मिसरूड फुटू लागलेल्या माझ्या मुलासाठी...

Submitted by दत्तप्रसन्न on 19 July, 2019 - 01:20

लिहतोस तू सगळ्यांसाठी
परी माझ्याकरता नाही कधी
लाडका म्हणवतोस नेहमी
अव्हेरिलेस का मला सांग कि ?

हट्ट असा मुलगा करी
समजावु परी कशा रीती?
कोण लिहितं का कधी
सांगा बरे स्वतःच विषयी?

तू आणि मी
आपण काही वेगळे नाही
पाहतो तुझ्या डोळ्यात मला मी
बालपण जगतो तुझ्याच रुपी

होते घेतले तळहाती
गोड हसलास त्या पहिल्याच भेटी
गाढ निद्रेतील बाप तेव्हा
जागा केलास तूच हृदयी

गाठशील लवकरच उंची
मिसरूड सुद्धा फुटू लागली
मजबूत तुझ्या खांद्या वरती
शीर आहे स्थिर आणि संयमी

म्हणतात सारे माझीच छबी
दिसतात जुळ्या भावांपरी
असलास डावखुरा जरी
दोघात उजवा तूच तरी

आवडते तुझी साथ नेहमी
घट्ट आहे दोघांची मैत्री
भावते ओंठातील संवादापेक्षा
अबोल शांत सोबत आपली

खूप खूप मोठा होशील
आकाशाला घालशील गवसणी
पाय मात्र जमिनीवर ठेवशील
आहे मला खात्री पक्की

बरे नव्हते मला एकदा
झोपून होतो जेव्हा घरी
न सांगता लावलेस निरांजन
देवापुढे संध्या समयी

उमगले तेंव्हाच ध्यानी
काळजी आता संपली
काम करीत राहील तुझी
जागृत सद्सदविवेक बुद्धी

माझ्या नंतर तुझ्यासाठी
ठेवू शकलो जरी काही नाही
पोहचवीत राहीन तुझ्या पर्यंत
मला मिळालेली संस्कार शिदोरी

पुरेशी आहे तीच तुला ती
ठेवील कायम समाधानी
चांगल्या माणसाला दुनियेत ह्या
कधीच काही कमी नाही

काय बाळा लिहू अजुनी
तुझ्यासाठी सांग तरी
काळजात ठेव अशीच जपुनी
सदैव तुझ्यातील माणुसकी

Group content visibility: 
Use group defaults

Chan