It's just happened..

Submitted by अजय चव्हाण on 17 November, 2018 - 00:52

शरद ऋतुतली प्रसन्न सकाळ.मस्त गोड गुलाबी थंडी.
कुठलासा हिरवाईने नटलेला वळणावळणाचा सुंदर घाट.चहुकडे पुसटसे धुके आणि धुक्यांतुन नागमोडी वळण घेत हलकेच धावणारी लांबलचक ट्रेन.रूळांच्या अगदी बाजुलाच असलेला चकचकीत डांबरी रस्ता आणि त्या डांबरी रस्त्यावर एक जुनाट जीप ट्रेनच्या स्पीडला मॅच करत चाललीय...गाडीमधल्या एम्प्लीफायरमध्ये किशोरचं जुन राॅमंटीक गाणं चालू आहे..आणि मी ही त्याच्या आवाजाला ठेका देत मस्त मुडमध्ये मोठ्याने राजेश खन्ना स्टाईलने गातोय.

"मेरी सपनों की राणी कब आयेगी तु...
आयी ऋत मस्तानी कब आयेगी तु..
बीती जाये जिंदगानी कब आयेगी तु..
चली आ...तु चली आ ...."

गात असताना माझी नजर माझ्या शर्मिला टागोरला प्रत्येक खिडकीत शोधतेय.कुठेतरी, कुठल्याशा खिडकीत असेलच ना ती पण छे कुठेच काही दिसत नाहीये.दिसतायेत फक्त पान गुटखा खाऊन थुंकणारे.दोन दिवस आंघोळ न केलेले भय्ये.
छी!पिक्चरमध्ये काहीही घडतं पण रिअलमध्ये हेच पाहायला मिळतं..असा विचार करून माझ्यातला राॅमेंटीक राजेश खन्ना गुपचुप बसणार तोच अगदी शेवटच्या खिडकीवर गोरापान हात आडवा ठेवलेला दिसला.तिच्या हाततालं नाजुक ब्रेसलेट कोवळ्या उन्हांत चमकतयं...तिचे रेशमी केस वार्याने खिडकीतल्या गंजामधून सैरभैर उडू पाहतायेत...तिचा चेहरा पाहता यावा म्हणून मी गाडी जोरात हाकतोय..अगदीच तिच्या जवळ जवळ येतोय आणि इतक्यातच शेजारांच्या किचनमधून आलेल्या कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने माझी झोपमोड झाली.

"यांच्या आईच्या डाळीचा भात" अशी शिवी देऊन चरफडतच उठून बसलो.सवयीने घड्याळ पाहीले.सकाळचे 9:30 वाजले होते अरे बापरे??आज प्रेझंटेशन आहे.लवकर लवकर आवरायला हवं.घाईघाईत पटकन तयार होऊन निघालोच मी.गाडी काढली स्टार्टर दिला तरी चालू व्हायचं नाव घेईना" हिला काय आजच तडपडायचं होत?" स्वतःशीच पुटपुटत जोराची किक मारली.कानातल्या हेडफोनमध्ये वाजणार्या गाण्यावर ठेका धरत मी भरधाव गाडी चालवत होतो.इतक्यात अचानक सिग्नल लागला."च्याआयला?? मी जेव्हा पण येतो त्याचवेळी कसा सिग्नल लाल होतो??"
सिग्नलवर काही टाईमपास करावा म्हणून उगाचचं मी आजुबाजुला पाहतोय.कानातल्या हेडफोनमध्ये तेच आपलं फेवरेट " मेरी सपनों की रानी कब आयेगी तु" वाजतयं.
"अल्लक निरंजन" करत सिग्नलवरच्या फकीराच्या भांड्यातून हलका हलका धुर येतोय..त्याच्याच बाजुला एक छोटी मुलगी मोगर्याच्या फुलांचा गजरा विकतेय आणि त्यांचा तो
सुवास आजुबाजुला दरवळतोय अशातच माझी नजर बाजुच्याच मिनीबसमधल्या खिडकीवर जाते.सकाळी दिसलेला तसाच नाजुक गोरापान हात खिडकीवर आडवा ठेवलेला.खिडकीच्या गंजामधून भुरभुरणारे रेशमी केसं..यार हिचा चेहराच दिसत नाहीये.मी थोडंसं उभ राहून चेहरा पाहायचा प्रयत्न करतोय इतक्यातच सिग्नल सुटला आणि ती बस पुढे गेलीसुद्धा.

माझं ना असंच होतं नेहमीच.सहज घडणारी गोष्ट कधी घडतच नाही पण आज एक संकेत मला मिळाला होता सकाळच स्वप्न आणि आता जे घडलं त्यात खुपच साम्य होतं.असो...स्वप्नेही कधी कधी खरी होतात तर...अॅनिवेय मी ऑफिसला पोहचलो तिच्या नादात थोड लेटच झालं मला.मी भराभर आवरून मिंटींग रूममध्ये पोहचलो.आजच प्रेझंटशन सकाळच्या त्या घटनेने जरा बोंबललचं.बोलताच आलं नाही मला नीट.नशीब internal होतं external असतं तर वाट लागली असती.

सारं संपल्यावर काहीतरी खावं आणि तसंही सकाळी काहीच खाल्लं नव्हत म्हणून कॅटीनमध्ये आलो.कॅटीनच्या लाकडी धक्यावर उगाचच तबला वाजवत मी ऑर्डर दिली आणि मुकाट्याने जवळच टेबल घेऊन बसलो.मी मोबाईल चाळता चाळता खात होतो इतक्यात बाजुच्या टेबलावर माझी नजर गेली.टेबलावर ओरेंज ज्युसनी भरलेला ग्लास आणि त्याच्या बाजुलाच अर्धा फोडलेला ओरिओ बिस्कीटचा पुडा.त्याच्याचपुढे कुणीतरी अनोळखी मुलगी बसली होती.
पुड्यातलं एक एक बिस्कीट ऑरेंज ज्युसमध्ये बुडवुन "ती" खात होती.

"ईऽऽऽ फ्रिक...ऑरेंज ज्युस विथ ओरिओ बिस्कीट कुणी खात का?? बावळटच आहे." नकळत मनातच मी बोलून गेलो.

एव्हाना माझं खाऊन झालंच होतं मी जड पावलाने माझ्या डेस्ककडे जायला वळलो.डेस्कवर पोहचल्यावर पाहतो तर काय माझा डेस्क चित्रविचित्र टाॅईज ने भरला होता.राॅकेट्स घेतलेले मिनिअन्स, डंबल्स घेतलेले मिनिअन्स,युनिकाॅर्न,ट्रान्सफाॅर्मर, बार्बी डाॅल,स्पायडरमॅन आणि बरेच काही.पीसीच्या कडेला स्टीकी नोट्स चिटकवलेली.काय लिहलं होत बरं त्यावर..

" If "A" plan fails remember that you have 25 letters left"

पाठीमागच्या वाॅलला शाहरूख काजोलचा फोटो.

मी गोंधळून सगळं बघतच होतो की,पाठिमागून नयनाने आवाज दिला...नयना माझी बाॅस...

"हर्षऽऽ युवर प्लेस हॅज बिन चेंजड...ओवर देअर..गो अॅण्ड सिट देअर..."

चरफडतच जाऊन बसलो मी.खरंतरं ती माझी आवडती जागा होती.ऑफिसमधली सगळी हिरवळ दिसायची तिथून.

माझी जागा चेंज झाली म्हणजे नक्कीच कुणीतरी नविन पाखरू आलेलं दिसतयं.बहुतेक "ती"च बावळट असावी.

माझा अंदाज खरा होता तर.मला समोरून "ऑरेंज ज्युस विथ ओरिओ .काॅम " येताना दिसली.स्ट्रेटनिंग केलेली मोकळी केस, कपाळावर हलकासा शोभणारा तीळ, चाॅकलेटी मोठे डोळे,गोरा रंग,मध्यम बांधा आणि ओठावर मधाळ हास्य,काॅफी कलरचा टाॅप आणि क्रिम कलरची ट्राऊजर.अरे ही तर "गोरी गोरी पान फुलासारखी छानच"

मगाशी इतकं निरखून पाहील नव्हतं पण आता दिसतयं ना...आल्या आल्या नयना मॅडमने तिची सगळ्यांची ओळख करून दिली.प्रत्येकाबरोबर हसतमुखाने तिने ओळख करून घेतली.हॅन्डशॅक करताना प्रत्येकाच्या हातात एक मॅलोडी चाॅकलेट कोंबल तिने.हे भारी आहे.आधीच दिसणं इतकं सुंदर त्यात नावही गोंडस "अन्यना" आणि वागणंही लोभसं...

आता नविन प्रोजेक्ट माझ्याकडेच आहे म्हणजे मलाच ही पार्टनर म्हणून मिळणार ह्या आशेने मनामध्ये लाडू फुटत होते.

कधी कधी ना देव आपल्या मनातलं बरोबरं ओळखतो म्हणजे नवस, प्रार्थना,विनवण्या असं काही करावं लागतच नाही जे आपल्याला हवं असतं नेमकं तसचं घडत जातं.आता मनात लाडू फुटलेच होते की नयनाने अनाऊसदेखिल केलं की अनन्या मला असिस्ट करणार आहे म्हणून..इतका आनंद झाला सांगू? जोरात "याहू" असं ओरडावसं वाटतं होतं पण मी आवरत घेतलं.

.....................................................................................

तिचा पहिला दिवस होता म्हणून अर्धा अधिक तिचा दिवस ओळखी पाळखी,कंपनीच्या पाॅलिसीज,कामाच स्वरूप,कंपनीचे रूल्स आणि ते फडतूस एच.आर.इंडक्शन ह्यातच गेला त्यामूळे ती फारशी माझ्या वाटेला आलीच नाही आणि मलाही आज क्लायंट काॅल होता.मी केलेल्या एका जुन्या प्राॅजेक्टसंदर्भात क्लायंटला काही इश्श्यूज होते सो ते जरा साॅर्ट आऊट करायचे होते.ह्याचं एकदा लचांड संपल की नविन प्रोजेक्टवर काम करायला मी मोकळा म्हणून आजच सगळ संपवायचं होतं.सगळं साॅर्ट आऊट करता करता खुपच उशिर झाला.अख्खं ऑफिस केव्हाच रिकामं झालं होतं.मी पण थकलेल्या मनाने निघालो.जेव्हा जेव्हा मी असा कुत्र्यासारखा काम करून थकतो ना तेव्हा तेव्हा उशिरा घरी जाताना थोडासा रिफ्रेश होऊनच जातो.पावले साॅरी चाके आपोआप वेलकम रेस्टोंरेंट अॅण्ड बारकडे वळाली.मस्त वरच्या मोकळ्या टेरसवर असलेल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसलो.सोमवार असल्याने फारशी गर्दी नव्हती.कोपर्यातल्या टीव्ही स्क्रीनवर "जबसे तुमको देखा है सनम क्या कहे" कुमार सानू हीट्स लागलेलं..वेटरने नेहमीप्रमाणे ऑर्डर न देताच दोन हाफ फ्राय,एक मुगदाल मसाला, चार गोल्डफ्लॅक, 90 ओडका आणि ऑरेंज ज्यूस टेबलावर आणून दिलं.. ऑरेज ज्यूस आणि ओडका माझं फेवरट काॅम्बिनेशन..ऑरेंज ज्यूस विथ ओडका ठीक आहे पण ऑरेंज ज्यूस विथ ओरिओ..? मला सकाळची ती आठवली.
सिगारेट शिलगाऊन कश मारला तेव्हा कुठे जरा बरं वाटलं मला..
घोट घेता घेता मी सहजच आजुबाजूला बघू लागलो.पलिकडच्या बाजुला असलेल्या फॅमिली सेक्शनमध्ये कुठलातरी ग्रुप एका मुलीचा बर्थडे सेलेब्रेट करत होता मध्येच स्ट्रिप्स असलेल्या काचेच्या भिंतीमुळे ऐकू काही येत नव्हतं फक्त जिथे स्ट्रीप्स नाहीयेत तिथून थोडंस दिसतं होतं.मीही आपला घोट घेत घेत पाहत होतो.केक कापून झाला..ज्या मुलीचा बर्थडे होता तिच्या चेहर्यावर केक माखून झाला.. मग एका मुलीने आपला मोबाईल काढून बर्थडे गर्लभोवती जमा झालेल्या घोळक्याचा सेल्फी काढायला सुरूवात केली.मोबाईल घेतलेल्या हातात काहीतरी चमकत होतं.बहुतेक ब्रेसलेट असावं..जाऊ दे आपल्याला काय त्याच? असं म्हणून मी माझ्या पेगवर काॅन्सट्रेट करायचं ठरवलं..
त्याचवेळी स्क्रिनवर "मेरा चांद मुझे.. आया है नजर..ऐ रात जरा थम थम के गुजर" हे गाणं लागलं होतं आणि नेमकी त्याचवेळी माझ्या मनात वीज चमकली मला सकाळचा तो हात आणि ब्रेसलेट आठवलं आणि आता पाहीलेलं ते ब्रेसलेट तसचं होतं.
मी पटकन पलीकडे पाहीलं.तो ग्रुप निघून गेला होता.मी काऊंटरवरच्या शेट्टीला आलोच असा इशारा करून पळत खाली जाऊन बघितलं.काही पार्कीग केलेल्या गाड्या आणि एका काळ्या कुत्र्याशिवाय कुणीच नव्हत तिथे..

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan surwat,
नावावरून तरी यश चोपडा स्टाईल गोग्गोड लव स्टोरी वाटते आहे

अजय वर्णनशैली छान पण इंग्रजी शिर्षक ...माफ करा पण मराठी योग्य पर्याय नाही का ?

धन्यवाद मन्या ऽ..
लवकरच पुढचा भाग लिहणार आहे...म्हणजे आधी लिहलेला ड्राफ्ट तयार आहे पण मी वाचल्यानंतर मलाच इतका आवडला नाही...सो समर्पक शेवट सुचल्यावर ही कथा पूर्ण करायचा प्रयत्न करेल..

धन्यवाद साळुंखे सर...

सहज सुचल म्हणून हे शिर्षक ठेवलं आहे .आणि कथानायक mnc त कामाला आहे आणि थोडासा इंग्राजळलेलादेखिल..म्हणून त्याच्याच दृष्टीकोनातून हे शिर्षक ठेवलं आहे..