कधी शांत, कधी उसळते !

Submitted by कुमार१ on 8 July, 2019 - 02:05

पित्तखडे आणि पित्ताशयदाह

तेल आणि तूप हे आपल्या आहारातले प्रमुख मेद पदार्थ. स्वयंपाक रुचकर होण्यात त्यांचे मोठे योगदान असते. मांसाहारातून अन्य काही मेद मिळतात. एकंदरीत मेदपदार्थ पचण्यास तसे जड असतात. त्यांचे पचन सुलभ होण्यासाठी आपल्या पचनसंस्थेतील पित्ताची (bile) खूप गरज असते. पित्त हा पाचकरस मुळात यकृतात तयार होतो आणि नंतर तो पित्त्ताशयात साठवला जातो. पित्तरसामध्ये अनेक घन पदार्थ असतात. त्यातील काही घटकांचे एकमेकाशी असलेले तुलनात्मक प्रमाण हे महत्वाचे असते. जर काही कारणाने यात बिघाड झाला तर पित्तखडे निर्माण होतात. त्यातून पुढे अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार समाजात बऱ्यापैकी आढळतो. त्याची मूलभूत माहिती करून देण्याचा या लेखाचा उद्देश आहे.

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:

१. पित्ताशय : रचना व कार्य
२. पित्तातील घटक पदार्थ
३. पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार

४. आजाराची कारणमीमांसा
५. लक्षणे व रुग्णतपासणी
६ .आजाराचे दीर्घकालीन परिणाम

७. प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
८. उपचार आणि प्रतिबंध

पित्ताशय : रचना व कार्य
आपल्या पचनसंस्थेतील यकृत, पित्ताशय (gall bladder) आणि लहान आतडे यांचा संबंध खालील चित्रात दाखविला आहे. यकृत आणि पित्ताशयांच्या नलिका एकत्र होऊन अखेर लहान आतड्यांत उघडतात. त्याद्वारे पित्तरस हा पचनादरम्यान आतड्यांत सोडला जातो.

gall b.jpg

पित्तरस प्रथम यकृतात तयार होतो. पुढे तो नलिकांद्वारे पित्ताशयात पोचतो. तिथे सुमारे ५० मिली रस एकावेळेस साठवलेला असतो. पित्ताशयात त्यातील पाणी शोषले जाऊन तो अधिक दाट होतो.
जेव्हा अन्नातील मेद लहान आतड्यांत शिरतात तेव्हा तिथून CCK हे हॉर्मोन स्त्रवते. त्याच्या प्रभावामुळे पित्ताशयाचे आकुंचन होऊन त्यातील रस आतड्यांत सोडला जातो. त्याच्यातील विशिष्ट क्षारांमुळे मेदाचे पचन होण्यास मदत होते.

पित्तातील घटक पदार्थ
यकृतातील पित्ताचे घटक असे:
• पाणी : ९७%
• पित्तक्षार : ०.७%
• बिलीरुबीन : ०.२%
• मेद पदार्थ : ०.५%
• अन्य क्षार

वरील मेद पदार्थांत कोलेस्टेरॉल, मेदाम्ले व लेसिथिन यांचा समावेश होतो. त्यापैकी कोलेस्टेरॉलचा एक मूलभूत गुणधर्म असा आहे की त्याचे छोटे खडे सहज तयार होऊ शकतात. पण, असे होऊ नये याची दक्षता लेसिथिनकडून घेतली जाते. या दोन्ही घटकांचे प्रमाण असे राखलेले असते की कोलेस्टेरॉल हे नेहमी विरघळवलेल्या स्थितीत राहते.

पित्तखडे : निर्मिती आणि प्रकार

gall stones.jpg

पित्ताशयात पित्तातील पाणी शोषले जाऊन ते दाट होत असते. या प्रक्रीयेदरम्यान पित्तातील काही घन पदार्थ न विरघळलेल्या अवस्थेत राहू शकतात. जर त्यांचे प्रमाण वाढते राहिले तर मग ते लहान स्फटिकांच्या रुपात वेगळे जमा होऊ लागतात. पुढे ते तिथल्या म्युकसमध्ये पकडले जाऊन तिथे गाळ तयार होतो. कालांतराने अनेक छोटे स्फटिक एकमेकात विलीन होऊन पित्तखडे तयार होतात. हे खडे २ प्रकारचे असतात:
१. कोलेस्टेरॉलयुक्त आणि
२. . बिलिरूबिनयुक्त.

आता या दोन्ही प्रकारांची कारणमीमांसा पाहू.

कारणमीमांसा
कोलेस्टेरॉलयुक्त खडे: हे तयार होण्याची प्रक्रिया मध्यमवयानंतर वाढू लागते तसेच ते तुलनेने स्त्रियांत अधिक होतात. एखाद्या व्यक्तीत खालील घटक किंवा आजार असल्यास खडे होण्याची प्रक्रिया अधिक संभवते:

१. लठ्ठपणा
२. गरोदरपण : अनेक वेळा आल्यास
३. आजाराची अनुवंशिकता
४. मधुमेह व उच्चरक्तदाब
५. काही औषधांचे परिणाम: मुख्यत्वे गर्भनिरोधक गोळ्या आणि रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणारी काही औषधे.

हे खडे स्त्रियांत अधिक प्रमाणात का होतात हा कुतूहलाचा विषय आहे. स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही हॉर्मोन्स त्यास जबाबदार आहेत. त्यांच्या प्रभावाने पित्तरस अधिक दाट होतो, त्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तसेच पित्ताशयाचे आकुंचनकार्य देखील मंदावते. अनेक वेळा गरोदर राहिलेल्या स्त्रियांत प्रोजेस्टेरॉनची पातळी सातत्याने वाढलेली राहते.( स्त्रीमध्ये पित्तखडे होण्याची ४ प्रमुख कारणे ‘F’ या अक्षराशी संबंधित आहेत : Fat Fertile Females ऑफ Forty ! ).

दीर्घकालीन मधुमेहात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी वाढलेली राहते आणि पित्तात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते राहते.

बिलिरूबिनयुक्त खडे
बिलिरूबिन हे रंगद्रव्य हिमोग्लोबिनच्या विघटनातून तयार होते. निरोगी अवस्थेत शरीरात रोज ठराविक प्रमाणात लालपेशी मृत होतात आणि मग त्यातल्या हिमोग्लोबिनच्या विघटनातून बिलिरूबिन तयार होते. लालपेशींच्या काही आजारांत नेहमीच्या कित्येक पट पेशी मरतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात बिलिरूबिन तयार होते. अशा वेळेस त्याचे पित्तातील प्रमाण वाढलेले असते. पुढे त्याचा कॅल्शियमशी संयोग होऊन काळ्या रंगाचे खडे तयार होतात.

काही रुग्णांत वरील दोन प्रकारच्या खड्यांचे मिश्रण होऊन ‘मिश्रखडे’ देखील बनू शकतात.

लक्षणे व रुग्णतपासणी

पित्तखड्यांची निर्मिती प्रक्रिया आपण वर पहिली. आता संबंधित रुग्णास त्याचा काय त्रास होतो ते पाहू. हा आजार झालेल्या सुमारे ५५% रुग्णांना या खड्यांचा कोणताच त्रास होत नाही. ते खडे पित्ताशयात शांत पहुडलेले असतात !

बाकीच्या रुग्णांत मात्र परिस्थिती बिघडते. पचनादरम्यान जेव्हा पित्ताशय आकुंचन पावते, तेव्हा त्याच्यात साठलेल्या खड्यापैकी १-२ खडे सरकून पित्तनलिकेत अडकतात. आता मात्र रुग्णास वेदना (colic) होते. ती सुमारे तासभर टिकते. नंतर पित्ताशय जेव्हा सैल पडते तेव्हा खडे पुन्हा नलिकेतून मागे जातात आणि त्यामुळे वेदना थांबते. एकदा का अशी प्रवृत्ती झाली की अशा प्रकारचा त्रास (attacks) अधूनमधून होत राहतो. तो किती काळाने होईल याचा काही भरवसा नसतो. जेव्हा जेवणात मेदांचे अधिक्य असते तेव्हा हा त्रास बळावतो.

ही वेदना जेवणानंतर साधारण तासात सुरु होते. रुग्णास पोटात मध्यभागी किंवा उजव्या बाजूस दुखते. ही वेदना सतत होत राहते आणि काही तास टिकते. त्याच्या जोडीला रुग्णास भरपूर घाम येऊन मळमळ व उलट्या होऊ शकतात. सुरवातीस बरेच रुग्ण हा acidity वा पचनाचा त्रास आहे असा तर्क करून त्यावरील सामान्य औषधे स्वतःच घेतात. पण त्याने काही फरक पडत नाही.

आजाराचे दीर्घकालीन परिणाम

एकंदरीत पाहता हा आजार कधी निद्रिस्त तर कधी उफाळून येतो. त्यामुळे आतड्यांत मेदांचे पचन बिघडत जाते. ज्या रुग्णांत खडे पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात त्यांच्यात कालांतराने काही अनिष्ट परिणाम दिसतात. पित्ताशय हळूहळू आकाराने मोठे होते आणि पुढे त्याचा दाह होतो. वेळप्रसंगी त्यात जंतूंची वाढ होऊ लागते. आजार खूप काळ वाढता राहिल्यास पित्ताशय कडक होते आणि त्याचे कार्य संपुष्टात येते. काही रुग्णांत हे खडे मुख्य पित्तनलिकेत वारंवार अडकू लागतात. जर का अशा अडकण्याने ती नलिका बंद झाली तर मग पित्त उलट्या मार्गे रक्तात उतरते. अशा रुग्णाच्या रक्तातील बिलिरूबिनचे प्रमाण वाढते आणि त्याला कावीळ झाल्याचे दिसते. क्वचित काही रुग्णांत स्वादुपिंडाचाही दाह होऊ शकतो.

प्रयोगशाळा व प्रतिमा चाचण्या
रुग्णास निव्वळ पित्तखडे झालेले असतील तर रक्त-लघवीच्या तपासण्यांची गरज नसते. मात्र जर त्याच्या जोडीने पित्ताशयदाह झाला असल्यास रक्तचाचण्या उपयुक्त असतात. त्यामध्ये रक्तपेशी, बिलिरूबिन आणि काही एन्झाइम्सची मोजणी यांचा समावेश होतो. आजाराच्या तीव्रतेनुसार या घटकांच्या पातळीत वाढ होते.

प्रतिमा चाचण्यांपैकी सोनोग्राफी (USG) ही चाचणी निदानासाठी सर्वोत्तम आहे. गरोदर स्त्रीवरदेखील ती निर्धोकपणे करता येते. या तपासणीत मध्यम व मोठ्या आकाराचे खडे सहज समजतात. तसेच दाहप्रक्रियाही समजते.

उपचार
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).

आपण वर पहिले की बऱ्याच जणांना पित्तखडे झालेले असतात पण त्याचा कोणताही त्रास होत नसतो. किंबहुना त्या व्यक्तीत या खड्यांचा शोध अन्य काही कारणासाठी पोटाची सोनोग्राफी करताना लागतो ! अशा रुग्णांवर उपचाराची गरज नसते. फक्त नियमित काळाने सोनोग्राफी करून खड्यांचा अंदाज घेतात.
ज्या रुग्णांना आजाराची लक्षणे वारंवार जाणवू लागतात त्यांच्यासाठी उपचारांची गरज असते. आता उपचारांची फक्त रूपरेषा देत आहे.

या आजारासाठी ३ प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत:
१. औषधे
२. लिथोट्रिप्सी
३. पित्ताशय शस्त्रक्रियेने काढून टाकणे.
प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे स्वरूप आणि गांभीर्य बघून योग्य त्या उपचाराची निवड केली जाते.

१. औषधे: ज्या रुग्णांत खड्यांचा आकार खूप लहान आहे, ते कोलेस्टेरॉलयुक्त आहेत आणि पित्ताशयाचे कार्य चांगले आहे, अशांमध्ये याचा विचार करता येतो. यासाठी पित्तक्षाराच्या गोळ्या खाण्यास देतात. त्याने खडे विरघळू शकतात. त्या दीर्घकाळ घ्याव्या लागतात आणि जेमतेम ४०% रुग्णांत त्याचा उपयोग होतो. त्यांच्यातही उपचार बंद केल्यावर खडे पुन्हा उद्भवण्याची शक्यता बरीच असते. हे सर्व पाहता या उपचारास डॉक्टर सहसा पसंती देत नाहीत. मात्र ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया अन्य काही कारणाने करता येत नाही अशांसाठी याचा विचार करतात. तसेच जे रुग्ण शस्त्रक्रियेस खूप घाबरतात त्यांच्या समाधानासाठी वेळप्रसंगी याचा तात्पुरता वापर करता येतो !

लिथोट्रिप्सी
हा उपचार शस्त्रक्रियेस पर्याय म्हणून काही रुग्णांत वापरता येतो. खडे जर लहान असतील आणि पित्ताशयाचे कार्य चांगले असेल तर याचा विचार करतात. या तंत्रात उच्च उर्जेच्या ध्वनीलहरी वापरून शरीरावर shocks दिले जातात. त्यामुळे आतील खडे फुटून त्यांचा भुगा होतो, जो पुढे पित्तनलिकेतून आतड्यांत पोचतो आणि त्याचा निचरा होतो. हे तंत्र रुग्णास भूल न देता सहज वापरता येते. पण, या उपचारानंतर खडे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता राहतेच. काही रुग्णांत याच्या जोडीला औषधे देता येतात.

पित्ताशय शस्त्रक्रिया
वरील दोन उपचारांच्या मर्यादा पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरतो. जेव्हा खड्यांचा त्रास वारंवार होऊ लागतो तेव्हा पित्ताशय काढून टाकण्याची शिफारस आहे. ही शस्त्रक्रिया आता बहुसंख्य रुग्णांत Laparoscopic पद्धतीने करतात. यात पोटावर अगदी लहान छेद देऊन सुटसुटीत शस्त्रक्रिया करता येते. काही ठराविक रुग्णांत मात्र पारंपारिक जुन्या पद्धतीची शस्त्रक्रिया करतात. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे-तोटे असतात. पित्ताशय काढून टाकल्यानंतर काही रुग्णांत पित्तनलिकेत पुन्हा खडेनिर्मिती होऊ शकते. थोडक्यात, एकदा का हा आजार झाला की तो आयुष्यभर पिच्छा पुरवतो !

प्रतिबंध
पित्तखडे निर्माण होऊच नयेत यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. परंतु ज्या रुग्णांत ते होण्याचा धोका अधिक असतो त्यांना पित्तक्षाराच्या गोळ्या देऊन पाहता येते. ज्या रुग्णांत खडे झालेले आहेत त्यांचा भावी त्रास (वेदना) कमी होण्यासाठी आहारातील मेदांचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरते.

समारोप

पित्तखडे हा मध्यमवयीन प्रौढांमध्ये बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. आधुनिक आहार आणि जीवनशैलीने जे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्तखड्यांच्या २ प्रकारांपैकी कोलेस्टेरॉलयुक्त खडे जास्त प्रमाणात आढळतात. पोटावरील अतिरिक्त चरबी, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि मेदांची वाढलेली रक्तपातळी या समूहाचाच पित्तखडे हा एक सदस्य आहे. बऱ्याच रुग्णांत हे खडे निद्रिस्त असतात. पण जर का ते त्रास देऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे हितावह असते.
**************************************************************************************************
(चित्रे जालावरून साभार).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !

** अर्धशिशी(मायग्रेन्)चा त्रास ही पित्तामुळेच होतो ना?">>>

नाही. मायग्रेन्चे मूळ कारण चेतातंतू आणि संबंधित रसायने (neurotransmitters) शी निगडित आहे.

आर्या व देवकी,
पुन्हा लक्षात घ्या. 'पित्त' शब्द समाजात फार सैलपणे वापरला जातो. त्यातून गैरसमज निर्माण झाले आहेत.

सस्मित ☺️ ते गाणे कशातले आहे ?

आभार डॉक्टर.
अवांतर - ते गाणं फार छान आहे ऐकायला व अभिषेक सहन होत असेल तर बघायलाही. स्मित :

Pages