माझी सैन्यगाथा (भाग २१)

Submitted by nimita on 2 May, 2019 - 07:15

एका सोमवारी नवरा आणि मुलगी यांची पाठवणी केल्यानंतर मी माझ्या स्कूटरवर आरूढ होऊन कून्नूरच्या दिशेनी कूच केलं.आमचं घर डोंगरमाथ्यावर असल्यामुळे कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना अगदी एखाद्या मोहिमेसाठी गडउतार होत असल्याची फीलिंग यायची. त्यात भर म्हणजे मी पुण्याची असल्यामुळे चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळल्याशिवाय स्कूटर चालवण्याचा अपराध माझ्या हातून होणे नाही.....स्कार्फ च्या बरोबर माझा सनकोट, हॅन्ड ग्लोव्हज आणि हेल्मेट असा सगळा जामानिमा केल्यावर अगदी युद्धासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घालून सज्ज झाल्यासारखं वाटायचं. त्या दिवशीही मी अशीच तयार होऊन 'Crown Bakery' ला भेट द्यायला निघाले.

त्या दिवसांत gps फारसं प्रचलित नसल्यामुळे एखादी जागा किंवा पत्ता शोधण्यासाठी आम्ही न लाजता रस्त्यावरच्या लोकांना विचारायचो आणि मुख्य म्हणजे ते ही तितक्याच उत्साहानी मदत करायचे !!

पण मला जास्त कोणाला विचारायची किंवा शोधाशोध करायची गरजच नाही भासली. पहिल्या प्रयत्नातच यश मिळालं..In fact, जेव्हा मी एका माणसाला "Crown Bakery किधर है?" असं विचारलं तेव्हा त्यानी ज्या दयाभूत नजरेनी माझ्याकडे पाहिलं ना...जणू काही तो म्हणत होता,"हे अज्ञानरुपी अंधःकारात चाचपडणाऱ्या बालिके, तुला crown बेकरी शोधायची गरज पडावी !" पण तरीही शक्यतो नॉर्मल चेहेरा ठेवत माझ्या त्या उद्गारकर्त्यांनी मला उचित मार्ग दाखवला आणि पुढच्या काही मिनिटातच मी माझ्या इच्छित स्थळी जाऊन पोचले. रस्त्याच्या कडेला स्कूटर पार्क करून समोर पाहिलं...आणि एका घरवजा दिसणाऱ्या ब्रिटिश काळच्या इमारतीवर मोठा बोर्ड दिसला...

CROWN BAKERY

(ESTD 1880)

बरंच काही ऐकलं होतं या बेकरी बद्दल ! (अर्थातच pck !!) १८८० साली मोहम्मद शरीफ नावाचे एक सद्गृहस्थ हैदराबाद हून कून्नूर ला आले आणि त्यांनी ही बेकरी सुरू केली. प्रथमदर्शनी जरी ही बेकरी अगदी साधी, इतर कोणत्याही बेकरी सारखी दिसत असली तरी तिचा स्वतःचा असा एक इतिहास आहे.

२ फेब्रुवारी १९३४ या दिवशी महात्मा गांधींची पायधूळ या बेकरी ला लागली होती. हो, त्यांच्या कून्नूर भेटीत गांधीजी या बेकरी मधेही आले होते.

आज जेव्हा मी या बेकरी बद्दल लिहायचं ठरवलं तेव्हा थोडी अधिक माहिती मिळावी म्हणून इंटरनेट वर चेक केलं तेव्हा ही माहिती मिळाली. इथल्या रेसिपीज सुद्धा या बेकरी इतक्याच जुन्या आहेत बरं का! पण फक्त रेसिपीज च नाही तर त्या काळातले काचेचे vintage bell jars पण अजूनही इथल्या काचेच्या shelves वर विराजमान आहेत.

हा bell jars चा फोटो मला या बेकरी च्या फेसबुक पेज वर सापडला.

विश्वयुद्ध काळातली दोन घड्याळंही आहेत इथे.बेकरीच्या उंबऱ्याला अजूनही त्या काळचे iron scrapers लागलेले आहेत. त्या काळचे लोक आत प्रवेश करताना आपल्या बुटांवरची माती, चिखल या iron scrapers वर स्वच्छ करत असत.

इथल्या ginger cookies खूप प्रसिद्ध आहेत. आणि मी तर असंही ऐकलं होतं (pck, of course) की पुण्यात चितळेंची बाकरवडी जशी अर्ध्या तासात संपते तशाच Crown Bakery च्या या ginger cookies देखील आपल्या डोळ्यांदेखत नाहीशा होतात...

तर अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बेकरी च्या समोर मी त्या दिवशी उभी होते. घाबरतच आत शिरले आणि त्याहूनही घाबरत विचारलं," Ginger cookies हैं क्या?" "खतम हो गयी ।" असं ऐकायला म्हणून मी मनाची पूर्ण तयारी केली होती. पण माझा प्रश्न संपायचा आत माझ्या समोर काउंटर वर ginger cookies चं एक पॅकेट अवतरलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते तिथून उचललं. पैसे देऊन बाहेर निघताना माझ्या चेहेऱ्यावर 'मोहीम फत्ते' झाल्याचं विजयी हास्य झळकत होतं.

त्या संध्याकाळी जेव्हा माझ्या मैत्रिणींना मी ही बातमी सांगितली तेव्हा त्या सगळ्या आश्चर्यचकित झाल्या.. अचानक त्यांच्या डोळ्यांत माझ्या बद्दल आदर दिसायला लागला. हळूच एकीनी विचारलं," पहाटेच जाऊन बसली होतीस का गं तिथे ..नंबर लावून?"

माझ्याकडून प्रेरणा घेत त्यातल्या दोघी तिघीनी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गडउतार व्हायचं ठरवलं आणि आमची मीटिंग बरखास्त झाली.

माझ्या Must see आणि Must buy च्या लिस्ट मधल्या एका नावा समोर मी tick केलं...Crown Bakery आणि तिथल्या Ginger cookies.

आता लिस्ट मधलं अजून एक नाव खुणावत होतं..'केत्ती' गाव आणि तिथल्या hand embroidery केलेल्या वस्तू!!

माझ्याप्रमाणेच माझ्या मैत्रिणी पण त्यांचं त्यांचं pck गाठीला बांधून आल्या होत्या. एका मैत्रिणीकडून कळलं की केत्ती मधे काही ठिकाणी 'made to order ' अशा एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या मिळतात. तिच्याकडे त्या दुकानांची नावं आणि पत्ते पण होते. म्हणजे आपण त्यांना जे डिझाइन आणि रंगसंगती सांगू त्याप्रमाणे त्या बायका आपल्याला साडीवर भरतकाम करून देतात..आणि त्यांचं कामही खूप नाजूक आणि सफाईदार असतं. खरं म्हणजे मला तिथल्या साड्यांपेक्षा इतर वस्तू बघायला जास्त आवडलं असतं..खास करून टेबल लिनन आणि बेड लिनन मधे मला जास्त इंटरेस्ट होता. पण एकच अडचण होती आणि ती म्हणजे- या सगळ्यासाठीची वेटिंग लिस्ट खूप लांब असते....अगदी चार पाच महिने सुद्धा!

त्यामुळे सर्वानुमते असं ठरलं की लवकरात लवकर केत्ती चं दर्शन घ्यायचं! आणि मग त्यादृष्टीनी आम्ही आमची प्लॅंनिंग करायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच...
ब्लाॅगवर फोटो दिसताहेत... Happy