पालवी

Submitted by _तृप्ती_ on 16 July, 2019 - 01:57

सरूला आज सगळया जगाचा राग आला होता. तिला कोणाशीच काहीच म्हणजे अगदी काहीच बोलायचं नव्हतं. मग तिने वरच्या माडीतली खिडकी पकडली आणि बाहेर बघत बसून राहिली. तिला आज त्या आभाळात पण काही छान दिसत नव्हतं. शी! काय हे. आज इथे पण काही मजाच नाहीये. रोज कसे तिला ढगांमधे प्राणी दिसायचे, कधी कधी तर भूत पण दिसायचं. आजी म्हणते देवाचं घर आभाळात असतं पण तो काही तिला दिसायचा नाही कधी. आजी इतकी छान गोष्ट सांगते नं रामाची. तिला आठवून पण खुद्कन हसू आलं. आणि मग तिला एकदम रागच आला स्वतःचा. सगळ्यात जास्त राग तर तिला आजीचाच आला होता. कशी वागते आजकाल. गेले काही महिने झाले. सारखी काहीतरी सूचना करत असते. असं वागू नको, इथे बसू नकोस. आणि काय तर म्हणे किती मोठयाने बोलतेस, हसतेस काय. आणि लक्ष दिलं नाही तिच्याकडे तर इतके मोठे मोठे डोळे करून बघत असते जणू काही त्या आकाशातली चेटकिणच आजीच्या अंगात शिरली आहे. सरूला एकदम आजीच्या अंगात चेटकिणीचा काळा झगा दिसायला लागला आणि मोठा झाडू घेऊन ती वरच्या माडीच्या बाहेर घिरट्या घालते आहे असं वाटायला लागलं. सरूला आजीच्या या अवताराच्या कल्पनेने सुद्धा, मोठ्या मोठ्याने हसायला यायला लागलं. मग तिने पटकन कोणी बघत नाही ना ते पाहिलं आणि कसंबस हसू दाबलं. कारण आजी आलीच चुकून तर तिचं काही सांगता येत नाही. तिला अगदी न बोललेलं पण कळतं. त्या दिवशी आई कैरी चिरत होती. हळूच कोणाला कळायच्या आता फोडी पळवणार, तर मी नुसती उठले तर आजी लगेच म्हणाली, " अजिबात कैरीला हात लावायचा नाहीये. काही उष्ट माष्ट कळतं का नाही. जा आधी पायावर पाणी घे. बाहेरून आली घुसली तशीच घरात. मुलीनं कसं निगुतीने वागावं ग. आता काय लहान आहेस का तू ." हेच, हेच आणि असंच असतं सारखं हिचं. देवा, पुढच्या जन्मी मला आपलं मुलगाच कर. तो गणू आला होता काल खेळायला बोलवायला. मग मी गेले हळूच. तर आजीने पाहिलंच येताना. जरा विचित्रच वागते आजकाल. आधी गणू आणि मी किती दंगा करायचो. ते चालायचं. हे काही महिने झाले आणि ते नहाणं सुरु झालं. ई…. तिला एकदम कसतरीच वाटलं. असं वाटलं कशाला हे असलं काहीतरी देवाने बनवलं काय माहित. तरी बरं, आई बाहेर तरी जाऊ देते. नाहीतर परवाच शालू सांगत होती तिच्या घरी तर बाहेरच जाऊ देत नाहीत. शाळा पण नाही आणि खेळायचं पण नाही. बिचारी शालू. रडायलाच लागली होती. इतक्यात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आज सकाळीच आत्तु आलीये ना. छोटयाश्या बाळाला घेऊन. इथून गेली तेव्हा पिल्लू कसं ३ महिन्यांचं होतं आणि सारखं सरूच बोटं पकडायचं. आता कसं छान रांगायला लागलं आहे आणि सरूला तर वाटलं तिला हाक पण मारतं आहे. आत्तु सकाळी आली तेव्हाच गेली होती सरू धावत धावत, गोटुला उचलायला. तर आल्या आजीबाई. "अगं, थांब. उद्या न्हाणं झालं की मग हात लाव त्याला. आत्ता बाजूला बस जरा. बाळाला सुद्धा अजून तेलपाणी करायचं आहे." सरूच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात पाणीच साठलं. तिला वाटलं आता कुठल्याही क्षणी पूरच येईल. तिने आत्तुकडे पाहिलं तर तिला कळलं होतं सगळं. तेवढं एक बरं आहे. आत्तुला सगळं कळतं सरूच्या मनातलं अगदी लहान असल्या पासून. पण ती तरी काय करणार. मग सरूने आईकडे पाहिलं. ती आपली काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाली, " सरू, उद्या आक्खा दिवस तू गोटूबरोबर खेळ हं. आज छान तुझ्या आवडता सांजा करते. जा वरच्या माडीत." मग सरू जे ताडताड आली वरच्या माडीत, ते इथेच बसून होती कधीपासून.
आत्ता पुन्हा गोटूचा आवाज आला. मग तिने पण ठरवलं की नाही म्हणजे नाहीच हात लावायचा आता आजी म्हणेपर्यंत. तिने खिडकींतून खाली पाहिलं तर लांब तिला गणु दिसला. तिला जरा बरं वाटलं. हळूच खेळायला पळून जाता येईल. म्हणून तिने गणूला हाक मारली. तर तो पण कसा अगदी मोठ्या माणसांसारखा बोलला. काय तर म्हणे त्याच्या ताईला पहायला पाहुणे येणार होते म्हणून याला घरी थांबायचं होतं. म्हणून वेळच नव्हता त्याच्याकडे. मग सरूला आणखीनच राग आला आणि डोळ्यातला पूर अगदी दाही दिशा वाहायला लागेल असंच वाटलं तिला. पण मग तिनेच स्वतःला समजावलं. आता आजी म्हणते तसं मोठी झाले आहे ना मी. मग असं रडून कसं चालेल. तिला खरं तर गणूला विचारायचं होतं. पाहुणे कोण? म्हणजे ते नक्की काय बोलणार ताईशी? आणि लगेच लग्न करून ताईला घेऊन जाणार कि काय? पण गणू कसा तोऱ्यात होता आज. जसं काही ह्यालाच सगळी कामं करायची आहेत. गणू पण नं जरा येडछापच आहे. कधी कधी इतकी मस्ती करतो आणि मधेच काय होतं काय माहित. परवा म्हणाला, "तू असं सारखं गणू काय म्हणतेस? गणेश नाव आहे ना माझं. मग तशीच हाक मारत जा. नाहीतर ओ देणार नाही मी आता." मला आणि शालूला हसूच आलं होतं. काहीच कळत नाही गणूला. मला आणि शालूला काही बोलायचं असलं तरी हा तिथेच थांबतो. मग आम्ही कसं बोलणार ना. एकदा देवळाच्या मागे ती आणि शालू लपून काय काय बोलत होत्या, तिला तेच आठवलं. गणूला चुकवून पळत पळत आल्या होत्या आणि अगदी मस्त बकुळीच्या खाली बसून किती वेळ गप्पा मारल्या. गणू बसला शोधत. गणूला माहिती असतं पण सगळं. मागे एकदा माझ्या पोटात दुखत होतं म्हणून, मी गेलेच नाही खेळायला. तर कसं मोठ्या माणसांसारखा वागला. नाहीतर एरवी इतका त्रास देतो. एक चिंचेचं बुटुक घ्यायला इतकं पळायला लागतं गणूच्या मागे. तिला आत्ता पण जायचं होतं बाहेर खेळायला. पण आज शालूपण आली नाही. मग तिने अभ्यासाची वही पुढे ओढली. आज बाईंनी निबंध दिला होता लिहायला. मी पक्षी असते तर...खरंच काय मजा आली असती ना. आभाळातले ढग असे खिडकीतून बघण्यापेक्षा ढगात जायला कसलं मस्त पिसासारखं वाटेल ना. मग तिने असंच काय काय लिहिलं. मग कंटाळाच आला. म्हणुन पुन्हा वही बंद करून टाकली. आज कसं असं काही करावसचं वाटत नव्हतं तिला.
ती उठून आरशासमोर उभी राहिली. तिला स्वतःचे लांब केस फार आवडायचे. आणि आई इतक्या छान घट्ट दोन वेण्या घालून द्यायची. सरूला वेणीचा पेड आणि पेड सरळ यायला लागतो आणि रिबीनच फुल पण नीट यायला हवं. नाहीतर ती ते किती वेळा सोडत असे आणि पुन्हा बांधत असे. त्या वेण्या अश्या खांदयावरून मागे पुढे करायला तिला काय मज्जा यायची. आत्तूला तर किती कौतुक आहे माझ्या लांब केसांचं. मस्त गजरा घालून देते. सागरवेणी घालून देते. आजी म्हणते, “इतकं काही मिरवायला नकोत ते केस." आणि मग कित्ती तेल लावून ठेवते. पण जेव्हा पहिल्यांदा नहाणं झालं नं, आजी किती खुश झाली होती. आणि स्वतः माझ्या केसांचा हा असा मोठा अंबाडा घालून दिला होता. असं जवळ घेऊन काजळ पण लावलं. म्हणाली, "पोरगी मोठी झाली आता. माझीच नजर नको लागायला. कुसुम, नजर काढ ग हिची. नक्षत्र आहे पोरगी." का कुणास ठाऊक मला वाटलं आता आपली ही कडक आजी रडते की काय. मला तर काय करू सूचेना. मी आपली तशीच बसून राहिले. पण तेव्हा मला माहितीच नव्हतं नं कि हे न्हाणं आता प्रत्येकच महिन्यात. मला वाटलं, लग्न कसं एकदाच होतं, तसंच असेल हे काहीतरी. शी बाई. जसं हे नेहमीचं झालं तसं आजीचं, आईचं फारच लक्ष असतं माझ्याकडे. आजी तर म्हणत होती, सरूला आता साडी आणायला हवी. काहीतरीच तिचं. बर झालं आईने ऐकलं नाही ते. साडी नेसून झाडावर कसं चढणार? आणि शाळेचा ड्रेस मला फार आवडतो. आता आत्तु आली आहे ना, तिलाच विचारते उद्या. हे न्हाणं वगैरे कधी संपणार आणि आई, आजीची तक्रार पण करणार आहे. सारख्या माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आप्पाकडे, बाबाकडे ओसरीवर कोणी आलं कि मला लगेच आत हाकलतात. आधी मी कितीही दंगा केला ना तरी चालायचा. आता असं काय झालं?
एवढ्यात खालून हसण्याचा आवाज आला आणि मग गोट्याचा दंगा पण ऐकू आला. तिला पण गोट्याशी खूप म्हणजे खूप खेळायचं होतं. त्याला कडेवर घेऊन घरभर फिरायचं होतं. आणि मागच्या अंगणात तिची एक गमंत होती. ती पण तिला फक्त गोट्याला दाखवायची होती. तिकडे नं रोज एक फुलपाखरू येतं. पिवळ्या रंगाचं आणि निळ्या ठिपक्यांच. गोटू कसा हसेल नं ते बघून. पण छे. तिला आज कोणी गोट्याशी खेळूच देणार नव्हतं. मग सरू पुन्हा रागावली आणि खिडकीत जाऊन बसली. तिला उगीचच आपण आता पक्षीच झालो आहे असं वाटलं. मग देवळाच्या मागच्या झाडावर बसता येईल ना आणि सगळ्यात वरची कैरी पण खाता येईल. तिला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. आणि बकुळीचा सुंदर वास सगळीकडे पसरला आहे असंच वाटलं. हळदीकुंकूला आई सगळ्या बायकांना अत्तर लावते आणि मग सगळ्या घरात कसा एक छान येडछाप वास येत राहतो, अगदी तसंच काहीतरी. सरूला असं काहीतरी येडछाप विचार करत बसायला फार मज्जा यायची. एवढ्यात जिन्यावरून कोणाचा तरी आवाज आला. आईच आली होती. सरूने मुद्दामच लक्ष दिलं नाही. कळू देत आईला पण. माझ्याशीच सगळे असे वागतात. मग मी पण कोणाशीच काहीच बोलणारच नाहीये. सरूने आपलया दोन्ही वेण्या अश्या मागे पाठीवर टाकल्या आणि आईकडे पाठ करून बसली. काय माहित मला तर वाटलं, आई हसतेच आहे की काय मला. मला रागच आला. माझी समजूत काढायची सोडून ही अशी हसते काय मला? पण मी पण आता मोठी झाले आहे ना. मग मुळीच बघणार नाही हिच्याकडे, हिने हाक मारल्याशिवाय. आईने हळूच हाक मारली. मी लक्षच दिलं नाही. मग आईने माझ्या वेण्या अगदी प्रेमाने सारख्या केल्या आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. "भूक लागली आहे ना? सांजा खातेस ना?" मला खरं तर खूप म्हणजे खूप राग आला होता आईचा. पण काय तरी वेगळंच वाटतं होतं. असं वाटतं होतं, कि मी आत्ता आईच्या कुशीतच शिरणार आहे अगदी गोट्या चिकटतो नं आत्तुला तशी आणि तो मगाचचा डोळ्यातला पूर वाहूनच जाणार. बर झालं नं आईकडे पाठ होती. मग मी एकदम शहाण्या मुलीसारखं सांगितलं, "मी खाईन. तू जा. तुला कामं असतील ना खूप." आईने एकदा माझ्याकडे बघितलं, हसली आणि म्हणाली, " आत्तु म्हणाली, उद्या सरूला मीच न्हायला घालणार आहे आणि छान सागरवेणी पण घालून देणार आहे, मोगऱ्याचा गजरा घालून." मी काहीच नाही बोलले. पण मनातल्या मनात मी किती म्हणजे कित्ती खुश झाले होते. आत्तुची आणि माझी एकदम गट्टी आहे. पण गोट्या आल्यापासून आत्तुकडे वेळचं नाहीये ना. गोट्या सारखा तिच्या मागे मागे असतो. उद्या आत्तूला काय काय सांगायचं हे ठरवतं झोपचं लागली मला.
सकाळी जाग आली तीच मुळी आत्तूच्या हाकेने. आत्तू मला हलवून उठवत होती. “सरू, उठतेस ना? अगं अशी काय झोपेत हसते. चल न्हायचं आहे आज. आणि मग खेळ गोट्याबरोबर." आणि मग मी डोळे उघडले तर आत्तू कशी टक लावून बघत होती माझ्याकडे. आणि काय मस्त हसली. ती हसली ना की मला इतकी आवडते. त्या गोष्टीतल्या परीसारखीच दिसते. मला आत्तूला मिठीच मारायची होती. पण नहाणं झालं की मग. आम्ही दोघी पटकन उठलो. आत्तूने इतक छान शिकेकाई, रिठा घालून मस्त नहायला घातलं. आणि मी आले तर मोगरीच्या वेलीजवळ फुलं काढत होती. मी तिला मिठीच मारली. आत्तूची एक गंमत आहे. तिला हे मोगरीचं झाड फार म्हणजे फारच आवडतं. मला तर वाटतं कधी कधी की ही बोलतच असते त्याच्याशी. मला जरा येडछापच वाटतं. मग आम्ही दोघी देवघरात आलो. देवाला नमस्कार न करता आजी घरात घेणारच नाही ना. एवढ्यात गोट्याचा आवाज आला. मला वाटलं आता आत्तू जाणार लगेच आणि मग मला किती बोलायचं होतं तिच्या एकटीशी. मग ते सगळं राहूनच जाणार आता. मी आत्तुकडे पाहिलं तर तिने मला हात धरून खाली बसवलं. म्हणाली, " सरू, अजून रुसली आहेस की काय? अगं खेळ आज गोटुशी हवं तेवढा वेळ." खरं तर आत्तू एवढंच म्हणली होती पण कालचा डोळ्यातला पूर अचानक वाहायलाच लागला. आत्तू मला थोपटत होती आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतच होतं. बाबा कधी कधी चिडवतात ना. म्हणतात सरुच्या डोळ्यातलं पाणी एकदा वाहायला लागलं की मग काळजीच नको. आख्या गावाला पाणी पुरेल. मग आई त्यांना खोटं खोटं ओरडते. त्यांना वाटतं मी अजून लहानच आहे आणि मला काही कळतंच नाही. मोठी माणसं पण ना जरा विचित्रच असतात. म्हणजे मी कधी मोठी आणि कधी लहान हे त्यांना हवं तसं ते ठरवणार. पण आत्ता रडताना मला एकदम आठवलं कि मी मोठी आहे आणि तरी पण रडते आहे. मी आत्तूला म्हटलं, " मला हे नहाणं अजिबात म्हणजे अजिबात आवडतं नाही ग. आई आणि आजी पण सारखं लक्ष ठेवतात माझ्यावर. तू नसतेस ना इथे तर कोणाला काही वाटतच नाही. हे कधी संपणार ग. तुला नाही का ग वाटतं की हे संपाव असं. आणि मुलींनाच काय असं काहीतरी." आत्तू म्हणाली, " अगं आता तर कुठे सुरवात आहे ना. अजून मोठी झालीस की कळेल तुला. मग आवडेल सुद्धा सगळं." आणि काहीतरी स्वतःशीच हसली. मला रागच आला. “आता तू पण आई आणि आजी सारखीच वागते आहेस. आई पण असंच उत्तर देते. जा तू पण जा आणि मला कोणी काही सांगूच नका आणि बोलू पण नका." आणि पुन्हा आपला डोळ्यातला पूर इकडून तिकडे वाहत होता. आता तर मला पण बाबांच म्हणणं पटायला लागलं. मला रडायचं नव्हतं तरी हे येडछाप पाणी काय येत होतं. आत्तू म्हणाली, "सरू, अग इकडे बघ तरी. पाहू दे तरी मला टपोरे डोळे. मला नं तुला एक गमंत सांगायची आहे. पण तू सांगणार नाहीस नं कोणाला. तरच सांगेन. आपल्या दोघीची गंमत." हे मला फार आवडलं. आत्तुकडे पण माझ्यासारख्या गमंती आहेत. हसूच आलं मला. मी कान टवकारून ऐकायला लागले. आत्तू म्हणाली, " अगं मला पण अगदी तुझ्यासारखच वाटायचं. नकोच हे नहाणं. अगदी अशीच रुसायचे मी. तुला पण सगळ्यांचा राग येतो का ग? " अय्या आत्तूला खरंच माझं सगळं कळतं हं. "एकदा असचं माझ्याशी खेळायला कोणीच नव्हतं आणि नहाणं झालयाशिवाय बाहेर कसं जाणार. मग फार रुसून मी मागच्या अंगणात गेले. कुठे माहिती आहे? आपला मोगरीचा वेल आहे ना तिथे. तेव्हा तो वेल नव्हता हं पण. " मला वाटलंच होतं तरी माझी जशी माडीतली खिडकी आहे न तसाच आत्तूचा वेल आहे. आत्तू म्हणाली, " पण आता तुला सांगते ती गंमत सांगू नको हं कोणाला." मला आता खरंच मोठं झाल्यासारखं वाटलं.मी अगदी गंभीर चेहरा करून म्हटलं, " मी कोणाला म्हणजे कोणालाच नाही सांगणार. " आत्तू परत इतकी छान हसली त्या मोगऱ्याच्या झाडासारखी. " बरं मग सांगते हं तुला. मी रुसून बसले होते आणि आपल्याकडे काम करतात ना सीताबाई. तेव्हा त्या म्हाताऱ्या नव्हत्या. त्या घेऊन आल्या हे मोगरीचं रोप. अंगणात लावायला. मग मी त्यांना म्हटलं, मीच लावणार हे रोप. त्यांना वाटलं मला जमणारच नाही. पण मी काही त्यांचं ऐकलंच नाही. मस्त खड्डा खणला, माती सारखी केली, मोगरीचं रोप लावलं. पुन्हा माती सारखी केली, पाणी घातली. आणि मग काय गंमत झाली माहितेय. मला खेळायला कोणी नसलं आणि असलं तुझ्यासारखं येडछाप बोलायचं असलं की मोगरीशी गप्पा मारायचे. आणि मग अजून एक गंमत आहे. दर महिन्यात नहाणीच्या वेळी, मी बघायचे तर रोपाला छान पालवी फुटायची. मग मला पण आपलं उगाचंच भारी वाटायचं जसं काही मलाच पानं फुटली आहेत. मग दर वेळेस मला वाटायचं आता कधी नहाणं येणार आणि या मोगरीला कधी फुलं येणार. आणि मग मला कधी या नहाण्याचा, आधीच्या दिवसांचा रागच नाही आला. आता बघ मोगरी कशी फुलली आहे. आणि सगळ्या घरात कसा मस्त वास भरून राहिला आहे. हे न्हाणं आहे नं सरू, त्या मोगरीच्या रोपासारखं आहे. फुलायला लागलं की जपायला लागतं ग. तू ते मोगरीचं रोपचं आहेस ना. म्हणून आई, आजीला काळजी वाटते ग तुझी. चल आता. आवार. तुला गजरा करणार आहे मोगऱ्याचा. घालशील नं “मला इतकं भारी वाटलं ना. म्हणजे काही सगळं कळलंच नाही. पण आत्तूची गंमत आवडली आणि मोगरीचं झाड पण. मग माझ्या पण डोकयात एक कल्पना आली. " आत्तु, मला पण झाड लावायचं आहे गप्पा मारायला आणि मला पण ती पानं कशी फुटतात ते पाहायचाय. मला शिकवशील." आत्तू हसली पण मला वाटलं आत्तूच्या डोळ्यात पाणीच आलं. येडछापच आहे मी पण. आत्तु मोठी आहे ना मग ती कशी रडेल. पण मला तर वाटतं ही मोठी माणसं जशी बोलतात नं तशी कधी वागतचं नाहीत. आजी एवढी मोठी बाई. पण आत्तू गेली नं, की इथे या देवघरात येऊन रडत असते. तिला वाटतं कोणीच बघत नाही. पण मी पाहिलंय नं तिला. मी आणि आत्तू देवघरातून बाहेर जाणार तर, आई चौकटीमध्ये गोट्याला घेऊन उभी होती. किती मस्त खेळत होता तो. आजी पण बहुदा आमच्याकडेच लक्ष ठेवून होती. मी आत्तूला हळूच कानात सांगितलं, “मी या दोघीना मुळीच सांगणार नाहीये आपली गंमत.” इतक्यात आजी म्हणाली आईला, “कुसुम, नारळ घे ग खवायला. सरूसाठी आणि तिच्या आत्तूसाठी वड्या करू गं आज."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच लिहीलं आहे ग.
नहाणं वैगरे वाचुन वाईट वाटल. अजुन ही काही घरांमध्ये हे प्रकार चालतात याचंच नवल आहे.
अशा कितीतरी सरी आहेत आजही ! तिच्या भावना मस्त टिपल्या आहेत. अचानक झालेल्या बदलामुळे तिच्या मनात चाललेली खळबळ शब्दा-शब्दांत जाणवते.

खुप गोड लिहिलय.
बाजुला बसणे वगैरे प्रकार सोडुन देउ.. पण मोगर्याच्या झाडाचा आणि रोपाला पालवी फुटण्याचा संबंध दर महिन्याच्या नहाणा साठी जोडला ही कल्पना मला आवडली. सरु च्या वयासाठी उगीच अवघड न करता ईतकं सोप्या भाषेत समजणं जास्त महत्वाचं.

खूप छान लिहिलंय.. जुन्या काळातल्या लेखकांची, त्यांच्या लेखातल्या वातावरणाची एकदम आठवण आली..

@स्मिता श्रीपाद, प्रतिसादाबद्दल खूप आभार. मला हेच पोचवायचं होतं. आता नहाणं हा प्रकार जवळजवळ नामशेष आहे काही अपवाद वगळता. परंतु, वयात येण्याची घालमेल, चंचलपणा आणि त्या वयात पडणारे प्रश्नही तसेच राहणार कायम. पालवी फुटण्यासारखा विचार दिला तर नकोसे वाटणे कमी होईल.

खूप सुंदर. पालवी फुटण्याचा आणि नहाणाचा संबंध जोडून एका नविनच उंचीवर गोष्ट नेली आहे. अशी समजावणारी असेल तर त्या दिवसांची भिती किंवा किळस मनात बसणार नाही.

चांगल्या शब्दात-लेखनशैलीत, चांगला विषय घेऊन लिहलेले प्रतिगामी लेखन.

काळ जुना आहे किंवा खेड्यातला आहे हे सहज, ठळकपणे समजेल असे काही बदल करू शकाल का?

Khup Chan lihilay. Palawi phutna te jhad sambhalns Ani te diwas Chan watla. Lahan wayat dilela sandarbha aawadla. Aaj kaal wegla nasana nasta pan aaplya chotya mulinna asa sahaj sangta aala pahije saglach..

छान Happy

सरुची चिडचिड,रुसणं, मन मोकळ करणं खुप छान मांडलंय.तिची इतरांसोबत असणारं बॉडींग तर मस्तच! पु.ले.शु! Happy

कथा जुन्या काळातली वाटण्यासाठी अजुन काही ठळक बदल कराल का? अँमी+११

@ _तृप्ती_,
माझ्या मते तुमच्या लेखनातून तुम्हाला अभिप्रेत असलेला काळ आणि कदाचित स्थळही घटनांमधून, संभाषणातून, वातावरणामधून, कथानायिकेच्या (Protagonist) विचारांमधून आणि घराच्या भागांची नावं वापरली आहेत त्यामधून अतिशय सुरेखपणे आणि संयतपणे व्यक्त होतोय...
त्यामधे इतरांना समजण्यासाठी अजून सुलभीकरण, सुस्पष्टीकरण केलं तर कथेच्या तरल पोताला कदाचित धक्का लागू शकेल, माझ्या मते त्याची आवश्यकता नाही...
(कुमारभारती आणि बालभारती ह्यातल्या लेखांमधे स्तराचा/सुलभीकरणाचा फरक असतोच ना.. : हे फक्त एक उदाहरण.)
तुमच्या लेखाचा स्तर तुम्ही ठरवावा हे सर्वात योग्य..

सगळ्या अभिप्रायांबद्दल मनापासून आभार. मी मायबोलीवर नवीन आहे. जितकी वेगळी मते मिळतील, तितकी पुढच्या लिखाणास मदतच होईल.
या लिखाणात आता बदल केला तर जोड लावल्यासारखा वाटेल. सुधारणेला कायमच वाव असतोच Happy तुम्हाला लिखाण आवडते आहे तर अजूनही पोस्ट करत राहेन.

> सगळ्या अभिप्रायांबद्दल मनापासून आभार. मी मायबोलीवर नवीन आहे. जितकी वेगळी मते मिळतील, तितकी पुढच्या लिखाणास मदतच होईल. > शब्बास! ऍटिट्यूड आवडला Happy

> या लिखाणात आता बदल केला तर जोड लावल्यासारखा वाटेल. सुधारणेला कायमच वाव असतोच. > बरोबर आहे.

लिहीत रहा.

खूपच गोड आहे गोष्ट सरूची आणि तिच्या आत्तूची.

मोगर्याच्या झाडाचा आणि रोपाला पालवी फुटण्याचा संबंध दर महिन्याच्या नहाणा साठी जोडला ही कल्पना मला आवडली. >>> + १२३