पडका वाडा

Submitted by स्वाती पोतनीस on 20 July, 2019 - 09:14

स्वाती पोतनीस
पडका वाडा
..१..
बोगीतले सगळे दिवे बंद केलेले होते. प्रवाशांचे इकडे तिकडे फिरणेही बंद झाले होते. रेल्वे एका लयीत धावत होती. धावताना होणारा खडखडाट कानाला सवयीचा झाल्याप्रमाणे प्रवासी आत झोपलेले होते. मोनिकाला मात्र झोप येत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर सतत तो सांगाडा येत होता. त्या वाडयालाच एकूण भयाण कळा आलेली होती. आत शिरत असतानाच एक उग्र दर्प नाकात शिरत होता. वाड्याची दारे, वासेच तेवढे चांगल्या स्थितीत होते. शिसवीच्या लाकडाला अजूनही वाळवी लागलेली नव्हती. पण भिंती मात्र पहिल्यासारख्या राहिल्या नव्हत्या. छताची माती जागोजागी पडून लाकडाचे वासे तेवढे दिसत होते. वरच्या मजल्यावर जाताना जिना करकर आवाज करत होता. वाड्याच्या बाहेरच्या भिंतींचे दगड लोकांनी पळवल्यामुले दाराचा वापर करण्याची गरजच नव्हती. वर्षानुवर्षे कोणीच तिथे रहात नसल्यामुळे जेवढे पळवण्यासारखे होते तेवढे लोकांनी पळवले होते. दिवाणखाण्यातील बैठक, कपाटे, स्वयंपाकघरातील भांडी काहीही राहिले नव्हते. हे कमी म्हणूनच की काय कोणीतरी वरच्या मजल्यावरही गेले होते आणि गावभर बोभाटा झाला. एक भिंतीच्या कोनाड्यातून अर्धवट एक सांगाडा दिसत होता. माणसे तिथे जायला घाबरत होती. सांगाडा बाहेर काढण्यासाठी पोलिसांना भिंत पडणे आवश्यक होते. कोणाच्या लक्षातही येणार नाही इतक्या बेमालूमपणे भिंतीत पोकळ जागा ठेवण्यात आलेली होती. कोनाड्यातल्या तळातल्या कप्प्याची पाठीमागची फळी काढल्यानंतर आतील पोकळ जागा दिसून येत होती. पण आत मात्र दिव्याची सोय नव्हती. पोलिसांनी श्रीरामला फोन करून बोलावले होते.
बरेच वर्षांनी श्रीराम गावाला चालला होता. त्याच्या वडिलांना जाऊनही वीस वर्षे लोटली होती. सात-आठ वर्षांचा असल्यापासून श्रीराम मुंबईला शिकायला आला. वडिलांच्या निधनानंतर एकदा तो गावाला गेला होता. मोनिकाच्या आठवणीत त्यांच्या लग्नानंतर एकदा त्याला गावाकडून बोलवणे आले होते. परंतु तेव्हा तो एकटाच गेला होता. गावाला जाण्याचा तिचा हा पहिलाच प्रसंग होता.
श्रीरामचे जवळचे नातेवाईक एकच म्हणजे त्याचे मामा. तेही मुंबईतच राहायला होते. त्यांनाच श्रीरामच्या वडिलांनी ट्रस्टी नेमले होते. सर्व पैसे मुंबईच्याच बँकेत असल्यामुळे मामांना व्यवहार बघणे सोयीचे जात होते. बहिणीच्या छंदीफंदी नवऱ्याबद्दल त्यांना फारसे प्रेम नव्हते आणि बहिणीच्या अचानक नाहीसे होण्याने तर उरलासुरला स्नेहसंबंधही संपुष्टात आला होता. असे असूनही श्रीरामच्या कल्याणासाठी त्याच्या वडिलांनी मामांवर पूर्ण विश्वास टाकला होता आणि त्याला कायमचे त्यांच्या ताब्यात सोपविले होते. श्रीरामच्या आईच्या जाण्यानंतर ते एकटेच वाड्यात रहात होते. आपल्या व्यसनात ते इतके बुडाले होते की आपल्या मुलाची भेट घेणे दूरच त्याची ख्याली खुशालीही त्यांनी कधी विचारली नाही. श्रीरामलाही त्यांची कधी आठवण येत नसे. मोनिकाने खोदून खोदून विचारल्यानंतर त्याने तिला आपल्या घरातल्यांबद्दल थोडेफार सांगितले होते. त्यावरून वडिलांबद्दल तिरस्कार आणि आईबद्दलचे प्रेम मात्र तिच्या लक्षात आले होते. तो स्वभावाने थोडासा एकलकोंडा व मितभाषी होता. त्याला जवळचा असा एकच मित्र होता, अशोक. तिने अशोककडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही श्रीरामच्या घराण्याबद्दल काहीही माहिती नव्हती. मामांशिवाय श्रीरामचे कोणतेही नातेवाईक त्याने कधी पहिले नव्हते.
आज सकाळी वाड्यासमोर गेल्यावर श्रीरामच्या चेहऱ्यावर क्षणभर विचित्र भाव आलेले मोनिकाच्या लक्षात आले. डोळ्यात कठोरपणा दिसत होता. पण क्षणभरच. पुढच्याच क्षणी निर्विकारपणे तो वाड्यात गेला. इन्स्पेक्टरसाहेबांबरोबर ते दोघे वरच्या मजल्यावर गेले. विजेरीच्या उजेडात तो सांगाडा पाहून त्याने पोलिसांना भिंत पाडायची परवानगी दिली. आणि दोघेही हॉटेलवर गेले. दुपारी जेवण झाल्यावर त्याला इस्पितळात बोलावण्यात आले. प्रेतागरात जाताना एक प्रकारचे दडपण तिच्या मनावर आले होते. पण श्रीराम मात्र निर्विकार होता. अगदी सहजपणे त्याने तो सांगाडा बघितला आणि पोलिसांबरोबर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आले. प्रेताची ओळख पटविण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ उपचार म्हणूनच पोलिसांनी त्याला तो सांगाडा दाखविला होता.
आत गेल्यावर सकाळचेच इन्स्पेक्टर त्याला भेटले. त्यांनी दोघांचे स्वागत केले. “श्रीरामसाहेब हा सांगाडा कोणाचा असावा वगैरे मी तुम्हाला विचारणार नाही. कारण तो सुमारे २५-३० वर्षे जुना असावा. त्यामुळे ओळख पटणे शक्य नाही. पण आम्हाला प्रेतावर काही दागिने मिळाले आहेत. त्यावरून तुम्ही काही ओळखू शकलात तर ठीक नाहीतर आम्हाला फाईल बंदच करावी लागणार आहे.” त्यांनी एका पिशवीतून दागिने काढून टेबलवर ठेवले.
श्रीराम बारकाईने बांगड्या, मंगळसूत्र, हार वगैरे हातात घेऊन बघत होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी चमकले. इन्स्पेक्टर काय विचारत आहेत इकडेही त्याचे लक्ष नव्हते. दोन मिनिटांनी त्याने बोलायचा प्रयत्न केला पण शब्दच बाहेर येईनात. इन्स्पेक्टरने दिलेले पाणी पिऊन त्याने डोळे टिपले आणि भरलेल्या आवाजात म्हणाला, “हे दागिने माझ्या आईचे आहेत.”
“ओह, सॉरी सर. तो सांगाडा एका स्त्रीचाच आहे हे आम्हाला कळले आहे.”
“म्हणजे इन्स्पेक्टर माझी आई कुठेही निघून गेली नव्हती. तिला नाहीसे केले गेलेले होते.”
“हे कुणी केले असावे, काही अंदाज आहे तुम्हाला?” इन्स्पेक्टरने विचारले.
“माझ्या वडिलांनी. नक्कीच. त्यांना आईबद्दल अजिबात प्रेम नव्हते. त्यांची नेहमी भांडणे होत.” श्रीराम म्हणाला. “मी सहावी नंतरच्या सुट्टीत घरी आलो होतो. दोन महिन्यांसाठी. त्याच रात्री आई बाबांचे भांडण चालू होते. आवाज खाली स्पष्ट ऐकू येत नव्हता. तो हळूहळू बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई नाहीशी झाल्याचे मला कळले. शोधाशोध चालु झाली. मुंबईहून मामा आले. आई त्यांच्याकडेही गेली नव्हती. खूप शोधूनही ती सापडली नाही, तेव्हा भांडणानंतर रागाने ती घर सोडून गेली असावी अशी सर्वांची समजूत झाली होती. काही दिवसांनी मी मामांबरोबर मुंबईला परतलो. सहा महिने तिची शोधाशोध चालु होती. ज्या ज्या गावात आमचे नातेवाईक होते तिथे तिथे मामा जाऊन आले. पण ती काही सापडली नाही. शेवटी मी तिची वाट पहाणे सोडून दिले.”
रात्रीच्या गाडीने श्रीराम आणि मोनिका परत जायला निघाले. श्रीरामला गाढ झोप लागली होती. त्यामुळे मनात असूनही तिला त्याला जागे करावेसे वाटेना. बऱ्याच गोष्टी तिला विचारायच्या होत्या. हीच एक संधी होती तिला आपल्या घराण्याबद्दल जाणून घेण्याची. एरवी श्रीराम तो विषयही काढू देत नसे. लग्नाला पंधरा वर्षे होऊनही तिला काहीच माहिती नव्हती. तसा श्रीराम घरीही फार काळ नसे. महिन्यातले १५-२० दिवस तो कामानिमित्त भारतभर आणी परदेशातही जात असे. आता मात्र घरी गेल्यावर त्याला सगळे विचारायचे हे तिने मनाशी पक्के ठरविले. आणि ती झोपेची आराधना करू लागली.
जरा डोळा लागला आणि ती दचकून जागी झाली. तिला वाटले त्या सांगाड्याचा हातच आपल्या तोंडावर आला आहे. पाहीले तो वरच्या बर्थवरच्या लहान मुलाचे पांघरूण खाली घसरले होते. ती उठून बसली आणि काहीतरी आठवायचा प्रयत्न करू लागली. साधारण बारा वर्षांपूर्वी एकदा असेच श्रीरामला गावाकडून बोलावणे आले होते. तेव्हाही श्रीरामच्या शेतावरच्या पडक्या घरात असाच स्त्रीचा सांगाडा सापडला होता आणि त्याला चौकशीसाठी बोलावणे आले होते. परंतु त्यावेळेस श्रीराम एकटाच गावाला आला होता. शेतातले घर पूर्ण पडलेले होते. शेत आधीच विकलेले होते. श्रीरामचा त्या नवीन लोकांशी कुठलाच संपर्क नसल्याने जुजबी प्रश्न विचारून त्याला जायला सांगण्यात आले होते. हे आठवतच तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. कोण असेल ती स्त्री? याच्याच घरातील तर नसेल? तिलाही असेच कोणी मारले तर नसेल? त्याच्या आजोबांनी? ते प्रेत ... त्याच्या आजीचे...? हे विचार प्रयत्न करूनही तिच्या मनातून जाईनात. आत्ताशिक एक वाजला होता. मुंबईला पोचायला अजून चार तास होते. उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. शेवटी तिने श्रीरामला उठविले. आजूबाजूला प्रवासी झोपलेले असल्याने दोघे दोन बोगींना जोडणाऱ्या मधल्या मोकळ्या जागेत उभे राहिले. बोलण्याच्या आवाजाने इतर प्रवाशांची झोप मोडायला नको म्हणून ती पुटपुटत त्याच्याशी बोलत होती. प्रथम तो वैतागला. पण ‘आता झोप मोडलीच आहे तर बोलूया’ या तिच्या युक्तिवादापुढे त्याला हार मानवी लागली. यानंतर हा विषय परत काढणार नाही असे आश्वासनही तिने दिले आणि तिच्या मनात आलेल्या शंकांना त्याने दुजोरा दिला.
..२..
दोन दिवसांनी श्रीरामच्या घरी त्याचा मित्र, आजूबाजूचे लोक, मोनिकाचे नातेवाईक जमले होते. सगळे हळहळत होते. मोनिकाच्या घरच्या माणसांना अश्रू आवरत नव्हते. श्रीराम तर कोलमडून पडला होता. पोलीसांनी मोनिकाचे छिन्नविछिन्न प्रेत त्यांच्या ताब्यात दिले होते. रात्रीत कसे कोण जाणे रेल्वेच्या उघड्या दारातून मोनिका बाहेर पडली होती. पहाटे उतरायच्या वेळी ती न दिसल्याने आणि शोधाशोध करूनही ती न सापडल्याने श्रीरामने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
..३..
मोनिकाचे क्रियाकर्म उरकले. आणि घरात जमलेले पै पाहुणे जायला निघाले. सगळे हळहळत होते. श्रीराम आता एकटा पडणार म्हणून त्याचे सांत्वन करीत होते. श्रीरामने डोळ्यात पाणी आणून त्यांचा निरोप घेतला. शेवटच्या पाहुण्याने घरातून बाहेर पाऊल ठेवले आणि श्रीरामच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. किती बेमालूमपणे मोनिकाची हत्येला अपघाताचे स्वरूप मिळाले होते. पोलीसही फसले. आता कोणीच त्याचे काही वाकडे करू शकणार नव्हते. त्याला आवडलेल्या मुलीला जाळ्यात पकडण्यासाठी तो मुक्त होता. अंगातील वडिलांचे रक्त थोडेच बदलणार होते?

download.jpgdownload.jpgdownload.jpgdownload.jpgdownload.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे कथा! आवडली.

एवढे कमी प्रतिसाद का?

बादवे एकच फोटो पाचवेळा दिसतोय. आणि > मोनिकाच्या आठवणीत त्यांच्या लग्नानंतर एकदा त्याला गावाकडून बोलवणे आले होते. > हे वाक्य मला थोडे गोंधळवणारे वाटले. त्याऐवजी 'मोनिकाला जेवढे आठवत होते त्यानुसार, श्रीरामशी लग्न झाल्यानंतर त्याला केवळ एकदाच गावाकडून बोलावणे आले होते' हे जास्त सोपं वाटेल.े

कथा छान लिहीली.. मुख्य म्हणजे क्रमशः नाही म्हणून जास्त आनंद वाटला Happy
फोटो खूपदा पोस्ट झालाय.

डेंंजर आहे कथा! मस्तच!!
मोनिकाच्या आठवणीत त्यांच्या लग्नानंतर एकदा त्याला गावाकडून बोलवणे आले होते. > हे वाक्य मला थोडे गोंधळवणारे वाटले>> अॅॅमी, अशी पद्धत असते बोलण्याची. उदा. 'माझ्या आठवणीत महाराष्ट्रात एकदाच भूकंप झाला आहे'