यक्त केलेलीच नव्हती. काय झाले असावे? महाराज वनविहार करायला, नदी कठी जायचे हे त्याला ठाऊक होते. त्याने दास दासींना, काही नगर वासीयांना विचारणा केली.
"महाराज योजनगंधेसोबत नौकाविहार करायचे." दासाने सांगितले.
"त्यांना तिने प्रेमपाशात बांधले होते असही ऐकलय आम्ही युवराज! " एक नगरवासी घाबरत घाबरत म्हणाला.
" महाराजांनी तिला विवाह प्रस्तावही दिला होता." दुसऱ्यानेही चोच उघडली.
" आणि ती सरळ नाही म्हणाली." मगाशी घाबरणाऱ्याने आता तक्रारीचा सुर लावला होता, " काय समजते स्वतःला काय माहिती?"
" कुठे असतात योजनगंधा?" देवव्रतने शांतपणे विचारले.

देवव्रतने श्वेतघोडा लगाम खेचून नगरीच्या सीमेजवळच्या वस्तीत थांबवला. मासेमारांच्या वस्तीत सर्वत्र दुर्गंध पसरला होता. देवव्रतने वाटसरूंना योजनगंधेचा ठाव ठिकाणा विचारला तसे ते चक्रावले.
" ते गंधवती बद्दल बोलतायत का? "
"ती? निषादची कन्या?"
एकमेकांमध्ये कुजबुजत त्या लोकांनी कडेच्या कुटीकडे बोट दाखवले.
कुटीच्या जवळपास पसरलेला मंद सुंगंध! देवव्रत कुटी बाहेर उभा राहिला.
" देवी सत्यवती?"
" कोण ? "
आतून पुरुषाचा आवाज आला.
"देवव्रत !"
" देवव्रत?"
" हस्तिनापुर युवराज."
निषाद बाहेर आला. नमन करून देवव्रतला कुटीत बसण्याची विनंती केली.
समोर योजनगंधा बसली होती. तिने उठून पाणी आणून दिले.
" देवी, माझ्या पिताश्रींना तुमच्याशी विवाह करायची इच्छा आहे. तुमच्या करिता मी याचना घेऊन आलोय. हस्तिनापुरची महाराणी बनून तुम्ही आम्हाला कृतकृत्त्य करावत."

हात जोडून देवव्रत म्हणाला.
योजनगंधा व्यथित होऊन पित्या कडे पाहू लागली. निषाद ने तिला मागे येण्याची खूण केली.
"माफ करावं युवराज. पण महाराणी म्हणून ती कशी येऊ शकेल?"
" का नाही महोदय? महाराजांची पत्नी बनतील त्या. महाराणी म्हणून त्यांना उचित सन्मान देण्याचे वचन देतो मी."
" तुमच मन मोठ्ठे आहे युवराज! पण महाराणी तोवरच जोवर महाराज आहेत. त्यांच्या पश्चात काय स्थान असेल तिचे?"
"महोदय!"
"क्षमा! पण हे सत्य नाही का? महाराजांनंतर तुम्ही त्यांची जागा घ्याल. सावत्रतेचा अनुभव तिला यायला नको, म्हणून मी तिला आई सुद्धा आणली नाही."
" मी त्यांना कधीही सावत्रपणा जाणवून देणार नाही महोदय. त्यांची तीच प्रतिष्ठा कायम राहील." तिच्याकडे पाहत देवव्रत म्हणाला, "चला देवी! महाराज आपल्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची तब्येत विरहाने खालावते आहे."
ती पाऊल पुढे टाकणार तितक्यात निषाद म्हणाला, " आणि यांना पुत्र झाल्यावर त्यांचे काय भविष्य असेल युवराज?"
" त्यांनाही कधी सावत्रता जाणवणार नाही महोदय."
" सावत्रता नसेल, परंतु त्यांच्या भाग्यात महाराणी आईच्या पोटी जन्म असूनही स्वतः राजा बनणे नसेलच! तुम्ही महाराज बनल्यावर वारसाहक्काने तुमची गादी तुमच्या आपत्याला मिळणार. माझ्या नातवांची ओळख केवळ राजाचे दास म्हणून होईल. मी हेच माझ्या कन्येलाही समजावले होते, युवराज; आणि तुमच्या पित्यांनाही! त्यांनी तेव्हाच हे स्पष्ट केले, कि देवव्रतचा अधिकार ते इतर कोणालाही देणार नाहीत."
"पण मी अधिकार अस्विकार करु शकतो ना महोदय?" देवव्रत म्हणाला तसे दोघे हादरले. आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
"मी.... गंगापुत्र, गौरांग, हस्तिनापुर युवराज देवव्रत प्रतिज्ञा घेतो.... मी आजन्म ब्राम्हचर्य पाळत निसंतान राहिन. मी हस्तिनापुरच्या सिंहासनाचा अधिकारी नाही तर दास म्हणून राहिन."
वाक्य संपते न संपते तोच विजा कडाडू लागल्या. धरणी कंपित झाल्यासारखी भासू लागली. वाऱ्याने जोर जोरात घोंगावत कुटिच्या खिडकीची तावदाने गजांवर आपटून दिली. आभाळ भर दुपारी काळवंडले.
दारं उघडून ढापा टाकत शंतनू आत पोचला.
" पिताश्री? "

" हे काय केलस देवव्रता? का केलस? याचीच भिती होती मला!" शेजारच्या तुटक्या आसनावर शरीर सोडून देत शंतनू आसवं गाळत राहिला. "दासांनी मला सांगितले आणि तत्काळ प्रस्थान केले.... पण तूं.... ही कसली भीषण प्रतिज्ञा घेतलीस? अरे वर्तमाना साठी भविष्यकाळाचा त्याग नाही करत कोणी !" शंतनूने एकदा रागाने निषाद आणि योजनगंधे कडे नजर टाकली. त्यांनी माना खाली घातल्या होत्या.
शंतनूला नमस्कार करत देवव्रत म्हणाला," पिताश्री, आपण आत्मक्लेश करु नये. हे माझे कर्तव्य होते."
शंतनू देवव्रताकडे बघतच राहिला.
"कुठून आणतोस हे सामर्थ्य? राज्यत्याग आणि सोबत ही अशी प्रतिज्ञा? नाही युवराज! हा त्याग करण्याइतकी तुझी क्षमता असेलही, पण तो स्विकारण्याचे बळ माझ्यात नाही. मागे घे शब्द!"
"पिताश्री, वेळ, प्राण आणि शब्द कधी परतवता येत नाही. आणि मी तसे करणारही नाही. पिताश्री, तुमच्या आनंदासाठी मी प्राणत्यागही करु शकतो."
शंतनूला भरून आले. पुरुने ययाति साठी केलेल्या तारुण्याच्या त्यागाची आठवण त्याला होत होती. पित्याच्या मोह-वासनेने मिळालेला शाप हा पुरुवंशात त्यांच्याच आपत्यांना भोगावा लागत असावा. योजनगंधा हा आपल्याला मिळालेला आधार की पुत्राच्या नशिबी शापरुपी लागलेले ग्रहण? शंतनू संभ्रमित झाला.
देवव्रताने प्रेम, सुख, राज्य या सर्व अधिकारांवर पाणी सोडले होते. स्वयंवरात देवव्रत यावा म्हणून देवाला गाऱ्हाणी घालणाऱ्या राजकन्यांचे स्वप्न धुळीस मिळणार होते. हस्तिनापूर त्यांचा प्रिय युवराज आता राजा बनू शकणार नाही म्हणून हताश होणार होता. ते ही केवळ देवव्रतच्या पित्याच्या आनंदाकरिता!
"तु खरचं महान आहेस, देवव्रत. न भुतो न भविष्यति ! माझे भाग्य आहे कि तुझ्यासारखा पुत्र मिळाला मला. तुझ्या या भीषण प्रतिज्ञेमुळे तुला आजपासून भीष्म नावाने पुकारतील सर्वजण! माग. तुला हवे ते माग!"
देवव्रताने हात जोडले, " हस्तिनापुरात धर्म आणि न्यायाचे राज्य मला माझ्या डोळ्यांनी बघायचे आहे पिताश्री!"
शंतनूच्या डोळ्यांत पाणी आले. पुत्राभिमान, दु:ख, आनंद.... सर्व काही भाव त्यात दाटून आले होते. " तुला ज्या व्यक्तीकडून, ज्यावेळी मृत्यू हवाय त्याच्याच कडून तुला मृत्युप्राप्ती होईल. मी तुला इच्छामृत्यू चे वरदान देतोय भीष्म!"
धरेची कंपने थांबली होती. वाऱ्याचा वेग मंदावला. आभाळ स्वच्छ झाले आणि रथावर स्वार होऊन योजनगंधेसोबत शंतनू ने महालाची वाट धरली. मागून भीष्माचार्यांचा श्वेत घोडा दौडत होता.

©मधुरा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users